आमच्या वाचकांचे मनोगत
एवढं आजारपण का? “तरुण लोक विचारतात . . . मलाच एवढं आजारपण का?” (मे ८, १९९७) या लेखासाठी मी तुमची आभारी आहे. मी २१ वर्षांची आहे आणि मला सीकल-सेल ॲनेमिया हा रोग जडला आहे. या लेखातील युवकांच्या भावना मी समजू शकते. माझी ही आरोग्य समस्या असताना, कोणी माझ्या प्रेमात पडेल का आणि माझ्याशी लग्न करेल का, असा एक प्रश्न मला सतत भेडसावत असतो. पण, तुमच्या लेखानं माझी मदत केली कारण आता मला समजलं आहे, की असं वाटणारी केवळ मी एकटीच नाही.
डी. आर., संयुक्त संस्थाने
“तरुण लोक विचारतात . . . मलाच एवढं आजारपण का?” (मे ८, १९९७) या लेखात जेसननं व्यक्त केलेल्या सर्व भावना मी स्वतः देखील अनुभवल्या आहेत. जेव्हा जेव्हा मी तो लेख वाचतो तेव्हा तेव्हा माझ्या स्थितीची समज, जाणीव आणि काळजी करणाऱ्या कुणा एका व्यक्तीशी मी गप्पा मारत असल्यासारखं मला वाटतं. माझा भार हलका केल्याबद्दल मी मनस्वी आभारी आहे. मला ठाऊक आहे, की यहोवा काळजी वाहतो आणि आपल्या नियुक्त समयी तो सर्व रोग नाहीसे करील.
ओ. ए., घाना
हा लेख हाती पडला त्याच्या दोन आठवड्यांपूर्वी मला झटके येत असल्याचे रोगनिदानावरून स्पष्ट झाले. नुकतंच मी १८ व्या वर्षात पदार्पण केलं आहे, पण नव्यानेच प्राप्त झालेल्या माझ्या स्वातंत्र्याला या आजारापायी मर्यादा पडल्या. किती दक्षता बाळगावी लागते आणि कितीतरी औषधं आठवणीनं घ्यावी लागतात. माझ्या दोन भावंडांच्या मृत्यूमुळे आधीच दुःखी झालेले माझे आईबाबा, माझ्या आजारामुळे तर आणखीनच असुरी दुःखाच्या डोहात बुडाले. त्या लेखानं मला इतके हेलावून सोडले, की मला अश्रू आवरेनासे झाले. मी आजपर्यंत जे विचार दडपून ठेवत होते नेमके तेच विचार त्यात अभिव्यक्त केले गेले होते आणि त्यामुळे मला पुन्हा एकदा काहीसं हलकं वाटतं. मला समजलं आहे, की अशा समस्या आणि चिंता अनुभवणारी मी काही एकटीच नाही. आध्यात्मिकरित्या सदृढ राहण्यासाठी मला हवी असलेली माहिती यहोवानं आपल्या संघटनेद्वारे शब्दांकित केली आहे.
डी. एस., संयुक्त संस्थाने
मी तो लेख वाचला तेव्हा माझ्या लक्षात आलं, की माझ्या या आजारामुळे सर्वात जास्त माझ्या आईबाबांना याचं दुःख होत आहे. माझा आजार आनुवंशिक असल्याचं ते मला सांगतात आणि यामुळे ते व्यथित होतात. त्यांना व्यथित झाल्याचं मला पाहवत नाही.
वाय. एच., जपान
मी लहान असताना माझी तब्येत तशी बरीच चांगली होती. पण, वयात आल्यानंतर मात्र मला एका पाठोपाठ एक आजार होऊ लागले. मी पूर्ण-वेळेची सेवा तर हाती घेतली, पण माझ्या या तब्येतीपायी पहिले दोन महिने मला माझे ध्येय गाठता आले नाही. मी फारच निराश झालो; मी यहोवाविरुद्ध काही तरी वाईट कृत्य केल्यामुळेच मला हा आजार भोगावा लागत आहे असा (चुकीचा) विचारही माझ्या मनात डोकावू लागला. सदर लेखानं मला माझ्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास तसंच धैर्य राखण्यास माझी मदत केली आहे.
सी. के., घाना
माझ्या नऊ वर्षांच्या मुलीला अध्ययन असमर्थता आणि मस्तिष्काघात आहे. ती अतिशय हुशार आहे आणि तिच्या असमर्थतांमुळे ती सर्वसामान्यपणे हालचाल करू शकत नाही याची देखील तिला जाणीव आहे. ती स्वभावाने अतिशय मनमिळावू असली तरी वेळोवेळी ती काहीशी निराश होऊन जाते. या लेखामुळे आणि जेथे ती देखील इतर मुलांसारखीच नाचूबागडू शकेल त्या भवितव्यातील परादीसबद्दल दररोज रात्री तिच्या बाबांशी होणाऱ्या चर्चांमुळे तिला फार प्रोत्साहन मिळालं आहे.
वाय. पी., संयुक्त संस्थाने
जवळजवळ दहा वर्षांपासून मी एका ‘अदृश्य आजाराविरुद्ध,’ अर्थात माझ्या पचन संस्थेवर परिणाम करणाऱ्या आजाराविरुद्ध संघर्ष करत आहे. त्यामुळे मला पूर्ण-वेळेची सेवा देखील सोडावी लागली. हा लेख वाचल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं, की आपला हा संघर्ष समजू शकणारं कुणी तरी जगात आहे. यात मी एकटीच नाही हे जाणून दिलासा मिळतो. जणू माझ्यावरील एक मोठा भारच काढून टाकल्यासारखं वाटतं. यासाठी तुमचे जितके आभार मानावे तितके कमीच. असे उत्तेजनात्मक व समयोचित लेख, या जुन्या व्यवस्थीकरणात तग धरून राहण्यात आमची मदत करतात.
एल. सी., कॅनडा