बायबलचा दृष्टिकोन
ख्रिस्ती सेवकांसाठी ब्रह्मचर्य एक आवश्यकता आहे का?
ब्रह्मचर्याचा बिनचूक अर्थ अविवाहित स्थिती असा आहे. तथापि, द न्यू एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका यानुसार, “धार्मिक अधिकारी, पंडित किंवा भक्त या नात्याने ब्रह्मचाऱ्याच्या भूमिकेला अनुलक्षून या संज्ञेचा बहुधा प्रयोग केला जातो.” “ब्रह्मचारी” ही संज्ञा अशांना सूचित करते जे “पवित्र व्रतासाठी अथवा वैराग्य पत्करण्यासाठी अविवाहित राहतात; किंवा मग धार्मिक पदासाठी अथवा धार्मिक भक्तीसाठी अविवाहित राहणे अधिक चांगले असल्याचा विश्वास बाळगतात.”
इतिहासात कधी ना कधी, विशिष्ट अशा प्रमुख धर्मांनी आपल्या सेवकांसाठी एक आवश्यकता म्हणून ब्रह्मचर्येचा स्वीकार केला. तरीही, ख्रिस्ती धर्मजगताच्या इतर कोणत्याही धर्मात नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात ब्रह्मचर्येने कॅथलिक धर्मात आपला अमीट ठसा उमटविला आहे. आज, कॅथलिक ब्रह्मचर्येच्या विषयावर बरेच मतभेद आहेत. द विल्सन क्वाटर्ली नियतकालिकाने अशी टिपणी केली: “अलीकडील दशकांत केलेल्या बहुसंख्य अभ्यासांनी असे अनुमान काढले, की बंधनकारक ब्रह्मचर्य अर्थात, १२ व्या शतकापासून कॅथलिक पाळकांसाठी असलेली एक आवश्यकता, पाळकांची भरती करण्यातील व त्यांना त्या पदावर टिकवून ठेवण्यातील चर्चच्या समस्यांचे मूळ होय.” रिचर्ड ए. श्यून्हर या समाजशास्त्रज्ञाच्या मते, “ऐतिहासिक व सामाजिक परिवर्तनाच्या सर्व भक्कम वास्तविकता, कॅथलिक पाळकवर्गात केवळ ब्रह्मचारी पुरुषांना स्थान देऊ करणाऱ्या कल्पनेचा विरोध करत आहेत.” ब्रह्मचर्येसंबंधी बायबलचा दृष्टिकोन काय आहे?
विवाह की सडेपण?
सबंध इतिहासात, अनेक निरनिराळ्या धर्मांत असंख्य धर्मपरायण स्त्रीपुरुषांनी ब्रह्मचारी राहण्याची निवड केली आहे. का बरे? कारण अनेक वेळा दैहिक, भौतिक गोष्टी खरे तर “पापाचे मूळ” असल्याची त्यांची समजूत होती. यामुळेच मग, शरीरसंबंध पूर्णपणे वर्ज्य करण्याद्वारेच केवळ आध्यात्मिक पावित्र्य शक्य होते या तत्त्वप्रणालीचा जन्म झाला. तथापि, हा बायबलचा दृष्टिकोन नाही. बायबलमध्ये विवाहास, देवाकडील एक शुद्ध, पवित्र देणगी असल्याचे मानले जाते. उत्पत्तीमधील निर्मितीचा अहवाल विवाहाला, देवासोबत आध्यात्मिकरित्या शुद्ध अशा नातेसंबंधातील एक बाधा नव्हे तर देवाच्या नजरेत ‘चांगला’ असल्याचे स्पष्टपणे चित्रित करते.—उत्पत्ति १:२६-२८, ३१; २:१८, २२-२४; तसेच नीतिसूत्रे ५:१५-१९ देखील पाहा.
प्रेषित पेत्रासोबतच प्रारंभिक ख्रिस्ती मंडळीत अधिकार पदांवर असणारे देवाचे इतर स्वीकृत सेवक विवाहित होते. (मत्तय ८:१४; प्रेषितांची कृत्ये १८:२; २१:८, ९; १ करिंथकर ९:५) मंडळीतील देखरेख्यांची किंवा ‘बिशपांची’ नेमणूक करण्याविषयी प्रेषित पौलाने तिमथ्याला दिलेल्या सुचनांवरून हे स्पष्ट होते. तो लिहितो: “बिशप निर्दोष, एका स्त्रीचा पती असावा.” (तिरपे वळण आमचे; १ तीमथ्य ३:२, रिव्हाईस्ड स्टॅण्डर्ड व्हर्शन, कॅथलिक आवृत्ती) याची नोंद घ्या, की ‘बिशपने’ विवाह करणे गैर आहे असे काहीच येथे सूचित होत नाही. पौलाने केवळ असे सूचित केले की ‘एखाद्या बिशपने’ बहुपत्नीक मनुष्य असू नये; तो विवाहित असल्यास त्याला फक्त एक पत्नी असावी. खरे तर, मॅकक्लिंटॉक व स्ट्राँग यांच्या बायबलीय, धर्मशास्त्रीय व धर्मोपदेशकीय वाङ्मयाचा ज्ञानकोश असा निष्कर्ष काढतो: “शुभवर्तमानाच्या व्यवस्थेखाली पाळकाला विवाह करण्यास मनाई आहे, असे नव्या करारातील कोणत्याही उताऱ्याच्या आधारावर म्हणता येणार नाही.”
बायबल, विवाहाचा नितान्त आदर करत असले तरीही सडेपणाचा ते निश्चितच धिक्कार करत नाही, अर्थात, ते स्वेच्छेने निवडलेले असल्यास. काहींसाठी हा एक वांच्छनीय जीवनक्रम असल्याचे बायबल सांगते. (१ करिंथकर ७:७, ८) येशू ख्रिस्ताने म्हटले, की काही स्त्रीपुरुष मुद्दामहून सडेपणाचा जीवनक्रम निवडतात. (मत्तय १९:१२) का बरे? विवाह हा मुळातच अपवित्र असून त्यामुळे आपल्या आध्यात्मिक विकासास बाधा येईल म्हणून नव्हे, तर त्या काळात, अर्थात त्यांच्या समजुतीनुसार असलेल्या निकडीच्या काळात देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले श्रम एकवटण्याच्या हेतूने केवळ ते हा जीवनक्रम निवडतात.
सक्तीच्या ब्रह्मचर्येची सुरवात
तथापि, ख्रिस्तानंतरच्या शतकांत परिस्थितीने वळण घेतले. विवाहासाठी पाळक पदाचा त्याग केलेले डेव्हिड राईस नामक एक डॉमिनीकन स्पष्टीकरण देतात, की आपल्या सामान्य युगाच्या पहिल्या तीन शतकांदरम्यान “विवाहित आणि अविवाहित असे दोन्हीही सेवक होते.” मग एका धर्मपरायण लेखकाने ज्याचे वर्णन, “ग्रीक व बायबलीय कल्पनांचा संयोग” असे केले व ज्यामुळे लैंगिकता व विवाह यांबाबतीत एक विकृत दृष्टिकोन निर्माण झाला त्याचा नामधारी ख्रिश्चनांवर प्रभाव पडू लागला.
असे असतानाही काहींनी सडेपणाचा पाठपुरावा केला तो वरील प्रभावामुळे नव्हे, तर “देवाच्या राज्य कार्यासाठी [स्वतःस] समर्पित करण्यास पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त व्हावे म्हणून.” इतरजण मात्र त्यांनी स्वीकारलेल्या मूर्तिपूजक तत्त्वज्ञानामुळे असे करण्यास अधिक उत्तेजित झाले होते. द न्यू एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका म्हणते: “लैंगिक समागम अपवित्र करणारा व पावित्र्याशी विसंगत असतो हा विश्वास, ब्रह्मचर्य पाळण्यामागील प्रबल उत्तेजन म्हणून [नामधारी ख्रिस्ती चर्चमध्ये] उदयास आला.”
राईस यांचे म्हणणे आहे की चौथ्या शतकात चर्चने, “प्रभुभोजनाचा विधी साजरा करण्याच्या आदल्या रात्री विवाहित पाळकाने लैंगिक समागम करणे प्रतिबंधित केले.” पुढे चर्च दररोजच प्रभुभोजनाचा विधी साजरा करू लागले, तेव्हा पाळकांनी लैंगिक समागम कायमस्वरूपी वर्ज्य करावा असा याचा अर्थ झाला. कालांतराने, पाळकांच्या विवाहावर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला. अशा प्रकारे, चर्चमध्ये सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ब्रह्मचर्य सक्तीचे झाले.
असे घडण्याविषयी प्रेषित पौलाने इशारेवजा संदेश दिला. त्याने लिहिले: “पवित्र आत्मा स्पष्ट सांगतो, की पुढील काळात अनेक लोक फसव्या आत्म्यांना आणि भुतांच्या शिकवणुकींना बळी पडतील आणि विश्वासाचा त्याग करतील . . . विवाह निषिद्ध आहे असे ते म्हणतील.”—१ तीमथ्य ४:१, ३, जेरूसलेम बायबल.
येशू ख्रिस्ताने म्हटले, “ज्ञान आपल्या कृत्याच्या योगे न्यायी ठरते.” (मत्तय ११:१९) देवाच्या दर्जांपासून दूर जाण्याचा मूर्खपणा, कार्यांद्वारे किंवा परिणामांद्वारे सिद्ध होतो. लेखक डेव्हिड राईस यांनी सक्तीचे ब्रह्मचर्य या विषयावर जगभरातील अनेक पाळकांची मुलाखत घेतली. त्यांपैकी काहींनी म्हटले: “तुम्ही पाळक पदावर राहा, होताहोईल तितकं लोकांचं भलं करा आणि त्याचवेळी धार्मिक, तुमच्याकडे कौतुकाने पाहणाऱ्या व तुमच्यासोबत शरीरसंबंध राखू इच्छिणाऱ्या स्त्रियांचा सावधगिरीने उपभोग घ्या.”
मत्तय ७:२० उद्धृत करून राईस म्हणतात: “‘तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल,’ असे येशू म्हणाला.” मग सक्तीच्या ब्रह्मचर्येमुळे निर्माण झालेल्या शोकांतिकेवर ते विवेचन मांडतात: “सक्तीच्या ब्रह्मचर्येमुळे आज दुटप्पी जीवन जगणारे हजारो पुरुष, उद्ध्वस्त जीवन जगणाऱ्या हजारो स्त्रिया, पाळक असलेल्या पित्यांनी लाथाडलेली हजारो मुले; आणि यात भरीस भर म्हणजे स्वतःच भावनिकरित्या घायाळ होऊन भटकणारे पाळक,” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आदरणीय विवाह, देवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे. बळजबरीने लादलेले ब्रह्मचर्य आध्यात्मिकरित्या घातक ठरले आहे. दुसऱ्या बाजूला पाहता, स्वेच्छेने निवडलेले सडेपण, पावित्र्य किंवा तारण यांसाठी अवश्यक नसले तरीही काहींसाठी हा निश्चितच फलदायी व आध्यात्मिकरित्या समाधानकारक जीवनमार्ग सिद्ध झाला आहे.—मत्तय १९:१२.
[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]
जीवन