तुम्हाला उत्तम आरोग्य कसे उपभोगता येईल?
औषधोपचार म्हणजे गप्पागोष्टींचा एक आवडता विषय. कोणत्याही व्याधीचे नाव काढले की मित्रमंडळीत, शेजारपाजाऱ्यांत, जवळजवळ प्रत्येकाचा त्यावर कोणता ना कोणता आवडता उपाय असतोच. सहसा लोकांना स्वतःच्या मनाने औषधोपचार घेऊन काम चालवावेसेच जास्त वाटते, हे समजण्याजोगे आहे. पण एका ब्राझीलियन डॉक्टराने सांगितल्याप्रमाणे, काहीजण तर “परिस्थिती अगदी टोकाला गेल्यावरच डॉक्टरकडे जायला निघतात. कधीकधी त्वचेवर जखमा झालेल्या असतात, आणि महिनोन्महिने स्वयं-उपचार करूनसुद्धा त्या बऱ्या होत नाहीत. शेवटी डॉक्टरकडे गेल्यावर कळतं की कर्करोग झाला आहे, सुरवातीलाच उपाय करायला हवा होता.”
रोगाच्या सुरवातीलाच निदान झाल्यास बऱ्याच वेळा जीवन बचावू शकते; उशीर केल्यास, तो जिवावर बेतू शकतो. एका सर्जनने एक प्रकरण सांगितले, “एका तीस वर्षीय महिलेला पाळी यायला उशीर झाला, शिवाय ओटी पोटातही थोडे थोडे दुखत होते. तिने आपल्याच मनाने भरपूर वेदनाशामके आणि दाहरोधके घेतली; दुखणे कमी झाले. पण तीन दिवसांनंतर तिला रक्तस्रावी आघात (हीमरेजिक शॉक) झाला आणि तत्काळ रुग्णालयात आणावे लागले. मी लगेच तिच्यावर शस्त्रक्रिया केली, तेव्हा फॅलोपियन ट्यूबमध्ये गर्भधारणा झाल्याचे दिसून आले. अगदी थोडक्यात बचावली!”
साँऊ पाउलू येथील एक तरुणी आपल्याला रक्तशय झाला असे समजून बसली, पण खरे पाहता तिच्या मुत्राशयात दीर्घकालीन बिघाड झाला होता. वैद्यकीय उपचार घेण्यात दिरंगाई केल्यामुळे, ट्रान्सप्लांट हा एकच मार्ग उरला. तिच्या डॉक्टरांनी शेवटी म्हटले की, “सहसा रुग्ण वैद्यकीय उपचार घेण्याविषयी अळंटळं करतो, स्वयं-उपचार करतो किंवा अनुभव नसलेल्यांनी सुचवलेले उपाय करून पाहतो आणि अशारितीने शेवटी स्वतःवर गंभीर रोग ओढवून घेतो.”
शरीराच्या संकेतांकडे आपले दुर्लक्ष होता कामा नये, हे खरे. पण त्याच वेळेस औषधोपचार किंवा स्वयं-उपचाराचा एकच ध्यास धरून बसण्याचे आपण कसे टाळू शकतो? आरोग्याला “शरीर, मन किंवा आत्मा निकोप असण्याची स्थिती” किंवा “शारीरिक आजार किंवा वेदनांपासून मुक्त असणे” असे म्हणण्यात आले आहे. एक लक्षवेधक गोष्ट अशी की, थोड्याफार प्रमाणात आज अधिकांश रोग टाळता येण्यासारखे आहेत असे दिसून आले आहे. डॉ. लुइस टॉमस यांच्या मते: “माणसाला अविचारीपणे निर्माण करण्यात आलेले नाही, उलट आपण अत्यंत मजबूत, चिवट आणि अतिशय सुदृढ प्राणी आहोत.” त्यामुळे ‘निरोगी असताना, आरोग्याची नको तितकी काळजी करीत बसण्याचा रोग स्वतःला लावून घेऊन, काळजीमुळेच अर्धमेले होण्याऐवजी’ आपण आपल्या शरीराला आणि आपल्या शरीराठायी स्वतःला दुरुस्त करण्याची जी अनन्यसाधारण क्षमता आहे, तिला सहकार्य केले पाहिजे. यात एखादा चांगला डॉक्टर किंवा हेल्थ प्रॅक्टिसश्नर (रोग चिकित्सक) देखील आपले साहाय्य करू शकेल.
वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी
एका ब्राझीलियन डॉक्टरांच्या मते, “ताप, डोकेदुखी, उलटी होणे, किंवा पोटात, छातीत अथवा ओटीपोटात दुखणे यांसारखी लक्षणे सर्वसामान्य औषधं घेऊनही कमी झाली नाहीत किंवा काही कारण नसताना वारंवार आढळत असतील किंवा जर दुखणे अतिशय तीव्र स्वरूपाचे असेल” तर अशा वेळी वैद्यकीय मदत घ्यावी. दुसरे एक डॉक्टर सल्ला देतात, की लक्षणे कशी कमी करावीत याविषयी नक्की माहिती नसल्यास किंवा एरवीपेक्षा काहीसे वेगळे होत आहे असे भासल्यास वैद्यकीय मदत घ्यावी. ते पुढे म्हणतात: “मूल आजारी पडते तेव्हा, स्वतःच औषधोपचार करण्याऐवजी आईवडील सहसा डॉक्टरांची मदत घेणे जास्त पसंत करतात.”
पण प्रत्येक वेळेस औषधे घेतलीच पाहिजेत का? औषधांमुळे उलटपरिणाम तर होणार नाही? काही दुष्परिणाम तर होणार नाहीत, उदाहरणार्थ पोटदुखी किंवा यकृत अथवा मुत्राशय यांत बिघाड? वेगवेगळ्या औषधांचा परस्परांवर कसा परिणाम होईल? द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिकानुसार, “फार कमी रुग्ण भावनांना बाजूला ठेवून किंवा डोळसपणे आपल्या समस्यांचा विचार करतात.” पण प्रामाणिक डॉक्टर मात्र आपल्याला समजावून सांगतील, की खरे पाहता सर्वच औषधे अपाय करू शकतात; ज्यांमुळे काहीही दुष्परिणाम होणार नाहीत अशी फार कमी औषधे आहेत. पुढच्या वेळेस डॉक्टरांनी लिहून दिलेले एखादे औषध विकत घ्याल, तेव्हा त्याच्या मागे दिलेला संभाव्य साईड-इफेक्ट्सचा इशारा वाचून पाहा! डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणाऱ्या औषधांचाही गैरवापर केल्यास किंवा प्रमाणाबाहेर घेतल्यास अपाय होऊ शकतो, अगदी मृत्यूसुद्धा संभवू शकतो.
या बाबतीत चौकस राहणे किती महत्त्वाचे आहे हे द बॉस्टन ग्लोबमध्ये आलेल्या रिचर्ड ए. नॉक्स यांच्या एका रिपोर्टवरून दिसून येते: “स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितल्यानुसार दररोज वेदनाशामके घेणाऱ्या लाखो आर्थरायटिस रुग्णांना अचानक रक्तस्राव होऊन त्यामुळे मृत्यू होण्याचाही धोका आहे.” ते पुढे म्हणतात: “शिवाय, या वेदनाशामकांच्या जोडीला ॲसिडिटीची औषधे किंवा गोळ्या घेतल्याने पोटाचे गंभीर विकार दूर होणार नाहीत उलट त्यांमुळे धोका आणखीन वाढू शकतो.”
सर्वसामान्य स्वयं-उपचाराविषयी काय? ब्राझीलमधील रिबेराऊ प्रेटू येथील एक डॉक्टर म्हणतात: “माझ्या मते सर्वांच्या घरात एक लहानशी घरगुती फार्मसी असल्यास फार चांगले होईल . . . पण ही औषधे विचारपूर्वक आणि शहाणपणाने वापरावीत.” (पृष्ठ ७ वरील पेटी पाहा.) शिवाय, आरोग्याबद्दलचे मूलभूत ज्ञान असल्यास ओघाओघाने माणसाचे जीवनही सुधारते. सावध राहा! यात मात्र आम्ही विशिष्ट औषधे, उपचारपद्धती किंवा नैसर्गिक उपाय सुचवत नाही कारण प्रत्येक व्यक्तीत आजारपणाची लक्षणे वेगवेगळी असतात.
उत्तम आरोग्य—तुम्ही काय करू शकता?
अठराव्या शतकातले एक लेखक जोनाथान स्विफ्ट यांनी एकदा लिहिल्याप्रमाणे, “जगातले सर्वात चांगले डॉक्टर म्हणजे डॉक्टर आहार, डॉक्टर विश्रांती आणि डॉक्टर हसमुख.” खरोखर संतुलित आहार, आवश्यक विश्राम आणि समाधानी वृत्ती उत्तम आरोग्याचे मूलभूत घटक आहेत. त्याउलट, युक्तिबाज जाहिरातदारांनी कितीही अट्टाहास केला तरीसुद्धा उत्तम आरोग्य हे काही फक्त औषधांच्या रूपात विकत घेता येत नाही. “औषधी उत्पादनांचा अनावश्यक आणि धोकादायक वापर केल्याने” रोग प्रतिबंधक शक्ती कमकुवत होऊ शकते.—डीसीओनारयु टेरापेयुटीकु ग्वानबारा.
पण आपण जबाबदारीची जाणीव ठेवून जीवन जगतो, मादक पदार्थांचा गैरवापर, धूम्रपान, अतिमद्यपान आणि अति तणाव टाळतो, तेव्हा आपण आपले आरोग्य सुधारण्यात बराच हातभार लावत असतो. साठी ओलांडलेल्या आणि बऱ्याच वर्षांपासून मिशनरी कार्य करीत असलेल्या मेरियन म्हणतात: “सर्वसामान्य जीवनशैली पाळून आणि आहारात निरनिराळ्या आरोग्यवर्धक पदार्थांचा समावेश करून मला बऱ्याच प्रमाणावर उत्तम आरोग्य टिकवून ठेवता आलं आहे.” शिवाय त्या म्हणतात, “मला पहाटे लवकर उठायला आवडतं, त्यामुळे अर्थातच रात्री लवकर झोपणंही महत्त्वाचं आहे.” व्यवहार ज्ञानाने वागणे, चांगल्या सवयी लावून घेणे, तसेच वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घेणे आणि सुप्रशिक्षित फॅमिली डॉक्टरांशी दिलखुलास चर्चा करणे देखील कमी महत्त्वाचे नाही.
मेरियन यांना पुढेही चांगली तब्येत टिकवून ठेवायची इच्छा आहे; पण त्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षही करत नाहीत आणि त्याविषयी फाजील काळजीही करीत बसत नाहीत. त्या म्हणतात: “आरोग्यासंबंधी कोणतेही निर्णय घ्यायचे असले, की मी यहोवाला माझं मार्गदर्शन कर म्हणून प्रार्थना करते; ज्यामुळे भविष्याच्या दृष्टीने जे सर्वात उत्तम तेच पाऊल मी उचलावं आणि आरोग्य सुधारण्यातच मला नको तेवढा वेळ आणि पैसा खर्च करावा लागू नये.” त्या पुढे म्हणतात: “सक्रिय राहणे अत्यावश्यक असल्यामुळे, मी देवाला प्रार्थना करते की त्याने मला आपला वेळ आणि शक्ती योग्यरितीने वापरण्यासाठी मदत करावी, जेणेकरून मी विनाकारण सेवेतून अंगही चोरू नये आणि स्वतःला शक्तीबाहेर खपवूही नये.”
खऱ्या अर्थाने सुखी व्हायचे असल्यास, भविष्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. सध्या आपली तब्येत जरी ठणठणीत असली तरीसुद्धा रोगराई, दुःख, वेदना आणि शेवटी मृत्यू यांचे अस्तित्व नाकारता येत नाही. आपण कधीतरी परिपूर्ण आरोग्य मिळण्याची अपेक्षा करू शकतो का?
[६ पानांवरील चौकट]
वाजवी प्रमाणात स्वतःची काळजी घेणे फायदेकारक
तुमचे आरोग्य बऱ्याच प्रमाणात तुमच्या खाण्यापिण्यावर अवलंबून असते. तुम्ही जर पाणी मिसळलेले पेट्रोल भरून गाडी चालवण्याचा प्रयत्न केला किंवा जर पेट्रोलमध्ये साखर घातली, तर लवकरच तुमच्या गाडीच्या इंजिनची वाट लागेल. तशाचप्रकारे, फक्त जिभेला रुचणाऱ्या निकस अन्नावर आणि पेयांवर तुम्ही काम भागवत राहिलात, तर शेवटी तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल; बिघडलेल्या आरोग्याच्या रूपात. कॉम्प्युटरवाल्यांच्या भाषेत, याला “GIGO” म्हणजे, “गार्बेज इन गार्बेज आऊट,” असे म्हणतात; ज्याचा अर्थ असा, की केरकचरा आत भरला तर परिणामही तसेच निघतात.
फॅमिली मेडिसिनच्या (कौटुंबिक औषधोपचार) प्राध्यापिका, डॉ. मेलनी मिंट्झर खुलासा करतात: “सहसा तीन प्रकारचे रुग्ण असतात: घरीदेखील सहज उपचार करता येईल अशा साध्यासुध्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जाणारे, आरोग्य-निगा यंत्रणेचा योग्य फायदा करून घेणारे आणि आवश्यक असते तेव्हा देखील डॉक्टरांकडे न जाणारे. पहिल्या गटातले रुग्ण सहसा डॉक्टरांचा विनाकारण वेळ खातात, आणि स्वतःचा वेळच नव्हे तर पैसा देखील वाया घालवतात. दुसरीकडे, वेळीच डॉक्टरांकडे येऊन योग्य उपचार न घेतल्यामुळे तिसऱ्या गटातले लोक स्वतःचा जीव धोक्यात घालतात. जास्तीतजास्त लोक मधल्या गटातले असते तर डॉक्टरांना हायसे वाटले असते.”
“उत्तम आरोग्य राखण्याचे सात मार्ग: पोषक तेच खा आणि प्या, नियमित व्यायाम करा, धूम्रपान करू नका, पुरेशी विश्रांती घ्या, तणावावर नियंत्रण करा, सामाजिक नातीगोती जपा, आजार आणि अपघात शक्यतो टाळण्यासाठी आधीच विचारपूर्वक पावले उचला.”—डॉक्टरांना बोलावण्याआधी—३०० हून अधिक वैद्यकीय तक्रारींवर सुरक्षित, गुणकारी स्वयं-उपचार, लेखक ॲन सायमन्स, एम.डी., बॉबी हॅस्सलब्रिंग, आणि मायकल कासलमन.
[७ पानांवरील चौकट]
घरगुती औषधांचे कपाट
“एरवी सुदृढ असणाऱ्या प्रौढांत जेव्हा दुखणीखुपणी, लहानमोठ्या जखमा आणि अस्वस्थतेची किंवा आजाराची इतर लक्षणे आढळतात तेव्हा यांपैकी अंदाजे ९० टक्के लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते आणि बऱ्याचदा कोणाला याविषयी सांगितलेही जात नाही. . . . सहसा काहीतरी सोपा उपाय केला जातो, जसे डोकेदुखीवर उपाय म्हणून दोन ॲस्प्रिनच्या गोळ्या.”
“घरगुती औषधांचे कपाट अशावेळी उपयोगी पडते. त्यामुळे डॉक्टरकडे किंवा दवाखान्यात विनाकारण माराव्या लागणाऱ्या फेऱ्या आणि पैसेही वाचतात.”—कंम्प्लीट होम मेडिकल गाईड, द कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ फिजिशियन्स ॲण्ड सर्जन्स.
याच पुस्तकात दिलेल्या सल्ल्यानुसार, घरगुती औषधांच्या कपाटात बॅण्डएडच्या आणि इतर पट्ट्या, स्टराईल गॉजचे पॅड्स, कापसाचे बोळे, बॅण्डेज पट्ट्या, निरनिराळे मलम आणि क्रीम्स, ॲन्टिसेप्टिक रबिंग ॲल्कोहोल, कात्री, थर्मोमीटर आणि इतर आवश्यक वस्तू असाव्यात.
औषधांपैकी, ताप आणि वेदना कमी करणाऱ्या गोळ्या, असिडिटीचे औषध, कफ सिरप, एखादे ॲन्टिहिस्टॅमीन/डिकंजेस्टंट, सौम्य सारक, अतिसाराचे औषध आणि थर्मोमीटर असावे.
[८ पानांवरील चौकट]
इशारा
“OTC [ओवर द काउन्टर] ड्रग्स, म्हणजेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायही मिळणारी औषधे देखील शेवटी औषधेच असतात. फक्त चिठ्ठी दाखवल्यावरच मिळणाऱ्या औषधांप्रमाणेच, यांपैकी देखील काही औषधे इतर औषधे घेत असताना किंवा विशिष्ट खाद्यांसोबत अथवा पेयांसोबत घेता येता नाहीत. इतर औषधांप्रमाणेच काही OTC औषधांमुळेही आणखी गंभीर समस्या उद्भवण्याची किंवा त्यांची सवय लागण्याची शक्यता असते. शिवाय, काही प्रसंगी डॉक्टरकडे जाणेच आवश्यक असते, नुसते एखादे OTC औषध घेऊन काम भागवले जाऊ नये.
“तरीपण, बहुतेक सुरक्षित आणि परिणामकारक असतात . . . आणि ती घेतल्याने हमखास गुण येतो.”—औषधांचा विचारपूर्वक वापर (इंग्रजी).
[७ पानांवरील चित्रं]
आठवणीत असू द्या, कोणतीही वनौषधी किंवा कोणतेही औषध पूर्णपणे सुरक्षित नसते
१. औषध विक्रेत्याचे कपाट
२. चालते-फिरते औषधांचे दुकान
३. वनौषधींच्या पिशव्या