तरुण लोक विचारतात . . .
माझं लक्ष का लागत नाही?
“कधी कधी हे कळत नकळत घडतं. मी मंडळीच्या सभेत लक्ष देऊन ऐकत असतो आणि अचानक दुसरेच विचार मनात येऊ लागतात. मग दहा मिनिटांनंतर पुन्हा शुद्धीवर येतो.”—जेसी.
“इकडं लक्ष दे!” हे शब्द तुमच्या शिक्षकांकडून किंवा पालकांकडून तुम्हाला सहसा ऐकावे लागतात का? तसे असल्यास, मन एकाग्र करण्याची तुम्हाला कदाचित समस्या असावी. परिणामस्वरूप, तुम्हाला चांगले मार्क मिळत नसतील. इतरजण तुम्हाला नीट वागवत नसतील, हा मुलगा स्वतःच्याच धुंदीत आणि तंद्रीत असतो किंवा फार फटकळ आहे असे म्हणून ते तुमच्याशी हटकून राहत असतील.
त्याहून महत्त्वाचे म्हणजे, लक्ष देता येत नसल्याने तुमच्या आध्यात्मिकतेवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. शेवटी, बायबलचीच आज्ञा आहे की: “तुम्ही लक्षपूर्वक ऐकता की नाही याविषयी काळजी घ्या.” (लूक ८:१८, सुबोध भाषांतर.) किंबहुना, ख्रिश्चनांनी आध्यात्मिक गोष्टींकडे “विशेष लक्ष लाविले पाहिजे” असे त्यांना आज्ञापिले आहे. (इब्री लोकांस २:१) तुम्हाला मन एकाग्र करायला कठीण वाटत असेल, तर या सल्ल्याचे पालन करणे देखील तुम्हाला कठीण वाटेल.
खरी समस्या काय असू शकते? काही बाबतीत, शारीरिक समस्येमुळे लक्ष लागत नसेल. उदाहरणार्थ, काही संशोधकांच्या मते, अटेन्शन डेफिसीट डिसऑर्डरमध्ये मेंदूतल्या तंत्रिकाप्रेक्षक संस्थांमध्ये बिघाड झालेला असतो.a काही युवकांना बधिरता किंवा कमी दृष्टी अशा निदान न झालेल्या समस्या असतात. यांच्यामुळेही लक्ष देण्याची क्षमता मंदावू शकते. संशोधकांना आढळले आहे की, प्रौढांपेक्षा सहसा युवकांना मन एकाग्र करण्याची जास्त समस्या असते. म्हणून लक्ष न देण्याची समस्या युवकांमध्येच बहुधा दिसून येते; हे नेहमीच वैद्यकीय विकारामुळे होत नसले तरीही.
बदलणारी विचारसरणी
मन एकाग्र करणे तुम्हाला जड जात असल्यास, कदाचित तुम्ही वयात येत असल्यामुळे हा त्रास होत असावा, आणखी काही नाही. प्रेषित पौलाने लिहिले: “मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धि असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.” (१ करिंथकर १३:११) होय, प्रौढतेप्रत वाटचाल करत असताना विचारसरणीत बदल होतो. पौगंडाची वाढ (इंग्रजी) या पुस्तकानुसार, “पौगंडावस्थेच्या प्रारंभिक काळात . . . नवनवीन विचारक्षमता तयार होतात.” गुंतागुंतीच्या विचारांची आणि कल्पनांची तुम्हाला समज मिळते आणि त्यांचे परीक्षण तुम्ही करू लागता. नैतिकता, नीतीतत्त्वे आणि इतर सर्वसाधारण विषयांबद्दलची खोल समज तुम्हाला मिळू लागते. प्रौढ माणसाप्रमाणे तुम्ही आपल्या भविष्याचा विचार करू लागता.
मग पाणी मुरते तरी कोठे? हे सर्व नवीन विचार, कल्पना आणि समज मनात घोळत असता, मन स्थिर राहू शकत नाही. लहान मुलाप्रमाणे आता तुम्ही साध्या, लहानसहान गोष्टींचा विचार करत नाही. आता, तुम्ही जे पाहता आणि ऐकता त्याचे परीक्षण करू लागता आणि त्याबद्दल प्रश्न विचारू लागता. शिक्षकाने किंवा लेक्चररने काही म्हटले तर लगेच तुमच्या मनाचा प्रवास सुरू होतो आणि विचारांच्या या लाटेसोबत तुम्ही कुठल्या कुठे भरकटत जाता. पण अशा वाहवत जाणाऱ्या विचारांना बांध घातला नाही तर पुष्कळशी मौल्यवान माहिती तुम्हाला शिकायला मिळणार नाही. रंजक गोष्ट अशी की, बायबलमध्ये नीतिमान पुरुष, इसहाक एकान्तात ध्यान करत होता असे म्हटले आहे. (उत्पत्ति २४:६३) दर दिवशी, आराम, मनन आणि नीट विचार करायला वेळ दिला तर इतर वेळी मन एकाग्र करायला तुम्हाला मदत होईल.
भावना आणि हॉर्मोन्स
तुमच्या भावनांमुळेही विकर्षण होत असेल. वाचताना किंवा काही ऐकताना तुम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न करता, पण इतर गोष्टींचाच विचार तुमच्या मनात येत असेल. कधी कधी सगळेकाही खूप कंटाळवाणे वाटते तर कधी भलताच उत्साह; कधी उदास-उदास वाटते तर कधी आनंदाच्या भरात अगदी हवेत तरंगत असतो. घाबरू नका! काहीही झालेले नाही. हे सर्व तुमच्या हॉर्मोन्समुळे होत आहे. तुमच्यात यौवनावस्थेचे बदल घडून येत आहेत आणखी काही नाही.
कॅथी मकॉय आणि चार्ल्झ वीबल्समन लिहितात: “पौगंडावस्थेच्या काळात भावना उफाळत असतात . . . हा लहरीपणा काही अंशी पौगंडावस्थेमुळे होत असतो. तर काही अंशी, सध्या तुमच्यात होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणारा तणाव यासाठी कारणीभूत असतो.” शिवाय, तुम्ही ‘ऐन तारुण्याच्या बहरात’—लैंगिक इच्छा अतिशय प्रबळ असते त्या काळात—प्रवेश करत आहात. (१ करिंथकर ७:३६, NW) लेखिका रूथ बेल म्हणतात: “यौवनावस्थेत होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे लैंगिक भावना अत्यंत तीव्र असू शकतात. डोक्यात बघाल तेव्हा लैंगिकतेचाच विचार असेल, सहजासहजी तुम्ही लैंगिकरित्या उत्तेजित होत असाल; काही वेळा तर लैंगिकतेशिवाय डोक्यात दुसरा विचारच नसेल.”b
सुरवातीला उल्लेख केलेल्या जेसीलाही किशोरवयीनांप्रमाणेच मन भरकटण्याची समस्या आहे: “काहीवेळा असं होतं की, डोक्यात एकतर मुलींचेच विचार असतात नाहीतर मी कशाची तरी काळजी करत बसतो किंवा पुढे मी काय करणार हा विचार करत बसतो.” भावनांचे हे वादळ कालांतराने शांत होईल. त्या दरम्यान, आत्म-शिस्त लावायचा प्रयत्न करा. प्रेषित पौलाने लिहिले: “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो.” (१ करिंथकर ९:२७) स्वतःच्या भावनांवर जितके अधिक नियंत्रण ठेवायला तुम्ही शिकाल तितकेच अधिक तुम्हाला एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करता येईल.
तुमची झोप
तुमची शारीरिक वाढ होण्यासाठी आणि दररोज शिकायला मिळणाऱ्या नवनवीन कल्पनांचा आणि भावनांचा नीट विचार करता यावा म्हणून मेंदूला वाव देण्यासाठी तुमच्या वाढत्या शरीराला पुरेशी झोप हवी असते. तथापि, अनेक किशोरवयीनांचा आराखडा असा असतो की, त्यांना फारशी झोप मिळत नसते. एक न्यूरोलॉजिस्ट म्हणतात: “शरीराला झोपेपासून वंचित ठेवले तर शरीर ते विसरत नाही. उलट, हे सर्व ते लक्षात ठेवते आणि एकदा अचानक विसरभोळेपणा, मन एकाग्र करता न येणे आणि मंद विचारक्षमता या रूपात त्याची किंमत मोजावी लागते.”
काही संशोधकांच्या मते, प्रत्येक रात्री एक-दोन तास ज्यादा झोप काढल्याने मन एकाग्र करण्याची क्षमता आणखी सुधारू शकते. हे खरे की, आळशी आणि निद्राप्रिय असण्याची बायबलमध्ये निंदा केली आहे. (नीतिसूत्रे २०:१३) परंतु, कार्यक्षमतेने काम करता येण्यासाठी पुरेशी झोप मिळवणे हे समंजसपणाचे आहे.—उपदेशक ४:६.
आहार आणि एकाग्रता
आहार ही दुसरी समस्या असू शकते. किशोरवयीनांना सहसा चरबीयुक्त आणि गोड पदार्थ अधिक आवडतात. संशोधकांचे असे म्हणणे आहे की, असले हे निकस पदार्थ खायला चटपटीत असले, तरी त्यांच्यामुळे तल्लखपणा मंदावतो असे दिसून येते. त्याचप्रमाणे अभ्यासांवरून हे दिसून येते की, ब्रेड, तृणधान्य, भात किंवा पास्ता असा कर्बोदकेयुक्त आहार घेतल्यावर बौद्धिक कामगिरी मंदावते. कर्बोदकांमुळे मेंदूत सेरोटोनीन नामक रसायनाचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे गुंगी येऊ लागते हे त्याचे कारण असावे. म्हणून काही न्यूट्रीशनीस्ट असा सल्ला देतात की, बौद्धिक जागरूकतेची आवश्यकता असलेल्या कोणत्याही कार्यहालचालीआधी प्रथिनांचे अधिक प्रमाण असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर उत्तम.
टीव्ही आणि संगणक पिढी
अनेक वर्षांपासून, शिक्षण तज्ज्ञांना वाटले आहे की, टीव्ही आणि त्यातील वेगवान चित्रांमुळे युवकांचा लक्ष देण्याचा कालावधी कमी झाला आहे; शिवाय काहीजण आता संगणकालाही असाच दोष देऊ लागलेत. हे आधुनिक तंत्रज्ञान युवकांवर नेमका कसा परिणाम करते यावर अद्याप तज्ज्ञांमध्ये वाद चालू असला, तरी टीव्ही पाहण्यात किंवा संगणकाचे खेळ खेळण्यात अति केले तर ते काही हितकारक ठरत नाही. एक युवक कबूल करतो: “व्हिडिओ गेम्स, संगणक आणि इंटरनेट या सर्वांमुळे आम्हा मुलांना आता सगळं कसं झट-की-पट झालं पाहिजे अशी सवय लागली आहे.”
पण, जीवनातल्या अनेक गोष्टी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न, चिकाटी आणि जुन्या विचारसरणीच्या लोकांचाच धीर लागतो. (पडताळा इब्री लोकांस ६:१२; याकोब ५:७.) म्हणून, महत्त्वाच्या गोष्टी नेहमी वेगवान आणि मनोरंजक असाव्यात असे गृहीत धरू नका. टीव्ही पाहणे आणि संगणकाचे खेळ खेळणे मनोरंजक असले, तरीसुद्धा चित्र रंगवणे, चित्र काढणे किंवा वाद्य वाजवणे असली कौशल्ये शिकणे बरे नव्हे काय? अशी ही कौशल्ये, एकाग्रतेची क्षमता वाढवू शकतात.
एकाग्रतेची क्षमता वाढवायचे इतर मार्गही आहेत का? निश्चित आहेत, आणि भावी लेखात यांची माहिती दिली जाईल.
[तळटीपा]
a सावध राहा! (इंग्रजी) नोव्हेंबर २२, १९९४, पृष्ठे ३-१२; जून २२, १९९६, पृष्ठे ११-१३; आणि फेब्रुवारी २२, १९९७, पृष्ठे ५-१० हे अंक पाहा.
b ऑगस्ट ८, १९९४ (इंग्रजी) अंकातला “तरुण लोक विचारतात . . . विरुद्धलिंगी व्यक्तीचा विचार माझ्या डोक्यातून कसा घालवू?” हा लेख पाहा.
[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]
संशोधकांचे असे म्हणणे आहे की, निकस पदार्थांमुळे तल्लखपणा मंदावतो असे दिसून येते.
[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]
“काहीवेळा असं होतं की, डोक्यात एकतर मुलींचेच विचार असतात नाहीतर मी कशाची तरी काळजी करत बसतो”
[२०पानांवरील चित्र]
वर्गात लक्ष द्यायला तुम्हाला सहसा कठीण वाटते का?