मंगळावरील यंत्रमानवाची शोधमोहीम
मार्स पाथफाईंडर नामक अवकाशयान वाहून नेणाऱ्या यानाने, केप कॅनाव्हेरल, फ्लोरिडाच्या अवकाश-तळावरून आकाशात झेप घेतली तेव्हा मी आणि माझे कुटुंब अगदी श्वास रोखून पाहत होतो. आम्ही विचार केला, ‘ते यशस्वीरित्या मंगळावर पोहंचेल की नाही? कोणते नवीन शोध लागतील?’
पाथफाईंडरच्या यशासंबंधी शंका करण्याचे कारण, यापूर्वी मंगळाला भेट दिलेले दोन अवकाशयान, अर्थात मार्स ऑबझर्व्हर आणि मार्स ९६ अपयशी ठरले होते. याशिवाय, पाथफाईंडरला अतिशय अवघड अवतरण करण्याचा प्रयत्न करायचा होता.
सदर अवकाशयान मंगळाच्या वातावरणात जवळजवळ, ताशी २७,००० किलोमीटरच्या वेगाने शिरू लागले. पॅराशूटच्या साह्याने त्याचा वेग मंदावण्याची व्यवस्था केल्यानंतर आणि मग ९८ मीटरच्या उंचीवर आल्यानंतर वेग आणखीनच मंदावण्यासाठी अवकाशयानाने यान सोडले. दरम्यान, हवा भरलेल्या मोठमोठ्या वायू पिशव्यांची एक संरक्षणात्मक उशी अवकाशयानाला पुरवण्यात आली. जुलै ४, १९९७ रोजी, ताशी ६५ किलोमीटरच्या गतीने मार्स पाथफाईंडरने मंगळाच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले.
पहिल्याच उसळीमुळे अवकाशयान १५ मीटर वर फेकले गेले. सुमारे १५ वेळा एखाद्या मोठ्या पण हलक्या चेंडूप्रमाणे उसळ्या खाल्ल्यानंतर ते स्थिर झाले. मग वायू पिशव्यांतील हवा बाहेर पडून त्या पिशव्या आखडल्या. आवश्यक असल्यास स्वतःस सरळ करण्याच्या क्षमतेसहित पाथफाईंडरची रचना केली होती; पण तशी आवश्यकता भासली नाही कारण ते सरळच उतरले. शेवटी त्याने आपल्या पुष्पसदृश्य पाकळ्या फैलावल्या, वैज्ञानिक उपकरणे, रेडिओ अँटिना, सौरबॅटरी आणि सोजर्नर नामक रोवर अर्थात बॅटरीवर चालणारे मोटार वाहन बाहेर काढले.
मंगळावरील शोधकार्य
लवकरच, पाथफाईंडरच्या कॅमेऱ्याने सभोवतालच्या परिसराची पाहणी केली. एरिस वॉलिस किंवा “मंगळ खोरे” या क्षेत्रापाशी असलेली “सुवर्ण मैदाने” या अर्थाच्या क्रूसे प्लानिट्या नामक विस्तृत मैदानात वसलेले खडक, उंचसखल पृष्ठभाग, दूरवरील टेकड्या—सोजर्नरद्वारे संशोधन करण्यास अगदी योग्य—पाथफाईंडरला आढळल्या. पासष्ट सेंटीमीटर उंच असलेल्या या कार्यक्षम लघु यंत्रमानवाने आपल्या कॅमेऱ्याच्या साह्याने दृश्यमान संशोधने करावयाची होती; तर स्पेक्ट्रोमिटरच्या साह्याने खडक आणि माती यांच्यातील रासायनिक घटकांच्या प्रमाणांचे मोजमाप करावयाचे होते.
शास्त्रज्ञ व अभियांत्रिकांच्या या गटाने सोजर्नरच्य साह्याने शोधकार्य सुरू केले. पृथ्वी आणि मंगळ हा प्रवास करण्यासाठी रेडिओ संकेतांना बरीच मिनिटे लागत असल्यामुळे गटाचे कार्यकर्ते थेटपणे सोजर्नर चालवू शकले नव्हते. यास्तव, मंगळावरील भूप्रदेशाचे अडथळे चुकवण्यासाठी सोजर्नरला मोठ्या प्रमाणात आपल्याच क्षमतेवर विसंबून राहावे लागणार होते. लेसर बीम्सच्या साह्याने आपल्या मार्गातील खडकांचे परिमाण व स्थान निश्चित करून त्याने हे अडथळे चुकवले. मग, पार करण्याइतके खडक लहान असल्यास त्यांना पार करण्याची किंवा मग खडक मोठे असल्यास आडमार्ग काढून जाण्याची सूचना कॉम्प्युटर त्यास देत असे.
साहसकार्य व शोध
वृत्तपत्रे व नियतकालिकांतील अहवालांनी पाथफाईंडरने घेतलेल्या मंगळाच्या पृष्ठभागाची छायाचित्रे छापून लक्षावधी लोकांना खूष केले. मंगळावरील नवनवीन दृश्ये प्रसिद्ध झाली तशी, वावरणाऱ्या रोवरच्या हालचालींनी लोकांची करमणूक केली; खडकाळ व डोंगराळ भूप्रदेशाच्या रंगीत, विशाल दृश्यांनी लोकांचे कुतूहल चाळवले तर ढगांच्या दृश्यांनी व मंगळाच्या आकाशातील सूर्यास्तांनी लोकांना मंत्रमूग्ध करून टाकले. शोधमोहिमेच्या पहिल्या महिन्यादरम्यान इंटरनेटवरील पाथफाईंडरच्या वेब पेजने, अवकाशयानाच्या कार्यहालचालीविषयी कुतूहल असणाऱ्या लोकांनी केलेल्या चौकशींचे ५० कोटींहून अधिक “हिट्स” नमूद केले.
शास्त्रज्ञांच्या गटाने अपेक्षा केली होती त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात पाथफाईंडरने माहितीचे भांडार उपलब्ध केले. आणि तेसुद्धा, जवळजवळ गोठण्याच्या ० डिग्री सेल्सियस ते थिजवणाऱ्या -८० डिग्री सेल्सियसच्या तापमानात चालत असताना. या संशोधनकार्याने काय प्रकट केले?
कॅमेरे व उपकरणे यांनी निरनिराळ्या रासायनिक संयोगांचे, रंगांचे व रचनेचे खडक, माती, व धुळीच्या कण यांचा शोध लावला; यावरून मंगळावर जटिल भूशास्त्रीय प्रक्रिया झाल्या असल्याचे सूचित होते. सभोवतालच्या भूप्रदेशातील लहान लहान टेकड्या, ईशान्येकडील वाऱ्यांमुळे वाळू साचली असल्याची ग्वाही देतात. बर्फाच्या कणांनी बनलेले अरुणोदयापूर्वीचे ढग आकाशात दिसून आले. हे ढग नाहीसे होऊन अरुणोदय झाला तसे वातावरणातील सूक्ष्म धुळीमुळे आकाशाने तांबूस रंगछटा पांघरली. अधूनमधून, लघू वावटळ अर्थात वाऱ्याचे व धुळीचे चक्रवात अवकाशयानावरून जात होते.
परग्रहावरील या अफलातून अनुभवाद्वारे मार्स पाथफाईंडरने अक्षरशः आपली करमणूक केली आहे. आगामी दशकात मंगळावर आणखीन संशोधनकार्य करण्याचा बेत संयुक्त संस्थाने व जपान करत आहेत. इतर वैज्ञानिक संशोधने करण्यासाठी मार्स ग्लोबल सर्व्हेयर नामक अंतरिक्ष यान केव्हाच मंगळावर अवतरले आहे. खरेच, अवकाशयानाच्या कॅमेऱ्यांतून या तांबड्या ग्रहाचा आपण शोधप्रवास करू तसे मंगळाशी आपण अधिक परिचित होऊ.—सौजन्याने.
[२४ पानांवरील चित्रं]
झेप घेताना
अवतरण
मंगळावर
[चित्राचे श्रेय]
सर्व चित्रे: NASA/JPL