बायबलचा दृष्टिकोन
दुरात्मे वास्तविक आहेत का?
सतराव्या आणि अठराव्या शतकांदरम्यान, युरोपच्या बहुतांश भागांना चेटकिणींविरुद्ध छळाच्या एका प्रक्षोभित मोहिमेने झपाटले होते. अनेक तथाकथित चेटकिणींना भयंकर यातना देण्यात आल्या. ज्यांच्यावर खोटा आरोप केला होता अशा काहींनी तर केवळ यातना चुकवण्यासाठी चेटूक करत असल्याचे कबूल केले. अफवा किंवा संशयामुळे अगणित लोकांना ठार मारण्यात आले.
त्या काळात चेटूकाविरुद्ध—भुताटकीचा एक प्रकार—जी कार्यहालचाल करण्यात आली ती शास्त्रवचनांवर आधारित असल्याचा आव आणण्यात आला असला, तरी तो निश्चितच अतिरेकीपणा होता. चेटकिणींना किंवा भूतविद्येचे आचरण करणाऱ्या इतर कोणालाही यातना देण्याची किंवा ठार मारण्याची कामगिरी ख्रिश्चनांवर सोपवण्यात आलेली नाही. (रोमकर १२:१९) आजचा सर्वसामान्य दृष्टिकोन काय आहे?
निवांत दृष्टिकोन
आज ख्रिस्ती धर्मजगतातले पुष्कळ जण अशा भूतविद्येच्या प्रकारांना गंभीरपणे लेखत नाहीत. उत्सुकतेपोटी, काहीजण फलज्योतिषशास्त्र, जादू, शकुनविचार आणि चेटूक हे प्रकार करत असतील पण हे गूढ विधी भुताटकीचा प्रकार आहेत असा त्यांचा समज नसतो. काही वेळा, तर मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्ती, खेळाडू आणि राजनैतिक व्यक्ती असले गूढ प्रकार आचरत असल्याचे जाहीरपणे सांगतात. एका विश्वकोशानुसार, काही पुस्तकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये, चेटकिणींना आणि जादूगारिणींना “आकर्षक, जराशा असामान्य व्यक्ती ज्यांच्या अमानवी कार्यांचा कोणालाच अपाय होत नाही” असे प्रस्तुत केले जाते. मुलांचे मनोरंजन आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी निर्माण केलेले साहित्य गूढ विषयांचा पुरस्कार करत असेल.
भुताटकीबद्दल असा निवांत आणि सहज दृष्टिकोन असल्याने दुरात्मे अस्तित्वात नाहीत असा समज होऊ शकतो. दुरात्मे अस्तित्वात आहेत आणि आपल्याला हानी पोहंचवण्याचा ते सक्रिय प्रयत्न करताहेत असा तुमचा विश्वास आहे का? आज अनेक जण म्हणतील की, दुरात्म्यांशी त्यांचा कधीच संपर्क आलेला नाही किंवा त्यांची कार्ये त्यांनी कधीही पाहिलेली नाहीत. दुरात्मे वास्तविक व्यक्ती आहेत का?
अविश्वासामुळे पेचप्रसंग
बायबलवर विश्वास असल्याचा दावा करणाऱ्या पण दुरात्म्यांच्या वास्तविकतेवर शंका करणाऱ्या लोकांसमोर एक पेचप्रसंग आहे. दुरात्मे वास्तविक आहेत असा त्यांचा विश्वास नसला तर ते बायबलवर काही प्रमाणात अविश्वास प्रकट करत आहेत. का? कारण अमानवी शक्ती असलेल्या दुष्ट आत्मिक प्राण्यांची कल्पना देवाचे वचन, बायबल यातून शिकवली जाते.
त्याच्यातील उत्पत्तीच्या पुस्तकात, एका बुद्धीमान प्राण्याने हव्वेला फसवून देवाविरुद्ध बंड करायला लावण्यासाठी सर्पाचा कसा उपयोग केला हे सांगितले आहे. (उत्पत्ति ३:१-५) बायबलचे शेवटचे पुस्तक, प्रकटीकरण या ठकवणाऱ्या दुष्ट व्यक्तीची अर्थात ‘जुनाट सापाची’ ओळख ‘सर्व जगाला ठकविणारा, दियाबल व सैतान’ अशी करून देते. (प्रकटीकरण १२:९) आपल्या बंडाळीत इतर देवदूतांनाही सामील करण्यात सैतानाला यश आले. (यहूदा ६) बायबलमध्ये या पतित देवदूतांना दुरात्मे म्हटले आहे. ते पृथ्वीच्या परिसरात आपले कार्य करतात आणि देवावर आणि त्याची सेवा करणाऱ्यांवर त्यांचा खूप राग आहे.—प्रकटीकरण १२:१२.
सैतानाला आणि दुरात्म्यांना मानवांवर प्रभाव पाडण्याची, त्यांना हानी पोहंचवण्याची आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याची शक्ती आहे. (लूक ८:२७-३३) मानवी स्वभावाचा त्यांनी हजारो वर्षे अभ्यास केला आहे. मानवी दुर्बलतांचा गैरफायदा कसा घ्यावा हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. पुरुष, स्त्रिया आणि मुलांमध्ये संचारून त्यांना संपूर्णतः स्वतःच्या वश केल्याच्या प्रकरणांचा बायबल अहवाल देते. (मत्तय १५:२२; मार्क ५:२) ते रोग आणि अंधत्वासारखे शारीरिक अपंगत्व घडवू शकतात. (ईयोब २:६, ७; मत्तय ९:३२, ३३; १२:२२; १७:१४-१८) ते लोकांची मने देखील अंधळी करू शकतात. (२ करिंथकर ४:४) दुरात्मे, ‘गर्जणाऱ्या सिंहासारखे कोणाला गिळावे हे शोधीत फिरणाऱ्या’ आपल्या नेत्याप्रमाणे अर्थात सैतानाप्रमाणे सतत क्रियाशील असतात. (१ पेत्र ५:८) बायबलमध्ये दुरात्म्यांच्या अस्तित्वाचे अनेक अहवाल सापडतात. बायबलवर तुमचा विश्वास असेल, तर अदृश्य दुष्ट प्राण्यांची वास्तविकता तुम्हाला स्वीकारावीच लागेल.
दुष्ट ठकबाज
परंतु, जगामध्ये सतत दराऱ्याचे वातावरण निर्माण न करता आज असे शक्तिशाली दुरात्मे कसे अस्तित्वात असू शकतात बरे? त्यांचे वास्तव्य आणि त्यांच्या कृती आणखीन स्पष्ट का नाहीत? बायबल उत्तरते: “सैतानहि स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.” (२ करिंथकर ११:१४) दियाबल एक ठकबाज आहे. सहसा दुरात्मिक कार्यहालचाल अनपायकारक किंवा फायदेकारक गोष्टींचे स्वरूप धारण करते. म्हणून, ती इतक्या सहजासहजी ओळखता येत नाही.
सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांनी बायबल समयांत केले त्याचप्रमाणे आजही ते विविध मार्गांनी लोकांना सतावतात. आज, खरे ख्रिस्ती असलेल्या काहीजणांचा आधी गूढ विधींमध्ये सहभाग होता; ते दुरात्मिक हल्ल्यांच्या भयानकतेचा पुरावा देऊ शकतात. आज, अभूतपूर्व प्रमाणात दुरात्मे आपल्या अमानवी शक्तींचा उपयोग करून लोकांना धडधडीत गूढ विधींच्या मोहजालात फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या शक्तींना क्षुल्लक समजता कामा नये. तथापि, लोकांना घाबरवून टाकण्यापेक्षा त्यांना भुरळ पाडून देवापासून दूर नेण्यात ते पुष्कळ काही साध्य करतात. सैतान आणि त्याचे दुरात्मे ‘सर्व जगाला ठकवत आहेत,’ असे बायबल म्हणते. (प्रकटीकरण १२:९) धूर्त आणि कावेबाज मार्गांनी आपली आध्यात्मिकता खचवण्याचा त्यांचा सर्वस्वी हेतू आहे.
दुरात्मे वास्तविक आहेत. आज लोकांमध्ये दिसून येणारा रक्तपिपासूपणा आणि लोकांचा नाश करण्याची अतृप्त इच्छा यांचे आणखी दुसरे कारण कोणते असेल? स्वभावतः, मानवांना शांती आणि आनंदात राहण्याची मनसा असते. परंतु, दुरात्मे दुष्टतेला बढावा देतात आणि मानवी मनाला प्रभावित आणि भ्रष्ट करण्याची शक्ती त्यांच्याजवळ असते.
तरीही, यहोवा हा सर्वशक्तिमान देव आहे—दुरात्म्यांपेक्षाही तो शक्तिमान आहे. तो आपल्याला “सैतानाच्या डावपेचांपुढे” टिकाव धरता यावा म्हणून सामर्थ्य आणि संरक्षण देऊ करतो. (इफिसकर ६:११-१८) आपला थरकाप उडेल अशी दुरात्म्यांची भीती बाळगायची आपल्याला गरज नाही, कारण देव अभिवचन देतो: “म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.”—याकोब ४:७.
[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]
Sipa Icono