वाचा विकृतीवर मात!
जवळजवळ आठ दशकांपासून सावध राहा! नियतकालिकाने आपल्या वाचकांना दैनंदिन समस्यांचा सामना करण्यास साहाय्य केले आहे. कधीकधी तर, त्यांच्या जीवनांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडणाऱ्या वैद्यकीय प्रांतातील अभिनव विकासांसंबधी व दृष्टिकोनांसंबंधी ते त्यांना जागरूक करते; हेच पुढील घटनेवरून स्पष्ट होते.
सन १९८९ मध्ये इंग्लंडच्या उत्तर भागात मॅथ्यूचा जन्म झाला होता. वयाच्या दुसऱ्या वर्षांपर्यंत तो अगदी नॉर्मल होता. पण मग, एकदा सुटीवर असताना अचानक असे घडले की त्याला नीट बोलताच येईना.
त्याची आई मार्गरेट म्हणते: “यांनी आणि मी स्थानिक वाचा चिकित्सा विभागात याबाबतीत विचारपूस केली तेव्हा आम्हाला असे सांगण्यात आले, की तो सात वर्षांचा होईस्तोवर काहीच केले जाऊ शकत नाही कारण या वयापर्यंत मुले आपल्या स्वरतंतुंवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. पण, मॅथ्यू शाळेत जाऊ लागला तेव्हा इतर मुलांचे चिडवणे त्याला सहन होईना आणि त्यामुळे तो आणखीनच अडखळत बोलू लागला. चारचौघांत वावरणं त्याला अगदी नकोसं झालं आणि तो सहसा फटकूनच राहू लागला. राज्य सभागृहात सभांना जायलाही तो घाबरायचा.
“मग, एप्रिल ८, १९९५ च्या (इंग्रजी) सावध राहा! नियतकालिकेतील ‘जगावरील दृष्टिक्षेप’ या सदराखाली आम्हाला, ‘वाचा विकृती असणाऱ्यांना आशा’ ही माहिती आढळली. त्यात, लहान मुलांतील वाणी दोषावर उपचार करण्यात यशस्वी झालेल्या सिडनी, ऑस्ट्रेलिया येथील वाचा चिकित्सक संघाच्या कार्याची संक्षिप्त माहिती देण्यात आली होती.
“आम्ही सिडनीच्या विद्यापीठाशी पत्रव्यवहार केला आणि डॉ. मार्क आन्झलो यांनी आमच्या पत्राचं छानसं उत्तर देऊन आम्हाला टेलिफोनवर त्यांच्याशी बोलण्याचं सुचवलं. आम्ही जगाच्या दुसऱ्या टोकाला राहात असल्यामुळे त्यांच्या वाचा चिकित्सक संघाने तिथूनच एका खास पद्धतीने उपचार करण्याचे ठरविले. मॅथ्यूचे पालक या नात्याने टेलिफोन, फॅक्स आणि ऑडिओ-टेपद्वारे आम्हाला देखील संघाच्या तंत्राविषयीचं प्रशिक्षण दिलं गेलं. खास मॅथ्यूच्या वैयक्तिक गरजा लक्षात ठेवून या चिकित्सेत थोडेफार बदल करण्यात आले होते. मी त्यासोबत अगदी आरामात बसायचे आणि ज्या शब्दांचा उच्चार करण्यात त्याला अडचण होत असे त्यांचे उच्चारण सुधारण्यात त्याची मदत करत असे. तो ‘स्पष्ट’ बोलायचा तेव्हा मी त्याची खूप प्रशंसा करायचे आणि त्याला एखादं छोटंसं बक्षिसंही द्यायचे.
“सहा महिन्यांनंतर मॅथ्यू अगदीच बदलला; तो आधीसारखा बुजरा राहिला नव्हता, खेळकर आणि मनमिळावू झाला. आता तो मंडळीच्या सभांमध्ये सहभाग घेतो आणि राज्य सभागृहात बायबलचे वाचन करायला तर त्याला फारच आवडतं. घरोघरच्या सेवेतही तो अर्थपूर्ण सहभाग घेतो. आज तो अगदी स्पष्ट बोलू शकतो!
“आमच्या लाडक्या मॅथ्यूचं जीवन बदलून टाकणाऱ्या सावध राहा! नियतकालिकेतील त्या छोट्याशा माहितीसाठी आम्ही शतशः आभारी आहोत!”—सौजन्याने.