वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ७/८ पृ. १३-१५
  • सुट्ट्यांचा बट्ट्याबोळ कसा टाळाल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुट्ट्यांचा बट्ट्याबोळ कसा टाळाल
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उत्तम तयारी
  • तुम्ही पोहंचता तेव्हा
  • सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी आवश्‍यक
  • साक्ष देण्याच्या संधी साधा
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ईश्‍वरशासित कार्यहालचालींचा उन्हाळ्यात पाठलाग करीत राहा
    आमची राज्य सेवा—१९९४
सावध राहा!—१९९८
g98 ७/८ पृ. १३-१५

सुट्ट्यांचा बट्ट्याबोळ कसा टाळाल

सुट्ट्या! हा शब्द कानांवर पडताच तुमच्या मनःपटलावर कोणते चित्र उमटते? सूर्यप्रकाशातील लख्ख समुद्र किनाऱ्‍यावर साद घालणाऱ्‍या जोमदार खजुरीच्या वृक्षांच्या छायेत विसावा घेण्याचे? की मग डोंगरमाथ्यांच्या सानिध्यात राहून शीतल, स्वच्छ हवेचा मनमुराद आनंद लुटण्याचे?

तरीही खराब हवामान, प्रवासातला उशीर, प्रवासातील आजारपण इत्यादी बाबींची शक्यता कदाचित तुम्हाला भेडसावत असेल. तुमच्या कल्पना कोणत्याही असोत, तुमची सुट्टी होताहोईल तितकी सुखकर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

उत्तम तयारी

सुट्टीवर जाणारे बुद्धिमान लोक पहिल्यापासूनच याचा बेत आखतात. प्रवास व आरोग्यसंबंधित कागदपत्रे ते तयार ठेवतात जेणेकरून प्रवासाला निघताना ती सुस्थितीत असतील. शक्यतो उद्‌भवणाऱ्‍या आरोग्य समस्यांची विचारपूस केल्याने कोणती प्रतिबंधक औषधे घ्यावीत हे ठरवण्यास त्यांना मदत होते.

जेथे मलेरियाचा रोग आहे तेथील प्रवासाला निघण्याच्या काही दिवसांपूर्वीपासून अनेकजण मलेरिया प्रतिबंधक औषधे घेतात. तथापि, दक्षता म्हणून अनेकदा असा सल्ला दिला जातो, की त्यांनी अशा प्रकारचा औषधोपचार संबंध सुट्टीदरम्यान तसेच सुट्टीनंतर चार आठवड्यांपर्यंतही चालू ठेवावा. याचे कारण, तोपर्यंत मलेरियाचे परजीवी शरीरात राहतात व वाढतात. पण, इतर पूर्वदक्षताही अत्यावश्‍यक आहेत.

लंडन स्कूल ऑफ हायजीन ॲण्ड ट्रॉपिकल मेडिसनचे डॉ. पॉल क्लार्क असा सल्ला देतात: “कीटकरोधक त्वचा क्रिम्स, मनगटावर अथवा घोट्यांवर बांधण्याचे पट्टे, मच्छरदाण्या तसेच विजेवर चालणारे कीटकनाशक साधन या सर्व तितक्याच महत्त्वाच्या आहेत.” अशा प्रकारचे साधन बहुधा सुट्टीला जाण्यापूर्वीच विकत घेणे सर्वात चांगले.

प्रवासातील आजारपण सफरीतील सगळी मजाच घालवून टाकते. पण हे आजारपण उद्‌भवते तरी कसे? एका संशोधकाच्या मते, एखाद्या अनोळखी परिसरात आल्यामुळे मेंदूवर पडणाऱ्‍या नवनवीन संकेतांच्या भाराने प्रवासातील त्रास निर्माण होतो. जहाजाचे हेलकावणे, विमानाचे कंपन किंवा तुमच्या कारच्या इंजिनचे घरघरणे यांमुळे हा त्रास होत असल्यास आपले लक्ष कोणत्याही एका स्थिर गोष्टीवर, कदाचित क्षितिजावर किंवा मग समोरच्या रस्त्यावर केंद्रित करा. खेळत्या हवेची चांगली सोय असल्यास अत्यावश्‍यक असलेले ऑक्सिजन मिळेल. प्रवासातील त्रास विकोपाला गेल्यास ॲन्टिहिस्टामीन औषध घेतल्याने त्याची लक्षणे कमी करण्यास मदत होते. तथापि, एक सावधगिरी बाळगणे उचित आहे: वरील औषध घेतल्याने गुंगीसारखे इतर काही दुष्परिणाम होण्याच्या शक्यतेसंबंधी सावध असा; कारण अशा परिस्थितींत तुमची सुरक्षा धोक्यात येऊ शकेल.

लांबच्या विमान प्रवासात देखील डिहायड्रेशनसारखे आरोग्य धोके उद्‌भवतात. काहीएक हालचाल न करता पुष्कळ वेळ दाटीवाटीने एकाच जागी बसून राहिल्याने पायात रक्‍ताची गाठ निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. रक्‍ताची ही गाठ फुफ्फुसापर्यंत अथवा हृदयापर्यंत पोहंचल्यास उद्‌भवणारे परिणाम विशेषतः घातक असू शकतात. यास्तव, दूरच्या विमान प्रवासात काहींना येण्याजाण्याच्या मार्गात पायी चालून व्यायाम करण्याची किंवा मग बसल्या जागी आपली कंबर व पायाचे स्नायू हालवण्याची गरज असेल. आणि डिहायड्रेशन कमी करण्यासाठी भरपूर मद्यार्करहित पेये घ्या.

वरील बाबी, विमान प्रवास करण्यातील तुमची भीती आणखीनच वाढवतात का? असल्यास, विमान प्रवास तर कितीतरी पटीने सुरक्षित असतो ही वस्तुस्थिती जाणून तुम्ही निर्धास्त राहू शकता. एखादी मोटारसायकल चालवण्यापेक्षा विमान प्रवास ५०० पट, तर कारने प्रवास करण्यापेक्षा २० पट सुरक्षित असतो! तथापि, काहीजण असा वाद घालतील, की सदर आकडेवारी, प्रवास करण्यात घालवलेल्या वेळेच्या नव्हे, तर प्रवासादरम्यान कापलेल्या अंतरावर आधारित आहे.

त्यातच प्रवासात मुले सोबत असली म्हणजे एक विशेष आव्हान उभे ठाकते. प्रसारक कॅथी आर्नल्ड असा सल्ला देते: “तुमच्या प्रवासाची आखणी एखाद्या लष्करी मोहिमेइतकी चोख करा.” तुम्हाला कदाचित तितके चोखंदळपणे करता येणार नाही; तरीही पुस्तके, खेळ किंवा मुलांचे मन रमविण्यासाठी इतर साहित्य सोबत घ्या. यामुळे संबंध कुटुंबाचाच प्रवास एकंदरीत सुखकर होईल.

तुम्ही पोहंचता तेव्हा

सुट्टीला जाणारे अनेकजण बहुधा असे म्हणतात: ‘सुट्टीची पुरेपूर मजा उठविण्याआधी प्रवासातील शिणवटा घालवून पुन्हा एकवार ताजेतवाने होण्यासाठी मला चारपाच दिवस तरी लागतात.’ होय, नवीन परिसराशी जुळवून घेण्यास वेळ लागतो यात शंकाच नाही. यास्तव, तुम्ही पोहंचता त्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्‍या दिवसापासून बाहेर न पडलेलेच बरे. तुमच्या मनाला व शरीराला एका नवीन आराखड्याशी जुळवून घेण्यासाठी वेळ द्या. असे न केल्यास मनावर ताण येऊ शकतो; शिवाय तुम्हाला तुमच्या सुट्टीचा पुरेपूर लाभही उठवता येणार नाही.

एका अंदाजानुसार, दर वर्षी परदेशी दौरा करणाऱ्‍या जगभरातील कोट्यवधी लोकांपैकी कमीतकमी निम्मे लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आजाराने किंवा दुखापतीने पीडित असतात. म्हणूनच, प्रवाशांचे आरोग्य (इंग्रजी) या नियतकालिकाचे संपादक डॉ. रिचर्ड दावूद स्पष्टीकरण देतात, “प्रतिबंध एक चोखंदळ योजना असून कोणत्याही प्रवाशाने त्याकडे डोळेझाक करता कामा नये.” प्रवाशाच्या शरीराला वातावरण, पाणी आणि अन्‍न यांतील विविध प्रकारच्या जीवाणूंशी जुळवून घेण्याची गरज असल्यामुळे, विशेषतः पहिले काही दिवस तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

डॉ. दावूद अशी सूचना देतात की, “अन्‍न ताजे असून पूर्णपणे शिजवलेले (गरम करून निर्जंतुक करणे) आहे—मांसाच्या बाबतीत त्यातला तांबूस रंग नाहीसा होईस्तोवर शिजवलेले आहे याची खात्री झाल्याशिवाय, अन्‍न सुरक्षित आहे असे धरून चालू नका.” तथापि, गरम केलेले अन्‍न देखील सुरक्षित असतेच याची शाश्‍वती नसते. यास्तव, “तुमचे दुपारचे जेवण काल संध्याकाळचे तर नाही ना; ते पुन्हा गरम करून केवळ मस्तपैकी सजवलेले तर नाही ना, याची खात्री करा.”

म्हणूनच, तुम्ही एखाद्या आगळ्यावेगळ्या ठिकाणी सुट्टीवर गेल्यास वाटेल त्या वेळी व वाटेल त्या ठिकाणी तुमच्या मनाजोगते भोजन करणे तुम्हाला कदाचित शक्य नसेल. परंतु, अतिसारापासून बचावण्याकरता ही तशी फारच छोटी किंमत आहे; अहवालानुसार, एकूण आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी २/५ प्रवाशांना अतिसाराची बाधा होते.

पेयांबाबत पाहू जाता, स्थानिकरित्या उपलब्ध असलेल्या पाण्यापेक्षा बाटलीत मिळणारे मिनरल पाणी बहुधा सुरक्षित असते. तथापि, समस्या टाळण्यासाठी बाटलीतील अथवा कॅनमधील पेये तुमच्या देखत उघडवून घेणे शहाणपणाचे ठरेल. बर्फ टाळणेही शहाणपणाचे आहे. बर्फ सुरक्षित आहे याची खात्री झाल्याशिवाय तो शक्यतो घातकच असतो अशी भयशंका बाळगा.

सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी आवश्‍यक

आपल्या वाचकांचे सर्वेक्षण घेतल्यानंतर एका प्रवासी संपादकाने असा अहवाल दिला: “सुट्टी खूप मजेत गेली किंवा इतकी काही खास नव्हती यात हवामानाचा वाटा मोठा असला तरी त्याहीपेक्षा मोठा, अर्थात सिंहाचा वाटा असतो तो मित्रपरिवाराचा.” खरे तर, “उत्तम हॉटेल्स, सुखरूप प्रवास, स्वादिष्ट भोजन आणि आकर्षक पर्यटनस्थळे यांपेक्षाही” कितीतरी वेळा अधिक, मजेशीर सुट्टीसाठी योगदान करणारे एक कारण म्हणून “चांगल्या सोबतीचा” उल्लेख केला गेला होता.

परंतु, सुट्टीला गेल्यावर नवीन आणि त्यातल्या त्यात चांगले मित्रमैत्रिणी तुम्हाला कोठे मिळतील बरे? अर्थात, असे करण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी भेट देण्याची योजना आखता त्या देशातील वॉच टावर संस्थेशी आगोदरच पत्रव्यवहार करणे. ते तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांच्या सगळ्यात जवळच्या राज्य सभागृहाचा पत्ता व तेथील सभांच्या वेळांची माहिती पुरवतील. दफ्तरांचे काही पत्ते या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वर दिले आहेत; तसेच यहोवाच्या साक्षीदारांच्या अलीकडच्या वार्षिक पुस्तकात यांची एक विस्तारित यादी देखील आढळेल.

सुट्टीची मजा लुटण्यासाठी आणि त्याच वेळी पुढे पस्तावा करावा लागेल अशी परिस्थिती टाळण्यासाठी बायबलचा पुढील सल्ला अनुसरणे अत्यावश्‍यक आहे: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) सुट्टीला गेल्यावर एखाद्या एकांत ठिकाणी असताना ख्रिस्ती दर्जांपासून व कृत्यांपासून पळ काढण्याची अनावर इच्छा तुम्हाला होते तेव्हा ही एक दुर्बलता आहे हे सुज्ञपणे ओळखून या इच्छेविरुद्ध लढत देण्याची मदत परमेश्‍वराकडे मागा. पालकांनी आपल्या मुलांच्या कार्यहालचालींवर डोळा ठेवणेही अतिशय जरूरीचे आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही कोठे का असेना, हे ‘शेवटले काळ’ आहेत याचा कदापि विसर पडू देऊ नका.—२ तीमथ्य ३:१.

संबंध कुटुंब मिळून तुम्ही सुट्टीला जाता तेव्हा हे गृहीत धरून चालू नका, की घरामध्ये आई सर्वसामान्यपणे सगळी कामे करते तसे येथे देखील तिच सर्व काही करेल. दररोजच्या कामांत हातभार लावण्यास तयार असा. आपण होऊन मदत करा आणि सहकार्याचा आत्मा दाखवा. अशा प्रकारची मनोवृत्ती सुट्टीतील सर्वांचाच आनंद द्विगुणित करण्यात बराच हातभार लावू शकते.

सुट्टीतील तुमचा अनुभव सुखकारक असेल का? विचारपूर्वक निवड केलेली छायाचित्रे, पोस्टकाड्‌र्स व स्मृतीचिन्हे; आणि कदाचित काही स्थानिक कलाकृती देखील, निश्‍चितच सुखद आठवणी जाग्या करतील. पण, सर्वांत संस्मरणीय असतील ते जोडलेले नवे मित्रमैत्रिणी. त्यांच्याशी संपर्क कायम ठेवा. आलेले मनोरंजक अनुभव पत्राद्वारे एकमेकांना कळवा. खरेच, सुट्टी मजेत घालवण्याचे एक ना अनेक मार्ग आहेत.

[१५ पानांवरील चौकट]

सुट्टीला निघताना आठवणीत ठेवण्यासारखे

निघण्यापूर्वी

• प्रवासाची व आरोग्याची सर्व आवश्‍यक, कायदेशीर कागदपत्रे तयार ठेवा

• प्रतिबंधक औषधांचा साठा सोबत घ्या

प्रवासात

• लांबच्या विमान प्रवासात भरपूर मद्यार्करहित पेये घ्या व व्यायाम करा

• लहान मुलांसाठी मनोरंजक साहित्य सोबत घ्या

पोहंचल्यावर

• तुमच्या शरीराला व मनाला जुळवून घेण्यासाठी वेळ द्या

• केवळ सुरक्षित भोजन व पेये घ्या

• नैतिक दक्षता बाळगा

• इतर कौटुंबिक सदस्यांमध्ये दररोजच्या कामांची वाटणी करा

[१४ पानांवरील चित्र]

सुट्टीला गेल्यावर तुमच्या संगतीकडे लक्ष द्या

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा