जगावरील दृष्टिक्षेप
कॉलेराचे पुनरागमन
शंभरहून अधिक वर्षे, काळाच्या उदरात गडप झालेल्या कॉलेराने दक्षिण अमेरिकेत नाट्यमयरित्या पुनरागमन केले. “सन १९९१ पासून, १४ लाख प्रकरणांची तेथे नोंद असून त्यांपैकी १०,००० जणांवर मृत्यू ओढवला आहे,” असे लंडनच्या द टाईम्सचे म्हणणे आहे. याच्या जोडीला १९९२ साली भारत, बांगलादेश आणि शेजारच्या देशांतील कॉलेरा जीवाणूच्या एका नवीन जातीचे आगमन, ही आरोग्य अधिकाऱ्यांसाठी एक चिंतेची बाब होती; आजवर २,००,००० लोकांना याचा संसर्ग झाला आहे. कॉलेरा, अतिसाराचाच एक तीव्र रोग असून योग्य उपचाराअभावी ७० टक्के प्रकरणांत मृत्यू ओढवतो. पण म्हणतात ना, उपचारापेक्षा पूर्वदक्षताच बरी. पिण्याचे पाणी आणि दूध उकळणे, माश्यांना दूर ठेवणे आणि क्लोरिनच्या पाण्यात कच्चे अन्नपदार्थ धुऊन स्वच्छ करणे हे मूलभूत सुरक्षा घटक आहेत.
विश्वशांतीची भाषा
स्टॉकहोल्म आंतरराष्ट्रीय शांती संशोधन संस्थेचे वार्षिक पुस्तक १९९७ यानुसार एके काळी, शीतयुद्धात सिंहाचा वाटा उचलणारी प्रादेशिक युद्धे आता संपुष्टात आल्याची दिसते. शीतयुद्धाच्या शेवटच्या वर्षी, म्हणजे १९८९ साली, ३६ “प्रमुख शस्त्रास्त्र संघर्ष” झाले. १९९६ साली ही संख्या २७ वर आली आणि भारत-पाकिस्तानमधील संघर्ष वगळता बाकीचे सगळे संघर्ष आंतरिक अर्थात देशांतर्गत होते. याशिवाय, मृतांच्या संख्येवर आधारित बांधलेल्या अंदाजावरून, यांपैकी अधिकांश संघर्ष अधिक तीव्र नसलेले किंवा मंदगतीने चालणारे वाटले. दक्षिण आफ्रिकेच्या द स्टार वृत्तपत्राने असे समालोचित केले: “आजपावेतो कुठलाही देश विश्वशांतीच्या इतका निकट नव्हता.” टाईम नियतकालिक म्हणते: “अमेरिकी वर्चस्वाने . . . जगाला अमेरिकी शांती दिली आहे, मानवी इतिहासात क्वचितच ज्ञात असलेले व या शतकालाही अद्याप अज्ञातच असलेले आंतरराष्ट्रीय शांती व प्रशांततेचे युग दिले आहे.”
अवकाशातून एकत्र करणे
सध्या ऑस्ट्रेलियातील काही कुणाराचे मालक गाईगुरांना आणि मेंढ्यांना आपल्या विस्तारित कुरणांमध्ये एकत्र करण्यासाठी, मंद गतीने उडणाऱ्या व अल्ट्रालाईट्स [अतिहलक्या वजनाच्या] म्हटल्या जाणाऱ्या विमानांचा उपयोग करत आहेत, असा अहवाल ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलियाचे सन्डे मेल वृत्तपत्र देते. क्वीन्सलँडमधील एक कुरणाचा मालक म्हणतो, की ज्या ज्या वेळा त्याने आपल्या मेंढ्यांना एकत्र गोळा करून आणले त्या प्रत्येक वेळी त्याच्या अल्ट्रालाईटने कित्येक लोकांच्या खिशात पडणाऱ्या दोन आठवड्यांच्या मजुरीची बचत केली. त्याने असेही म्हटले: “मोटारसायकलने घोड्याची आणि आता अल्ट्रालाईटने मोटारसायकलची जागा घेतली आहे.” या हलक्या वजनाच्या विमानांमध्ये जबरदस्त टेप रेकॉड्र्स बसविलेले असतात आणि कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजांच्या कॅसेट्स ते वाजवतात. हा आवाज कानी पडताच, “घाबरून गेलेली गाईगुरे व मेंढ्या धूम ठोकून सगळ्यात जवळच्या गोठ्यात आश्रय घेतात,” असे सदर लेख म्हणतो.
“यमदूत”
जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) १९९७ वर्षाचा अहवाल म्हणतो, की समृद्ध पाश्चिमात्य देश, न्यूनविकसित देशांसाठी रोगांचा एक “दुहेरी भार” निर्माण करत आहेत. लंडनच्या द डेली टेलिग्राफमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, न्यूनविकसित राष्ट्रांनी पाश्चिमात्य देशांकडून उसनेवारी घेतलेल्या धुम्रपान, कॅलरीयुक्त व चरबीयुक्त आहार आणि कमी शारीरिक कार्यहालचालींच्या जीवनशैलींमुळे हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग यांत कमालीची वाढ होत आहे. आज विश्वभर लोक दीर्घायुषी असले तरी, ‘दर्जेदार जीवनाशिवाय हे दीर्घायुष्याचं बक्षीस पोकळ आहे,’ असे डब्लूएचओचे संचालक डॉ. पॉल क्लाययूस म्हणतात. ते असेही म्हणतात: “आम्ही खरोखरच यमदूत आहोत असे म्हणणाऱ्या लोकांचं म्हणणं निराधार नाही.” आरोग्यदायी जीवनशैलीस प्रोत्साहन देण्यासाठी डब्लूएचओ आता एका जोरदार विश्वव्यापी मोहिमेचे समर्थन करत आहे. नाहीतर, “दुःखाची एक जगव्याप्त आणीबाणीच” निर्माण होईल असे ते म्हणते.
स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान
ब्राझीलियन नियतकालिक मेडिसिना कोनसेलयो फेडराल यानुसार स्तनाचा कर्करोग, ब्राझीलच्या स्त्रियांमध्ये एक सर्वसामान्य महाभयंकर रोग असून प्रत्येक १२ स्त्रियांपैकी एकीला याचा प्रादुर्भाव होतोच. सदर नियतकालिक, २५ हून अधिक वय असलेल्या सर्व स्त्रियांना नियमितपणे स्वतःची स्तन तपासणी स्वतः करण्याचे उत्तेजन देते. मेडिसिना असाही सल्ला देते, की पस्तीस ते चाळीस वयोमानादरम्यान स्त्रियांनी आपला पहिला मेमेग्राम [रेडिओग्राफीद्वारे स्तनातील पेशींच्या विकृती शोधणारे परीक्षण] काढावा तर चाळीस ते पन्नासच्या वयोमानादरम्यान दर दोन वर्षांनी आणि पन्नाशी ओलांडल्यानंतर दर वर्षी मेमेग्राम काढावा. ज्या स्त्रियांच्या आहारात संपृक्त प्रमाणात चरबीचे पदार्थ अंतर्भूत असतात, तसेच ज्यांच्या कुटुबांमध्येही हा रोग असल्याची माहिती असते त्यांना सर्वाधिक प्रमाणात याचा धोका असतो; तथापि असे असतानाही ७० टक्के स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण या सर्वाधिक धोक्याच्या गटात मोडत नाहीत. ही वास्तविकता, “लवकर निदान धोरणाचे महत्त्व स्पष्टतः दर्शवून देते,” अशी मेडिसिनाची नोंद आहे.—पाहा सावध राहा! एप्रिल ८, १९९४ (इंग्रजी).
जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू
गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉड्र्सनुसार झान ल्वीझ कालमान नामक जगातील सर्वात वयोवृद्ध स्त्रीचे ऑगस्ट ४, १९९७ रोजी वयाच्या १२२ व्या वर्षी निधन झाले, असा ला फीगारो फ्रेंच वृत्तपत्राचा अहवाल आहे. फेब्रुवारी २१, १८७५ रोजी—विजेचा बल्ब, फोनोग्राफ आणि मोटारगाडीचा शोध लागण्याआधी दक्षिण फ्रान्समधील आर्ल या ठिकाणी झान यांचा जन्म झाला होता. सन १८९६ मध्ये त्यांचा विवाह झाला. आपल्या एकुलत्या एका मुलीपेक्षा त्यांनी आयुष्याची ६३ वर्षे अधिक पाहिली आणि त्यांना एक नातूही होता ज्याचा १९६३ साली मृत्यू झाला. सन १८८८ मध्ये त्या किशोरवयीन असताना चित्रकार व्हिन्सेंट वॉन गोघ यांच्याशी झालेली भेटही त्यांच्या स्मृतीपटलावर लख्ख होती; १९०४ साली नोबेल पारितोषिक पटकावलेले फ्रेडरीक मिस्ट्राल यांच्या त्या स्नेही होत्या. झान यांनी दीर्घायुष्याच्या रहस्याची अनेक गंमतीशीर निरीक्षणे केली; त्यात त्यांनी हास्य, कार्यशीलता आणि “शहामृगासारखे पोट,” यांचा उल्लेख केला.
द्विभाषिक मुले
एखादे मूल आपली मातृभाषा शिकू लागते तेव्हा त्याची बोलण्याची अधिकतर क्षमता, ब्रोकाचे क्षेत्र म्हटलेल्या मेंदूच्या एका भागात स्थिरावते. द्विभाषिक व्यक्ती एक किंवा दोन भाषा बोलतात तेव्हा त्यांच्या मेंदूचा कुठला भाग क्रियाशील असतो हे निश्चित करण्यासाठी अलीकडेच, न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोअन-केटरींग कॅन्सर सेंटरमधील संशोधकांनी कार्यक्षम चुंबकीय अनुस्पंद प्रतिमाकारकतेचा उपयोग केला. त्यांच्या निदर्शनास आले, की लहान असताना एखादी व्यक्ती एकाच वेळी दोन भाषा शिकते तेव्हा त्या दोन्ही भाषा ब्रोका क्षेत्रातील एकाच भागात संग्रहित होतात. तथापि, पौगंडावस्थेत अथवा त्यानंतरच्या काळात दुसरी एखादी भाषा आत्मसात केली असता पहिल्या भाषेत मिसळून न जाता त्या भाषेलगत ती स्थायिक होत असल्याचे दिसून येते. लंडनचे द टाईम्स वृत्तपत्र स्पष्टीकरण देते: “असे दिसते जणू पहिली भाषा आत्मसात केल्यामुळे ब्रोकाच्या क्षेत्राने मर्यादा पाडल्या आहेत आणि त्यामुळे दुसऱ्या भाषेची सोय इतरत्र करावी लागते.” संशोधकांना वाटते, की मोठे झाल्यानंतर दुसरी एखादी भाषा आत्मसात करणे इतके जड का जाते याचे स्पष्टीकरण देण्यास वरील बाब कदाचित सहायक ठरेल.
चीनी बालसंगोपनाच्या चिंता
चायना टुडेने दिलेल्या अहवालानुसार, समाजशास्त्राच्या चीनी अकादमीच्या विद्यमाने पालक-पाल्य नातेसंबंधाचा एक व्यापक अभ्यास केला गेला होता. आजकालच्या मुलांचे संगोपन करण्यासंबंधी अनेक पालक चिंतित असल्याचे संशोधनावरून प्रकट झाले. चायना टुडेनुसार, “आपल्या मुलांना नेमके कोणते धडे द्यावेत—प्रामाणिकपणा, सभ्यता, धीर आणि समजूतदारपणा यांसारख्या सांप्रदायिक चीनी नैतिकतांचे, की चढाओढीच्या आधुनिक सामाजिक बांधिलकीचे, यांसंबंधी पूर्णतः अनिश्चित असल्याचे काहींना वाटते.” टीव्हीमुळे मुलांच्या मनावर होणाऱ्या नकारात्मक प्रभावांसंबंधी जवळजवळ ६० टक्के पालक चिंतित आहेत. वार्ता संशोधक बू वे यांनी पालकांना असा सल्ला दिला आहे, की मुलांचे वय आणि व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन, मुले पाहत असलेल्या कार्यक्रमांचे नियमन करावे, मुलांसोबत कार्यक्रम पाहावे आणि त्यांच्यासोबत यांची चर्चा करावी; तसेच टीव्हीला मुलांचा वाजवीपेक्षा अधिक वेळ घेऊ देऊ नये.
अजूनही अव्वल स्थानी
ईएनआय बुलेटीनच्या अहवालानुसार दुसऱ्या कोणत्याही ग्रंथापेक्षा बायबलच्या अधिकाधिक प्रती अजूनही छापल्या जात आहेत. बायबलचे सर्वाधिक वितरण होणाऱ्या देशांमध्ये चीन, संयुक्त संस्थाने आणि ब्राझील हे देश आघाडीवर आहेत. युनायटेड बायबल सोसायटीझच्या (युबीएस) अहवालानुसार, १९९६ साली संपूर्ण बायबलच्या १.९४ कोटी प्रती छापल्या गेल्या होत्या. १९९५ सालापेक्षा ९.१ टक्के वाढ दाखविणारा व नोंदला गेलेला हा एक नवीनच विक्रम होता. याव्यतिरिक्त, बायबलच्या काही भागांच्या ५० कोटींहून अधिक प्रतींचे वितरण केले गेले होते. युबीएसमधील प्रकाशन सेवेचे संयोजक जॉन बॉल यांनी म्हटले: “जगाच्या पाठीवरील विशिष्ट भागात चित्तथरारक वितरणवाढ असतानाही, प्रत्येक व्यक्तीला शास्त्रवचने सहजसुलभ करून द्यायची असल्यास अद्याप बरेचसे काम करणे बाकी आहे.”
शार्कचा वाईटातला वाईट शत्रू
मानवांना बहुधा शार्क माश्यांची भीती बसलेली असते. पण असे दिसून येईल, की शार्कनाच मनुष्याची अधिक भीती असते. दर वर्षी शार्कच्या हल्ल्यांमुळे “केवळ काही डझनावारी लोक” दगावतात तर दुसऱ्या बाजूला पाहू जाता कोळ्यांच्या हाती दर वर्षी अंदाजे १०,००,००,००० शार्क मारले जातात, असा फ्रेंच वृत्तपत्र ल मॉन्डचा अहवाल आहे. हा विध्वंस असाच चालू राहिल्यास समुद्रांचे नैसर्गिक संतुलन बिघडण्याची भीती असणाऱ्या सागरी जीवशास्त्रज्ञांना ही वास्तविकता भेडसावत आहे. सागरी जीवसंख्या नियंत्रित ठेवण्यात शार्कचा वाटा अतिमहत्त्वपूर्ण आहे. लैंगिक प्रौढता गाठण्यात शार्क मंद असल्यामुळे, शिवाय गर्भधारणेनंतरच्या दीर्घ समयानंतर त्यांना केवळ मोजकीच पिले होत असल्यामुळे अवाजवी मच्छिमारी, शार्कच्या काही जातींना विलोपनाच्या मार्गावर आणण्याचा धोका आहे. “फिन्नींग”—अन्नासाठी शार्कचे पर छाटून, शेवटी मरून जाण्यासाठी त्यांना पुन्हा समुद्रात टाकून देणे, ही सागरी तज्ज्ञांना विशेष खेदित करणारी एक बाब आहे.
बेकारीचा तणाव
जर्मन वृत्तपत्रक सूटडॉइचे ट्साइटूंन यात उल्लेखिलेल्या अभ्यासांनुसार, बेकारीच्या भावनिक व सामाजिक तणावाचा एखाद्या व्यक्तीच्या स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. अशा तणावामुळे शरीराची प्रतिकार यंत्रणा दुर्बळ होत असल्याचे सांगितले जाते. कामधंदा असलेल्या लोकांच्या तुलनेत, बेरोजगारांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचे झटके येण्याची दाट शक्यता असते. “नोकरीवर असलेल्या लोकांपेक्षा, दीर्घकाळापर्यंत बेकार असणाऱ्यांना सोसावा लागणारा तणाव भयंकर तर असतोच असतो पण त्यासोबत दुष्परिणाम देखील असतात,” असे जर्मनीतील हॅन्नोव्हर विद्यापीठाचे प्राध्यापक टोमास कीझेलबाक म्हणतात. “बहुधा सर्वच बेरोजगार एखाददुसऱ्या औदासिन्यतेच्या व्याधीने ग्रस्त असतात.” युरोपियन संघातील बेरोजगारांची संख्या अदमासे डेन्मार्क, फिनलंड आणि स्वीडनच्या लोकसंख्येइतकी असल्याचे म्हटले जाते.