वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ६/८ पृ. १५-१७
  • मोठ्या पांढऱ्‍या पक्ष्याचे पुनरागमन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मोठ्या पांढऱ्‍या पक्ष्याचे पुनरागमन
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हव्यासाचा दुःखद परिणाम
  • पुनरागमनाची सुरवात
  • भविष्याचे काय?
  • वन्यजीवनावर पाळत
    सावध राहा!—२००२
  • स्थलांतराच्या रहस्यांचा छडा लावणे
    सावध राहा!—१९९५
  • मुक्या पक्षांनी दिला कैद्यांना हितोपदेश
    सावध राहा!—२०००
सावध राहा!—१९९८
g98 ६/८ पृ. १५-१७

मोठ्या पांढऱ्‍या पक्ष्याचे पुनरागमन

जपानमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

हातात काठी घेऊन, त्या सगळ्या सुंदर पांढऱ्‍या पक्ष्यांना एक-एक करून खलास करायला ते निघाले. हे पक्षी म्हणजे ॲलबट्रॉस. ही माणसे: हानेमोन टामाओकी आणि त्याचे साथीदार. ठिकाण: टोरीशिमा, टोक्योच्या दक्षिणेकडे सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर असलेले बेट. वर्ष होते १८८७.

ही योजना कित्येक वर्षांपासून टामायोकीच्या डोक्यात घोळत होती. खुद्द जपानमध्ये आणि परदेशातही गाद्यांसाठी मऊ पिसांची भरपूर मागणी होती, आणि टोरीशिमा हे एकान्त बेट होते; हजारो ॲलबट्रॉस एवढेच तिकडचे रहिवाशी होते जे विणीसाठी नियमाने तिकडे भेट द्यायचे. त्यांच्यामध्ये आखूड शेपटीचा ॲलबट्रॉस पक्षी होता; यांच्यावरच टामाओकीचा डोळा होता. उत्तर गोलार्धातील तो सर्वात मोठा पक्षी होता. सुमारे आठ किलो वजनाच्या आणि पंखांचा अडीच मीटर विस्तार असलेल्या गुटगुटीत पक्ष्यावर किती पिसे असतील याचा जरा विचार करा! त्यात हा पक्षी सालस; धोका जाणवल्यावरही पळण्याचा प्रयत्न करत नसे.

टामाओकीने बेटावर ३०० कामगारांना आणून पक्ष्यांना ठार मारून त्यांची पिसे उपटायला लावली. त्यांनी तेथे एक गावच वसवले; एवढेच नव्हे तर, मेलेल्या पक्ष्यांना वाहून नेण्यासाठी एक लहान रेलमार्ग बांधला. त्यांची ही कामगिरी इतक्या सफाईने पार पडली की, टामाओकी रातोरात श्रीमंत झाला—सुमारे ५० लाख पक्ष्यांना ठार मारून. हा नाश इतका भयंकर होता की, १९०२ साली त्या बेटावरील ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्या गावाचा आणि त्यातील रहिवाश्‍यांचाही नाश झाला तेव्हा, “ॲलबट्रॉसला ठार मारल्यामुळे हा शाप” त्यांच्यावर आला असे काहींनी म्हटले. येथेच सगळे काही थांबले नाही, तर त्याच्या पुढील वर्षी लोक पुन्हा उरलेल्या पक्ष्यांना ठार मारायला तेथे आले.

सुमारे १५०० किलोमीटर अंतरावर, पूर्व चीनी समुद्रात, तायवान आणि ओकीनावा यांच्यामधील निर्जन, खडकाळ बेटांवर, टाटसुशिरो कोगा नावाचा एक माणूस तोच फायदेशीर धंदा करत होता. टामाओकीप्रमाणेच, कोगाच्याही पक्ष्यांचा पुरवठा लगेचच संपला. सरतेशेवटी, १९०० साली तो ते बेट सोडून गेला—पण, जाण्याआधी त्याने सुमारे दहा लाख ॲलबट्रॉस पक्षी ठार मारले होते.

हव्यासाचा दुःखद परिणाम

पक्ष्यांचा हा सरसकट नाश म्हणजे एक दुर्घटनाच होती, जिचे परिणाम भयंकर होते. ॲलबट्रॉसच्या विविध जातींपैकी, तीन जाती उत्तर पॅसिफिकमध्ये राहतात; टामाओकी आणि कोगा यांनी धाड घातलेली ती बेटे त्यांच्या राहण्याची प्रमुख ठिकाणे होती. त्यांच्यातील आखूड शेपटीच्या ॲलबट्रॉसचे (डायोमेडिया ॲलबट्रस) तर जगात दुसरे कोणतेच ज्ञात विणीचे ठिकाण नव्हते.

एके काळी विस्मयकारक ॲलबट्रॉस पक्ष्याबद्दल समुद्रातील खलाशांना आदर वाटायचा. पारंपरिक समुद्री कथा-कहाण्यांमध्ये त्याला वादळे आणि धुक्याची पूर्वसूचना देणारा पक्षी असे चित्रित केले आहे. परंतु, या मोठ्या पांढऱ्‍या पक्ष्याच्या असाधारण लांब पंखांमुळे तो काही दिवसांतच सागर पार करू शकत होता आणि बहुतेकवेळा तो पंख न हलवता वाऱ्‍यावर तरंगत जाई, ही काही मिथ्य कथा नाही. पंख न हलवता वाऱ्‍यावर तरंगणे आणि समुद्रावर दिवसेंदिवस राहणे ही त्याची क्षमता अद्वितीय आहे.

ॲलबट्रॉस हवेत जरी डौलदारपणे उडत असला, तरी जमिनीवरील त्याची हालचाल अगदीच मंद आणि बेडौल असते. त्याचे लांब पंख आणि जड शरीर असल्यामुळे त्याला पटकन हवेत झेप घेता येत नाही. या एका कारणामुळे शिवाय स्वभावतःच त्यांच्याठिकाणी माणसांबद्दल भीती नसल्यामुळे हा पक्षी सहजगत्या बळी पडला. यामुळे, लोकांनी त्याला गुनी बर्ड किंवा मॉलीमॉक अशी नावे दिली.a

मेलेल्या ॲलबट्रॉसचा पैसा करता येतो अशी कल्पना मिळालेल्या बेजबाबदार लोकांनी अगदी आनंदाने हा नायनाट जारी ठेवला. एका सर्वेक्षणानुसार, १९३३ साली तर टोरीशिमामध्ये ६०० हून कमी पक्षी उरले होते. मग नाइलाजाने, जपानी सरकाराने त्या बेटावर मानवांना जाण्यास बंदी असल्याचे घोषित केले. पण, ही बंदी अंमलात येण्याआधी होता होईल तितक्या पक्ष्यांना ठार मारण्यासाठी हे दुष्ट लोक बेटाकडे धावून गेले. १९३५ सालापर्यंत फक्‍त ५० पक्षी उरले होते. शेवटी, आखूड शेपटीचा ॲलबट्रॉस पक्षी नामशेष झाला आहे असे घोषित करावे लागले. मानवी हव्यासाचा हा केवढा दुःखद परिणाम! पण पुढे आश्‍चर्याचा सुखद धक्का बसणार होता.

पुनरागमनाची सुरवात

जानेवारी १९५१ साली, एके सायंकाळी, टोरीशिमाच्या खडकांवर चढणारा एक माणूस अचानक कलकल ऐकून आश्‍चर्यचकित झाला. त्याच्या समोर चक्क ॲलबट्रॉस पक्षी होता! आखूड शेपटीचा ॲलबट्रॉस कसाबसा वाचला होता आणि पुन्हा एकदा टोरीशिमावर राहत होता. या वेळी मात्र या पक्ष्यांनी मानवांच्या हद्दीपलीकडील उतारावर घरटी बांधली होती. आणि आता ते मानवांपासून जरा दूरच राहत होते. निसर्ग प्रेमिकांना केवढा आनंद झाला असणार!

जपानी सरकाराने मुळीच दिरंगाई केली नाही. घरट्यांसाठी जमीन घट्ट करायला त्यांनी पाम्पास गवत लावले आणि टोरीशिमाला मानवांना जाण्यासाठी बंदी घातली. ॲलबट्रॉसला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केले आणि त्याला आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्राप्त झाली.

सन १९७६ पासून, जपानच्या टोहो विद्यापीठाचे हिरोशी हासेगावा या पक्ष्यांचा अभ्यास करत आहेत आणि त्यांची पाहणी करण्यासाठी ते वर्षातून तीनदा त्या बेटावर जातात. त्यांनी सावध राहाला! सांगितले की, प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रंगांच्या रिंगा त्यांच्या पायांत घातल्यामुळे आखूड शेपटीचे हे ॲलबट्रॉस पक्षी तीन किंवा चार वर्षांतून केवळ एकदाच विणीसाठी आपल्या जन्माच्या ठिकाणी परत येतात असे त्यांना आढळले आहे. सहा वर्षांचे झाल्यावर त्यांची पहिली वीण होते आणि एका वेळी एकच अंडे ते देतात. म्हणून, त्यांची सरासरी आयुर्मर्यादा २० वर्षांची असली, तरी त्यांची संख्यावाढ व्हायला बराच वेळ लागतो. सन १९९६/९७ च्या हिवाळ्यात, या पक्ष्यांनी घातलेल्या १७६ अंड्यांपैकी केवळ ९० अंड्यांतून पिले बाहेर आली.

बाकीच्या वेळी हे ॲलबट्रॉस पक्षी काय करतात? हासेगावा म्हणतात की याविषयी इतकी माहिती नाही. ते जमिनीपासून आणि लोकांपासून दूर राहतात हे निश्‍चित. ॲलबट्रॉस जहाजांचा पिच्छा करून त्यांच्यावर उतरतात का? हासेगावांच्या मते ही केवळ एक कथा आहे आणि याला सिद्ध करण्यासाठी कोणताच पुरावा नाही. “जपानी ॲलबट्रॉस जहाजांवर उतरत नाहीत,” हे त्यांना निश्‍चित माहीत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. पण ते असेही म्हणतात की, जगात दुसऱ्‍या ठिकाणी “या पक्ष्यांना खाऊ घातले तर ते कदाचित जहाजांवर थोड्या काळासाठी राहतही असतील.” अनुकूल वाऱ्‍याच्या प्रवाहात जाऊन अफाट सागरावर घिरट्या मारण्यात ते पटाईत असतात आणि अधिकतर वेळा ते हेच करतात. थकले की, समुद्रावर उड्डाणावस्थेतच झोप काढतात. स्क्विड, उडणारे मासे, खेकडे आणि कोळंबी हे त्यांचे खाद्य आहे. हासेगावा यांनी ज्या पक्ष्यांच्या पायांत रिंगा अडकवल्या आहेत ते पक्षी नियमितपणे बेरिंग समुद्रात आणि अलास्काच्या आखातात दिसून येतात. आणि १९८५ मध्ये, कॅलिफोर्निया किनारपट्टीपासून दूर, आखूड शेपटीचा ॲलबट्रॉस पक्षी पाहण्यात आल्याने तेथील पक्षी निरीक्षकांमध्ये खळबळ माजली होती—जवळजवळ एका शतकातली ही पहिलीच घटना होती.

भविष्याचे काय?

सकारात्मक बाजूने पाहिल्यास, आखूड शेपटीच्या ॲलबट्रॉसची संख्यावाढ होत आहे. गेल्या मे महिन्यात हासेगावांनी अंदाज बांधला की, “पिलांना धरून ९०० हून अधिक” पक्षी होते. ते पुढे म्हणाले: “सन २००० पर्यंत, टोरीशिमा बेटावरच १,००० हून अधिक पक्षी असायला हवेत आणि दर वर्षी १०० हून अधिक पिले जन्मली पाहिजेत.” १९८८ साली, ८८ वर्षांनंतर, हे पक्षी पूर्व चीनी समुद्रावर पुन्हा एकदा वीणीसाठी जात असल्याचे पाहण्यात आले ही गोष्ट देखील अत्यानंदाची आहे. या पक्ष्यांनी, वादग्रस्त क्षेत्रातील एक खडकाळ ठिकाण निवडले आहे; त्याअर्थी काही काळापर्यंत त्यांना मानवांपासून संरक्षण मिळेल.

शंभर वर्षांआधी केलेली चूक आता हळूहळू सुधारली जात आहे. खरीच सुधारली जात आहे का? संशोधकांना बहुधा असे आढळते की, जेव्हा ते पक्ष्यांच्या पायांत रिंगा अडकवण्यासाठी त्यांना पकडतात तेव्हा ते पक्षी घाबरून उलट्या करतात. त्यांच्या पोटांतून प्लॅस्टिकचे तुकडे, डिस्पोसेबल सिगारेट लाइटर्स आणि असलाच कचरा मिळतो जो या पक्ष्यांच्या अन्‍न मिळवण्याच्या ठिकाणी अर्थात सागरांमध्ये निष्काळजीपणाने फेकला जातो.

मानवांच्या मूर्खपणामुळे हा मोठा पांढरा पक्षी पुन्हा एकदा नामशेष होण्याच्या मार्गावर जाईल का?

[तळटीप]

a “मुळात, ‘गुनी’ हा शब्द ‘गोनी’ होता; हा जुना इंग्रजी शब्द एका बावळट माणसासाठी वापरत असत . . . ‘मॉलीमॉक’ किंवा ‘मॉलीहॉक’ किंवा फक्‍त ‘मॉली’ हा शब्द डच भाषेतल्या मॉलेमॉक या शब्दातून येतो ज्याचा अर्थ मूर्ख सागरी पक्षी होतो.” (ऑलिव्हर एल. ऑस्टीन, जुनियर यांचे बड्‌र्स ऑफ द वर्ल्ड) जपानी भाषेत, “मोठा पांढरा पक्षी” या अर्थाचे जुने नाव बदलून त्या जागी आहोदोरी अर्थात, “मूर्ख पक्षी” ही संज्ञा आली.

[१६ पानांवरील चित्र]

ॲलबट्रॉस पक्ष्याच्या लांब, सडपातळ पंखांमुळे हवेत तरंगण्यात हा जगातला सराईत पक्षी आहे

[१६ पानांवरील चित्र]

टोरीशिमा, आखूड शेपटीच्या ॲलबट्रॉसचे घर

[१७ पानांवरील चित्र]

आखूड शेपटीच्या ॲलबट्रॉसने टोरीशिमात पुनरागमन केले आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा