स्वतंत्र होऊ देण्याचं दुःख
“आम्हाला पहिलं मूल झालं तेव्हाच माझ्या पतीनं मला इशारा दिला होता—‘अगं, मुलांना मोठं करणं म्हणजे त्यांना स्वतंत्र होऊ देण्याची ही एक प्रदीर्घ क्रिया असते.’—आम्ही आणि आमची मुले (इंग्रजी)—पालकांनी व पालकांसाठी लिहिलेले पुस्तक.
पहिलं मूल जन्मतं, तेव्हा पुष्कळ पालकांना आनंद होतो—इतकंच काय तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पालक झाल्यावर गैरसोयी, वादविवाद, त्रास, निराशा आणि चिंता वाढल्या, तरी मुलांमुळे खूप आनंद मिळू शकतो. सुमारे तीन हजार वर्षांआधी, बायबलने म्हटले: “मुले ही प्रभूची देणगी बघा! पोटची मुले हा त्याचा आशीर्वाद.”—स्तोत्र १२७:३, मराठी कॉमन लँग्वेज.
तथापि, बायबल एक गंभीर भाकीत देखील करतं: “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील.” (उत्पत्ति २:२४) अनेक कारणांमुळे, मोठी मुलं बहुधा घर सोडतात—पुढचं शिक्षण घेण्यासाठी, आपल्या करियरसाठी, ख्रिस्ती सेवा वाढवण्यासाठी, लग्न करण्यासाठी, वगैरे. परंतु काही पालकांना हे सत्य स्वीकारणं अतिशय जड जातं. मुलं स्वतंत्र होण्याचा स्वाभाविक प्रयत्न करू लागले की—एका लेखिकेच्या मते—“आपला अपमान झाला आहे, आपल्याला क्रोधित केले आहे, लाजवले आहे, धमकावले आहे किंवा नाकारले आहे” अशाप्रकारचे विचार पालक डोक्यातून काढून टाकत नाहीत. यामुळे सहसा कुटुंबामध्ये सतत भांडणतंटे होतात आणि तणाव वाढतो. आपली मुलं घरटं सोडून जातील तो दिवस पाहण्याची इच्छा नसल्यामुळं काही पालक त्यांची प्रौढावस्थेसाठी तयारी करत नाहीत. असं दुर्लक्ष करण्याचा परिणाम फार वाईट असू शकतो: घर, कुटुंब किंवा नोकरी देखील सांभाळायला तयार नसलेले प्रौढ.
एकटे-पालक कुटुंबांमध्ये तर विलग होण्याचं दुःख जास्तच असेल. कॅरेन नावाची एक एकटी-पालक म्हणते: “माझ्या मुलीसोबत माझी खूप जवळीक आहे. आम्ही अगदी जवळच्या मैत्रिणी झालो आहोत. मी जायचे तिकडे सगळीकडे तिला घेऊनच जायचे.” सहसा एकटे-पालक कुटुंबांमध्ये, पालक आणि मुलांच्यात जवळचे नातेसंबंध असतात. म्हणूनच, अशी जवळीक आता राहणार नाही हा विचार सुद्धा असह्य वाटतो हे समजण्याजोगे आहे.
परंतु, निरोगी कुटुंबाची लक्षणे (इंग्रजी) या पुस्तकात पालकांना ही आठवण करून दिली आहे: “कौटुंबिक जीवनाचा अर्थच हा की: परावलंबी बाळाला प्रौढ बनवणं ज्याचं आपलं स्वतःचं जीवन असतं.” मग हे पुस्तक असा इशारा देतं: “पुष्कळ कुटुंबांमध्ये आपल्या मुलांना स्वतंत्र होऊ देण्यामध्ये पालक असमर्थ ठरतात म्हणूनच अनेक समस्या निर्माण होतात.”
तुमच्याबद्दल काय? तुम्ही देखील एक पालक आहात का? असल्यास, एके दिवशी तुमच्या मुलांना स्वतंत्र होऊ देण्याची वेळ येईल त्यासाठी तुम्ही तयार आहात का? आणि तुमच्या मुलांविषयी काय? तुम्ही त्यांना आपल्या पायावर उभं राहण्यास तयार करत आहात का?