वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ८/८ पृ. २६-२८
  • प्रणयचेष्टा (फ्लर्टींग) करण्यात गैर काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रणयचेष्टा (फ्लर्टींग) करण्यात गैर काय?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विवाहित असल्यास
  • भावनिक प्रेम प्रकरणे
  • अविवाहितांविषयी काय?
  • अंतःकरणाचे रक्षण करून शुद्ध चारित्र्य राखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
  • “तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • आपला विवाह टिकवून ठेवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ८/८ पृ. २६-२८

बायबलचा दृष्टिकोन

प्रणयचेष्टा (फ्लर्टींग) करण्यात गैर काय?

“प्रणयचेष्टा म्हणजे कोणाच्या भावनांशी खेळणे किंवा फसवणूक किंवा चुकीची गोष्ट आहे असा आपण विचार का करावा? तसं काहीच नसतं! निव्वळ मजा असते ती! आणि यात दोघांचाही फायदा होत असतो, कारण आपण दुसऱ्‍या व्यक्‍तीला आनंदी करत असतो.” —सुझन रेबिन, न्यूयॉर्क येथील प्रणयचेष्टा शाळेची अध्यक्षिका.

अनेकांना प्रणयचेष्टा म्हणजे नॉर्मल, निव्वळ मजा वाटते; इतकेच नव्हे तर लोकांसोबत संबंध जोडायला आणि टिकवायला ते आवश्‍यक आहे असेही वाटते. पाश्‍चात्त्य देशांमध्ये अलीकडेच, “प्रणयचेष्टेच्या कलेसाठी” आवश्‍यक असलेले हावभाव, प्रवृत्ती, नेत्र कटाक्ष, आणि टक लावून पाहणे हे सर्व काही शिकवणारी भरमसाट पुस्तके, पत्रिकांमधील लेख आणि खास कोर्सेस निघाले आहेत.

प्रणयचेष्टा काय असते? तिची विविध पद्धतीने व्याख्या केली जाते आणि अर्थ सांगितला जातो. एका शब्दकोशात तिची व्याख्या “कामुक चेष्टेची किंवा लैंगिकरित्या मोहक” वर्तणूक अशी केली आहे. आणखी एका शब्दकोशात, प्रणयचेष्टेची व्याख्या, “उगाच मौज-मजेसाठी कामचेष्टा” करणे अशी केली आहे. म्हणून, प्रणयचेष्टा करणारा माणूस, विवाहाचा कोणताही हेतू नसताना प्रणय भावना व्यक्‍त करतो असे सर्वसामान्य मत आहे. प्रणयचेष्टा अनापायकारक समजावी का? प्रणयचेष्टेविषयी बायबलचा दृष्टिकोन काय आहे?a

शास्त्रवचनांमध्ये प्रणयचेष्टेचा स्पष्ट उल्लेख केलेला नसला, तरी आपण देवाचा दृष्टिकोन जाणून घेऊ शकतो. ते कसे? सदर विषयासंबंधीत असलेल्या बायबल तत्त्वांचे परीक्षण करण्याद्वारे. तर अशाप्रकारे आपण आपल्या “ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव” करायला लावतो. (इब्री लोकांस ५:१४) प्रथम, विवाहित लोकांनी प्रणयचेष्टा करणे उचित आहे का याचे परीक्षण आपण करू या.

विवाहित असल्यास

विवाहित जोडप्यांनी खाजगीत एकमेकांशी कामचेष्टा करणे साहजिक आहे. (पडताळा उत्पत्ति २६:८.) पण, विवाहाबाहेरच्या कोणा व्यक्‍तीसोबत अशाप्रकाराने वागणे हे देवाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. विवाहित जोडप्यांमध्ये एक निकटचा आणि विश्‍वसनीय नातेसंबंध असावा असा यहोवाचा उद्देश होता. (उत्पत्ति २:२४; इफिसकर ५:२१-३३) त्याच्या नजरेत विवाह एक पवित्र, स्थायी बंधन आहे. मलाखी २:१६ म्हणते की देवाला, “सूटपत्राचा तिटकारा आहे.”b

विवाहित जोडप्याने प्रणयचेष्टा करणे याचा मेळ विवाहासंबंधी देवाच्या दृष्टिकोनाशी बसतो का? मुळीच नाही, कारण प्रणयचेष्टा करणारी व्यक्‍ती देवाच्या वैवाहिक व्यवस्थेच्या पावित्र्याचा अनादर करते. शिवाय, ख्रिस्ती पतीने “जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी,” आणि पत्नीने “आपल्या पतीची भीड राखावी” अशी आज्ञा इफिसकर ५:३३ देते. ईर्ष्या निर्माण करणारी प्रणयचेष्टा केल्याने एखाद्याच्या सोबत्याला प्रेम किंवा आदर दाखवला जातो का?

प्रणयचेष्टेमुळे एखादी व्यक्‍ती जारकर्म करण्याच्या थराला जाऊ शकते ही त्याहूनही अधिक गंभीर गोष्ट आहे; हे पाप यहोवाच्या नजरेत निंद्य आहे यात शंका नाही आणि तो याला विश्‍वासघात म्हणतो. (निर्गम २०:१४; लेवीय २०:१०; मलाखी २:१४, १५; मार्क १०:१७-१९) यहोवाच्या नजरेत जारकर्म इतके गंभीर आहे की, वैवाहिक विश्‍वासघाताला बळी पडलेल्या व्यक्‍तींना तो घटस्फोट घेण्याची अनुमती देतो. (मत्तय ५:३२) तर मग, प्रणयचेष्टेसारखी घातक मौज यहोवा खपवून घेईल असा विचार आपण करू शकतो का? एखादा प्रेमळ पालक जसे आपल्या चिमुरड्या मुलाला धारदार चाकूसोबत खेळू देणार नाही त्याचप्रमाणे देवही प्रणयचेष्टेला संमती देत नाही.

जारकर्माविषयी बायबल ताकीद देते: “मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरिला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय? कोणी निखाऱ्‍यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय? जो कोणी आपल्या शेजाऱ्‍याच्या स्त्रीशी गमन करितो तो असा आहे; जो कोणी तिला स्पर्श करितो तो निर्दोष असणार नाही.” (नीतिसूत्रे ६:२७-२९) तथापि, जारकर्म केला नसला, तरी प्रणयचेष्टा करणारी विवाहित व्यक्‍ती आणखी एक धोका स्वतःवर ओढवून घेत असते—“भावनिक प्रेम प्रकरण” ज्याला म्हणतात त्यात गुंतण्याचा धोका.

भावनिक प्रेम प्रकरणे

काही लोक विवाहबाह्‍य नातेसंबंध ठेवतात ज्यामध्ये त्यांना एकमेकांविषयी प्रणय भावना असतात, पण कोणत्याही प्रकारचा लैंगिक संपर्क आलेला नसतो. परंतु, येशूने चेतवले: “मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२८) मनातल्या मनात जोपासलेली वासना उचित नाही असे येशू का म्हणतो?

त्याचे एक कारण म्हणजे “अंतःकरणातूनच . . . जारकर्मे. . . निघतात.” (मत्तय १५:१९) तथापि, जारकर्म होण्याइतपत हे प्रकरण वाढले नसले, तरी असा नातेसंबंध केव्हाही बाधक ठरतो. तो कसा? या विषयावरील एक पुस्तक म्हणते: “तुमच्या सोबत्याऐवजी दुसऱ्‍या एखाद्या कार्यात किंवा नातेसंबंधात अधिक वेळ आणि शक्‍ती घालवली जात असेल तर तो अविश्‍वासूपणाचा एक प्रकार आहे.” होय, भावनिक प्रेम प्रकरणामुळे एखाद्याच्या वैवाहिक सोबत्याला वेळ, लक्ष आणि जिव्हाळा यांपासून वंचित ठेवले जाते. लोकांनी आपल्याला जसे वागवावे असे आपल्याला वाटते तसे इतरांनाही वागवावे ही येशूची आज्ञा लक्षात ठेवून, प्रणयचेष्टा करणारी विवाहित व्यक्‍ती स्वतःला उचितपणे हा प्रश्‍न विचारू शकते, ‘माझा सोबती दुसऱ्‍या व्यक्‍तीशी असा वागला असता तर मला कसं वाटलं असतं?’—नीतिसूत्रे ५:१५-२३; मत्तय ७:१२.

कोणा व्यक्‍तीचा अशाप्रकारचा अनुचित भावनिक संबंध असल्यास, तिने काय करावे? कोणासोबत भावनिकरित्या अनुचितपणे गुंतलेली विवाहित व्यक्‍ती, गाडी चालू असताना झोपी जाणाऱ्‍या ड्रायव्हरसारखी आहे. त्याच्या विवाहाचा आणि देवासोबतचा नातेसंबंध तुटण्याआधी त्याने भानावर येऊन तत्काळ, निर्णायक पाऊल उचलणे जरूरीचे आहे. देवासोबतचा चांगला नातेसंबंध धोक्यात येणार असल्यास, डोळ्यासारखी किंवा हातासारखी मौल्यवान गोष्टही उपटून काढावी किंवा तोडून टाकावी असे येशूने म्हटले त्यावरून केवढे गंभीर पाऊल उचलण्याची गरज आहे हे त्याने दाखवून दिले.—मत्तय ५:२९, ३०.

म्हणून, तुम्ही त्या दुसऱ्‍या व्यक्‍तीला कोठे आणि किती वेळा भेटता यावरही बंधन घालणे सुज्ञपणाचे ठरेल. निश्‍चित स्वरूपाने, त्या व्यक्‍तीसोबत एकान्तात राहण्याचे टाळा, आणि कामाच्या ठिकाणी असल्यास, संभाषण कामापुरतेच ठेवा. कदाचित त्या व्यक्‍तीसोबत संपूर्णतः संबंध टाळावा लागेल. त्यानंतर, आपली नजर, विचार, भावना आणि वर्तणूक यांसंबंधी स्वतःवर कडक आत्म-संयम ठेवण्याची गरज आहे. (उत्पत्ति ३९:७-१२; स्तोत्र १९:१४; नीतिसूत्रे ४:२३; १ थेस्सलनीकाकर ४:४-६) “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?” असे विवाहित ईयोबाने म्हटले तेव्हा त्याने याबाबतीत एक उत्कृष्ट उदाहरण मांडले.—ईयोब ३१:१.

तर विवाहित व्यक्‍तीने प्रणयचेष्टा करणे हे अपायकारक त्याचप्रमाणे गैरशास्त्रीय आहे हे स्पष्ट झाले आहे. परंतु, अविवाहित व्यक्‍तींनी आपापसांत प्रणयचेष्टा करण्याविषयी बायबल काय म्हणते? ती नॉर्मल, निव्वळ मौज किंवा विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत संबंध जोडण्यासाठी आवश्‍यक आहे असे समजावे का? त्यापासून काही अपाय होऊ शकतो का?

अविवाहितांविषयी काय?

दोन अविवाहित व्यक्‍ती जर विवाह करण्याचा विचार करत असतील आणि त्यांनी अनुचित वर्तन टाळले तर अशांनी एकमेकांबद्दल प्रणय व्यक्‍त करणे चुकीचे नाही. (गलतीकर ५:१९-२१) अशाप्रकारच्या भावना प्रणयाराधनेच्या सुरवातीच्या काळात दाखवल्या जाऊ शकतात आणि त्यावेळी विवाहाचा विचार फार पुढचा विचार असेल. यामागील हेतू चांगले असतील, तर हे अनुचित असेलच असे नाही. अशी वर्तणूक म्हणजे काही प्रणयचेष्टा नव्हे.

परंतु, केवळ मौज म्हणून अविवाहित लोक एकमेकांना प्रेमाचे संकेत देऊ लागले तर काय? ते अविवाहित असल्यामुळे, यात काही धोका दिसणार नाही. परंतु, भावनिक इजा पोहंचण्याची शक्यता लक्षात घ्या. प्रणयचेष्टा करणाऱ्‍या व्यक्‍तीचे वर्तन खरे मानल्यास, खूप दुःख आणि हृदयभंग होऊ शकतो. नीतिसूत्रे १३:१२ येथील शब्दांमध्ये केवढे तथ्य आहे: “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते, पण इष्टप्राप्ति जीवनाचा वृक्ष आहे”! ती व्यक्‍ती फक्‍त मजा करते हे मला माहीत आहे असे दोघेही समजू लागले, तरी—समोरच्या व्यक्‍तीला काय वाटते किंवा तिच्या मनात काय आहे हे दोघांपैकी एकाला तरी निश्‍चितपणे ठाऊक असते का? बायबल उत्तरते: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?”—यिर्मया १७:९; पडताळा फिलिप्पैकर २:४.

शिवाय, व्यभिचाराच्या धोक्याचा विचार करा आणि त्यामुळे कदाचित संभवणारे रोग किंवा अनौरस गर्भधारणा यांचा सुद्धा विचार करा. शास्त्रवचनांमध्ये, व्यभिचार हा निषिद्ध आहे, आणि जे कोणी जाणूनबुजून ते करतात त्यांच्यावर देवाची कृपा राहत नाही. प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना उचित सल्ला दिला की, मोहाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी त्यांचे “अवयव म्हणजे जारकर्म,” हे ‘जिवे मारायचे’ होते आणि जारकर्माला कारणीभूत ठरणारी ‘कामवासना’ टाळायची होती. (कलस्सैकर ३:५; १ थेस्सलनाकाकर ४:३-५) इफिसकर ५:३ येथे तर तो सल्ला देतो की, अयोग्य वासना उत्तेजित होईल अशातऱ्‍हेने जारकर्माचे “नावसुद्धा निघू नये.” या सल्ल्यानुसार प्रणयचेष्टा अनुचित आहे. लैंगिकतेविषयी अहितकर चर्चा करण्याचीही देव मनाई करतो.

प्रणयचेष्टा ही सहमानवांप्रती दुष्टता असू शकते आणि विवाहाचा संस्थापक, यहोवा याचा अनादर करू शकते असे बायबल तत्त्वे प्रकट करतात. अनुचित प्रणयचेष्टेविषयी बायबलचे मत, निश्‍चितच प्रेमळ आणि वाजवी आहे कारण अपाय होऊ नये म्हणून ते लोकांचे रक्षण करते. यास्तव, देवावर प्रेम करणारे लोक अनुचित प्रणयचेष्टा करणार नाहीत आणि विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत शुद्ध आणि आदरणीय वागणूक राखतील.—१ तीमथ्य २:९, १०; ५:१, २.

[तळटीपा]

a कोणतीही कामुक भावना न ठेवता मित्रत्वाने किंवा मनमिळाऊपणे वागणे म्हणजे प्रणयचेष्टा अशी गैरसमजूत करून घेऊ नये.

b सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकाच्या फेब्रुवारी ८, १९९४ अंकातील “देवाला कोणत्या घटस्फोटाचा तिटकारा आहे?” हा लेख पाहा.

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

© The Curtis Publishing Company

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा