वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ८/८ पृ. १५-१८
  • चैतन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण कलकत्ता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चैतन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण कलकत्ता
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शहराचा जन्म
  • कलकत्त्याचा ब्लॅक होल
  • कलकत्त्याचा नवा चेहरामोहरा
  • व्यापारी महाकेंद्र
  • परिवहन—पूर्वीचे आणि आताचे
  • कलकत्त्याची बहुरंगी संस्कृती
  • पाहण्यालायक अनोख्या गोष्टी
  • खवय्यांसाठी
  • भारतीय रेल्वे देशभर पसरलेले विस्तृत जाळे
    सावध राहा!—२००२
  • भारतातील कापणीच्या हंगामात आनंद करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
सावध राहा!—१९९८
g98 ८/८ पृ. १५-१८

चैतन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण कलकत्ता

भारतातील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

ब्रिटिश लेखक रुडयार्ड किप्लिंग यांच्या शब्दांत हे “रात्रीच्या वेळी भयानक रूप धारण करणारे नगर,” “गिचमिडीचे गलिच्छ शहर” होते. पण प्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब यांच्या शब्दांत मात्र ही, “स्वर्गातून उतरलेली” “रसभरीत नगरी” होती. डोमिनीक लॉप्येर या लेखकाला, या शहराला दिलेली प्रत्येक भेट म्हणजे “एक विलक्षण, सदाबहार अनुभव” वाटायचा, तर नॅशनल जियोग्रॅफिक नियतकालिकात पीटर टी. व्हाईट लिहितात, की लोक या शहराला “भयानक, भेसूर, भीतिदायक. जगातली सर्वात मोठी झोपडपट्टी” म्हणतात. कलकत्ता (बंगाली, कालिकाता) खरोखर एक वैविध्यपूर्ण शहर आहे.

शहराचा जन्म

भारताच्या उत्तरपूर्व तटावर, पश्‍चिम बंगालच्या राज्यात वसलेले कलकत्ता काही प्राचीन काळापासून अस्तित्वात नव्हते. दिल्ली आणि तंजावूर शहरांच्या तुलनेत ते आत्ताआत्ताचे शहर आहे. अधिकतर शहरांप्रमाणे कलकत्त्याच्या जन्मासाठीही एक नदीच कारणीभूत ठरली. महानदी गंगा. बंगाल खाडीच्या जवळ येतायेता, गंगेला दोन फाटे फुटतात आणि मग पुढे गेल्यावर आणखी कितीतरी फाटे फुटतात; त्यामुळे या ठिकाणी जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. या त्रिभुज प्रदेशाच्या पश्‍चिमेकडील नदीला आधी भगीरथी-गंगा म्हणायचे आणि नंतर हुगळी म्हणू लागले; ही नदी दक्षिणेकडे समुद्रात जाऊन मिळते.

पंधराव्या आणि सोळाव्या शतकात पोर्तुगी, डच आणि इंग्रज व्यापाऱ्‍यांनी हुगळी नदीवाटे येऊन तेथल्या प्रदेशातील राजांच्या परवानगीने व्यापार केंद्रे स्थापन केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा ऑफिसर जोब चारनक याने सुतानातीचे खेडे व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून निवडले. काही अडचणी पार केल्यावर शेवटी तो सुतानाती येथे आला आणि मग गोविंदपूर आणि कालिकाता याही खेड्यांना सामावून त्याने नुसत्या व्यापार केंद्राऐवजी, तेथे ब्रिटिशांची वसाहतच स्थापण्याची तयारी केली. अशारितीने कलकत्त्याचा जन्म झाला. तो दिवस होता ऑगस्ट २४, १६९०.

कायदेशीररित्या वहिवाटीचे अधिकार १६९८ साली मिळवण्यात आले; १७५७ सालापर्यंत इंग्रज मोगल नवाबांना भाडे देत होते. विकासाकडे वाटचाल करीत असलेल्या या शहराचे लष्करी हल्ल्यांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी फोर्ट विल्यम किल्ला बांधला. या किल्ल्यामुळे व्यापाऱ्‍यांना सुरक्षित वाटू लागले आणि त्यांनी मोठमोठाले बंगले बांधण्यास सुरवात केली. आसपासच्या खेड्यांसहित एव्हाना तेथली लोकसंख्या ४,००,००० झाली होती; व्यापाराच्या निमित्ताने दरवर्षी जवळजवळ ५० जहाजे हुगळी नदीवाटे येत असत.

कलकत्त्याचा ब्लॅक होल

सन १७५६ मध्ये सिराजउद्दौला या बंगालच्या एका धाडसी अंमलदाराने कलकत्त्यावर हल्ला केला. बहुतेकांनी शहरातून पळ काढला, पण फोर्ट विल्यम किल्ल्यात आश्रय घेतलेल्या काही इंग्रजांना शरणागती पत्करावी लागली; जून महिन्याच्या जीवघेण्या उकाड्यात त्यांना एका लहानशा अंधारकोठडीत कोंडण्यात आले. दुसऱ्‍या दिवशी पाहिले तर कितीतरी जण गुदमरून मेले होते. या अंधारकोठडीला कलकत्त्याचा ब्लॅक होल म्हणतात.

या घटनेमुळे ईस्ट इंडिया कंपनीचा रोष ओढवला; सन १७५७ मध्ये रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटिश सैनिक हे शहर पुन्हा काबीज करण्यास निघाले. यानंतर झालेल्या प्लासीच्या लढाईनेच भारतात ब्रिटिश राज्याची सुरवात झाली असे म्हणतात. याचा कलकत्त्यावर काय परिणाम झाला? १७७३ मध्ये कलकत्ता इंग्रजांचा बालेकिल्ला झाला आणि १९११ पर्यंत त्याचे हे स्थान अबाधित राहिले.

कलकत्त्याचा नवा चेहरामोहरा

शहराचे वैभव वाढत गेले; आलिशान इमारती उभारण्यात आल्या आणि त्यामुळे कलकत्त्याचे नाव राजमहालांचे नगर (सिटी ऑफ पॅलेसेस) असे पडले. शहरात प्रशस्त सडका बांधण्यात आल्या; वस्तूसंग्रहालये आणि ग्रंथालये सुरू करण्यात आली. या साऱ्‍या वैभवाचा पुरावा म्हणून, त्याकाळच्या बऱ्‍याच इमारती अजूनही दिमाखात उभ्या आहेत.

इंग्रजांनी भारतात तब्बल १९० वर्षे राज्य केल्यानंतर, १९४७ साली मोहनदास गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्त्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळाले, आणि त्यापाठोपाठ देशाची फाळणी झाली. मोहम्मद अली जिन्‍ना यांच्या अखत्यारीत मुस्लिम राष्ट्रांचे पूर्व आणि पश्‍चिम पाकिस्तान बनले. त्यानंतर १९७१ साली, पूर्व पाकिस्तानचे बांगलादेश बनले. या घटनांमुळे निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे कलकत्त्यात दाखल झाले; आज या महानगराची लोकसंख्या जवळजवळ १,२०,००,००० पेक्षा जास्त आहे.

पोटापाण्याची सोय नसलेल्या इतक्या लोकांची भर पडल्यामुळे कितीतरी समस्यांना तोंड फुटले. राहण्याची सोय नसल्यामुळे अक्षरशः लाखो लोकांना अत्यंत दरिद्री परिस्थितीत, पुठ्ठे आणि जूट यांपासून बनवलेल्या खुराड्यांत राहावे लागले; स्वच्छतेची व्यवस्था जवळजवळ नव्हतीच, वीज पुरवठा आणि पाण्याचाही पत्ता नव्हता. जमीन अंथरूण आणि आकाश पांघरूण, अशी हजारो लोकांची दैनावस्था झाली. १९६७ साली, आंतरराष्ट्रीय पातळीवर नगरव्यवस्था करणाऱ्‍या नऊ अधिकाऱ्‍यांनी कलकत्त्याच्या स्थितीविषयी सांगताना म्हटले की, “अर्थव्यवस्था, निवारा, स्वच्छता, परिवहन आणि इतर जीवनावश्‍यक सोयींचा विचार करता, [हे शहर] वेगाने अधोगतीकडे वाटचाल करीत आहे.” भविष्याचे चित्र चिंताजनक होते.

लोकांच्या, विशेषकरून लो-इनकम गटातील लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी खाऱ्‍या पाण्याच्या जलाशयाचा एक मोठा भाग वापरण्यात आला. शिवाय, जागा तयार करण्यासाठी नदीतला गाळ काढल्यामुळे जलवहन सुधारले.

नव्वदच्या दशकात, भारतात बऱ्‍याच प्रमाणात परदेशी गुंतवणूक होऊ लागली; कलकत्त्यालाही मागे राहायचे नव्हते. त्यामुळे, एक फार मोठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. गलिच्छ वस्त्यांमध्ये राहणाऱ्‍या लोकांची शहराच्या बाहेर राहण्याची व्यवस्था करण्यात आली, केरकचऱ्‍याचा वीज आणि फर्टिलायझर उत्पादनाकरता उपयोग करण्यात आला, आणि प्रदूषण फैलावणाऱ्‍या वाहनांवर तसेच ज्यामुळे धूर निर्माण होतो अशा खुल्या भट्ट्यांवर बंदी आली. रस्ते आणखी रुंद करण्यात आले; शॉपिंग सेंटर्स उभारण्यात आले. नागरिक मंडळे केरकचऱ्‍याची विल्हेवाट लावण्याच्या, साफसफाई आणि पेंटिंगच्या कामाला लागली. अशारितीने विनाशाच्या काठावर उभे असलेल्या कलकत्त्याला जणू नवजीवन मिळाले—एकेकाळी ‘मरणाला टेकलेल्या,’ ‘संकटात सापडलेल्या’ शहराची पुन्हा एकदा भरभराट होऊ लागली. १९९७ साली शहराची उपयोगिता आणि नागरी सोयीसुविधा यांच्या आधारावर तयार केलेल्या एका वृत्तात, भारतातील इतर प्रमुख शहरांच्याही कितीतरी वर कलकत्त्याचा नंबर लागला.

व्यापारी महाकेंद्र

शेजारच्या राष्ट्रांतून आलेले निर्वासित, भारतातील इतर राज्यातून येथे येऊन स्थायिक झालेले लोक, मूळ बंगाली लोकसंख्या, आणि येथले फार जुने चीनी आणि आर्मेनियन रहिवाशी या सर्वांमुळे कलकत्त्यात नानाविध भाषा, संस्कृती, धर्म आणि पाकशैली यांचे मिश्रण झालेले आढळते. पण, या लाखो लोकांना आकर्षिण्याइतके इथे होते तरी काय? व्यापार! पूर्व आणि पश्‍चिमेच्या या संगमस्थानी सबंध जगातून जहाजे येत असत. मीठ, ताग, चहा, साखर, नीळ, कापूस आणि रेशीम यांची निर्यात केली जात असे. महामार्ग, लोहमार्ग आणि जलमार्ग यांच्याद्वारे कलकत्त्यातून अतिशय मोठ्या प्रमाणात मालाची नेआण होत असे. स्वातंत्र्यानंतर, येथे लोखंड आणि पोलादाच्या उत्पादनाकरता मोठमोठ्या ओतशाळा निर्माण करण्यात आल्या; तसेच घरगुती वापराकरता व निर्यातीकरता उपयोगी धातुकांचे खाणकाम सुरू करण्यात आले.

व्यापारात वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे येथले बंदर. पूर्वी इंग्रज आपली जहाजे हुगळीच्या खोल प्रवाहात नांगरायचे आणि मग लहान बोटींवर आपला माल नदीवाटे किनाऱ्‍यापर्यंत पाठवायचे. १७५८ साली मात्र कलकत्त्यात भारताच्या भविष्यातल्या एका प्रमुख बंदराचा पाया घालण्यात आला. एकसारखे आधुनिकीकरण आणि गंगेवरील बांधामुळे पाण्याचा वाढलेला प्रवाह यांमुळे कलकत्त्याचे आंतरराष्ट्रीय, तटीय आणि अंतर्गत जलवहन बरेच वाढले आहे.

परिवहन—पूर्वीचे आणि आताचे

परिवहन समस्या, १.२ कोटी लोकसंख्येच्या या शहराची एक प्रमुख समस्या आहे. आधुनिक शहरांत सहसा आढळणारी परिवहनाची सर्व साधने कलकत्त्यात आहेत—किंबहुना त्यांपेक्षा जास्तच! हाताने रिक्षा ओढत, येथल्या प्राणांतिक गर्दीतून मार्ग काढून पुढे जाणाऱ्‍या चपळ रिक्षावाल्यांना पाहून, कितीतरी पाहुणे मंडळी अक्षरशः तोंडात बोट घालतात; सहसा ट्रॅफिकमध्ये अडकून राहणाऱ्‍या बस आणि टॅक्सीपेक्षा या रिक्षांतूनच आपल्या ठिकाणी लवकर पोचता येते. १९०० साली माल वाहून नेण्यासाठी यांची सुरवात झाली होती, पण लवकरच लोकांनाही एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी नेण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ लागला; आज कलकत्त्याच्या सडकांवरून जवळजवळ २५,००० रिक्षा धावतात असे म्हणतात! कधीकधी त्यांच्यामुळे वाहतुकीत व्यत्यय येतो हे खरे असले तरीसुद्धा, त्यांच्यामुळेच सुमारे ५०,००० माणसांच्या पोटापाण्याची आणि आणखी कितीतरी लोकांच्या येण्याजाण्याची सोय होते.

दररोज, कलकत्त्याच्या मुख्य रेल्वे स्थानकापासून ते सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टपर्यंतच्या अंतरात हजारो प्रवासी लहान बोटींतून येजा करतात. जगात सर्वाधिक वाहतूक असणाऱ्‍या हावडा ब्रिजवरून दररोज कमीतकमी ५०,००० मोटारी आणि ट्रक्स कशाबशा वाट काढतात; रस्त्यांवरील या वाहतुकीच्या समस्या कमी करण्यासाठी जलवाहतूक आणखी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मात्र या शहराचे सर्वात मुख्य आकर्षण कोणते असेल तर ते म्हणजे इथल्या विद्युतचलित ट्रॅम्स. प्रदूषणापासून मुक्‍त, उच्च क्षमतेची आणि ऊर्जा-कार्यकारी असणारी ही वाहने दररोज लाखो लोकांना शहरात ठिकठिकाणी नेण्याआणण्याचे काम करतात; अर्थात हा प्रवास नेहमीच आरामदायक नसतो. ट्रॅमला लटकून प्रवास करण्याचे, सर्वांना न जमणारे एक विशेष तंत्रच आहे! अलीकडेच मेट्रो रेल यंत्रणेचे बांधकाम पूर्ण झाले; हे प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल होते कारण यामुळे शहराच्या मध्यभागातून दर तासाला जवळजवळ ६०,००० प्रवासी अगदी आरामशीर येजा करू शकतात.

कलकत्त्याची बहुरंगी संस्कृती

कलकत्त्याच्या शैक्षणिक सोयीसवलतींमुळे कित्येकांनी विज्ञानाच्या आणि कायदेशास्त्राच्या क्षेत्रात नाव कमावले आहे; विविध कलांनाही येथे भरपूर वाव आहे, किंबहुना या शहराला उपखंडाचे सांस्कृतिक आगर म्हटले जाते. येथल्या १४० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कलकत्ता विद्यापीठात अडीच लाख पेक्षाही अधिक विद्यार्थी आहेत; जगातल्या सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी हे एक आहे.

मुंबई जसे भारतातील कमर्शियल सिनेमाचे, तसे कलकत्ता हे दर्जेदार आर्ट सिनेमाचे माहेरघर आहे. सत्यजीत रे आणि मृणाल सेन यांसारखी नावे कला क्षेत्राला दिलेल्या त्यांच्या योगदानामुळे जगप्रसिद्ध झाली आहेत. कलकत्त्याच्या काही विशेष अभिमानास्पद बाबी म्हणजे, रोम आणि पॅरिस या दोन्ही शहरात मिळून झालेले नाहीत इतके कवी येथे झाले आहेत, न्यूयॉर्क आणि लंडन या दोन्ही शहरात मिळून नसतील इतकी साहित्यिक नियतकालिके येथून प्रसिद्ध होतात, शिवाय कॉलेज स्ट्रीटवर जगातली सर्वात मोठी सेकंडहँड पुस्तकांची बाजारपेठ देखील आहे.

पाहण्यालायक अनोख्या गोष्टी

विशेष प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे व्हिक्टोरिया स्मारक, जे इटॅलियन प्रबोधनकालाच्या वास्तूशिल्प शैलीत संगमरवरापासून बनवण्यात आले आहे. १९२१ साली सुरू झालेले हे स्मारक म्हणजे भारतातील ब्रिटिशांच्या राज्याची आठवण करून देणारे एक मोठे वस्तूसंग्रहालय आहे. याशिवाय अतिशय मोठे इंडियन म्युझियम आणि अशीच आणखी ३० वस्तूसंग्रहालये कलकत्त्यात आहेत. इंडियन वनस्पतीशास्त्रीय उद्यान आणि त्यातले ४०० मीटरपेक्षा मोठा घेरा असलेले २४० वर्षांचे वडाचे झाड, तसेच झूलॉजिकल गार्डन्स देखील पाहण्यालायक आहेत. मैदान या नावाने ओळखले जाणाऱ्‍या १,२८० एकरच्या पटांगणाला कलकत्त्याचा जीवनवायू भांडार आणि संपूर्ण भारतातला सर्वात मोठा चौक म्हणतात. कलकत्त्याचे आणखी एक भूषण म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या वेधशाळांपैकी एक, बिरला वेधशाळा. क्रिकेटप्रेमींसाठी असलेले आकर्षण म्हणजे ईडन गार्डन्स हे क्रिकेट मैदान; आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या वेळी येथे एकाच वेळेस कमीतकमी १,००,००० क्रिकेटशौकीन उत्साहाने आरडाओरडा करीत सामन्याचा आनंद लुटतात.

सायन्स सिटी हे एक अत्यंत सुंदर ठिकाण आणि आशियातले सर्वात मोठे प्रायोगिक विज्ञान केंद्र आहे; येथे पर्यटकांना भूकंप कसा होतो ते प्रत्यक्ष अनुभवता येते, एखादे बेट पाण्याखाली कसे बुडते, झंझावात कसे तयार होते ते प्रत्यक्ष पाहता येते, शिवाय पर्यावरणासंबंधी आणि कितीतरी प्राण्यांच्या वेगवेगळ्या सवयींविषयी पुष्कळशा विलक्षण गोष्टी पण शिकायला मिळतात. मात्र, या सर्वांपेक्षा हिंदू धर्मियांना कलकत्त्याचे आकर्षण असण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे इथली दुर्गा पूजा; या पाच दिवसांच्या सोहळ्यात सर्वसाधारण कारभार ठप्प पडून, सबंध शहर या उत्सवाच्या हर्षोल्लासात अक्षरशः न्हाऊन निघते.

खरेदी करू इच्छिणाऱ्‍यांना कलकत्त्यात काय सापडेल? अहो, काय सापडणार नाही असे विचारा! फक्‍त इथल्या गोंगाटगर्दीतून धक्केबुक्के खात पुढे जाण्याची तयारी ठेवा; बायकांनी नेसलेल्या त्या अप्रतिम रंगीबेरंगी साड्या, त्या पाहायला विसरू नका. कलकत्त्यात चामड्याच्या वस्तू अगदी परवडणाऱ्‍या किंमतींत मिळतात, विशेषतः चायनीझ दुकांनांमध्ये मिळणारे उत्तम प्रतीचे लेदरचे बूट. स्टेनलेस स्टीलच्या वस्तू, कापड, चीनीमातीची सुरेख भांडी, निरनिराळ्या सुंदर डिझाईन्सचे दागिने आणि अशा कितीतरी वस्तू या “खरेदीवेड्यांच्या पॅरेडाइजमध्ये” मिळतात; फक्‍त डोके शांत ठेवून शॉपिंग करण्याची तयारी हवी!

खवय्यांसाठी

कलकत्त्याला खवय्यांचा स्वर्ग देखील म्हणण्यात आले आहे, इथले स्वादिष्ट पदार्थ चाखायलाच हवेत. बंगाली लोक म्हणे अस्सल पोटपुजारी असतात, आणि लोकांचीही परीक्षा ते त्यांच्या पाक कौशल्याच्या आधारावरच करतात! कलकत्त्याच्या जेवणात मासे हमखास असतातच; बाजारांत निरनिराळ्या प्रकारचे मासे, मांस आणि भाज्या मिळतात. बंगाली लोकांचे विशिष्ट प्रमाणात मिसळलेले आणि आयत्या वेळी वाटलेले विशिष्ट मसाले, अगदी साध्याशाच भाजीतही अनोखी लज्जत आणतात. चायनीझ फूडची इथे वाण नाही. पण हे सारे असले तरीसुद्धा कलकत्त्याच्या पाककलेची सर्वात मोठी खासियत म्हणजे इथल्या सुप्रसिद्ध मिठाया. नासवलेल्या दुधाचे गोळे साखरेच्या सुगंधी पाकात भिजवून तयार केलेले रसगुल्ले हा तर जणू बंगालचा ट्रेडमार्क! आणि जेवणाच्या शेवटी खाण्याचा अत्यंत चविष्ट आणि लोकप्रिय दह्‍याचा प्रकार, अर्थात मिष्ती दोई खायला विसरू नका! हॉटेलांमधून कसा खमंग वास येतोय, तोंडाला पाणी सुटले की नाही? खरंच, माणसाला मोहवून टाकणारे, चैतन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण शहर आहे कलकत्ता!

[१५ पानांवरील नकाशा]

(For fully formatted text, see publication.)

श्रीलंका

भारत

कलकत्ता

बांगलादेश

[नकाशा]

कलकत्ता

इंडियन वनस्पतीशास्त्रीय उद्यान

मैदान

झूलॉजिकल गार्डन्स

बिरला वेधशाळा

व्हिक्टोरिया मेमोरियल

इंडियन म्युझियम

हूगली नदी

खाऱ्‍या पाण्याचे जलाशय

डम डम आंतरराष्ट्रीय विमानतळ

[चित्राचे श्रेय]

Mountain High Maps® Copyright © 1997 Digital Wisdom, Inc.

[१५ पानांवरील चित्र]

सायन्स सिटी

[१६ पानांवरील चित्र]

व्हिक्टोरिया मेमोरियल

[१७ पानांवरील चित्र]

बाजारातली वर्दळ

[१७ पानांवरील चित्र]

रस्त्याच्या कडेला थाटलेले न्हाव्याचे दुकान

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा