ख्रिस्ती धर्मजगताच्या उपासनेविषयी देवाचा कसा दृष्टिकोन आहे?
येशू ख्रिस्ताने म्हटले: “मला प्रभुजी, प्रभुजी, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्ही . . . तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; ‘अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’”—मत्तय ७:२१-२३.
देवाने, त्याचे पवित्र वचन बायबलद्वारे आपली इच्छा स्पष्ट केली आहे. ख्रिस्ती धर्मजगताचे चर्च देवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहेत का? की, ते येशूने म्हटल्याप्रमाणे ‘अनाचार करणारे’ आहेत?
रक्तपात
पेत्राने आपल्या धन्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री, येशूला अटक करण्यासाठी आलेल्या सैनिकांच्या ताफ्यासोबत जवळजवळ युद्धच सुरू केले होते. (योहान १८:३, १०) तथापि, येशूने सर्वांना शांत केले व पेत्राला ताकीद देऊन तो म्हणाला: “तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” (मत्तय २६:५२) या स्पष्ट इशाऱ्याचा प्रकटीकरण १३:१० येथे पुनरुच्चार केलेला आहे. ख्रिस्ती धर्मजगताच्या अनेक चर्चनी याकडे लक्ष दिले आहे का? की, पृथ्वीच्या विविध भागांत अखंडपणे सुरू असलेल्या युद्धांसाठी ते देखील जबाबदार आहेत?
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात सहस्त्रावधी सर्बियन व क्रोएशियन लोकांची धर्माच्या नावाखाली कत्तल करण्यात आली. द न्यू एन्साक्लोपिडिया ब्रिटानिका पुढील वृत्त देतो: “क्रोएशियात, मुळात फॅसिस्ट असलेल्या राज्याने नात्सी कृत्यांपेक्षाही वरचढ असलेले ‘जातीय शुद्धीकरणाचे’ धोरण हाती घेतले . . . सर्बियन जनतेतील एक-तृतीयांश लोकांना हद्दपार करण्यात येईल, एक-तृतीयांश लोकांचे धर्मांतर करून त्यांना रोमन कॅथलिक बनवण्यात येईल व एक-तृतीयांश लोकांचा समूळ नाश केला जाईल असे जाहीर करण्यात आले . . . या कृत्यांना कॅथलिक पाळकवर्गाने अंशतः सहकार्य दिल्यामुळे युद्धानंतर चर्च व सरकार यांतील संबंधांना गंभीर क्षती झाली.” असंख्य लोकांना, धर्मांतर करून कॅथलिक धर्माचा स्वीकार किंवा मृत्यू या दोन पर्यायांपैकी एक निवडण्यास भाग पाडण्यात आले; इतर हजारो लोकांना तर निवड करण्याची संधीसुद्धा देण्यात आली नाही. सबंध गाव—म्हणजे पुरुष, स्त्रिया व मुलांना जबरीने त्यांच्या ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये नेऊन त्यांची कत्तल करण्यात आली. विरोधी पक्षाच्या कम्युनिस्ट सैन्याबद्दल काय? त्यांना देखील धार्मिक पाठिंबा होता का?
युगोस्लाव्हियाचा इतिहास (इंग्रजी) हे पुस्तक अहवाल देते की “काही पाळक विद्रोही सैन्यांच्या बाजूने युद्धात सहभागी झाले.” युगोस्लाव्हिया व नवीन कम्युनिस्ट मतप्रणाली (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते, “कट्टर सैन्यांत सर्बियन ऑर्थोडॉक्स व रोमन कॅथलिक या दोन्ही चर्चचे, पाळक देखील समाविष्ट झाले. धार्मिक मतभेद बाल्कन राष्ट्रांतील युद्धाच्या आगीत आजपावेतो सतत तेल ओतत आहेत.”
शिवाय, रवांडाविषयी काय? कॅथलिक इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल रिलेशन्सचे प्रमुख सचिव, इयन लिंडन यांनी द मन्थ (इंग्रजी) या नियतकालिकात पुढील कबुली दिली: “स्थानीय कॅथलिक, अँग्लिकन व बॅप्टिस्ट चर्च पुढारी, अकरण व करणदोषाने नागरिकी सेनेच्या कत्तलींमध्ये गोवलेले होते याची दोनएक उदाहरणे लंडनमधील ॲफ्रिकन राइट्स या चळवळीच्या तपासांत आढळतात. . . . अनेक पॅरिश्मधील बहुसंख्य नामांकित ख्रिश्चन लोक कत्तलींमध्ये सहभागी होते यात काहीच शंका नाही.” दुर्दैवाने, तथाकथित ख्रिश्चनांच्या आपसांतील संघर्षाने मध्य आफ्रिका अद्यापही पीडित आहे.
जारकर्म व व्यभिचार
देवाच्या वचनानुसार, लैंगिक संबंधाची एकमात्र व्यवस्था विवाह बंधनाच्या आत आहे. “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.” (इब्री लोकांस १३:४) चर्च पुढारी देवाच्या या शिकवणुकीचे समर्थन करत आहेत का?
दांपत्य सर्वस्वीपणे वचनबद्ध असल्यास विवाहापूर्वी लैंगिक संबंध अयोग्य नाहीत असे सुचविणारे एक अधिकृत पत्रक ऑस्ट्रेलियातील अँग्लिकन चर्चने १९८९ साली प्रकाशित केले. अलीकडेच, स्कॉटलंड येथील अँग्लिकन चर्चच्या नेत्याने असे विधान केले: “चर्चने प्रेमप्रकरणांना पापमय व अयोग्य असे ठरवून त्यांचा निषेध करू नये. व्यभिचार आपल्या आनुवंशिकतेमुळे घडतो हे चर्चने कबूल केलेच पाहिजे.”
दक्षिण आफ्रिकेत पाळकवर्गातील अनेकांनी उघडपणे, समलैंगिकतेचे समर्थन करणारे अभिप्राय मांडले आहेत. उदाहरणार्थ, १९९० साली, तुम्ही (इंग्रजी) नामक दक्षिण आफ्रिकी नियतकालिकाने एका नामांकित अँग्लिकन पाळकाचे पुढील विधान उद्धृत केले: “शास्त्रवचनाची बाध्यता सर्वकाळ नसते . . . समलैंगिक लोकांबद्दल चर्चच्या मनोवृत्तीत व धोरणात बदल होतील असे मला वाटते.”—रोमकर १:२६, २७ मधील फरक पडताळा.
१९९४ ब्रिटानिका वार्षिक पुस्तक, (इंग्रजी) यानुसार अमेरिकेतील अनेक चर्चमध्ये लैंगिकता एक प्रमुख वादविषय बनली आहे, उदाहरणार्थ, “समलैंगिकता आचरत असल्याची ख्याती असणाऱ्या पुरुष व स्त्रियांना धार्मिक सेवेकरता दीक्षा देणे, समलैंगिकांच्या हक्कांविषयीचा धार्मिक दृष्टिकोन समजून घेणे, ‘समलैंगिक विवाहांना’ आशीर्वाद देणे व समलैंगिकतेसंबंधी जीवनशैलींना मान्यता देणे अथवा त्यांचा निषेध करणे हे मुद्दे विशेषतः वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.” चर्चचे बहुतेक प्रमुख पंथ, अधिक लैंगिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी मोहिमा राबवणाऱ्या पाळकांना खपवून घेतात. १९९५ ब्रिटानिका वार्षिक पुस्तक (इंग्रजी) सांगते, की ५५ एपिस्कोपेलियन बिशपांनी, “समलैंगिकांना दीक्षा देण्याच्या व त्यांच्या जीवनशैलीच्या स्वीकार्यतेला दुजोरा देणाऱ्या” जाहीरनाम्यावर हस्ताक्षर केले.
काही पाळक समलैंगिकतेला समर्थन देण्यासाठी सबब देताना असा दावा करतात, की येशू याविरुद्ध कधीही बोलला नाही. परंतु, हे खरे आहे का? येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितले की देवाचे वचन हे सत्य आहे. (योहान १७:१७) याचा अर्थ असा होतो, की लेवीय १८:२२ येथे वर्णन केलेल्या समलैंगिकतेविषयी यहोवाच्या दृष्टिकोनास त्याने मान्यता दिली, ते वचन म्हणते, “स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करू नको; हे अमंगळ कृत्य होय.” शिवाय, ‘आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करितात’ अशा वाईट गोष्टींच्या यादीत येशूने जारकर्म व व्यभिचार यांचाही उल्लेख केला. (मार्क ७:२१-२३) जारकर्म यासाठी उपयोगात आणला जाणारा ग्रीक शब्द, व्यभिचारासाठी असलेल्या ग्रीक शब्दापेक्षा एक अधिक विस्तृत संज्ञा देतो. हा शब्द कायदेशीर विवाहाच्या मर्यादेबाहेर असलेल्या सर्व प्रकारच्या लैंगिक संबंधांचे वर्णन करतो ज्यात समलैंगिकता देखील समाविष्ट आहे. (यहूदा ७) तसेच, येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना, जारकर्माच्या गंभीरपणास कमी लेखत असलेल्या कोणत्याही तथाकथित ख्रिस्ती शिक्षकास खपवून घेता कामा नये, असे बजावून सांगितले.—प्रकटीकरण १:१; २:१४, २०.
धार्मिक पुढारी, समलैंगिक स्त्री-पुरुषांना दीक्षा मिळावी म्हणून मोहिमा राबवतात तेव्हा त्यांच्या चर्चच्या इतर सदस्यांवर विशेषतः तरुण लोकांवर कसा परिणाम होतो? हे विवाहाच्या मर्यादेबाहेर लैंगिक संबंध प्रस्थापित करून पाहण्यासाठी एक प्रोत्साहनच नव्हे काय? उलटपक्षी, देवाचे वचन ख्रिश्चनांना “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा” असे आवर्जून सांगते. (१ करिंथकर ६:१८) जर एखादा सहविश्वासू अशा प्रकारच्या पापात पडला, तर त्या व्यक्तीला देवाची स्वीकृती पुन्हा मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रेमळ मदत देण्यात येते. (याकोब ५:१६, १९, २०) ही मदत नाकारण्यात आली तर? अशा व्यक्ती पश्चात्ताप करत नाहीत तोवर त्यांना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही,” असे बायबल सांगते.—१ करिंथकर ६:९, १०.
‘लग्न करावयाची मनाई’
“जारकर्मे होत आहेत म्हणून,” बायबल म्हणते की “वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे.” (१ करिंथकर ७:२, ९) या सुज्ञ सल्ल्याकडे डोळेझाक करून, अनेक पाळकांकडून ब्रम्हचारी म्हणजेच अविवाहित राहण्याची अपेक्षा केली जाते. नीनो लो बेल्लो, वॅटिकन दस्तऐवज (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात म्हणतात की “एखादा पाळक, जोगी किंवा जोगिणी यांपैकी कोणी लैंगिक संबंध ठेवल्यास ब्रम्हचर्याचा वचनभंग होत नाही. . . . कबुली देण्याच्या ठिकाणी निष्कपट स्पष्टीकरण दिल्यास लैंगिक संबंधांसाठी एकवेळा क्षमा प्राप्त करता येते, परंतु कोणत्याही पाळकाच्या विवाहास मात्र चर्च कदापि मान्यता देणार नाही.” या शिकवणुकीने चांगले फळ उत्पन्न केले आहे की वाईट?—मत्तय ७:१५-१९.
अनेक पाळक नैतिकदृष्ट्या निष्कलंक जीवन जगतात यात काही शंका नाही, परंतु पुष्कळशा पाळकांविषयी हे खरे नाही. १९९२ ब्रिटानिका वार्षिक पुस्तक सांगते की, “रोमन कॅथलिक चर्चने पाळकांच्या लैंगिक दुर्व्यवहाराच्या खटल्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ३०० दशलक्ष डॉलर खर्च केले आहेत असे वृत्त आहे.” नंतर, १९९४ च्या आवृत्तीत असे म्हणण्यात आले: “अनेक पाळकांचा एड्सने मृत्यू झाल्यामुळे, समलैंगिक पाळक अस्तित्वात आहेत व असंख्य . . . समलैंगिक पुरुष पाळकत्त्वाविषयी आस्थेवाईक आहेत हे उघडकीस आले.” तर मग, ‘लग्न करावयाची मनाई’ करणे हे ‘भुतांचे शिक्षण’ आहे असे बायबल म्हणते यात काही नवल नाही. (१ तीमथ्य ४:१-३) ख्रिस्ताचे पाद्री (इंग्रजी) या पुस्तकात लेखक, पीटर डे रोझा लिहितात, “काही इतिहासकारांच्या मते, [पाळकीय ब्रम्हचर्य] यामुळे नीतिमूल्यांचे जितके नुकसान झाले आहे, तितके कदाचित पाश्चात्त्यातील इतर कोणत्याही रूढीमुळे झाले नसावे, वेश्याव्यवसायामुळेही नाही. . . . [ते] बहुतांश वेळा ख्रिस्ती धर्माच्या नावावर कलंक ठरले आहे. . . . जबरीने लादलेले ब्रम्हचर्य, पाळकवर्गाच्या उच्चपदीय अधिकाऱ्यांच्या ढोंगीपणाला नेहमीच कारणीभूत ठरले आहे. . . . पाळक हजारो वेळा भ्रष्ट झाला तरी काही हरकत नाही, परंतु चर्चच्या लिखित विधिनियमाप्रमाणे एकदाही विवाह करणे त्याच्यासाठी निषिद्ध आहे.”
बआलाच्या उपासनेबद्दल देवाचा दृष्टिकोन विचारात घेता, ख्रिस्ती धर्मजगताचे विभाजित चर्च यांविषयी त्याचे कसे मत असेल हे सहजगत्या लक्षात येते. बायबलचे शेवटले पुस्तक खोट्या उपासनेच्या सर्व प्रकारांना “मोठी बाबेल, कलावंतिणींची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई” या नावात सामावते. ते पुढे म्हणते, “तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्त सापडले.”—प्रकटीकरण १७:५; १८:२४.
याकारणास्तव, देव त्याचे खरे उपासक होऊ पाहणाऱ्या सर्वांना आर्जवतो: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. . . . तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ एका दिवशीच येतील, आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल; कारण तिचा न्यायनिवाडा करणारा प्रभू देव सामर्थ्यवान आहे.”—प्रकटीकरण १८:४, ८.
आता प्रश्न असा उद्भवतो, की खोट्या धर्मांतून बाहेर पडल्यावर एखाद्याने कोठे जावे? देवाला कोणत्या प्रकारची उपासना स्वीकार्य आहे?
[५ पानांवरील चौकट]
मूर्तिपूजा
बआलाच्या उपासनेत मूर्तींचा वापर समाविष्ट होता. इस्राएल लोकांनी यहोवाच्या उपासनेसोबत बआलाच्या उपासनेला मिसळण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर त्यांनी यहोवाच्या मंदिरात मूर्ती आणल्या. देवाने जेरुसलेम व त्याच्या मंदिराचा नाश केला तेव्हा मूर्तिपूजेविषयीचा त्याचा दृष्टिकोन स्पष्ट झाला.
ख्रिस्ती धर्मजगताचे अनेक चर्च मूर्तींनी भरलेले आहेत, मग त्या क्रूसाच्या रूपात असो, प्रतिमांच्या रूपात असो अथवा मरियेच्या पुतळ्यांच्या रूपात असो. याशिवाय, अनेक चर्चच्या सदस्यांना या मूर्तींना नमन करण्यास, त्यांपुढे गुडघे टेकण्यास किंवा क्रूसाची खूण करण्यास शिकविले जाते. उलटपक्षी, खऱ्या ख्रिश्चनांना “मूर्तीपूजेपासून दूर पळा” अशी आज्ञा देण्यात आली आहे. (१ करिंथकर १०:१४) ते मूर्त वस्तूंच्या साहाय्याने देवाची उपासना करण्याचा प्रयत्न करत नाहीत.—योहान ४:२४.
[चित्राचे श्रेय]
Musée du Louvre, Paris
[७ पानांवरील चौकट]
‘चर्चचा पुढारी अदूष्य असला पाहिजे’
हे विधान टुडेज इंग्लिश व्हर्शन या बायबल अनुवादाप्रमाणे तीताला पत्र १:७ या वचनातील आहे. किंग जेम्स व्हर्शन असे म्हणते: “बिशप निर्दोष असलाच पाहिजे.” “बिशप” हा शब्द, “पर्यवेक्षक” असा अर्थबोध असलेल्या ग्रीक शब्दातून आला आहे. याकारणास्तव, खऱ्या ख्रिस्ती मंडळीत अध्यक्षता करण्यास नेमण्यात आलेल्यांनी बायबलच्या मूलभूत दर्जांना जागलेच पाहिजे. त्यांनी असे न केल्यास त्यांना त्यांच्या देखरेखीच्या पदावरून कमी करण्यात यावे, कारण ते आता “कळपाला कित्ते” असे नाहीत. (१ पेत्र ५:२, ३) ख्रिस्ती धर्मजगताचे चर्च ह्या अपेक्षेला किती महत्त्व देतात?
मला तुमच्या विवाहाविषयी काळजी आहे, (इंग्रजी) या पुस्तकात लेखक डॉ. एवरेट् वर्थिंग्टन, अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात १०० पाळकांवर करण्यात आलेल्या एका पाहणीचा उल्लेख करतात. यांपैकी ४० टक्क्यांपेक्षा अधिक जणांनी, स्वतःचा विवाह-सोबती नसलेल्या व्यक्तीसोबत कोणत्या न कोणत्या प्रकारचा कामोत्तेजक व्यवहार केला असल्याचे कबूल केले. बहुतेकांनी व्यभिचार केला होता.
आधुनिक काळात ख्रिस्ती धर्म (इंग्रजी) असे निरीक्षण करते की, “मागील दशकात, चर्चच्या काही अत्यंत माननीय पुढाऱ्यांचे अनैतिक वर्तन उजेडात आल्याने, चर्चला वारंवार हादरे बसले आहेत.” “व्यभिचारी पाळकांची फेरनियुक्ती का होऊ नये” असे शीर्षक असलेल्या या लेखाने चर्च पुढाऱ्यांना “लैंगिक अपराध केल्याबद्दल दोषी” ठरवण्यात आल्यावर लगेच त्यांच्या पूर्वीच्या पदांवर पुन्हा नियुक्त करण्याच्या ख्रिस्ती धर्मजगतातील सामान्य रीतीला आव्हान केले.