तरुण लोक विचारतात . . .
माझा आदर्श कोण असावा?
“बास्केटबॉलमध्ये त्याचा हात कोणी धरू शकत नव्हतं. माझ्या सर्व मित्रांना तो आवडायचा. तो माझा आदर्श होता, मला त्याच्यासारखं व्हायचं होतं आणि त्याच्याकडे जे होतं ते मलाही हवं होतं.”—पिंग, एक आशियाई तरुण
ज्यांचं कौतुक आणि अनुकरण केलं जातं अशांना बहुधा आदर्श म्हणतात. लेखिका लिंडा नीलसन यांचं असं निरीक्षण आहे: “ज्यांच्या विचारांशी आपले विचार जुळतात आणि आपल्याला हवीहवीशी असणारी बक्षिसे किंवा प्रशंसा ज्यांना मिळते अशांचे अनुकरण युवक सहसा करतात.” म्हणून, जे प्रसिद्ध किंवा आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात अशा समवयस्कांचे युवकांना मोठे कौतुक असते. पण अनेक युवक, विशेषतः, सिने स्टार, संगीतकार आणि खेळाडूंना आदर्श मानतात.
अर्थात, बहुतांश प्रसिद्ध लोकांची जनसामान्यांसमोर जी प्रतिमा उभी केली जाते ती बहुधा वाढवून फुगवून सांगितलेली काल्पनिक कथा, सर्व दोष लपवण्याची पद्धतशीर योजना, लोकांनी प्रशंसा करावी म्हणून आणि मुख्य म्हणजे विक्री व्हावी म्हणून केलेला प्रयत्न असतो! आधी उल्लेखिलेला पिंग कबूल करतो: “मी माझ्या बास्केटबॉल हिरोचे सर्व व्हिडिओ विकत आणले आणि त्याच्यासारखे कपडे आणि बूट सुद्धा घालू लागलो.” काही युवक त्यांच्या टीव्ही किंवा क्रिडा क्षेत्रातल्या या आदर्शांच्या वेषभूषेचे, केशभूषेचे आणि बोलण्या-चालण्याचे देखील अनुकरण करतात.
आदर्श—चांगले आणि वाईट
‘पण कुणाचं कौतुक करण्यात काय गैर आहे?’ असं तुम्ही म्हणाल. तुम्ही कोणाचं कौतुक करता यावर हे निर्भर करतं. बायबल म्हणते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) बायबल आपल्याला मानवांचं अनुकरण करण्याचं उत्तेजन देत नाही. (मत्तय २३:१०) पण, “विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे,” असं ते आपल्याला जरूर सांगतं. (इब्री लोकांस ६:१२) ते शब्द लिहिणाऱ्या प्रेषित पौलाने प्रारंभिक ख्रिश्चनांसमोर एक उत्तम उदाहरण मांडले. म्हणून तो म्हणू शकला: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.”—१ करिंथकर ११:१.
तीमथ्य नामक एका तरुणाने अगदी तसंच केलं. पौलासोबत मिशनरी दौरा करताना तो त्याचा जवळचा मित्र बनला. (प्रेषितांची कृत्ये १६:१-४) पौलाने तीमथ्याला “प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र” असे मानले. (१ करिंथकर ४:१७) पौलाच्या मदतीनिशी तीमथ्य एक उल्लेखनीय ख्रिस्ती पुरुष बनला.—फिलिप्पैकर २:१९-२३.
पण, तुम्ही चुकीचा आदर्श निवडलात तर काय होऊ शकतं? रिचर्ड नामक एक तरुण म्हणतो: “मी १५ वर्षांचा होतो तेव्हा, मार्यो नावाचा एक शाळकरी मित्र माझा जिवलग मित्र बनला. माझे आईवडिल ख्रिस्ती होते आणि त्यांनी मला आध्यात्मिक मदत देण्याचा प्रयत्न केला. पण मार्योच्या जीवनात मजाच मजा होती—डिस्को, पार्ट्या, बाईक्स वगैरे वगैरे. तो आपली मनमानी करू शकता होता, त्याच्याजवळ वाटेल ते, वाटेल तेव्हा करण्याचे स्वातंत्र्य होते. मला मात्र मोकळीक नव्हती. म्हणून मी १६ वर्षांचा असताना माझ्या आईवडिलांना सांगितलं की, मी यापुढे ख्रिस्ती राहू शकत नाही आणि मी तसंच केलं.”
प्रसिद्ध लोकांना आणि क्रिडा क्षेत्रातल्या हिरोंना आदर्श मानण्यात सुद्धा एवढा धोका आहे का? होय, निश्चितच. कोणा खेळाडूच्या म्हणा किंवा कलाकाराच्या किंवा संगीतकाराच्या कौशल्याची तारीफ करण्यात काही गैर नाही. पण स्वतःलाच विचारा, ‘हे लोक आपल्या व्यक्तिगत जीवनात कसले उदाहरण राखतात?’ पुष्कळसे क्रिडा क्षेत्रातले हिरो, संगीतकार आणि इतर कलाकार लैंगिक अनैतिकता, मादक औषधं आणि मद्यप्राशन करण्यासाठी प्रसिद्ध नाहीत काय? त्याचप्रमाणे, पैसा आणि प्रसिद्धी असतानाही अनेकांचे जीवन दुःखी, असमाधानकारक असते हे खरे नाही का? या दृष्टिकोनातून पाहिल्यावर, अशा लोकांचे अनुकरण करण्यात काही लाभ आहे का?
एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची केशभूषा, कपडे किंवा बोलण्याचे अनुकरण करणे इतकी काही मोठी गोष्ट वाटत नसेल हे खरे आहे. पण, जगाला ‘त्याच्या सांच्यात [आपल्याला] घालू देण्यास’ अनुमती देण्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल असू शकतं. (रोमकर १२:२, फिलिप्प्सा) सुरवातीला तो ‘सांचा’ हवाहवासा वाटेल. पण तुम्ही पूर्णतः त्याच्या वश झालात, तर तो तुम्हाला अशाप्रकारे घडवेल की निश्चितच तुम्ही देवाच्या विरोधात व्हाल. याकोब ४:४ येथे बायबल म्हणते, “जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे.”
चांगला आदर्श—कोणत्या अर्थाने मदतदायी
तथापि, चांगलं उदाहरण मांडणाऱ्या व्यक्तीचं अनुकरण केल्यानं तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो! सह-ख्रिश्चनांमध्ये, “भाषण, वर्तन, प्रीति, विश्वास व शुद्धता ह्यांविषयी . . . कित्ता” असलेले अनेकजण तुम्हाला सापडतील. (१ तीमथ्य ४:१२) हे खरे आहे की, ख्रिस्ती मंडळीतही सोबती निवडताना दक्षता बाळगावी लागते. (२ तीमथ्य २:२०, २१) परंतु, मंडळीत खरोखर “सत्याने चालत” असलेले कोणते लोक आहेत हे जाणून घेणं काही कठीण नसतं. (२ योहान ४) इब्री लोकांस १३:७ येथील तत्त्व म्हणते: “त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.” तुमच्या बहुतांश समवयस्कांच्या बाबतीत, त्यांच्या वर्तणुकीचा काय परिणाम होईल हे स्पष्ट होण्यास अद्याप अवकाश आहे. पण मंडळीत, आपला विश्वासूपणा ज्यांनी सिद्ध केलाय असे वयाने मोठे असलेले लोक आहेत आणि त्यांच्याशी परिचय करून घेणं सुज्ञतेचं आहे.
‘काय, वयाने मोठ्या असलेल्या लोकांशी परिचय?’ असं तुम्ही म्हणाल. होय, सुरवातीला हे जरा विचित्रच वाटेल. पण, तीमथ्य आणि वयस्क प्रेषित पौल यांच्यातल्या नातेसंबंधाची आठवण करा. पौलानं तीमथ्याची कुवत ओळखली आणि त्याच्याठायी “देवाचे जे कृपादान . . . ते प्रज्वलित” करण्यास त्याला उत्तेजन दिलं. (२ तीमथ्य १:६) तुम्हाला मदत आणि उत्तेजन देणारे व देवाने तुम्हाला दिलेली कृपादाने वाढवायला प्रोत्साहन देणारे कोणी असेल तर ते फायदेकारक ठरणार नाही का?
ब्रायन नामक एका युवकाला याची सत्यता पटली. न्यूनगंडाच्या भावनांशी झुंजत असतानाच मंडळीत त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका अविवाहित सेवा सेवकाशी त्याचा परिचय झाला. ब्रायन म्हणतो: “इतरांची आणि माझीसुद्धा प्रेमाने काळजी घेणे; सेवेतला आवेश आणि उत्तम भाषणं यासाठी मी त्याचं कौतुक करतो.” वयाने त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या या ख्रिश्चनाने ब्रायनकडे जे व्यक्तिगत लक्ष दिलं त्याचा त्याला फायदा झालाच आहे. तो अगदी स्पष्टपणे सांगतो: “यामुळे मला माझ्या पूर्वीच्या बुजऱ्या आणि निरुत्साही व्यक्तिमत्त्वात बदल करण्यास मदत मिळाली.”
पालक—आदर्श म्हणून
पौगंडावस्था—तणावग्रस्त पिढी (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते की, पालक “एका सर्वसाधारण पौगंडाला स्वतःचे समाधानकारक वेगळेपण स्थापन करण्यासाठी मदत करणारा किंवा अडखळण आणणारा सर्वात महत्त्वाचा एकमेव असा बाहेरील प्रभाव आहे.” ते पुस्तक पुढं म्हणतं, मार्गदर्शनाच्या आणि स्वतःच्या वेगळेपणाची त्या स्पष्ट भावनेविना तरुण लोक “सुकाणू नसलेल्या जहाजासारखे, प्रत्येक लाटेसोबत दिशा बदलणारे असे होतील.”
या सल्ल्यावरून, याकोब १:६ मध्ये लिहिल्याप्रमाणे, शिष्य याकोबाने १,९०० वर्षांआधी जे लिहिले तेच स्पष्ट होते: “त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.” तुम्हाला कदाचित अगदी असलेच तरुण ठाऊकही असतील. ते जणू आजच्या मौजमजेसाठीच जगतात; उद्याची त्यांना काहीही पर्वा नसते.
मंडळीत उत्तम उदाहरण राखणाऱ्या देव-भीरू पालकांचा आशीर्वाद तुम्हाला लाभला आहे का? असल्यास, त्यांचा प्रभाव तुम्ही स्वतःवर होऊ देता का? की, बघाल तेव्हा तुम्ही त्यांच्याशी वाकड्यातच शिरत असता? हे खरं की, तुमचे पालक काही परिपूर्ण व्यक्ती नाहीत. पण त्यांच्या उत्तम गुणांकडे कानाडोळा करू नका—या गुणांचे अनुकरण केल्यास तुम्हाला लाभ होईल. “माझ्या पालकांचं मला खूप कौतुक वाटतं,” असे जॅरॉड नावाच्या एका तरुणाने लिहिले. “सेवेत त्यांनी निरंतर दाखवलेला आवेश, आर्थिक अडचणींचा सामना कसा केला आणि पूर्ण-वेळेच्या सेवेत जाण्यासाठी त्यांनी मला जे उत्तेजन दिलं या सर्वांचा माझ्यावर चांगला परिणाम झाला. माझ्या पालकांनाच मी नेहमी आदर्श मानलंय.”
सर्वोत्तम आदर्श
गॅलप सर्वेक्षण संघटनेने संयुक्त संस्थानांतील काही तरुणांना, त्यांच्या मते इतिहासातील सर्वात थोर व्यक्ती कोण असे विचारले असता, बहुतेक जणांनी अमेरिकी राजकारणी व्यक्तींची नावे सांगितली. फक्त ६ टक्के तरुणांनी येशू ख्रिस्ताचं नाव घेतलं. तथापि, बायबल आपल्याला सांगते की, येशू ख्रिस्ताच्या “पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने [आपल्याकरिता परिपूर्ण] कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१; इब्री लोकांस १२:३) तो आपल्या शिष्यांना त्याच्याकडून शिकायला प्रोत्साहन देतो. (मत्तय ११:२८, २९) पण ते करायचे तरी कसे?
येशूच्या जीवनाबद्दल संपूर्ण माहिती मिळवा. सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य आणि त्यासोबत सुरवातीपासून शुभवर्तमानाची पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करा.a येशूच्या शिकवण्याची पद्धत, लोकांशी सहानुभूतीने व्यवहार करण्याची पद्धत आणि तणावात असताना सुद्धा त्याने दाखवलेला धीर या सर्वांचे निरीक्षण करा. हे केल्यावर, येशू हा सर्वात उत्तम आदर्श आहे असे तुमच्या लक्षात येईल.
या सर्वोत्तम आदर्शाबद्दल तुम्ही जितके अधिक जाणून घ्याल तितकेच तुम्हाला अहितकर समवयस्क किंवा प्रसिद्ध व्यक्तींबद्दल कमी आकर्षण वाटेल. तो पिंग आणि क्रिडा क्षेत्रातल्या एका हिरोबद्दल त्याला वाटणारं कौतुक तुम्हाला आठवतं का? तोच पिंग अजूनही अधूनमधून बास्केटबॉल खेळतो, पण स्वतःसमोर प्रसिद्ध व्यक्तींचा आदर्श ठेवणं मूर्खपणाचं आहे याची जाणीव त्याला झालीय.
आणि रिचर्डबद्दल काय? त्याने निवडलेल्या आदर्शामुळे त्याने ख्रिस्ती धर्म त्यागला. परंतु, रिचर्डची ओळख सायमन नामक एका विशीतल्या यहोवाच्या साक्षीदाराशी झाली. रिचर्ड म्हणतो, “सायमन माझा दोस्त बनला आणि त्याने मला हे पाहण्यास मदत केली की जीवनाचा आनंद घेण्यासाठी बायबल तत्त्वे झुगारण्याची गरज नाही. मला लगेचच सायमनबद्दल आदर वाटू लागला, आणि त्याच्या उदाहरणामुळेच मी मंडळीत पुन्हा आलो आणि यहोवाला माझं जीवन समर्पित केलं असं म्हटलं तरी चालेल. आता मी खूप आनंदी आहे आणि मुख्य म्हणजे माझं जीवन आता खरोखर अर्थपूर्ण झालंय.”
होय, तुम्ही आदर्श म्हणून कोणाची निवड करता हे निश्चितच महत्त्वाचं आहे!
[तळटीप]
a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
[१३ पानांवरील चित्र]
चांगल्या नावलौकिकाच्या वयाने मोठ्या असलेल्या लोकांची संगत केल्याने तुम्हाला मदत मिळू शकते