जगावरील दृष्टिक्षेप
ऑस्ट्रेलियाचे रानटी उंट
ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम भागांत टेलिग्राफ लाईन बसविण्यासाठी आणि रेल्वेमार्ग बांधण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी या देशात उंटांची आयात करण्यात आली होती. या धट्ट्याकट्ट्या उंटांची जागा ट्रकने घेतली तेव्हा त्यांच्या अफगान मालकांनी त्यांची हत्त्या करण्याऐवजी त्यांना जंगलात सोडून दिले. मध्य ऑस्ट्रेलियाच्या शुष्क भागांत या उंटांची भरभराट झाली आणि आज तेथे २,००,००० इतके उंट आहेत. द ऑस्ट्रेलियन या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, काही लोकांचा आता असा विश्वास आहे, की हे उंट एक बहुमोल राष्ट्रीय संपदा होऊ शकतील. उंटाचे मांस नमुन्यासाठी बाजारात केव्हाच उपलब्ध केले असून ते गोमांसाहून कोवळे असल्याचे व त्यात स्निग्ध पदार्थांचा अंशही कमी असल्याचे म्हटले जाते. उंटाच्या इतर उत्पादनांत कातडी, दूध, लोकर, आणि साबण व सौंदर्यप्रसादनांत वापरले जाणारे स्निग्ध पदार्थ समाविष्ट आहेत. जिवंत उंटांनाही बरीच मागणी आहे. मध्य ऑस्ट्रेलियन उंट उद्योगाचे पीटर सायडल यांच्या मते, “अनेक आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयांना आणि पर्यटन उद्यानांना ऑस्ट्रेलियाचेच उंट हवे असतात, कारण आमच्याकडचे उंट रोगमुक्त आहेत.”
आर्सेनिकची विषबाधा
द टाईम्स ऑफ इंडिया असा अहवाल देते की, “कलकत्त्यासोबतच बांगला देशच्या जवळजवळ १.५ कोटी लोकांना, तर पश्चिम बंगालच्या ३ कोटी लोकांना आर्सेनिक विषबाधा झाली आहे.” ही समस्या, हरितक्रांतीचेच एक अनपेक्षित उपउत्पादन होय. अन्नधान्य पिकविण्यासाठी जागोजागी कूपनलिका खोदण्यात आल्या, तेव्हा भूगर्भात नैसर्गिकरित्या दडलेले आर्सेनिक पाण्यासह वर आले आणि सरतेशेवटी ते त्या विहिरींमध्येही झिरपले ज्यांतले पाणी पिण्यासाठी वापरले जाते. अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठाचे पर्यावरण तज्ज्ञ, विलर्ड चॅपेल यांनी अलीकडेच या आर्सेनिकग्रस्त क्षेत्रांना भेट देऊन त्या समस्येचे वर्णन, ‘जगातील सामूहिक विषबाधेचे सर्वात भयानक प्रकरण,’ या शब्दांत केले. यामुळे २,००,००० पेक्षा अधिक लोकांना त्वचेचा विकार झाला असून हे आर्सेनिक विषबाधेचेच लक्षण आहे. बांगला देशचे सरकारी अधिकारी ईसहाक अली म्हणाले: “असे दिसून येते, की (हरितक्रांतीद्वारे) आपण भूक समस्या सोडवली खरी, पण ते करण्याच्या प्रयत्नात आणखीन विपत्ती ओढवून घेतली.”
दिवाळखोरी सर्रास बनत आहे
न्यूजवीक नियतकालिकाच्या म्हणण्यानुसार, सन १९९६ मध्ये “१२ लाख अमेरिकन लोकांनी आपले दिवाळे निघाल्याची घोषणा केली; ही एक विक्रमी संख्या असून १९९४ सालापेक्षा ४४ टक्क्यांनी ती वाढली होती. दिवाळखोरी इतकी सर्रास झाली आहे, जणू त्यात काहीच वावगे नाही.” दिवाळखोरीतील या वाढीचे कारण काय? एक कारण म्हणजे, “अधिकतर लोक असे मानायला लागले आहेत की, दिवाळखोरी ही आणखीन एक जीवनशैलीच होय,” असे न्यूजवीक म्हणते. “धनकोंचे असे म्हणणे आहे, की विचारसरणीतील हा बदल दिवाळखोरीचा गैरफायदा घेण्याकडे वाटचाल करत आहे: एका अभ्यासानुसार आपले दिवाळे निघाले असल्याचे घोषित करणारे ४५ टक्के लोक त्यांचे अधिकतर कर्ज फेडू शकत होते.” परंतु, घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची इच्छा बाळगण्याऐवजी आणि याबद्दल लाज वाटण्याऐवजी अनेकजण सरळ सरळ असे म्हणत आहेत की: ‘माझे सर्व कर्ज माफ व्हावेत, म्हणजे मला पुन्हा एकवार चांगली सुरवात करता येईल.’ अनेकानेक लोक आणि कंपन्या दिवाळखोरीचा मार्ग पत्करत आहेत; या शिवाय, “कर्ज-समस्या झटपट सोडवा!!” अशा वकिलांच्या जाहिरातींचाही त्यांच्यावर प्रभाव पडत असतो. एका भरभराटीच्या अर्थव्यवस्थेदरम्यान दिवाळखोरींची संख्या सतत वाढत असताना एखाद्या वेळी शेअरबाजार ढासळलाच किंवा त्याची मरगळ झालीच तर काय होईल या विचाराने तज्ज्ञांचा थरकाप उडतो.
नोकरी करणाऱ्या माता
सन १९९१ मध्ये नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या राष्ट्रीय मंडळाने असा अंदाज बांधला की, “१९९० या दशकाच्या मध्यापर्यंत, ज्यांची मुले शाळेला जाण्याच्या वयाची नाहीत अशा ६५% [अमेरिकन] स्त्रिया आणि ज्यांची मुले शाळेत जाण्याच्या वयाची झाली आहेत अशा ७७% स्त्रिया कर्मचारी वर्गात मोडतील.” यांचा होरा कितपत खरा ठरला? द वॉशिंग्टन पोस्टचा असा अहवाल आहे, की १९९६ मध्ये यु.एस. सेन्सर ब्युरोनुसार ६३ टक्के स्त्रिया—ज्यांची मुले पाच वर्षांहून कमी वयाची होती—नोकरी करणाऱ्या होत्या. ज्यांची मुले शाळेला जाण्याच्या वयाची होती अशा स्त्रियांपैकी ७८ टक्के स्त्रिया नोकरी करणाऱ्या माता होत्या. युरोपबद्दल काय? युरोपियन संघाच्या आकडेवारी दफ्तराने संकलित केलेल्या माहितीवर आधारित, सन १९९५ च्या दरम्यान युरोपियन देशांतील नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण—“ज्यांची मुले ५ ते १६ वर्षे वयोगटातील होती”—पुढीलप्रमाणे होते: पोर्तुगाल ६९ टक्के, ऑस्ट्रीया ६७, फ्रान्स ६३, फिनलंड ६३, बेल्जियम ६२, ब्रिटन ५९, जर्मनी ५७, नेदरलंड ५१, ग्रीस ४७, लक्झेम्बर्ग ४५, इटली ४३, आयर्लंड ३९ आणि स्पेन ३६.
मच्छीमारीच्या विध्वंसकारी पद्धती
व्यापारी मच्छीमारी कंपन्या अशा उपकरणात गुंतवणूक करत आहेत ज्याद्वारे समुद्राच्या तळातील सतत घटणारे मासे पकडता येतील. यापूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या जातींना वर आणण्यासाठी मोबाईल गिअर म्हटले जाणारे हे समुद्रतळ उपकरण समुद्राच्या तळावर ३,९०० फुटाच्या खोलीवरून फरफटले जाते. समस्या अशी आहे, की या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात, “ट्यूब वर्म, स्पंज, अनेमनी, हायड्रोजोअन, अर्चिन आणि इतर समुद्र जीव” देखील पकडले जातात आणि शेवटी “कचऱ्यात टाकून दिले जातात” असा वैज्ञानिक वार्ता (इंग्रजी) नियतकालिक अहवाल देते. यांचा विनाश केल्यामुळे माश्यांच्या संख्येत आणखीनच घट होते. हे जीव खरे तर लहान माश्यांना अन्ननिवारा पुरवत असल्यामुळे रेडमण्ड, वॉशिंग्टन, अमेरिका येथील समुद्रजीव संरक्षण जीवशास्त्र संस्थेचे संचालक एलिऑट नॉर्स म्हणतात, की मच्छिमारीच्या या पद्धतीमुळे सागरी वस्तीस्थानांच्या या विध्वंसाची तुलना “जंगलतोडीशी” केली जाऊ शकते.
चोखंदळ नकलनवीस
मन्टस्टर, जर्मनीच्या नवा करार संशोधन संस्थेच्या प्रमुख, डॉ. बार्बारा आलान्ट म्हणतात, की बायबलच्या ग्रीक शास्त्रवचनांमधील मजकूराची अगदी चोखंदळ नक्कल करून मोठ्या काळजीने तो आपल्याप्रत पोहंचवला गेला आहे. वेस्टफालिश नाख्रिक्टनच्या अहवालानुसार, “चुका किंवा धर्मशास्त्रीय कारणांसाठी प्रेरित केलेले बदल देखील अगदी किरकोळ आहेत.” सन १९५९ पासून या संस्थेने, मध्ययुगातल्या आणि मध्ययुगापूर्वीच्या ५,००० हून अधिक हस्तपत्रिकांचे परीक्षण केले आहे. काही ९० टक्के हस्तपत्रिका सूक्ष्मपटात रेकॉर्ड केल्या आहेत. चुका न करण्यासंबंधी नकलनवीसांनी इतकी काळजी का घेतली बरे? “कारण त्यांनी स्वतःस लेखक नव्हे, तर ‘नकलनवीस’ समजले,” असे वृत्तपत्र म्हणते.
मुलांसाठी बालपणीच बुद्धीगुणांक परीक्षा
मानवी बुद्धीमत्तेचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आता असा विश्वास करतात, की एखाद्या अर्भकाच्या जन्मापासून वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत त्याचा मेंदू, विकासाच्या एका अतिमहत्त्वपूर्ण टप्प्यातून वाटचाल करत असतो. असेही समजले जाते, की या काळात मानसिक उद्दीपनाच्या प्रतिसादात मेंदूत स्थायी संबंध प्रस्थापित होतात. यास्तव, आपल्या मुलांना बालोद्यानात दाखल करण्याच्या कितीतरी आधी काही पालकांनी त्यांना बुद्धीगुणांक परीक्षा (आय.क्यू.टेस्ट) देण्यास सुरवात केली आहे, जेणेकरून पुढे त्यांना नेहमीच लाभ होऊ शकेल, असे आधुनिक प्रौढता (इंग्रजी) नियतकालिक अहवाल देते. तथापि, बॉस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या बालरोगचिकित्सा विभागाचे डॉ. बॅरी ट्सूकरमन यांनी, “एक ‘सुपर बेबी’ तयार करण्याच्या हेतूने त्याला क्षणोक्षणी ‘उद्दीपित’ करण्याच्या दबावाखाली वावरणाऱ्या” पालकांसंबंधी चिंता व्यक्त केली. बाल मानसशास्त्राचे प्राध्यापक रिचर्ड वेनबर्ग यास दुजोरा देतात: “लहान वयातच मुलांवर स्पर्धा करण्याचं दडपण आणल्यामुळे पुष्कळदा उलटच परिणाम निष्पन्न होतात. यास्तव, तुमच्या चिमुरड्यांना त्यांच्या बालपणाचा पुरेपूर आनंद घेऊ द्या.”
जागतिक वननिर्मूलन
“पृथ्वीग्रहावरील दोन तृतीयांश अरण्यांचा केव्हाच विध्वंस केला गेला आहे,” असा झॉर्नल डे टार्डचा अहवाल आहे. पृथ्वीच्या आठ कोटी चौरस किलोमीटर मूळ अरण्य क्षेत्रांपैकी केवळ तीन कोटी आता शाबूत आहेत. द वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) याच्या निदर्शनास आले आहे, की आशिया खंड हा सर्वाधिक वननिर्मूलन केलेला खंड असून त्यातील ८८ टक्के मूळ वनस्पतीचा विनाश केला गेला आहे. युरोपमध्ये ही संख्या ६२ टक्के, आफ्रिकेत ४५ टक्के, लॅटिन अमेरिकेत ४१ टक्के आणि उत्तर अमेरिकेत ३९ टक्के आहे. जगातील सर्वात मोठ्या उष्णकटिबंधीय पर्जन्यारण्याचे माहेरघर असलेल्या ॲमेझोनियातील ८५ टक्क्यांहून अधिक मूळ आरण्य शाबूत आहे. डब्ल्यूडब्लूएफचे गॅरो बाटमानयन यांचे शब्द उद्धृत करताना ऑ एस्टाडॉ दे साऊन पाऊलु वृत्तपत्र म्हणते: “इतर अरण्यांत घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती न करण्याची संधी आज ब्राझीलकडे आहे.”
खजिना लांबविणे
वर्ल्ड प्रेस रिव्ह्यूच्या अहवालानुसार, कॅनडातील एका अलीकडील वृत्त प्रकाशनाने घोषित केले की, “१९९१ च्या पर्शियन खाडी युद्धामुळे जवळजवळ असुरक्षित असलेल्या मॅसेपोटोमियातील खजिन्याला ‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळीने’ आपले लक्ष्य बनविले आहे. सन १९९६ मध्ये, दिवसाढवळ्या बॅबिलोनच्या वस्तूसंग्रहालयात घुसून चोरट्यांनी नळकांडे आणि दगडी पाट्या लांबविल्या ज्यांवर कीलाकार लिखाणे कोरली गेली होती. दुर्मिळ पुरातन वस्तूंचे—काही तर अगदी दुसरा नबूखद्नेस्सर राजा याच्या कारकीर्दीतील—मोल आंतरराष्ट्रीय कलाकुसरीच्या बाजारपेठांत ७,३५,००० डॉलरपेक्षा अधिक असल्याचा अंदाज बांधला गेला. चोरट्यांचे लक्ष्य बनलेले आणखीन एक क्षेत्र म्हणजे प्राचीन अल-हाडर शहर. उरल्यासुरल्या खजिन्याचे संरक्षण करण्यासाठी सरकारने शहराच्या सर्व वेशी व येण्याजाण्याचे मार्ग विटा आणि चुन्याचा गारा यांनी बंद केले आहेत, असे सदर नियतकालिक म्हणते.