जगावरील दृष्टिक्षेप
दीर्घायुष्यासाठी चालावे
दररोज चालल्यावर आयुर्मयादेत उल्लेखनीय वाढ होऊ शकते, असे एशियावीक म्हणते. १२ वर्षांचा एक अभ्यास, ६१ ते ८१ वयोगटातल्या ७०७ पुरुषांवर करण्यात आला होता जे धूम्रपान करत नव्हते आणि ज्यांना चालता येत होते. त्या अहवालाचे निरीक्षण असे आहे की, जे “पाय मोकळे करण्यासाठी का होईना—पण दररोज फक्त ३.२ किलोमीटर (दोन मैल) चालत होते त्यांच्या बाबतीत कोणत्याही कारणाने संभवणाऱ्या मृत्यूचा धोका निम्म्याने कमी झाला.” जे चालत नव्हते त्यांना, निदान दर दिवशी ३.२ किलोमीटर चालणाऱ्या व्यक्तींपेक्षा सर्व प्रकारच्या कर्करोगांपासून मृत्यू संभवण्याची २.५ पटीने अधिक शक्यता होती. न्यू इंग्लंड वैद्यकीय पत्रिका (इंग्रजी) यात प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, दर दिवशी ०.८ किलोमीटर इतके कमी अंतर चालल्यावरही मृत्यूचे प्रमाण कमी होते. सुरवातीला, इतक्या हलक्या व्यायामाचा फायदा काय अशी शंका काही स्वास्थ्य तज्ज्ञांनी केली. आता मात्र, नवीन अभ्यासाचा निष्कर्ष असा आहे: “वयस्क लोकांना चालायला उत्तेजन देणे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेकारक आहे.”
मुलांवर टीव्हीचा परिणाम
“सहा ते बारा वर्षांच्या वयोगटातल्या मुलांच्या वागणुकीवर शाळेपेक्षा कार्टुन आणि व्हिडिओ गेम्सचा अधिक प्रभाव पडतो; कारण दर आठवडी शाळेत घालवल्या जाणाऱ्या २३ तासांच्या तुलनेत ते टीव्ही पाहण्यात ३८ तास खर्च करतात,” असे वृत्त एल युनिव्हर्सल हे मेक्सिकन वृत्तपत्र देते. संशोधक ओमार टोरब्लांका यांच्या निरीक्षणाप्रमाणे, विशिष्ट परिस्थितींत मुलांनी कसे वागावे हे टीव्ही त्यांना शिकवते—पण, मुलांना मात्र या प्रवृत्ती उचित आहेत की अनुचित याची काहीच जाणीव नसते. ते म्हणाले: “उदाहरणासाठी, एखाद्या कार्टुनमध्ये किंवा फिल्ममध्ये कोणा पात्राला बांधून ठेवले आणि त्याला काहीच झाले नाही असे एखाद्या लहान मुलाने पाहिले तर याचीच नक्कल हे मूल करील.” टोरब्लांका यांच्या संशोधनावरून हे स्पष्ट होते की, “मुले दररोज शाळेत जे शिकतात ते नव्हे तर टीव्हीवर जे शिकतात तेच आचरतात, कारण त्यांच्यासाठी शाळा हे एक कर्तव्य असते.”
संगीत मुलांसाठी हितकर
तीन किंवा चार वर्षांच्या मुलांना संगीत शिकवले तर त्यांना कारणमीमांसा आणि विचार करायला त्याची मदत होते, असे इर्वाईन येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक गॉर्डन शॉ यांचे म्हणणे आहे. या कोवळ्या वयात, मेंदूतील संयोग लागलीच तयार होतात, आणि संशोधकांनी हे दाखवून दिले आहे की, प्रत्येक दिवशी केवळ १० मिनिटे नियमितपणे सराव केला, तरी “मुलाच्या कारणमीमांसा आणि विचार करण्याच्या पद्धतीत दीर्घकालीन सुधार” होण्यास मदत होते. एका नऊ महिन्यांच्या चाचणीत, पियानो क्लासेस घेतलेल्या मुलांची तुलना संगणकाचे क्लासेस घेणाऱ्या किंवा कोणतेच शिक्षण न घेणाऱ्या मुलांशी करण्यात आली. पियानो शिकलेल्या मुलांच्या बौद्धिक परीक्षेचे मार्क ३५ टक्क्यांनी सुधारले, तर इतर दोन गटांमध्ये फार कमी किंवा काहीच सुधारणा दिसून आली नाही, असा अहवाल लंडनचे संडे टाईम्स देते.
आपला जागतिक आहार
दररोज जगातले लोक किती अन्न खातात याची तुम्हाला कल्पना आहे का? दररोज किती अन्न खाल्ले जाते याविषयी ग्रीक वृत्तपत्र टो विमा यात थक्क करून टाकणारी आकडेवारी दिली होती. सबंध जगभरात, दोन अब्ज अंडी उत्पन्न आणि फस्त केली जातात—दोन अब्ज अंडी म्हणजे, सायप्रस बेटाइतके मोठे ऑम्लेट! जगभरात १६ लाख टन मका खाल्ला जातो. बटाट्यांचा देखील—चक्क ७,२७,००० टन इतका वापर केला जातो! भात तर जगातल्या खूप लोकांचे मुख्य अन्न आहे; दर दिवशी १५ लाख टन भात उत्पन्न होतो. यांपैकी, ३,६५,००० टन भात चीनी लोक खातात. ७,००० टन चहाचे तीन अब्ज कप भरतात. जगातल्या काही विशेष लोकांनाच २.७ टन माशांची खारी अंडी खायला मिळतात. असे म्हटले जाते की, दिवसा २,५०० कॅलेरी आपल्या शरीराला आवश्यक असतात, पण पाश्चिमात्त्य देशांमधील सर्वसाधारण प्रौढ व्यक्ती दिवसा ४,००० कॅलेरी सेवन करते, तर आफ्रिकेतील सर्वसाधारण व्यक्ती फक्त १,८०० कॅलेरींचे सेवन करते.
तंबाखूने संभवणारे मृत्यू
तंबाखू नियंत्रणाची आशियाई कन्सलटन्सी हिच्या प्राध्यापिका ज्यूडीथ मॅके म्हणतात, जगभरात जवळजवळ १.१ अब्ज लोक धूम्रपान करतात. ब्रिटिश मेडिकल जर्नल यात अहवाल दिल्यानुसार, तंबाखू आणि आरोग्य यासंबंधी घेण्यात आलेल्या दहाव्या जागतिक परिषदेत, १९९० साली तंबाखूमुळे संभवलेल्या मृत्यूंचे प्रमाण तीस लाख होते असा अंदाज केला होता. सन २०२५ ते २०३० च्या दरम्यान हे प्रमाण एक कोटी होईल अशी अपेक्षा आहे. जर्नल म्हणते की, पुढील तीन दशकांमध्ये तंबाखूने संभवणाऱ्या मृत्यूंमधील वाढ, विकसित नव्हे तर विकसनशील देशांमध्ये होईल. ऑक्सफोर्ड विद्यापीठातील वैद्यकीय आकडेवारीचे प्राध्यापक, रिचर्ड पीटी यांच्या मते, “इतर कोणत्याही देशापेक्षा चीनमध्ये तर आताच तंबाखूने संभवणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे.”
अवयवांचे दाते
मेल्यावर इतरांनी तुमचे अवयव घ्यावेत अशी तुमची इच्छा आहे का? जानेवारी १, १९९८ पासून एक नवीन नियम अंमलात आल्यापासून ब्राझीलमधील अनेकांसमोर हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्या नियमानुसार, १८ वर्षांच्या वर असलेल्या लोकांनी याविषयी आपली अनिच्छा प्रकट करून सह्या दिल्या नाहीत, तर ते सर्वजण आपोआप आपल्या अवयवांचे दाते होतील. पण, “बहुतांश ब्राझीलियन लोकांना मरणानंतर आपले अवयव दिलेले आवडणार नाही अशी पुष्कळ चिन्हे दिसताहेत,” असे द मियामी हेरल्ड वृत्त देते. “गेल्या सहा महिन्यांमध्ये, ड्रायव्हिंग लायसेन्स काढणाऱ्या चारपैकी तीन लोकांनी अवयव देण्याचे नाकारले आहे.” का? काहींना अशी भीती वाटते की, अवयव मिळवण्यासाठी रुग्णांचे मेंदू निकामी झालेत असे अकाली सांगायला डॉक्टरांवर दबाव आणला जाईल.
लुप्त होणारी अरण्ये
मानव जंगलांना नष्ट करू लागण्याआधी पृथ्वीवर असलेली सुमारे दोन तृतीयांश जंगले आता लुप्त झाली आहेत, असे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) सांगते. या समस्येबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी मानवाने अतोनात प्रयत्न केले असतानाही, या दशकात जंगलतोडीचे प्रमाण इतके वाढले आहे की, लवकरच कित्येक देशांमध्ये नैसर्गिक जंगले उरणारच नाहीत. लाकूड आणि शेतीसाठी जंगलतोड केल्याने वनस्पती आणि प्राण्यांच्या जाती मोठ्या प्रमाणावर नष्ट होतात. शिवाय, झाडे जाळल्याने वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायू सोडला जातो आणि यामुळे पृथ्वीचे तापमान वाढण्यात हातभार लागेल अशी अनेकांना भीती वाटते. सबंध जगभरात २००० या सालापर्यंत, सर्व प्रकारच्या अरण्यांच्या निदान १० टक्के भागाचे संरक्षण करावे असे डब्ल्यूडब्ल्यूएफ आर्जवत असल्याचे वृत्त लंडनचे गार्डियन वृत्तपत्र देते.
जगभरातील अन्न तुटवड्याचा अंदाज
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, “लोकसंख्येत कपात आणि शेतीच्या उत्पन्नात विलक्षण वाढ झाली नाही तर २०२५ सालापर्यंत जगभरातल्या अंदाजे ८ अब्ज उपाशी पोटांसाठी पुरेसे अन्न नसेल,” असे असोसिएटेड प्रेसचे एक वृत्त आहे. संशोधक आगाऊ ताकीद देत आहेत की, “साधारणतः एका स्त्रीची दोन मुले इतके जन्मप्रमाण कमी झाले नाही तर,” २०२५ या सालापर्यंत लोकांनी निरोगी राहावे म्हणून “पुरेसे उत्तम आणि पोषक अन्न मिळण्यासाठी” अन्नाचे उत्पन्न दुप्पट व्हावे लागेल. या समस्येत, पाण्याचा तुटवडा, जमिनीचे प्रदूषण, जमिनीची धूप होणे आणि हवामानात बदल यांमुळे आणखीनच भर पडते. आज देखील, पृथ्वीवरील सुमारे ६ अब्ज लोकांना पुरेल इतके अन्न उत्पन्न केले जात असतानाही दर वर्षी साधारण १.८ कोटी लोक उपासमारीला बळी पडतात.