वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ५/८ पृ. ३-६
  • स्त्रियांप्रती भेदभाव

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्त्रियांप्रती भेदभाव
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • लहान वाटा
  • माता आणि कमावणाऱ्‍या
  • ही समस्या का वाढत आहे?
    सावध राहा!—२००३
  • स्त्रिया आणि त्यांच्या कामाची कदर करणे
    सावध राहा!—१९९८
  • संकटग्रस्त मुले
    सावध राहा!—१९९९
  • “मी तुझ्या अनैतिक कामांचा अंत करीन”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ५/८ पृ. ३-६

स्त्रियांप्रती भेदभाव

पश्‍चिम आफ्रिकेत एक व्यापारी एका नऊ वर्षांच्या बालकाला विकत घेतो. आशियात, एका नवजात बालकाला वाळवंटात जिवंत गाढले जाते. एका पौर्वात्य देशातल्या अनाथाश्रमात, एक रांगणारे मूल उपासमारीने मरण पावते—ते कोणालाच नको होते आणि त्याची काळजी कोणीही घेत नव्हते. या शोकांतिकांमध्ये एक समान घटक होता: बळी पडलेली ही सर्व बालके मुली होत्या. त्या मुली होत्या म्हणून त्या नको असलेल्या वस्तू आहेत असे समजले जात होते.

एवढीच प्रकरणे नाहीत. आफ्रिकेत तर हजारो मुलींना आणि तरुण स्त्रियांना गुलाम म्हणून विकले जाते; अगदी १५ डॉलर इतक्या कमी किंमतीतही. त्याचप्रमाणे, दर वर्षी लाखो तरुण मुलींना वेश्‍या व्यवसायासाठी विकले जाते किंवा त्यात सक्‍तीने ढकलले जाते आणि हे खासकरून आशियात घडते. याहूनही वाईट म्हणजे, कित्येक देशांच्या लोकसंख्येवरून असे निष्पन्‍न होते की, १० कोटी मुली “बेपत्ता” आहेत. स्पष्टतः गर्भपात, बालहत्या किंवा स्त्रियांकडे दुर्लक्ष ही यामागची कारणे आहेत.

अनेक देशांमध्ये स्त्रियांना पुष्कळ काळापासून—शतकांपासून—असे लेखण्यात आले आहे. आणि काही ठिकाणी तर अद्यापही त्यात फरक झालेला नाही. का? कारण अशा देशांमध्ये मुलांना जास्त महत्त्व दिले जाते. तेथे लोकांची अशी धारणा आहे की, मुलगा हा वंशाचा दिवा असतो, तो मालमत्तेचा वारस बनतो आणि पालक म्हातारे झाले की त्यांना सांभाळतो कारण बहुधा अशा देशांमध्ये वृद्ध लोकांसाठी सरकारकडून निवृत्ती वेतन मिळण्याची योजना नसते. एक आशियाई म्हण त्याचे कारण देते की “मुलीला सांभाळणे म्हणजे शेजाऱ्‍याच्या बागेतल्या रोपाला पाणी घालण्यासारखे आहे.” ती मोठी झाल्यावर लग्न करून दुसऱ्‍या घरी जाईल किंवा कदाचित वेश्‍या व्यवसायातही तिला विकले जाईल आणि म्हणून तिच्या वयोवृद्ध पालकांचा सांभाळ करायला तिच्याकडून फार कमी मदत होईल किंवा काहीही हातभार लागणार नाही.

लहान वाटा

दारिद्र्‌य असलेल्या राष्ट्रांमध्ये अशा मनोवृत्तीचा अर्थ, कुटुंबातल्या मुलींसाठी कमी अन्‍न, कमी आरोग्य निगा आणि कमी शिक्षण होतो. आशियाच्या एका राष्ट्रातील संशोधकांना हे आढळले की, केवळ ५ टक्के मुलांच्या तुलनेत १४ टक्के मुली कुपोषित होत्या. काही राष्ट्रांमध्ये, मुलींच्या दुप्पटीने मुलांना आरोग्य केंद्रांमध्ये आणले जाते असे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडचा (युनिसेफ) एक अहवाल सांगतो. आफ्रिकेत त्याचप्रमाणे दक्षिण आणि पश्‍चिम आशियात ४० टक्क्यांहून अधिक तरुण स्त्रिया निरक्षर आहेत. “विकसनशील जगात भयंकर लिंग भेद होत आहे,” असा खेद युनिसेफच्या माजी राजदूत, भूतपूर्व ऑड्रे हेपबर्न यांनी व्यक्‍त केला होता.

हा “लिंग भेद” मुली प्रौढ झाल्यावरही तसाच राहतो. दारिद्र्‌य, हिंसा आणि अंतहीन कष्ट हे सर्व बहुधा स्त्रीच्याच पदरी पडते; ती केवळ स्त्री असते म्हणून. जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणाले: “जगातील दोन तृतीयांश काम स्त्रिया करतात. . . . तरीही जगाच्या मिळकतीतून त्या केवळ एक-दशांश कमावतात आणि जगातील मालमत्तेत त्यांचा हक्क एक टक्क्याहून कमी आहे. त्या जगातील गरीबातल्या गरीब लोकांपैकी आहेत.”

संयुक्‍त राष्ट्रांच्या एका वृत्तानुसार, अत्यंत गरिबीत दिवस कंठणाऱ्‍या जगातील १.३ अब्ज लोकांपैकी ७० टक्क्यांहून अधिक व्यक्‍ती स्त्रियाच आहेत. “आणि ही परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे,” ते वृत्त पुढे म्हणते. “अगदीच तळागाळाच्या परिस्थितीत राहणाऱ्‍या ग्रामीण स्त्रियांची संख्या गेल्या दोन दशकांमध्ये जवळजवळ ५० टक्क्यांनी वाढली. आता अधिकाधिक स्त्रियाच दारिद्र्‌यात राहत आहेत.”

या जुलूमी दारिद्र्‌यापेक्षाही आघातजन्य गोष्ट असेल तर ती आहे हिंसा, ज्यामुळे कित्येक स्त्रियांचे जीवन पार उद्‌ध्वस्त होते. विशेषतः आफ्रिकेत, अंदाजे दहा कोटी मुलींचे जनन अंगच्छेदन करण्यात आले आहे. बलात्कार हा असा एक सर्वसामान्य अत्याचार आहे की काही ठिकाणांमध्ये त्याचा लिखित पुरावा देखील नाही; तरीही अभ्यासांनुसार ६ स्त्रियांपैकी एका स्त्रीवर तिच्या जीवनकाळात बलात्कार होतो असे स्पष्ट होते. युद्धांचा पुरुषांवर आणि स्त्रियांवर सारखाच परिणाम होतो तरीही आपली घरे सोडून जाण्यास भाग पाडल्या जाणाऱ्‍या निर्वासितांपैकी बहुतांश स्त्रिया आणि मुले असतात.

माता आणि कमावणाऱ्‍या

कुटुंबाचा सांभाळ करण्याचा बोजा अधिककरून मातेवरच असतो. ती अधिक तास काम करत असावी आणि कदाचित घरात तीच एक कमावणारी व्यक्‍ती असेल. आफ्रिकेच्या काही ग्रामीण भागांमध्ये, जवळजवळ निम्मी कुटुंबे स्त्रियाच चालवतात. पाश्‍चात्त्य जगातील काही ठिकाणांमध्ये, अधिककरून स्त्रियाच कुटुंबे चालवतात.

शिवाय, खासकरून विकसनशील देशांमध्ये, पाणी आणणे आणि सरपण गोळा करणे अशी सर्वात अवजड कामे स्त्रियाच करतात. जंगलतोड आणि गुरांच्या अति चरण्यामुळे ही कामे आणखीनच कठीण होऊन बसली आहेत. अनावृष्टी असलेल्या काही देशांमध्ये, स्त्रिया सरपण शोधण्यात दिवसाला तीन किंवा त्याहूनही अधिक तास आणि पाणी भरण्यात दिवसाला चार तास घालवतात. हे त्रासदायक काम उरकल्यावरच घरातली किंवा शेतावरची इतर कामे त्या सुरू करू शकतात.

स्पष्टतः, दारिद्र्‌य, उपासमार किंवा झगडे ज्या देशांमध्ये दररोजच सहन करावे लागतात तेथे पुरुषांना त्याचप्रमाणे स्त्रियांनाही त्रास होतो. पण स्त्रियांना अधिक सहन करावे लागते. ही परिस्थिती कधी बदलेल का? सगळीकडे स्त्रियांना आदर आणि विचारशीलतेने वागवले जाईल असा दिवस उजाडण्याची काही खरी आशा आहे का? स्वतःची परिस्थिती सुधारण्यासाठी स्त्रिया आता काही करू शकतात का?

[५ पानांवरील चित्र/चौकट]

वेश्‍या बालिका—कोण जबाबदार?

दरवर्षी अंदाजे दहा लाख बालकांना—बहुतांश मुलींना—वेश्‍या व्यवसायाच्या गर्तेत सक्‍तीने ढकलले जाते किंवा विकले जाते. आग्नेय आशियातून येणारी एरायाa तिच्या वर्गसोबत्यांचे काय घडले त्याविषयी आठवून सांगते. “कुलवादी १३ वर्षांची असतानाच वेश्‍या बनली. ती खूप चांगली मुलगी होती पण तिची आई दारू प्यायची आणि जुगार खेळायची म्हणून मुलीची काळजी घ्यायला तिला वेळच नसायचा. कुलवादीच्या आईने तिला पुरुषांसोबत जाऊन पैसे कमवायचे उत्तेजन दिले आणि काही काळातच ती वेश्‍या बनली.”

“माझ्या वर्गातली आणखी एक विद्यार्थीनी, सीवुन, उत्तर भागातून आली होती. तिच्या आईवडिलांनी तिला वेश्‍या व्यवसाय करायला राजधानीत पाठवले तेव्हा ती फक्‍त १२ वर्षांची होती. तिच्या आईवडिलांनी लिहून दिलेल्या कराराप्रमाणे पैसे फेडण्यासाठी तिला दोन वर्षं तो व्यवसाय करावा लागला. सीवुन आणि कुलवादीची गोष्ट काही नवीन नाही—माझ्या वर्गातल्या १५ मुलींपैकी ५ जणी वेश्‍या बनल्या.”

सीवुन आणि कुलवादीसारख्या लाखो तरुणी आहेत. “हा वेश्‍या व्यवसाय म्हणजे एक मोठा बाजार आहे आणि त्याची भरभराट होत आहे,” असे युनेस्कोच्या (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, साएंटिफिक ॲण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन) वासिला तामसाली खेदाने म्हणतात. “१४ वर्षांच्या मुलीला विकणं इतकं सर्वसामान्य झालं आहे की त्यात नवीन असं काहीच वाटत नाही.” आणि एकदा ह्‍या बालिकांना लैंगिक दास्यात विकले गेले की, त्यांच्या खरेदीची किंमत फेडणे अशक्य कोटीतली गोष्ट होऊन जाते. मंजूच्या वडिलांनी तिला १२ वर्षांची असताना विकली पण सात वर्षे वेश्‍या व्यवसाय केल्यावरही त्यांच्यावर १२,००० रुपयांचे कर्ज होते. “मी काहीच करू शकत नव्हते—मी अगदीच असहाय होते,” असे ती म्हणते.

या बालिकांना एडस्‌ चुकवणे म्हणजे त्यांना दास करून ठेवणाऱ्‍या वेश्‍या दलालांना चुकवण्याइतकेच कठीण असू शकते. आग्नेय आशियात घेतलेल्या एका सर्वेक्षणात, या ३३ टक्के अल्पवयीन वेश्‍यांना एडस्‌ विषाणूची लागण झाली होती असे निष्पन्‍न झाले. जोपर्यंत या पाच अब्ज डॉलरच्या वेश्‍या व्यवसायाची भरभराट होत राहील तोपर्यंत या बालिकांचे असेच हाल होत राहतील.

या दारुण चालीरीतीसाठी कोण जबाबदार आहे? वेश्‍या व्यवसायात बालिकांची खरेदी किंवा विक्री करणारे यासाठी अधिक दोषी आहेत हे उघड आहे. परंतु, आपल्या लैंगिक हव्यासापोटी या बालिकांचा वापर करणारे अधम पुरुषही यासाठी दोषी आहेत. कारण अनैतिकता आचरणारे हे लोक नसते तर या बालिकांचा वेश्‍या व्यवसाय झालाच नसता.

[तळटीप]

a  नावे बदलण्यात आली आहेत.

दरवर्षी सुमारे दहा लाख तरुण मुलींना वेश्‍या व्यवसायाच्या गर्तेत सक्‍तीने ढकलले जाते

[६ पानांवरील चौकट/चित्र]

मध्य आफ्रिकेत एका स्त्रीचा कामाचा दिवस

घरातली स्त्री सकाळी सहा वाजता उठते आणि कुटुंबासाठी नाश्‍ता बनवते; सकाळी १० ते ११ च्या दरम्यान नाश्‍ता केला जातो. जवळपासच्या नदीवरून पाणी भरल्यावर ती शेतावर जायला निघते—त्यासाठी तिला कदाचित तासभर चालावे लागत असेल.

दुपारी चार वाजेस्तोवर ती लागवड, काटेकुसळे काढणे किंवा पाणी घालणे अशी कामे उरकत असेल आणि सोबत आणलेले तेवढे जेवण खाण्यापुरताच विसावा घेत असेल. सूर्यास्त होण्याआधीच्या त्या दोन तासांमध्ये ती कुटुंबासाठी सरपण गोळा करते आणि कासावा किंवा इतर भाज्या गोळा करते—ते सगळे उचलून ती घरी नेते.

बहुतेकदा, सूर्यास्त होतेवेळीच ती घरी पोचते. आता रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागायचे असते; त्यासाठी दोन तास किंवा त्याहूनही अधिक वेळ लागू शकतो. रविवारच्या दिवशी जवळपासच्या नदीवर जाऊन कपडे धुणे, मग कपडे सुकल्यावर इस्त्री करणे ही कामे उरकली जातात.

तिचा पती तिच्या या राबण्याविषयी काहीच कदर व्यक्‍त करत नाही किंवा तिच्याकडून कधी सल्लेही घेत नाही. एखादवेळेस, लागवडीसाठी जमीन तयार करायला तो झाडे कापून देईल किंवा लहानमोठी झुडपे जाळून देईल पण त्याहून अधिक काही करणार नाही. कधीतरी, तो मुलांना आंघोळीसाठी नदीवर घेऊन जाईल आणि कदाचित थोडीफार शिकार आणि मच्छीमारी करील. पण, दिवसाचा बहुतांश वेळ तो गावातल्या इतर पुरुष मंडळीसोबत गप्पा मारण्यात घालवतो.

पतीची ऐपत असेल, तर काही वर्षांनंतर तो एक नवीन, तरुण बायको आणील; मग त्याचे सर्व प्रेम तो तिच्यावरच बरसत राहील. परंतु, पहिल्या बायकोची प्रकृती ढासळेपर्यंत किंवा ती मरेपर्यंत तिच्याकडून आधीप्रमाणेच काम करण्याची अपेक्षा केली जाते.

आफ्रिकन स्त्रियांवर कामाचे मोठे बोजे असते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा