डेंग्यू—चावण्यामुळे संभवणारा ताप
फिलिपाईन्स येथील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
नकळत एक डास एका लहान मुलीच्या हातावर बसतो आणि तिचे रक्त शोषू लागतो. एवढ्यात, तिच्या आईचे लक्ष त्या डासावर पडते. ती एक चापटी मारते आणि डास तिथल्या तिथेच खल्लास. पण, इथेच सगळे काही संपले का? कदाचित नाही. डास मेला असेल, पण त्याने त्या लहान मुलीच्या रक्त प्रवाहात जो क्षणिक शिरकाव केला होता त्यामुळे नको असलेले जंतू तिच्या शरीरात राहिले असतील ज्याने रोग संभावू शकतो.
दोन आठवड्यांनंतर, त्या मुलीमध्ये थंडी, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागच्या बाजूला वेदना, तीव्र सांधेदुखी आणि तीव्र ज्वर ही लक्षणे आढळतात. हा आजार वाढल्यावर, तिच्या अंगावर लाल चट्टे उठतात आणि ती पार क्षीण होऊन जाते. तिला डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे; डासाच्या चावण्याने संभावणारा हा ज्वर आहे.
परंतु, त्या मुलीला आधी डेंग्यूचा संसर्ग होऊन गेला असल्यास, तिला डेंग्यू रक्तस्रावी ज्वर (डीएचएफ) हा तीव्र स्वरूपाचा रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे, केशिका गळू लागतात आणि त्वचेखाली रक्तस्राव होऊ लागतो. आंतरिक रक्तस्राव होत असेल. योग्य उपचार न केल्यास, रुग्णाला तीव्र शॉक बसून अभिसरण खंडित होऊन तत्काळ मृत्यू संभावू शकतो.
डेंग्यू नेमका काय आहे? त्याचा तुम्हाला धोका आहे का? स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण तुम्ही कसे करू शकता? चला जरा जवळून परीक्षण करू या.
डेंग्यू काय आहे?
ब्रेकबोन फिवर असेही नाव असलेला डेंग्यू, डासांच्या चावण्यामुळे संभावणाऱ्या अनेक रोगांपैकी केवळ एक रोग आहे. हा रोग खरे तर विषाणूमुळे होतो. संसर्गित डासाच्या (अर्थात, संसर्गित व्यक्तीला चावलेल्या डासाच्या) लाळग्रंथीत हा विषाणू असतो. रक्त शोषण्यासाठी एखाद्या व्यक्तीला चावताना हा विषाणू त्या व्यक्तीमध्ये प्रवेश करतो.
डेंग्यू विषाणूचे चार प्रकार आहेत. एका प्रकारचा संसर्ग झाल्यास बाकीच्या तीन प्रकारांप्रती प्रतिबंधकता उरत नाही. एक संसर्ग होऊन गेल्यावर, त्या व्यक्तीला दुसऱ्या प्रकाराने संसर्गित असलेल्या डासाने चावले तर डीएचएफ होऊ शकतो.
“जगाची दोन पंचमांश लोकसंख्या” धोक्यात
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) २.५ अब्ज लोकांना अर्थात “जगाच्या दोन पंचमांश लोकसंख्येला” डेंग्यूचा धोका आहे. एशियावीकने अहवाल दिला: “शंभरहून अधिक उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधी देशांनी तेथे डेंग्यू आढळला असल्याचा अहवाल दिला आहे आणि नोंदलेली अशी कोट्यवधी प्रकरणे आहेत ज्यांमध्ये संसर्गित झालेली ९५% टक्के लहान मुले आहेत.”
जगात, सर्वप्रथम डेंग्यू केव्हा आढळला हे निश्चित माहीत नाही. १७७९ साली कायरोमध्ये ‘गुडघा ज्वराची’ नोंद करण्यात आली ती कदाचित डेंग्यूचीच असावी. तेव्हापासून, सबंध जगभरात डेंग्यू आढळला आहे. विशेषतः, दुसऱ्या महायुद्धानंतर, आग्नेय आशियातून सुरवात होऊन डेंग्यूचा मानवांच्या प्रकृतीवर खूप परिणाम झाला आहे. या विषाणूचे अनेकानेक प्रकार पसरू लागले आणि यामुळे सर्वात घातक रक्तस्रावी प्रकाराची निर्मिती झाली. डब्ल्यूएचओचे एक प्रकाशन म्हणते: “आशियात सर्वप्रथम रक्तस्रावी ज्वर खरोखर सुरू झाला तेव्हा १९५४ साली मनिला येथे त्याची ओळख पटली.” मग त्यापाठोपाठ थायलंड, व्हियतनाम, मलेशिया आणि शेजारील प्रदेश येथे विशेषतः तो पसरला. आग्नेय आशियात सुरवातीला हा आजार सुरू झाला तेव्हा तेथील मृत्यूप्रमाण १० ते ५० टक्के होते, पण या आजाराविषयी अधिक शिकून घेतल्यावर हे प्रमाण कमी झाले.
सन १९६० च्या दशकापासून, या विषाणूचा संसर्ग ज्या डासांमुळे होतो त्या डासांवर नियंत्रण करण्याच्या उपाययोजना ढिल्या पडल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव अचानक वाढला. डेंग्यू पसरत गेला त्यासोबत डीएचएफही पसरला. सन १९७० च्या आधी केवळ ९ राष्ट्रांमध्ये साथी होत्या, पण १९९५ सालापर्यंत या राष्ट्रांची संख्या ४१ इतकी वाढली. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार, दर वर्षी डीएचएफची ५,००,००० प्रकरणे इस्पितळात भरती केली जातात.
उष्णकटिबंधीय प्रदेशांबाहेर हा आजार इतका आढळत नसला, तरी अनेक बाबतीत असे होते की, प्रवासी, संसर्ग होण्याची अधिक शक्यता असलेल्या ठिकाणी जाऊन संसर्गित होतात आणि तो आजार आपल्यासोबत मायदेशी आणतात. उदाहरणार्थ, द न्यूयॉर्क टाईम्समध्ये १९९६ च्या उत्तरार्धात संयुक्त संस्थानांत—मॅसच्यूसेट्स, न्यूयॉर्क, ओरेगोन आणि टेक्सास येथे—डेंग्यूची प्रकरणे आढळल्याचे सांगण्यात आले होते.
डीएचएफचे विशेष धोके
आधी सांगितल्याप्रमाणे, डीएचएफ हा डेंग्यूचा प्राणघातक प्रकार आहे. डीएचएफचा एक धोका म्हणजे, हा इतका काही गंभीर आजार नाही असा लोकांचा गैरसमज होतो. अनेकांना वाटते की हा फ्ल्यू आहे. परंतु, दिरंगाई केल्याने, हा आजार आणखी गंभीर होऊन रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण फार कमी होते, रक्तस्राव होऊ लागतो (आंतरिकपणे किंवा हिरड्या, नाक किंवा त्वचेतून) आणि रक्तदाब घटतो. मग रुग्णाची प्रकृती खालावते. प्रकरण गंभीर आहे हे कुटुंबातल्या लोकांच्या लक्षात येते तेव्हा कदाचित रुग्ण शॉकमध्ये जातही असेल. मग ते तातडीने त्याला इस्पितळात धाडतात. तेथे डॉक्टरांना आढळते की, त्याचे अभिसरण निकामी झालेले आहे. गंभीर स्थिती असल्याने, इंट्राव्हेनस मार्गाने द्रवहानी भरून काढायला सांगितले जाते.
कुटुंबाचे संरक्षण करणे
या आजाराचे परिणाम घटविण्यासाठी काही केले जाऊ शकते का? डेंग्यूचा संसर्ग असलेल्या भागात एखादे कुटुंब राहत असेल आणि कुटुंबातल्या एका सदस्याला एका दिवसाहून अधिक काळ जास्त ताप असेल, तर त्यांनी सुज्ञपणाने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषतः, आजारी व्यक्तीमध्ये डेंग्यूची इतर लक्षणे दिसून येत असतील तर हे अधिक महत्त्वाचे आहे, जसे की, अंगावर चट्टे उठणे, स्नायू आणि सांध्यांमध्ये किंवा डोळ्यांमागे दुखणे.
डॉक्टर रक्ताची चाचणी करतील. रक्तस्रावी डेंग्यू नसला, तर उपचार साधा असेल. पण चाचणी केल्यावर, डीएचएफ असल्याचे निष्पन्न झाले, तर न विसरता द्रव पदार्थ देण्यावर लक्ष ठेवायला डॉक्टर कदाचित सांगतील. यात, अतिसाराच्या वेळी दिले जाणारे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन किंवा स्थिती अत्यंत गंभीर असल्यास, रिंगर्स सोल्यूशन, सलाईन सोल्यूशन किंवा इतर सोल्यूशन वापरून इंट्राव्हेनस मार्गाने द्रवहानी भरून काढणे समाविष्ट असू शकते. शॉकच्या प्रकरणांमध्ये, रक्तदाब सुधारण्यासाठी आणि रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण भरून काढण्यासाठी डॉक्टर विशिष्ट औषधे घ्यायला सांगू शकतात.
फार रक्तस्राव झाला असल्यास, रक्त संक्रमण घ्यायला देखील डॉक्टर सांगू शकतात. पर्यायांचा विचार न करताच डॉक्टर कदाचित हे सुचवतील. हे देवाच्या नियमाच्या विरुद्ध आहेच आहे पण बहुतेकवेळा ते अनावश्यक देखील असते. (प्रेषितांची कृत्ये १५:२९) अनुभवानिशी हे दिसून आले आहे की, आजाराच्या सुरवातीपासूनच अभिसरण द्रव देण्यावर काळजीपूर्वक लक्ष देणे हा उपचारातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यावेळी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात सहयोग असल्यास, रक्त संक्रमणासंबंधित समस्या टाळता येतील. या सर्वांवरून, व्यक्तीला डीएचएफ असल्याचा संशय येताच तत्काळ पावले उचलणे किती महत्त्वाचे आहे हे ठासून सांगितले जाते.—“लक्षणे?” ही पेटी पाहा.
प्रतिबंधक उपाययोजना
एडिस इजिप्टाय डास हा डेंग्यू विषाणूचा एक प्रमुख वाहक आहे. जगभरात, उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय भागांमध्ये ही जात सर्वत्र आढळते. (बाजूचा नकाशा पाहा.) एडिस इजिप्टाय डासांची भरभराट गजबजलेल्या भागांमध्ये जास्त होत असते. या डासांवर नियंत्रण ठेवणे हा आजारावर नियंत्रण ठेवण्याचा एक मार्ग आहे.
सबंध जगभरात डासांवर नियंत्रण ठेवणे हे सोपे काम नाही. तथापि, तुमच्या घराभोवतीच्या परिसरातला धोका कमी करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता. या डासाची मादी पाण्यात अंडी घालते. जुने टायर, रिकामे डबे, बाटल्या किंवा नारळाच्या करवंट्या अशांमध्ये एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळासाठी पाणी साठले असल्यास, त्यात डिंभांची वाढ होऊ शकते. अशा वस्तूंचा नायनाट केल्याने डासांची पोषस्थाने नाहीशी होऊ शकतात. शिवाय, बादल्या किंवा बोटी पालथ्या ठेवाव्यात असे सुचवले जाते. तुंबलेली गटारे साफ केल्यानेही मदत होऊ शकेल. गंमत म्हणजे, १९९७/९८ शालेय वर्षाच्या सुरवातीला फिलिपाईन्स येथील आरोग्य विभागाने याच कारणास्तव शाळेतल्या वर्गांमध्ये फ्लावरपॉट ठेवण्यास मनाई केली.
घरातल्या कोणा सदस्याला डेंग्यूचा संसर्ग झाल्यास, त्याला आणखी डास चावणार नाहीत याची दक्षता घ्या, नाहीतर इतरांनाही संसर्ग होऊ शकतो. घरातल्या खिडक्या-दारांना जाळ्या लावल्या किंवा घरात एअर-कंडिशन बसवले तर संरक्षण मिळू शकते.
लसीकरणाविषयी काय? यावर सध्या तरी प्रभावकारी लस उपलब्ध नाही. लस तयार करण्यासाठी संशोधन चालू आहे; पण लस तयार करायची असेल, तर डेंग्यूच्या चारही प्रकारांप्रती प्रतिबंधक असलेली लस तयार करावी लागेल तरच संपूर्ण संरक्षण मिळू शकते आणि म्हणूनच हे जरा कठीण होऊन बसले आहे. एकाच प्रकारासाठी लस तयार केली तर उलट डीएचएफचा धोका आणखी वाढेल. पुढील पाच ते दहा वर्षांमध्ये प्रभावकारी लस तयार होण्याची आशा संशोधकांना वाटते.
काही संशोधक दुसरा मार्ग उपयोगात आणायचा प्रयत्न करत आहेत. जेनेटिक इंजिनियरींगमार्फत (जननिक फेरबदल), डासाच्या लाळेत डेंग्यू विषाणूची हुबेहूब नक्कल टाळता येईल अशी त्यांना आशा आहे. योजनेनुसार, हे साध्य झाले तर जननिक फेरबदल ज्यांमध्ये केले आहेत असे डास डेंग्यूरोधक पिल्ले देतील. यात काही अंशी प्रगती झाली असली, तरी हे कितपत यशस्वी ठरेल हे अद्याप पाहायचे आहे.
सध्या तरी, संपूर्णतः डेंग्यूचा नायनाट करणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पण, व्यावहारिक पावले उचलली तर तुम्हाला तसेच तुमच्या प्रियजनांना डेंग्यूपासून—चावण्याने संभावणाऱ्या एक प्रकारच्या या तापापासून—निर्माण होणाऱ्या प्राणघातक समस्या टाळता येतील.
[२३ पानांवरील चौकट]
लक्षणे?
डेंग्यू ज्वर आणि डेंग्यू रक्तस्रावी ज्वर (डीएचएफ) या दोघांची लक्षणे
• अचानक तीव्र ज्वर
• तीव्र डोकेदुखीa
• डोळ्यांमागे दुखणे
• सांधे आणि स्नायू दुखणे
• लसिका ग्रंथीवर सूज येणे
• अंगावर चट्टे उठणे
• क्षीण
डीएचएफची विशिष्ट लक्षणे
• अचानक प्रकृती खालावणे
• त्वचेखाली रक्तस्राव
• सबंध शरीरातून रक्तस्राव
• त्वचा थंड आणि चिकट होणे
• अस्वस्थता
• नाडीचे ठोके जलद चालणे आणि शॉकमध्ये जाणे (डेंग्यू शॉक सिंड्रोम)
ही लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरला दाखवण्यात उशीर करू नका. मुलांना याचा अधिक धोका असतो.
[तळटीप]
a वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, ॲस्पिरीन कटाक्षाने टाळावी कारण त्यामुळे रक्तस्राव वाढू शकतो.
[२४ पानांवरील चौकट]
प्रवाशांना सूचना
काही वेळा, उष्णकटिबंधात येणाऱ्या प्रवाशांना डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो, पण डेंग्यू रक्तस्रावी ज्वर हा क्वचित आढळतो कारण सहसा दुसऱ्या वेळी डेंग्यूचा संसर्ग झाल्यावरच हा गंभीर प्रकार होत असतो. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी येथे काही सूचना दिल्या आहेत:
• लांब बाह्यांचे शर्ट आणि फुल पँट घाला
• डासांपासून संरक्षण मिळणारी औषधे वापरा
• गजबजलेली ठिकाणे शक्यतो टाळा
• अशा ठिकाणी मुक्काम करा जेथे खिडक्या बंद केल्या जाऊ शकतात ज्यामुळे डास आत येणार नाहीत
• घरी आल्यावर तुम्हाला ताप आल्यास, तुम्ही कोठे गेला होता ते डॉक्टरांना सांगा
[२४ पानांवरील नकाशा/चित्र]
अलीकडील डेंग्यूग्रस्त क्षेत्रे
डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका असलेली क्षेत्रे
“एडिस इजिप्टाय,” डेंग्यू-वाहक डासाचे प्रमाण
[चित्राचे श्रेय]
उगम: रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र, १९९७
© Dr. Leonard E. Munstermann/Fran Heyl Associates, NYC
[२५ पानांवरील चित्रं]
संभावनीय पोषस्थाने (१) जुने टायर, (२) पावसाने तुंबलेली गटारे, (३) कुंड्या, (४) बादल्या किंवा इतर भांडी, (५) टाकलेले डबे, (६) बॅरेल
[२२ पानांवरील चित्राचे श्रेय]
© Dr. Leonard E. Munstermann/Fran Heyl Associates, NYC