तरुण लोक विचारतात . . .
त्याचे माझ्यावर प्रेम नसले तर?
“मला खूप चिंता वाटतीय; मला मनःस्ताप झालाय. मी त्याच्या प्रेमात पडलीय. पण त्याला काय वाटतं हे मला माहीत नाही. मी काय करू? मी माझं प्रेम व्यक्त करावं का? नाही, नाही, हे कसं शक्य आहे? लोक काय म्हणतील?”—ह्यूडा.a
ह्यूडा, ही तरुण लेबनीज स्त्री एका व्यक्तीच्या प्रेमात पडली होती, पण त्याचे तिच्यावर प्रेम नव्हते. यात जगावेगळं काहीच नाही. झेना नावाच्या आणखी एका तरुणीचाही हाच अनुभव होता. ती आठवून सांगते: “तो आमच्या शेजारी राहायचा म्हणून दररोज दिसायचा. तो फार आकर्षक आणि देखणा होता. म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले.”
अर्थात, कोणाबद्दल अशा तीव्र भावना बाळगण्यात काहीच गैर नाही—ती व्यक्ती एका ख्रिश्चनासाठी योग्य असली तर. (नीतिसूत्रे ५:१५; १ करिंथकर ७:३९) त्याचप्रमाणे आपणही लग्न करून संसार थाटावा अशी एका तरुण स्त्रीची इच्छा काही चुकीची नाही. पण समजा तुम्ही एका योग्य व्यक्तीच्या प्रेमात पडला पण त्या व्यक्तीला मात्र काहीच माहीत नसेल—किंवा ती तुमच्या प्रेमात नसेल तर काय?
प्रेमरोगाचे दुःख
ह्यूडासारखे तुम्हाला देखील वाटेल की, तुम्ही भावनिक वादळात गुरफटले गेला आहात. एका क्षणी अत्यानंदाच्या उफाळ्या जाणवतात तर दुसऱ्या क्षणी असह्य खिन्नता. “कधीकधी माझ्यासारखी आनंदी अख्ख्या जगात कोणी नसेल असं वाटायचं तर कधी माझ्याइतकी कोणी दुःखी नसेल असं वाटायचं,” असे झीना म्हणते. प्रेमाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यास, काळजी, निद्रानाश आणि खिन्नता देखील संभावू शकतात.
नीतिसूत्रे १३:१२ येथे बायबल म्हणते: “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते.” आणि अपेक्षा जेव्हा पूर्ण होतच नाहीत तेव्हा तर सगळ्याचा पार चुरा होतो! सदा न कदा याच व्यक्तीचे विचार तुमच्या डोक्यात घोळत असतील आणि त्याच्याविषयी कसलीही माहिती ऐकायला तुम्ही उत्सुक असाल असे तुमच्या लक्षात येईल. त्याचे लक्ष आकर्षित करण्यासाठी नवनवीन मार्ग किंवा त्याच्यासोबत असण्याकरता काही न काही निमित्त तुम्ही शोधून काढाल. आणि तो जवळपास कोठे असला, तर तुम्हाला नॉर्मल वागणे जरा कठीण वाटत असेल.
तुमचे ज्याच्यावर प्रेम आहे तो कधीकधी तुमच्याकडे फारच लक्ष देतो आणि इतर वेळा जणू ओळखही नसल्यासारखा वागतो तेव्हा आणखीनच गोंधळ होतो. आणि त्याने इतर कोणा व्यक्तीकडे जास्त लक्ष दिले किंवा इतरांशी नम्रपणे आणि शिष्टाचाराने वागत असला, तर तुमचा जळफळाट होऊ शकतो. बायबल म्हणते: “क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरवली, पण प्रेमसंशयापुढे कोण टिकेल?”—नीतिसूत्रे २७:४.
ह्यूडाने कबूल केले: “मला इतकी म्हणजे इतकी ईर्ष्या वाटायची की, मी स्वतःला आवरलं नसतं, तर मला वेड लागलं असतं.” स्वतःची किळस वाटू शकते. ह्यूडा म्हणाली: “माझ्यावर प्रेम न करणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात मी का पडले आणि स्वतःचाच छळ का करून घेत आहे म्हणून मी स्वतःलाच दोष देऊ लागले.”
पाश्चात्त्य देशांमध्ये एखादी तरुण स्त्री मनमोकळेपणाने आपल्या भावना एखाद्या तरुणासमोर व्यक्त करू शकत असली, तरी सर्वच तरुणी असे करणार नाहीत. शिवाय, काही संस्कृतींमध्ये तर, मुलीने पुढाकार घेणे म्हणजे अनुचितपणाचे किंवा धक्केदायकही मानले जाऊ शकते. मग, तुम्ही ज्यावर प्रेम करता ती व्यक्ती तुमच्या प्रेमाला प्रतिसाद देत नसेल तर तुम्ही काय करू शकता?
स्वतःच्या भावनांचे परीक्षण
प्रथम, शांतपणे आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून स्वतःच्या भावनांचे परीक्षण करा. बायबल ताकीद देते: “जो आपल्या मनावर भरवसा ठेवितो तो मूर्ख.” (नीतिसूत्रे २८:२६) का? कारण बहुतेकवेळा आपले हृदय जे म्हणते ते चुकीचे असते. (यिर्मया १७:९) शिवाय, ज्याला आपण प्रेम समजतो ते भलतेच काही असू शकते. “माझ्याकडे कुणी लक्ष द्यावं आणि माझ्यावर प्रेम करावं असं मला नेहमी वाटायचं,” असे ह्यूडा कबूल करते. “माझ्यावर प्रेम करणारं, माझी काळजी घेणारं कुणीतरी मला हवं होतं. लहानपणापासून मला कधी प्रेम मिळालेलं नव्हतं. त्याचाच माझ्यावर जास्त प्रभाव झाला.” तुमच्या कुटुंबातले वातावरणही असेच प्रेमरहित किंवा अत्याचारी असले असेल, तर तुम्हीही प्रेमासाठी आणि दुसऱ्यांनी तुमच्याकडे लक्ष द्यावे म्हणून आसुसलेले असाल. परंतु, प्रणयसंबंध हाच त्यावरचा उपाय आहे का?
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, ज्या लोकांना पोकळी आणि एकलकोंडेपणा जाणवतो ते म्हणावे तसे चांगले विवाहसोबती बनत नाहीत. त्यांच्या मते, त्यांना ज्याची अत्यंत गरज आहे ती भागवण्यासाठी ते विवाह करतात. परंतु, खरा आनंद हा घेण्यात नव्हे, तर देण्यात आहे. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) आणि ज्या स्त्रिला स्वतःबद्दल समाधान वाटत असते आणि जी ‘आपलेच हित पाहत नाही, तर दुसऱ्यांचेही पाहते,’ अशी स्त्री विवाह हाताळण्यासाठी उत्तम स्थितीत असते.—फिलिप्पैकर २:४.
विवाह करण्याचा दबाव असतो, तेव्हा कोणत्याही विरुद्धलिंगी व्यक्तीने तुमच्याकडे लक्ष दिले तर तुम्ही अगदी सहजपणे त्याचा गैर अर्थ लावू शकता. काहीवेळा एका तरुणीच्या प्रणय भावना तिच्या मित्रमैत्रिणींमुळे आणि कुटुंबामुळे वाढवल्या जातात. काही समाजांमध्ये, लग्नाचे वय झाले न झाले तोच मुलीचे होता होईल तितक्या लवकर लग्न उरकून टाकावे यावर जास्त भर दिला जातो. मध्यपूर्वेतील स्त्रिया (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “एखादी स्त्री ३० वर्षांची झाली आणि तरीही तिचा विवाह झालेला नसला, तर कुटुंबाला त्याची फार काळजी वाटू लागते.” कुटुंबाच्या इज्जतीचा सवाल असल्यामुळे, आपल्या मुलींची लग्ने लवकरात लवकर उरकून टाकायचा प्रयत्न वडील करतील.
तथापि, संस्कृतीपेक्षा बायबल तत्त्वे वरचढ आहेत. शिवाय, तरुण लोकांनी, विवाह करण्याआधी ‘ऐन तारुण्याचा बहर ओसरेपर्यंत’ थांबून राहावे असे शास्त्रवचने आर्जवतात. (१ करिंथकर ७:३६) तर मग, तुमचा मित्रपरिवार किंवा पालक तुमच्यावर विवाह करण्याची अनावश्यकपणे जबरदस्ती करत असल्याचे तुम्हाला वाटले तर काय? देव-भीरू शुनेमकरीणने आपल्या सोबतीणींना, ‘इच्छा होत नाही तोपर्यंत तिच्या प्रेमास उठवू नका किंवा जागृत करू नका’ असे सौम्यतेने दटावून सांगितले असे बायबल म्हणते. (गीतरत्न २:७, NW) अशाप्रकारे कदाचित तुम्ही देखील ठामपणे बोलून दाखवले तर तुम्हाला त्याचे उत्तम परिणाम लाभतील, विशेषतः तुमचे पालक देव-भीरू असतील तर.
सत्याला सामोरे जाणे
तरीही, तुम्हाला ज्या व्यक्तीवर प्रेम आहे असे वाटते त्याबाबतीत तुम्हाला कधी न कधी सत्याला तोंड द्यावे लागेल. हे इतके सोपे नाही आणि त्यामुळे तुम्हाला भावनिक मनःस्ताप होऊ शकतो. पण शास्त्रवचने सांगतात: “सत्य . . . विकत घे, विकू नको.” (नीतिसूत्रे २३:२३) स्वतःला विचारा, ‘मी कोणत्या आधारावर त्याच्या प्रेमात पडलीय? या व्यक्तीविषयी मला खरोखर केवढी माहिती आहे? त्याचे विचार, भावना, मत, सवयी, मूल्ये, क्षमता, कसब आणि जीवनशैली यांच्याबद्दल मला किती माहीत आहे?’
दुसरी एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, त्याला तुम्ही खरोखर आवडता असे त्याने व्यक्त करून दाखवले आहे की नाही. बहुतेकवेळा, फक्त चांगुलपणा किंवा मनमिळाऊपणाचा चुकीचा अर्थ लावला जातो. ह्यूडा म्हणते, “त्याच्या विनयशील वागणुकीचा मी गैर अर्थ लावला की त्याला मी आवडते कारण मला तसं हवं होतं. नंतर, त्याला मी तशाप्रकारे आवडत नाही असं मला कळाल्यावर मला फारच ओशाळल्यासारखं झालं. मीच त्याच्यासाठी पात्र नाही आणि माझ्यातच काही खोट आहे असं मला वाटलं.”
कदाचित अशाच अनुभवामुळे तुम्हालाही तसे वाटले असावे. पण, तुम्ही हे जाणून घ्या की, ह्या व्यक्तीला तुम्ही उचित वाटला नाहीत याचा अर्थ इतर कोणतीही व्यक्ती तुम्हाला उचित समजणार नाही असे नाही. संपूर्ण जगात हाच काही एकटा तरुण नाही!
दुःखातून सावरणे
असे असले, तरी तुमच्या दुखावलेल्या भावनांमधून सावरायला तुम्हाला वेळ लागेलच. अशावेळी तुम्हाला कशाची मदत होईल? एक मार्ग म्हणजे, ‘खऱ्या मित्राजवळ’—जो तुमचे ऐकेल अशा प्रौढ ख्रिश्चनाजवळ आपल्या भावना व्यक्त करणे. (नीतिसूत्रे १७:१७) कदाचित, मंडळीत वयाने मोठी असलेली एखादी बहीण असेल जिच्यासोबत तुम्ही बोलू शकता. ख्रिस्ती पालक देखील मदत आणि आधार देण्यात महत्त्वाची भूमिका अदा करू शकतात. झीना आठवून सांगते: “आमच्या मंडळीतल्या एका ख्रिस्ती स्त्रीने माझ्या या पीडित मनःस्थितीचं निरीक्षण केलं, मला मदत द्यायला ती पुष्कळ प्रौढ होती. तिच्याबरोबर बोलायला मला मोकळेपणा वाटायचा आणि मी तिला सगळं काही सांगून टाकलं. मग तिने मला माझ्या पालकांसोबत याविषयी बोलायला सांगितलं. म्हणून मी त्यांच्यासोबत बोलले आणि त्यांनी मला समजून घेतलं आणि मला मदत दिली.”
शिवाय, प्रार्थनेचे सामर्थ्य देखील लक्षात ठेवा. (स्तोत्र ५५:२२) ह्यूडा म्हणते: “यहोवाला मी प्रार्थना केल्यामुळे माझं दुःख विसरायला मला मदत मिळाली. मी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांतले सहायक ठरणारे लेखही वाचले.” या व्यतिरिक्त, तुम्ही स्वतःला इतरांपासून विलग करू नये हे देखील महत्त्वाचे आहे. (नीतिसूत्रे १८:१) इतर लोकांसोबत मैत्री करा. झीना आठवते, “मी माझ्या कामात गढून गेले आणि पायनियर [पूर्व-वेळेची सुवार्तिका] बनले त्यामुळेही मला मदत मिळाली. मंडळीतल्या इतर स्त्रियांशी सुद्धा मी माझा सहवास वाढवला. यामुळे मला आध्यात्मिक प्रगती करायला मदत मिळाली.”
बायबलमध्ये, “प्रेम करण्याचा समय” असतो असे म्हटले आहे आणि म्हणून कालांतराने कदाचित तुम्हालाही एखादी व्यक्ती भेटेल जी तुमच्या प्रेमाला प्रतिसाद देईल. (उपदेशक ३:८) यहोवा देवाने, मानवांमध्ये विवाहातल्या प्रेमाच्या सुखाचा आनंद लुटण्याची इच्छा घातली आणि कालांतराने तुम्हाला देखील आपल्या महान निर्मात्याच्या या उत्तम तरतुदीची प्रचिती मिळेल. तोपर्यंत, स्वतःच्या अविवाहित स्थितीचा पुरेपूर लाभ का घेऊ नये? या काळात एखादी व्यक्ती “निश्चिंत” असते असे पौल म्हणतो. (१ करिंथकर ७:३२-३४) कोणत्याही बाबतीत, बायबलच्या अभिवचनाची पूर्णता होण्याची खात्री तुम्ही बाळगू शकता: “तू [यहोवा] आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस.”—स्तोत्र १४५:१६.
[तळटीपा]
a संबंधित लोकांबद्दल गुप्तता ठेवण्यासाठी नावे बदलण्यात आली आहेत.
[२७ पानांवरील चित्र]
काहीवेळा, विनयशील वागणुकीचा गैर अर्थ लावला जातो