वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ८/८ पृ. ३-५
  • स्वयं-उपचार—फायदे आणि धोके

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वयं-उपचार—फायदे आणि धोके
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्वयं-उपचार—धोकेदायक?
  • सुरक्षित स्वयं-निदान—कसे?
  • तुम्हाला उत्तम आरोग्य कसे उपभोगता येईल?
    सावध राहा!—१९९८
  • सुज्ञपणे औषधांचा वापर करा
    सावध राहा!—१९९६
  • हर्बल उपचार तुमच्याकरता फायदेकारक असू शकतात का?
    सावध राहा!—२००४
  • एड्‌सचे लोण आटोक्यात येईल? कसे?
    सावध राहा!—२००३
सावध राहा!—१९९८
g98 ८/८ पृ. ३-५

स्वयं-उपचार—फायदे आणि धोके

ब्राझीलमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

एका बड्या फार्मस्युटिकल कंपनीच्या अध्यक्षांच्या मते, “सबंध जगात स्वयं-उपचाराचा बाजार वाढत चालला आहे. लोक आपल्या आरोग्यावर स्वतःच नियंत्रण ठेवू इच्छितात.” हे जरी खरे असले तरीसुद्धा, यात काही धोके समाविष्ट आहेत का?

अर्थात योग्य वापर केल्यास, औषधांमुळे आराम मिळू शकतो. उदाहरणार्थ इन्सुलिन, ॲन्टिबायोटिक्स, तसेच ओरल रीहायड्रेशन थेरपी यांसारखे स्वस्त आणि सोपे उपाय कितीतरी लोकांना अक्षरशः जीवनदान देतात. कमीतकमी धोके पत्करून जास्तीत जास्त फायदा मिळवणे, हेच स्वयं-उपचारातील आव्हान आहे.

काही देशांत प्रशिक्षित कार्यकर्त्यांकडून उपचार करून घ्यायचा म्हटले की एकतर फार दूर जावे लागते, किंवा मग तो उपचार खिशाला परवडणारा नसतो. त्यामुळे, बऱ्‍याच लोकांना मित्रमंडळी, कुटुंबीय यांच्याकडून किंवा सल्लाविषयक पुस्तकांतून मिळणाऱ्‍या उपचारासंबंधी माहितीवर अवलंबून राहावे लागते. तसेच, ब्राझील येथील साँऊ पाउलू विद्यापीठात प्राध्यापक असणारे फर्नांड्यू लफेवरे म्हणतात त्याप्रमाणे, “जाहिरातींतून असे भासवले जाते जणू काही एक कॅप्सूल घेतली की झाले, तुम्ही अगदी निरोगी आणि सुदृढ व्हाल.”a यावर विश्‍वास ठेवून, बरेच लोक कामाचा ताण, निकस आहार आणि अगदी लहानसहान भावनिक ताणतणाव यांसारख्या कारणांमुळे होणारे दुष्परिणाम दूर करण्यासाठी औषधे घेऊ लागतात. लफेवरे पुढे म्हणतात, “हे लोक आपल्या जीवनातल्या परिस्थिती सुधारण्याऐवजी, कपाटातली औषधं काढून आपल्या समस्या सोडवू पाहतात.” आणि त्यांनी रोगाचे अचूक निदान केले आहे याची तरी कोठे खात्री असते?

बरेच जण डोकेदुखी, उच्च रक्‍तदाब आणि अपचन यांसारख्या समस्यांकरता तर औषधोपचार घेतातच, पण काळजी, भीती आणि एकटेपणा घालवण्यासाठी देखील ते गोळ्या-कॅप्सूल घेतात. डॉ. ॲन्ड्रे फेनगोल्ड सांगतात, “गोळी घेतली की आपली समस्या हमखास सुटेल, असे समजून लोक डॉक्टरांकडे येतात. शिवाय, आरोग्य अधिकाऱ्‍यांना देखील औषधं लिहून देण्याची आणि वाटेल तेवढ्या चाचण्या करवून घेण्याचा सल्ला देण्याची सवयच झालेली असते. रुग्णाची हिस्ट्री (पूर्वेतिहास) जाणून घेण्याचा प्रयत्नच केला जात नाही; सहसा या रुग्णांपैकी बहुतेकांचे जीवन अस्ताव्यस्त, तणावग्रस्त आणि अनारोग्यकारक असल्याचे आढळते.” सायकोट्रॉपिक्सचा (संवेदन आणि वर्तन यांवर परिणाम करणारी औषधे) गैरवापर रोखण्याकरता नेमलेल्या जागतिक परिषदेचे सदस्य, रोमिल्डो ब्वेनो कबूल करतात की: “रुग्णांना तपासण्याकरता पुरेसा वेळ नसल्यामुळे, डॉक्टर फक्‍त लक्षणांचा उपचार करून रुग्णाला घरी पाठवतात.” औषधे घेणे हा “सामाजिक समस्या [सोडवण्यासाठी] काढलेला वैद्यकीय उपाय” आहे. पण, दुसरे एक डॉक्टर ताकीद देतात की बऱ्‍याच रुग्णांना फार काळजीपूर्वक ठरवलेली सायकोट्रॉपिक औषधे देण्याची खरोखरच गरज असते.

“प्रोझॅक फॅड” याचे विवरण देताना ब्राझीलचे दैनिक ओ एस्तेदो द एस. पाउलु म्हणते: “एखादे औषध नव्या हेअरस्टाईलसारखे फॅड बनावे, हे फारच विचित्र आहे.” आर्थर काउफमॅन या मनोविश्‍लेषकाच्या शब्दांत: “जीवनात योग्य दृष्टिकोन आणि उद्देश नसल्यास एखादे गुणकारी औषध सर्वच आजारांवर तरणोपाय आहे असे वाटू लागते.” काउफमॅन पुढे म्हणतात: “आज माणसाला झटपट इलाज हवा असतो; म्हणूनच, आपल्या समस्यांची कारणं शोधत बसण्यापेक्षा एखादी गोळी घेऊन काम आटपायला त्याला जास्त आवडतं.” पण स्वयं-उपचार करणे सुरक्षित आहे का?

स्वयं-उपचार—धोकेदायक?

द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिकानुसार, “२० व्या शतकात वैद्यकीय क्षेत्रातले सर्वात लक्षवेधक वैशिष्ट्य कोणते असेल, तर ते म्हणजे नवनवीन औषधांचा शोध.” पण हा विश्‍वकोश पुढे म्हणतो: “शरीरात होणारी विषबाधा आणखी कोणत्याही कारणापेक्षा औषधांमुळेच होते.” सत्य हेच आहे की औषधांमुळे जसा इलाज होऊ शकतो तसेच त्यांमुळे नुकसान देखील होऊ शकते. ॲनोरेक्सिया (क्षुधानाश) पिल्स, अर्थात आहारनियंत्रणाच्या गोळ्या “मज्जासंस्थेवर परिणाम करतात आणि त्यामुळे निद्रानाश, वर्तनात बदल आणि कधी कधी भ्रमविकार यांसारखे दुष्परिणाम होण्याचा संभव असतो,” असे लेखिका सीलेने डी कॅस्ट्रो सांगतात. त्या पुढे म्हणतात: “पण ॲनोरेक्सियाच्या गोळ्या घेतल्यामुळे फक्‍त भूक लागणार नाही असे जर कोणाला वाटत असेल तर हा त्याचा गैरसमज आहे. एक कॅप्सूल घेतल्यावर आणखी कितीतरी औषधे घ्यावी लागतात, जी एकमेकांचे परिणाम निष्फळ करतात.”

अगदी सर्रास वापरल्या जाणाऱ्‍या कित्येक औषधांमुळे पोटदुखी, आणि कधीकधी तर मळमळ, वांत्या आणि रक्‍तस्राव देखील होऊ शकतो. काही विशिष्ट औषधांचे व्यसन लागू शकते किंवा त्यांमुळे मुत्राशयाला आणि यकृताला अपाय होऊ शकतो.

अगदी सर्वमान्य आरोग्य उत्पादनांवर देखील भरवसा ठेवता येत नाही. ब्राझीलियन वैद्यकीय मंडळाचे अध्यक्ष, डॉ. इफ्रेम ऑल्शेव्हर इशारा देतात की, “व्हिटॅमिन पूरक घेण्याचे अलीकडचे फॅड अत्यंत धोकेदायक आहे. सामान्य लोक तर आपल्या मनाने वाटेल ती औषधे घेतच आहेत, पण काही अजाण डॉक्टर देखील धोके लक्षात न घेता रुग्णांना शंकास्पद प्रिस्क्रिप्शन लिहून देतात.” तथापि, एका डॉक्टरांच्या मते, योग्य मात्रेत घेतलेले व्हिटॅमिन पूरक विशिष्ट आजार बरे करण्यासाठी आणि न्यूनता भरून काढण्यासाठी आवश्‍यक असतात आणि गुणकारकही ठरू शकतात.

सुरक्षित स्वयं-निदान—कसे?

आपल्याला थोडेसे देखील अस्वस्थ वाटले की प्रत्येक वेळेस आपण थेट डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही; त्यामुळे, आरोग्यविषयक शिक्षण घेणे आणि माफक प्रमाणावर स्वयं-उपचार करणे आपल्या कुटुंबियांकरता फायदेकारक ठरू शकते. तथापि, कोणताही औषधोपचार घेण्यापूर्वी, योग्य आणि भरवशालायक स्वयं-निदान करणे अत्यावश्‍यक आहे. जवळपास डॉक्टर नसतात किंवा डॉक्टरांकडे जाण्याची तुमची ऐपत नसते, तेव्हा तुम्ही एखाद्या वैद्यकीय संदर्भ पुस्तकाच्या साहाय्याने अचूक निदान करू शकता. उदाहरणार्थ, अमेरिकन मेडिकल असोशिएशनद्वारे एक कौटुंबिक वैद्यकीय मार्गदर्शन पुस्तक प्रकाशित केले जाते, ज्यात १८३ पृष्ठांच्या एका विभागात वेगवेगळ्या रोगांची लक्षणे सुचिबद्ध केलेली असतात. यात रुग्णाकरता बरेच प्रश्‍न असतात ज्यांची होय किंवा नाही अशी उत्तरे द्यावी लागतात. या पद्धतीने, बऱ्‍याच वेळा अचूक निदान केले जाऊ शकते.

पण डॉक्टरांविषयी काय? प्रशिक्षितांची मदत केव्हा घेतली जावी? आरोग्याविषयी फारच काळजी करणे किंवा मग अजिबातच काळजी न घेणे या दोन्ही टोकाच्या भूमिका आपण कशाप्रकारे टाळू शकतो? या जगात आजार आणि मनोदैहिक विकार इतक्या मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असताना, चांगल्या आरोग्याचा उपभोग घेणे आपल्याला कसे शक्य होईल?

[तळटीपा]

a कित्येक डॉक्टर आणि वैद्यकीय संस्थांचा विरोध असूनही, केवळ डॉक्टरांची चिठ्ठी दाखवल्यावरच मिळणारी औषधे, “चिठ्ठीविना ग्राहकाला” देण्यात येतील या आशयाच्या जाहिरातींना अलीकडे बऱ्‍याच देशांत ऊत आला आहे.

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

“रुग्णाची हिस्ट्री (पूर्वेतिहास) जाणून घेण्याचा प्रयत्नच केला जात नाही; सहसा या रुग्णांपैकी बहुतेकांचे जीवन अस्ताव्यस्त, तणावग्रस्त आणि अनारोग्यकारक असल्याचे आढळते.”—डॉ. ॲन्ड्रे फेनगोल्ड

[४ पानांवरील चौकट]

नैसर्गिक घरगुती उपाय

हजारो वर्षांपासून, निरनिराळ्या संस्कृतींतील लोक शेतांत आणि जंगलांत आढळणाऱ्‍या वनस्पती वापरून वेगवेगळ्या आजारांवर नैसर्गिक उपाय करीत आले आहेत. किंबहुना कित्येक आधुनिक औषधे देखील वनस्पतींपासून तयार केलेली असतात; उदाहरणार्थ, हृदयरोगांवरील उपचारांत वापरले जाणारे डिजीटॅलिस. त्यामुळेच, संयुक्‍त राष्ट्रातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल हर्बलिस्ट्‌सच्या सदस्या पनेलपी ओडी यांनी आपल्या पुस्तकात असे विधान केले आहे की, “साधे सर्दीपडसे, आणि डोकेदुखीपासून ते त्वचाविकार, पचनासंबंधी समस्या आणि बालरोगांवरील विशेष उपचारांपर्यंत—जवळजवळ २५० सुरक्षित उपाय उपलब्ध आहेत.”

त्या लिहितात: “वनौषधीला आदिम काळापासून ‘सामान्य लोकांची औषधी’ म्हणण्यात आले आहे—यात लहानसहान रोगांवर केले जाणारे साधेसोपे उपाय किंवा मग दीर्घकालीन आणि गंभीर रोगांवर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या अधिक गुणकारक औषधांच्या जोडीला घ्यावयाची औषधे समाविष्ट आहेत.” पुढे त्या म्हणतात: “बऱ्‍याच वनौषधी मुळातच सुरक्षित असतात, तरीसुद्धा त्यांचा विचारपूर्वक वापर केलेलाच बरा. रोगाची लक्षणे कमी झाली नाहीत, उलट आणखी वाढली किंवा निदान चूक आहे की बरोबर याविषयी शंका असल्यास, सांगितलेल्या औषधाची मात्रा वाढवू नये, तसेच घरगुती उपायही सुरू ठेवू नयेत.”—द कम्प्लीट मेडिसिनल हर्बल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा