लहान बेटाचे व्यस्त विमानतळात परिवर्तन
हाँगकाँगमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
काय टाक या हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या विमानाच्या खिडकीतून एकीने खाली पाहिले तर तिला धक्काच बसला. “आपल्या ह्या विमानानं ह्यांच्या इमारतींवरील ॲन्टिना तर उडवले नसतील ना?” असे तिला क्षणभर वाटले. काऊलुन शहराजवळच्या एका इमारतीच्या टेरसवर कपडे वाळायला घालणाऱ्या एका बाईने गरजत येणाऱ्या विमानाला पाहून पटकन कानांवर हात ठेवले.
अनेकदा या धोकेदायक क्षेत्रात विमान उतरवलेल्या जॉन नामक विमानचालकाने असे म्हटले: “इथले डोंगर म्हणजे खरं तर डोक्याला तापच आहे. वायव्य दिशेकडून विमान उतरवायचं म्हटलं तर रनवेच्या आधी येणारं वळण पाहून नाही म्हटलं तरी धडकी भरतेच. इतकंच नाही, तर या डोंगरटेकड्यांमुळे वाऱ्याच्या प्रवाहातही अचानकपणे बदल होतो.”
जीव मुठीत धरून बसलेल्या प्रवाशांना, वैमानिकांना आणि विशेषतः काऊलुन शहरातील रहिवाशांना काय टाक विमानतळ केव्हा एकदाचे बंद होईल असे झाले होते. तो दिवस आला मात्र. हाँगकाँग शहरात नवीन विमानतळ जुलै १९९८ पासून सुरू झाले.
बेटावर विमानतळ
एकोणीसशे ऐंशीच्या दशकात, काय टाक विमानतळ अपुरे पडू लागले. आणखी वाढवायला कोठेच जागा नसल्यामुळे, नवीन विमानतळासाठी जागेचा शोध घेण्यात येऊ लागला. पण हाँगकाँगमध्ये विमानतळासाठी पुरेशी सपाट जमीन अशी कोठेच नव्हती. विमानाचा गोंगाट यामुळे लोकांनासुद्धा आसपास विमानतळ नको होते. यावर उपाय? लानटॉ या द्वीपाचा विस्तार प्रचंड असला तरी म्हणावा तितका त्याचा विकास अद्याप झालेला नव्हता. या द्वीपाच्या उत्तर दिशेला असलेल्या चेक लप कॉक बेट विमानतळाकरता निवडण्यात आले. कोणताही सिव्हिल इंजिनियर आनंदाने स्वीकारील अशी ही आव्हानात्मक कामगिरी होती.
विमानतळाकरता त्या लहानशा बेटाची व बाजूच्या आणखी एका छोट्या बेटाची जमीन सपाट करावी लागली, शिवाय समुद्रामध्ये सुमारे साडेनऊ चौरस किलोमीटर जमीन निर्माण करावी लागली. विमानतळाला आणि हाँगकाँग शहराला जोडण्यासाठी बेटांच्या आणि खाडींच्या वरून कमानीसारखा काऊलुन शहरातून व व्हिक्टोरिया बंदरातून जाणारा ३४ किलोमीटरचा लोहमार्ग आणि प्रशस्त राजमार्ग बांधण्यात आला. त्यासाठी पूल आणि बोगदे पुन्हा बांधावे लागणार होते. एकंदर, हा जगातला सर्वात मोठा बांधकाम प्रकल्प ठरला आहे.
बेटे ओलांडण्यासाठी अनोखे पूल
लानटॉ बेटाला हाँगकाँगशी जोडणारा लानटॉ लिंक—जगातले एक अपूर्व वैशिष्ट्य पाहायला हाँगकाँगमध्ये हजारो लोकांची गर्दी जमते. लानटॉ लिंक म्हणजे लानटॉ बेट आणि मा वान या लहानशा बेटाला जोडणारा केबल-स्टेड पद्धतीचा पूल, मा वान बेटावरून जाणारा वायाडक्ट पूल तसेच मा वान आणि चिंग यी या दोन्ही बेटांना जोडणारा १,३७७ मीटर लांबीचा सस्पेन्शन पूल. या पुलांच्या लांबीचे डबल-डेक पूल अख्ख्या जगात कोठेच नाहीत; वरच्या डेकवर वाहनांसाठी एक रस्ता आणि एक लोहमार्ग आहे, तर खालच्या भुयारीसारख्या बंद डेकवर वाहनांसाठी दोन मार्ग आहेत.
सस्पेन्शन पुलाला आधार देणाऱ्या केबल्स दुरून धाग्यांसारखे नाजूक दिसतात. इंजिनियरांचे कोठे चुकले तर नाही, पूल पाण्यात कोसळून पडायचा तर नाही असे वाटू लागते. पण जवळून पाहिले तर केबल्स दिसतात तितक्या नाजूक नाहीत हे कळते. या १.१ मीटर रुंदीच्या केबल्समध्ये १,६०,००० किलोमीटरच्या वायरी आहेत—पृथ्वीला चक्क ४ वेळा घेरा मारू शकतील इतक्या लांब! तितक्याच जाडीच्या केबल्स आवश्यक आहेत कारण पुलावरच्या ५०० टन वजनाच्या डेकच्या ९५ तयार तुकड्यांचा सर्व भार त्यांच्यावरच आहे. केबल्स लावून झाल्यावर हे तयार तुकडे बोटीने पुलाच्या खाली नेऊन त्यानंतर वर उचलून पुलावर बसवण्यात आले.
सस्पेन्शन केबल्सना आधार देणारे खांब उभारताना आसपासच्या रहिवाशांना पाहायला मजा वाटली. सहसा बांधकाम करतेवेळी परांची बांधतात, पण तसे काहीही न करता या पुलाचे खांब उभारण्यात आले होते. याकरता बिल्डर्सनी स्लिपफॉर्मिंग पद्धत वापरली. या पद्धतीत, सहज हलवता येण्याजोग्या साच्यांमध्ये काँक्रीट ओततात आणि हे सबंध साचे हळूहळू वर ढकलले जातात; त्यामुळे प्रत्येक वेळी साच्याची काढ-घाल करायची गरज नसते. या नव्या पद्धतीने, बिल्डर्सनी पुलाचा एक तब्बल १९० मीटरचा खांब अवघ्या तीन महिन्यांत उभारला.
हाँगकाँग हे वादळी कटिबंधात मोडते. तेव्हा या पुलावर जोरदार वाऱ्यांचा काय परिणाम होईल? संयुक्त संस्थानांतील वॉशिंग्टनमध्ये १९४० साली, ताशी ६८ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने जुन्या टाकोमा नॅरोझ पुलाचा जणू बांबूचा असल्याप्रमाणे पार चेंदामेंदा करून टाकला होता. पण तेव्हापासून पुलांच्या डिझाईनमध्ये बरीच प्रगती झाली आहे. ताशी ३०० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रतिबंध करू शकणाऱ्या या नवीन डिझाईनच्या पुलांच्या नमुन्यांची आधी चाचणी घेण्यात आली होती.
विमानतळावरून शहरात फक्त २३ मिनिटांत!
नवीन विमानतळ सध्याच्या काय टाक येथील विमानतळापेक्षा चार पटीने दूर असले, तरी काय टाक विमानतळाच्या तुलनेत नवीन विमानतळापासून हाँगकाँग बेटावर यायला फार वेळ लागत नाही. का तर, ताशी १३५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेन्स हाँगकाँगच्या व्यापारी केंद्रातून जातात—या केंद्राला देण्यात आलेले सेंट्रल हे नाव अगदी साजेसे आहे. प्रथम, लानटॉच्या उघड्या पर्वतांचा सुंदर देखावा येथून पाहण्यास मिळतो. बेटे पार करून ट्रेन प्रमुख प्रदेशात येताना क्वाय चाँग हे जगातले सर्वात मोठे कन्टेनर बंदरही रस्त्यात लागते. त्याच्या आणखी पाच किलोमीटर पुढे गेल्यावर १,७०,००० लोकवस्ती असलेले माँग कॉक येते. त्यानंतर, चिम शॉ चुई हे पर्यटन स्थळ येते, आणि मग बंदराखालून जाणाऱ्या बोगद्यातून सेंट्रलच्या शेवटल्या स्टेशनवर ट्रेन येऊन थांबते—विमानतळापासून येथपर्यंत हा प्रवास फक्त २३ मिनिटांचा!
पुढचा विचार करून तयार केलेले विमानतळ
डिसेंबर १९९२ मध्ये, चेक लप कॉक हे ३०२ हेक्टरचे खडकाळ बेट होते. पण जून १९९५ पर्यंत त्याचा पूर्ण कायापालट झाला होता; नवीन विमानतळासाठी याचा १,२४८ हेक्टरचा प्रदेश सपाट करण्यात आला आणि हाँगकाँगचे क्षेत्र जवळजवळ १ टक्क्याने वाढले. एकीकडे, ४४,००० टन वजनाच्या शक्तिशाली स्फोटकांचा वापर करून आधीच्या बेटावरची जमीन सपाट करण्याचे काम चालू होते, तर दुसरीकडे कित्येक जहाजांद्वारे समुद्रतळाची वाळू काढून ती बेटावर आणली जात होती. एकदा तर बांधकामाला एवढा वेग आला होता, की दिवसाकाठी पाच एकरच्या हिशेबाने समुद्रातून जमीन तयार केली जात होती. या बांधकामाच्या सबंध ३१ महिन्यांमध्ये, सरासरी एका सेकंदाला दहा टन बांधकाम साहित्याची हालवाहलव करण्यात येत होती. कंत्राटदारांनी जमीन तयार करण्याचे थांबवले तोच विमानतळ बांधणीचे कामकाज सुरू झाले.
या प्रकल्पात गोवलेल्या स्टीव्हने या प्रकल्पाविषयी काही खास गोष्टी सांगितल्या: “रनवे ठीक नसले, तर आजच्या जंबो जेट विमानांमुळे ते खराब होऊ शकतात. म्हणून डांबरीकरणाआधी वाळू घट्ट बसवताना अजस्र रोलर उपयोगात आणले गेले. रोलर फिरवून पहिला रनवे आणि विमाने उभे करण्याची जागा पूर्ण झाली तेव्हा या विशाल रोलरांनी १,९२,००० किलोमीटर इतकं—जगाभोवती पाच फेऱ्या मारून येण्याइतकं अंतर कापलं होतं.
“तिथले रेल्वे स्टेशन बनवण्याचं कंत्राट आमच्या कंपनीकडे होतं; आम्ही छताचे स्टील ब्रॅकेट तयार करून उभे केले. त्या प्रत्येक ब्रॅकेटचं वजन जवळजवळ १५० टन होतं. लांबलचक ट्रकवर भल्या मोठ्या क्रेनच्या साहाय्याने हे ब्रॅकेट चढवून त्यांना ताशी २ किलोमीटर वेगानं स्टेशनापर्यंत आणण्यात आलं.”
हे स्टेशन काँक्रीटच्या कोंदट चौकोनी इमारतीसारखे नाही. उलटपक्षी त्याची बांधणी करताना तेथे भरपूर प्रकाश असेल आणि हवा खेळती राहील तसेच विमानतळाच्या सर्व कर्मचाऱ्यांकरता आणि प्रवाशांकरता ते सुखकारक ठरेल, या सर्व गोष्टींचा विशेष विचार करण्यात आला होता. शिवाय, विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना विनाविलंब पोहंचवता येईल याची देखील व्यवस्था करण्यात आली. चेक-इन काऊंटरवर पोहंचल्यावर त्यांना विमानात बसायला अर्धा तासही लागत नाही. येणे-जाणे सुलभ व्हावे म्हणून, स्टेशनच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवाशांची ने-आण करणारी एक ट्रेन आहे—ही ट्रेन चालकाविना चालते. शिवाय, चालून चालून दमलेल्या लोकांकरता २.८ किलोमीटरचे धावते वॉकवे आहेत.
स्टीव्ह पुढे सांगतो: “सन १९९५ मध्ये, काय टाक विमानतळात २.७ कोटींहून अधिक प्रवासी गेले! पण आताच्या या नवीन विमानतळावर दर वर्षी ३.५ कोटी प्रवासी येऊ शकतात आणि ३० लाख टन माल उतरवला जाऊ शकतो. भवितव्यात हे विमानतळ ८.७ कोटी प्रवासी आणि ९० लाख टन माल सामावू शकेल!”
या प्रकल्पात हाँगकाँग पाण्यासारखा पैसा ओतत आहे—जवळजवळ २० अब्ज डॉलर खर्च केले जात आहेत, किंवा हाँगकाँगमधील ६३ लाख रहिवाशांपैकी प्रत्येकामागे सुमारे ३,३०० डॉलर खर्च केले जात आहेत. चेक लप कॉक विमानतळामुळे हाँगकाँगची आज जशी भरभराट होत आहे तशीच यापुढेही होत राहील अशी आशा आहे. प्रत्यक्षात काय घडते, ते येणारा काळच सांगेल; परंतु, विमानाने हाँगकाँगमध्ये उतरण्याचा क्षण अविस्मरणीय असेल हे मात्र नक्की.
[१२ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
विमानतळावरील रेल्वे
चेक लप कॉक येथील विमानतळ
लानटॉ बेट
उत्तर लानटॉचा प्रशस्त राजमार्ग
लानटॉ लिंक
काप शुई मुन पूल
चिंग मा पूल
पश्चिम काऊलुनचा प्रशस्त राजमार्ग
काऊलुन
काय टाक येथील विमानतळ
हाँगकाँग बेट
[१३ पानांवरील चित्र]
चिंग मा पुलाचे बांधकाम चालू असताना
[११ पानांवरील चित्राचे श्रेय]
New Airport Projects Co-ordination Office