तरुण लोक विचारतात . . .
वांशिक अभिमानाबद्दल काय?
सतरा वर्षांची टान्या दुःखाने म्हणते: “माझा एक शाळासोबती सतत इतरांच्या वंशाबद्दल आणि वर्णाबद्दल नको ते बोलत असतो. त्याच्या जवळजवळ सगळ्याच गप्पागोष्टींतून तो त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचा दावा करतो.”
आपले कूळ, संस्कृती, भाषा किंवा जन्मस्थळ यांचा अभिमान बाळगणे अगदीच स्वाभाविक आहे. “आपण तर व्हिएतनामी आहोत बुवा. आणि मला माझ्या संस्कृतीचा खूप खूप अभिमान आहे.” असे १५ वर्षांची फॉन म्हणते.
तथापि, पुष्कळ वेळा वांशिक अभिमान आणि वंशवाद या दोन गोष्टी हातात हात घालून चालतात. म्हणूनच, हा अभिमान सुसभ्यतेच्या मुखवट्याआड लपलेला एक तीव्र संक्रामक रोगच असू शकतो जो बेमालूमपणे नाती झीजवून टाकतो. येशू ख्रिस्ताने म्हटले: “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.” (मत्तय १२:३४) आणि अनेकदा खोलवर दडलेल्या श्रेष्ठत्वाच्या—किंवा तुच्छतेच्या भावनांना तोंड फुटून, परिणामी दुःख आणि यातनेचा जन्म होतो.
कधीकधी वांशिक अभिमान एक उग्र स्वरूप देखील धारण करतो. अलीकडील काळात तर युद्धे, दंगली आणि रक्तलांच्छित “वांशिक शुद्धीकरणे” या सर्वांसाठी ते चक्क इंधनच ठरले आहे. तथापि, वांशिक अभिमानाच्या विद्रूप अंगाची प्रचिती होण्यासाठी तुम्हाला रक्तपात प्रत्यक्ष पाहण्याची गरज नाही. उदाहरणार्थ शाळेत, कार्यस्थळी किंवा तुमच्या शेजारीपाजारी तुम्हाला तो पाहायला मिळतो का? “होय, निश्चितच,” असे मेलिसा नावाची एक ख्रिस्ती युवती म्हणते. “माझ्या शाळेतले काही मित्रमैत्रिणी, उच्चार करण्याची विदेशी लकब असणाऱ्या मुलांची टिंगल करतात आणि म्हणतात, की ते त्यांच्यापेक्षा फार बरे आहे.” त्याचप्रमाणे टान्या म्हणते: “‘मी तुझ्यापेक्षा हजार पटीने बरा/बरी,’ असं मुलं बिनधोकपणे म्हणत असल्याचं मी स्वतः ऐकलं आहे.” एका यु.एस. सर्वेक्षणात, जवळजवळ निम्म्या प्रतिवाद्यांनी, त्यांना मागील वर्षादरम्यान व्यक्तिगतपणे वांशिक कलुषितपणाचा कोणता ना कोणता प्रत्यय आला असल्याचे सांगितले. नताशा नावाची एक तरुणी म्हणते की, “आमच्या शाळेत तर वांशिक तणाव बराच फोफावलाय.”
आता समजा, तुम्ही राहात असलेल्या देशात किंवा क्षेत्रात परदेशी लोकांच्या प्रचंड ओघामुळे तुमच्या शाळेचे, शेजारपाजारचे किंवा ख्रिस्ती मंडळीचे स्वरूप नाट्यमयरित्या पार पालटून गेले आहे; यामुळे तुम्ही काहीसे अस्वस्थ होता का? असल्यास, कदाचित तुम्ही विचार केला नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात वांशिक अभिमानाचा तुमच्या विचारसरणीवर पगडा आहे.
योग्य अभिमानाविरुद्ध अयोग्य अभिमान
याचा अर्थ अभिमान मूलतःच वाईट असतो असा होतो का? नेहमीच नाही. कोणकोणत्या क्षेत्रांत योग्य प्रकारचा अभिमान बाळगावा याचे स्पष्टीकरण बायबल देते. प्रेषित पौलाने थेस्सलनीकाकरांतील ख्रिश्चनांना लिहिले, तेव्हा त्याने म्हटले: “आम्ही स्वतःच देवाच्या भक्तगणात तुमच्याविषयी मोठ्या अभिमानाने सांगत असतो.” (२ थेस्सलनीकाकर [थेसलोनिका] १:४; मराठी कॉमन लँग्वेज बायबल) त्याचप्रमाणे, परिमाणानुसार मर्यादित स्वाभिमान बाळगणे हितकर व सर्वसामान्य देखील आहे. (रोमकर १२:३) तर मग आपला वंश, कूळ, भाषा, वर्ण किंवा जन्मस्थळाचा थोडासा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. आपल्याला या गोष्टींचा कमीपणा वाटावा अशी अपेक्षा देव निश्चितच करणार नाही. प्रेषित पौलाला एक इजिप्शियन अपराधी असल्याचे समजले गेले तेव्हा, “मी किलिकियांतील तार्सकर यहूदी आहे; हलक्या सलक्या नगराचा राहणारा नव्हे,” असे म्हणण्यास त्याने मागेपुढे पाहिले नाही.—प्रेषितांची कृत्ये २१:३९.
तथापि, स्वाभिमानाच्या भावनेची अतिशयोक्ती होते तेव्हा, किंवा मग इतरांना पाण्यात पाहण्यास ती चेतविते तेव्हा वांशिक अभिमान एक विद्रूप स्वरूप धारण करतो. बायबल म्हणते: “परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग, व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करिते.” (नीतिसूत्रे ८:१३) तसेच नीतिसूत्रे १६:१८ देखील म्हणते: “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधःपाताचे मूळ होय.” यास्तव, आपण एखाद्या श्रेष्ठ वंशातले आहोत अशा फुशारकीची देव घृणा करतो.—पडताळा याकोब ४:१६.
वांशिक अभिमानाचा उगम
आपल्या वंशाविषयी वाजवीपेक्षा जास्त अभिमान बाळगण्यामागे लोकांचे काय कारण असते? लीझे फूंडरबूर्ग यांचे श्वेत, अश्वेत, इतर (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “अनेक लोकांच्या मनावर वंशाबद्दल त्यांचे पहिले (आणि शेवटचे स्थायी) प्रभाव त्यांच्या पालकांकडून व कुटुंबीयांकडूनच पाडले जातात. पण दुःखाची गोष्ट अशी, की काही पालकांमार्फत पाडले गेलेले प्रभाव असंतुलित किंवा विकृत स्वरूपाचे असतात. काही युवकांना तर कदाचित सडेतोडपणे सांगितले जाते, की त्यांच्या वंशाचे लोक सगळ्यात श्रेष्ठ आणि बाकीचे वंश निराळे किंवा हलके आहेत. तथापि, बहुतेक वेळा तरुण लोक निरीक्षितात, की त्यांच्या पालकांचे इतर वंशाच्या लोकांशी काहीएक देणेघेणे नसते. यामुळे देखील त्यांच्या विचारसरणीवर जबरदस्त प्रभाव पडू शकतो. सर्वेक्षणे दाखवून देतात, की वेशभूषा किंवा संगीताच्या बाबतींत एखाद्या वेळी किशोरवयीन आणि पालक यांचे दृष्टिकोन कदाचित टोकाचे असतील; पण वंशाच्या बाबतीत पाहू जाता बहुतेक युवकांचे दृष्टिकोन अगदी त्यांच्या पालकांसारखेच असतात.
जुलूम आणि गैरवागणूक यांमुळे देखील वंशासंबंधी असंतुलित प्रवृत्त्या विकसित होऊ शकतात. (उपदेशक ७:७) उदाहरणार्थ, शिक्षकांच्याही लक्षात आले आहे, की क्षुद्र मानल्या जाणाऱ्या गटांतील मुलांना बहुधा कोणतेही वळण नसते. ही समस्या सुधारण्यासाठी काही शिक्षकांनी मुलांना त्यांच्या वंशाचा इतिहास शिकविण्यासाठी शालेय अभ्यासक्रम विकसित केला आहे. आस्थेची बाब अशी, की वांशिक अभिमानावरील हा शिरजोर, उलटपक्षी वंशवादास खतपाणीच घालतो, असा समिक्षकांचा वाद आहे.
वैयक्तिक अनुभव देखील बाधक वांशिक प्रवृत्त्यांच्या विकासात आपली भूमिका अदा करतात. दुसऱ्या एका वंशाच्या व्यक्तीशी आलेल्या कटू अनुभवावरून त्या वंशाचे सर्वच लोक असे पीडादायक किंवा धर्मवेडे असतात असा निष्कर्ष काढण्यास आपण प्रवृत्त होऊ. जेव्हा प्रसारमाध्यमेही वांशिक संघर्ष, पोलिसांची पशूतुल्य वृत्ती आणि निषेध जमाव यांकडे लक्ष वेधतात तेव्हा, किंवा नकारात्मक दृष्टिकोनातून वांशिक गटांचे चित्र रेखाटतात तेव्हा नकारार्थी भावना जागविल्या जाण्याची शक्यता आहे.
वांशिक श्रेष्ठत्वाची मिथ्या
आपला वंश इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असे वाटण्याचा आपल्याला हक्क आहे असा दावा करणाऱ्यांबाबत काय? लोकांची खरोखरच विभिन्न वंशात विभागणी केली जाऊ शकते हीच गोष्ट मुळात आक्षेपार्ह आहे. न्यूजविक यातील एका लेखाने पुढील अहवाल प्रसिद्ध केला: “सदर विषयावर सखोल अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनात, वंश एक कुविख्यात निसरडी कल्पना आहे जिची व्याख्या करण्याचे सर्व प्रामाणिक प्रयत्न शेवटी फसतात.” हे खरे की, “वर्ण, केशरचना आणि नाकाडोळ्यांचा आकार यांतील फरक चटकन नजरेस येऊ शकतो.” तथापि, न्यूजविकने म्हटले की, “हे फरक निव्वळ वरकरणी आहेत; आणि कसोशीचे प्रयास करूनही एका वंशाला दुसऱ्यापासून वेगळे करणाऱ्या निश्चित फरकांचा कोणताही संच उदयास आणणे शास्त्रज्ञांना मूलतः शक्य झालेले नाही. . . . या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या बव्हंशी शास्त्रज्ञांचा मूलभूत निष्कर्ष असा आहे, की वंश केवळ एक ‘सामाजिक कल्पना’—कलुषितपणा, अंधश्रद्धा आणि मिथ्याचे एक [भ्रष्ट] मिश्रण आहे.”
वंशावंशात वैज्ञानिक भेद करणे शक्य झाले असते तरीही एका “शुद्ध रक्ताच्या” वंशाची कल्पना निव्वळ कल्पनाच राहिली असती. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका असे निरीक्षण करते: “शुद्ध रक्ताचा एकही वंश अस्तित्वात नाही; सध्या हयात असलेले सर्व वांशिक गट सर्वस्वी संमिश्रित आहेत.” ते काहीही असो, पण बायबल अशी शिकवण देते की, ‘त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण केली.’ (प्रेषितांची कृत्ये १७:२६) वर्ण, केशरचना किंवा नाकाडोळ्यांची ठेवण कशीही असोत, खरे तर केवळ एकच वंश—मानववंश हयात आहे. आदाम, आपल्या सर्वांचा पूर्वज असल्यामुळे त्याच्यामार्फत सर्व मानव एकमेकांचे आप्तजन बनतात.
सर्व वंशाच्या एकाच उगमाविषयी प्राचीन यहुद्यांना पुरेपूर जाणीव होती. तरीही, ख्रिस्ती बनल्यानंतर देखील त्यांच्यापैकी काहीजण या विश्वासास बिलगून राहिले, की ते गैर-यहुद्यांपेक्षा—तसेच त्यांचे गैर-यहुदी सहविश्वासू यांच्यापेक्षाही श्रेष्ठ होते! वांशिक श्रेष्ठत्वाची कल्पना चिरडून टाकण्यासाठी प्रेषित पौलाने जे काही म्हटले ते रोमकर ३:९ येथे नमूद केले आहे: “यहूदी व हेल्लेणी हे सर्व पापवश आहेत.” यास्तव, कोणताही वांशिक गट, देवासन्मुख एक विशेष स्थान असल्याची फुशारकी मारू शकत नाही. खरे तर, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच केवळ लोकांना देवाशी एक नातेसंबंध जोपासता येतो. (योहान १७:३) आणि देवाचीच अशी इच्छा आहे की, “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (तिरपे वळण आमचे.)—१ तीमथ्य २:४.
देवाच्या नजरेत सर्व वंश एकसारखेच आहेत याची जाणीव, आपण स्वतःस आणि इतरांस कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर जोरदार प्रभाव पाडू शकते. इतरांना मानसन्मानाने वागवण्यास—त्यांच्यातील फरकांची कदर व कौतुक करण्यास आपण प्रवृत्त होऊ. उदाहरणार्थ, सुरवातीला उल्लेखिलेली तरुण मेलिसा, उच्चार करण्याची विदेशी लकब असणाऱ्या युवकांची टिंगल करण्यात आपल्या शाळकरी मित्रांना साथ देत नाही. ती म्हणते: “जे दोन भाषा बोलतात अशांना मी हुशार समजते. आणखीन एक भाषा बोलायला मलाही आवडलीच असती पण मला केवळ एकच भाषा बोलता येते.”
तुमच्या वंशाच्या व संस्कृतीच्या लोकांकडे फुशारकी मारण्यास निःशंकपणे पुष्कळशी कारणे असल्यास हे लक्षात ठेवा, की इतर वंशांकडेही तशी कारणे असतात. आणि आपल्या संस्कृतीविषयी व आपल्या पूर्वजांच्या साध्यतांविषयी थोडाफार अभिमान बाळगणे रास्त असले, तरी व्यक्तिगतपणे प्रयत्न व कष्ट करून तुम्ही स्वतः जे काही साध्य केले आहे त्याविषयी अभिमान बाळगणे कितीतरी समाधान देणारे असते! (उपदेशक २:२४) खरे तर, अशी एक साध्यता आहे ज्याविषयी अभिमान बाळगण्याचा आर्जव बायबल तुम्हाला करते. यिर्मया ९:२४, येथे सांगितल्याप्रमाणे, देव स्वतः म्हणतो: ‘जो अभिमान बाळगतो त्याने याविषयी अभिमान बाळगावा की तो समजतो व ओळखतो, की मी यहोवा आहे.’ तुम्ही ही फुशारकी मारू शकता का?
[२६ पानांवरील चित्र]
वंशाविषयी देवाच्या दृष्टिकोनाची जाणीव, इतर वंशातील लोकांच्या सहवासाचा आस्वाद घेण्यास आपल्याला मदत करते