वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 २/८ पृ. ४-८
  • स्वतंत्र होऊ देण्यास शिकणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वतंत्र होऊ देण्यास शिकणे
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मुलांना जबाबदार होण्यास शिकवणे
  • प्रेमळ सुधारणूक
  • जीवनोपयोगी शिक्षण
  • तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंबाची उभारणी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 २/८ पृ. ४-८

स्वतंत्र होऊ देण्यास शिकणे

“तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातांतील बाणांप्रमाणे आहेत,” असे बायबलच्या स्तोत्रकर्त्याने लिहिले. (स्तोत्र १२७:४) एखादा बाण योगायोगाने नेमावर लागत नाही. त्यासाठी अचूक नेम धरावा लागतो. त्याचप्रमाणे, मुलंही पालकांच्या मार्गदर्शनाविना जबाबदार प्रौढ बनण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोचू शकणार नाहीत. बायबल प्रोत्साहन देतं: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”—नीतिसूत्रे २२:६.

बालपणातली परावलंबी वृत्ती एका रात्रीत जाऊन प्रौढपणी स्वतंत्र होण्याची वृत्ती काही लगेच येत नाही. तर मग, आपल्या मुलांना स्वतःच्या पायांवर उभं राहण्याचं शिक्षण पालकांनी केव्हापासून द्यावं बरं? प्रेषित पौलाने तीमथ्य नावाच्या एका तरुणास अशी आठवण करून दिली: “बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे . . . ते खिस्त येशूमधील विश्‍वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे.” (२ तीमथ्य ३:१५) कल्पना करा, तीमथ्याची आई तो बाळ असतानाच त्याला आध्यात्मिक शिक्षण देऊ लागली!

जर, लहान बाळांना आध्यात्मिक शिक्षणाचा लाभ होऊ शकतो, तर मग मुलांना प्रौढत्वाचं प्रशिक्षण होता होईल तितक्या लवकर देणं योग्य नव्हे का? असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, त्यांना जबाबदार असायला, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवा.

मुलांना जबाबदार होण्यास शिकवणे

तुम्ही तुमच्या मुलांना जबाबदार होण्यास कसे उत्तेजन देऊ शकता? जॅक आणि नॉरा या विवाहित जोडप्याला आपल्या मुलीविषयी एक गोष्ट आठवली: “ती नुकतीच चालायला लागली होती तेव्हाच मोजे किंवा लहानसहान वस्तू उचलून आपल्या खोलीत न्यायला आणि त्या बरोबर ड्रॉवरमध्ये ठेवायला शिकली होती. खेळणी आणि पुस्तकं सुद्धा जिथल्या तिथं ठेवायला ती शिकली होती.” अशातऱ्‍हेने, लहान गोष्टींपासूनच सुरवात झाली होती पण मूल मात्र जबाबदार निर्णय घ्यायला शिकले होते.

एखादं मूल मोठं होत जातं तसं, त्याला किंवा तिला आणखी भारी जबाबदाऱ्‍या देता येऊ शकतात. ऑब्रा आणि अनीटाने आपल्या मुलीला कुत्रा पाळायला अनुमती दिली. कुत्र्याची काळजी घेण्याची जबाबदारी तिची होती आणि त्याला लागणाऱ्‍या वस्तूंसाठी ती स्वतःच्या वरखर्चामधून पैसे देखील द्यायची. मुलांना आपल्या जबाबदाऱ्‍या सांभाळण्याची तालीम द्यायला सहनशीलता लागते. पण ती सार्थ ठरते आणि त्यांच्या भावनिक वाढीस योगदान मिळतं.

घरकामांमुळेही मुलांना जबाबदारीविषयी शिकवण्याची आणखीन एक संधी मिळते. काही पालक आपल्या मुलांना घरातली काही कामं देतच नाहीत; त्यांच्या मते मुलं मध्ये पडलीत तर त्यांची मदत होण्याऐवजी त्यांचा तापच जास्त असतो. दुसऱ्‍यांना असं वाटतं की ‘आपल्यापेक्षा आपल्या मुलांचं बालपण चांगलं असावं.’ ही चुकीची कारणमीमांसा आहे. शास्त्रवचने म्हणतात: “बाळपणापासून एखाद्या गुलामाला लाडात वाढविले, तर तो शेवटी कृतघ्न ठरेल.” (नीतिसूत्रे २९:२१, मराठी कॉमन लँग्वेज) या वचनातले तत्त्व निश्‍चितच मुलांना लागू होते. एखादा तरुण केवळ “कृतघ्न” ठरणार नाही तर सोप्यातलं सोपं देखील घरकाम करता न येता जर त्याने प्रौढपणात पदार्पण केलं तर त्यासारखी दुःखाची गोष्ट कोणतीही नाही.

बायबल काळातल्या युवकांना सहसा घरकाम नेमून दिलं जायचं. उदाहरणासाठी, १७ वर्षांच्या कोवळ्या वयातही, घरच्या गुराढोरांची राखण करण्याची जबाबदारी लहानग्या योसेफाची होती. (उत्पत्ति ३७:२) हे काम काही तोंडचं काम नव्हतं कारण त्याच्या वडिलांची खूप गुरंढोरं होती. (उत्पत्ति ३२:१३-१५) योसेफ मोठा झाल्यावर एक शक्‍तिशाली नेता बनला याचा विचार केला, तर या प्रारंभिक शिक्षणामुळेच योसेफाला सकारात्मक पद्धतीनं आपले व्यक्‍तिमत्त्व बदलता आलं याचं नवल वाटत नाही. इस्राएलचा भावी राजा, दावीद याला देखील लहान असताना आपल्या घरच्या गुराढोरांची राखण करण्याचं काम सोपवलं होतं.—१ शमुवेल १६:११.

आज पालकांसाठी काय धडा आहे? आपल्या मुलांना अर्थपूर्ण घरकाम नेमून द्या. वेळ देऊन, प्रयत्न करून आणि सहनशीलता दाखवून तुम्ही आपल्या लहानग्यांना स्वच्छता, स्वयंपाक, अंगण नीटनेटके ठेवणं आणि घरातली किंवा वाहनाची दुरुस्ती यांसारखी कामं करायला शिकवू शकता. मुलाच्या वयोमानावर आणि क्षमतेवर पुष्कळ काही अवलंबून असतं हे खरं. पण अगदी लहान मुलं देखील ‘पप्पांना गाडी दुरुस्त करण्यासाठी मदत’ किंवा ‘आईला स्वयंपाकात मदत’ करू शकतात.

घरकाम शिकवण्यासाठी पालकांना आपल्या मुलांना एक बहुमोल देणगी—त्यांचा वेळ—देखील द्यावा लागतो. दोन मुलं असलेल्या एका विवाहित जोडप्याला मुलांच्या यशस्वी प्रशिक्षणाचं रहस्य काय असे विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं: “वेळ, वेळ, वेळ!”

प्रेमळ सुधारणूक

मुलं जेव्हा आपलं काम चांगल्यारितीनं पार पाडतात किंवा निदान ते चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न करतात तेव्हा त्यांची भरभरून आणि प्रामाणिकपणे प्रशंसा करून त्यांना प्रोत्साहन द्या! (पडताळा मत्तय २५:२१.) बहुधा, मुलं प्रौढांसारख्या कुशलतेनं काम करत नाहीत. आणि मुलांना जेव्हा निर्णय घ्यायला वाव दिला जातो, तेव्हा त्यांच्याकडून बहुतेकवेळा चुका ह्‍या घडणारच. पण, म्हणून राईचा पर्वत करण्याची चूक करू नका! तुम्ही प्रौढ असूनही चुका केल्या नाहीत का? तर मग, तुमच्या मुलाकडून एखादी चूक होते तेव्हा त्याबरोबर सहनशीलतेनं वागणं बरं नव्हे का? (पडताळा स्तोत्र १०३:१३.) चुका होऊ द्या. त्या शिकण्याचा भाग आहेत असं समजा.

मायकल शूलमन आणि इवा मेकलर हे लेखक असे निरीक्षण करतात: “ज्या मुलांना मैत्रिपूर्ण पद्धतीने वागवले जाते त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेतल्यामुळे आपल्याला शिक्षा होईल ही भीती नसते.” तथापि, “भावनाशून्य किंवा कडक पालकांची मुले बहुधा एकाएकी असे काहीही करायला, मग ते मदतदायी असले तरीही, घाबरतात कारण आपल्या पालकांना यात काहीतरी चूक दिसेलच आणि ते त्यांची टीका करतील किंवा त्यांना शिक्षा देतील अशी त्यांना भीती वाटते.” हे विवेचन बायबलमध्ये पालकांसाठी असलेल्या इशाऱ्‍याच्या एकमतात आहे: “तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्‍न होतील.” (कलस्सैकर ३:२१) म्हणून आपल्या मुलाचे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे नसले, तर निदान प्रयत्न केल्याबद्दल तरी त्याची स्तुती का करू नये? पुढच्या वेळी त्याला आणखी चांगलं करण्यासाठी उत्तेजन द्या. त्यानं प्रगती केल्यावर तुम्हाला आनंद होतो हे त्याला कळू द्या. तुमच्या प्रेमाची त्याला खात्री पटवून द्या.

अर्थात, काहीवेळा सुधारणूक करावी लागते. पौगंडावस्थेच्या वर्षांमध्ये तरुण लोक जेव्हा स्वतःच्या अस्मितेसाठी अथवा वेगळेपण स्थापन करण्याची धडपड करत असतात, तेव्हा हे विशेषतः दिसून येईल. म्हणून स्वतंत्र होण्याच्या अशा प्रयत्नांना नेहमीच बंडखोरी म्हणण्याऐवजी पालकांनी त्यांच्याबद्दल समंजसपणाने विचार केल्यास बुद्धिमत्तेचे ठरते.

लहान मुलं सहसा आवेशात येऊन पटकन काहीतरी करतात किंवा ‘तरुणपणाच्या वासनांना’ वश होतात हे खरे आहे. (२ तीमथ्य २:२२) म्हणून, तरुणपणच्या वर्तणुकीवर जर मर्यादा घातल्या नाहीत तर एखाद्या मुलाला भावनिकरित्या हानी पोचू शकते; ते आत्मसंयम आणि आत्मशिस्त शिकणार नाही. बायबल ताकीद देतं: “मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते.” (नीतिसूत्रे २९:१५) पण, योग्य शिस्त प्रेमळपणाने दिल्यास ती फायदेकारक ठरते आणि प्रौढावस्थेतल्या जबाबदाऱ्‍या तसेच दबावांकरता ती युवकाला तयार करते. बायबल प्रोत्साहन देतं: “जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करितो तो त्याजवर प्रीति करणारा होय.” (नीतिसूत्रे १३:२४) परंतु, लक्षात ठेवा, शिस्त देण्याचा खरा अर्थ शिकवणं आणि तालीम देणं होय—शिक्षा देणं नव्हे. येथे उल्लेखिलेली “छडी” मेंढपाळ आपल्या कळपांना मार्गदर्शित करण्यासाठी वापरत असलेल्या काठीला बहुतेककरून सूचित करते. (स्तोत्र २३:४) हे कठोर क्रूरतेचं नव्हे तर प्रेमळ मार्गदर्शनाचं प्रतीक आहे.

जीवनोपयोगी शिक्षण

मुलाच्या शिक्षणाचा प्रश्‍न येतो, तेव्हा पालकांच्या मार्गदर्शनाची विशेषतः गरज असते. तुमच्या मुलाच्या शिक्षणामध्ये रस घ्या. शाळेत उचित विषय निवडायला आणि अतिरिक्‍त शिक्षणाची गरज भासेल का यासाठी जबाबदार निर्णय घ्यायला त्याला मदत करा.a

अर्थात, सर्वात महत्त्वाचे शिक्षण हे आध्यात्मिक शिक्षण आहे. (यशया ५४:१३) प्रौढ जगात वावरण्यासाठी मुलांना ईश्‍वरी मूल्यांची गरज भासेल. त्यांच्या “ज्ञानेंद्रियांना” प्रशिक्षण देण्याची गरज आहे. (इब्री लोकांस ५:१४) या बाबतीत त्यांची मदत करण्यासाठी पालक पुष्कळ काही करू शकतात. यहोवाच्या साक्षीदारांमधल्या कुटुंबांना आपल्या मुलांसोबत बायबलचा नियमित अभ्यास करण्याचं उत्तेजन दिलं जातं. तीमथ्याच्या आईचं उदाहरण अनुसरून, जिनं त्याला बाळपणापासून शास्त्रवचनांविषयी शिक्षण दिलं, साक्षीदार पालक देखील आपल्या लहान मुलांना शिकवतात.

बार्बरा नावाची एक एकटी-पालक आपल्या मुलांकरता बायबलचा कौटुंबिक अभ्यास अधिक मनोरंजक बनवते. “त्या संध्याकाळी मी त्यांच्यासाठी छानपैकी जेवण बनवते आणि त्यांच्या आवडीचं काहीतरी गोडधोडही बनवते. तो मूड निर्माण करण्यासाठी मी किंग्डम मेलडीजची टेप लावते. मग, प्रार्थना केल्यावर आम्ही सहसा टेहळणी बुरूज नियतकालिकाचा अभ्यास करतो. पण जर एखादी खास गरज असेल, तर मग मी तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे (इंग्रजी) अशा प्रकाशनांचा उपयोग करते.b बार्बराच्या मते, बायबलचा अभ्यास केल्याने तिच्या मुलांना “एखाद्या विषयाबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय” तो समजण्यास मदत होते.

होय, एखाद्या मुलाला देवाचं वचन अर्थात बायबलविषयी ज्ञान आणि समज देण्यापेक्षा दुसरं कोणतंही मोठं बक्षीस नाही. ते “भोळ्यांस चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण” देतं. (नीतिसूत्रे १:४) अशातऱ्‍हेने सुसज्ज होऊन एखादी तरुण व्यक्‍ती नवीन दबावांना आणि परिस्थितींना तोंड देण्याच्या समर्थतेसह प्रौढावस्थेत पदार्पण करते.

असं असलं, तरीही मुलं घर सोडतात तेव्हा बहुतेक पालकांच्या जीवनशैलीत फार मोठा बदल होतो. आपल्या रिकाम्या घरट्यातील परिस्थितीला ते यशस्वीरित्या कसं तोंड देऊ शकतात याची चर्चा आमच्या पुढील लेखात केलेली आहे.

[तळटीपा]

a “पालकांनो—तुम्हालाही गृहपाठ आहे तर!” ही सप्टेंबर ८, १९८८ च्या सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकातली लेखमाला पाहा.

b वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“भावनाशून्य किंवा कडक पालकांची मुले बहुधा एकाएकी असे काहीही करायला, मग ते मदतदायी असले तरीही, घाबरतात कारण आपल्या पालकांना यात काहीतरी चूक दिसेलच आणि ते त्यांची टीका करतील किंवा त्यांना शिक्षा देतील अशी त्यांना भीती वाटते.”—नीतिमूल्ये असणाऱ्‍या मुलाचे पालनपोषण करणे, मायकल शूलमन आणि इवा मेकलर यांच्याद्वारे लिखित

[६ पानांवरील चौकट]

एकटे-पालक—स्वतंत्र होऊ देण्याचं आव्हान

रिबेका नावाची एक एकटी-पालक म्हणते: “एकट्या पालकांना आपल्या मुलांना स्वतंत्र होऊ देणं फार कठीण असतं. आम्ही स्वतःवर ताबा ठेवला नाही तर त्यांचं अतिसंरक्षण करू लागतो आणि त्यांची वाढ खुंटवतो.” कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्यc या पुस्तकात, पृष्ठे १०७-८ वर पुढील मदतदायी निरीक्षणे दिलेली आहेत:

“एकट्या-पालकांनी आपल्या मुलांच्या अधिक जवळ असणं स्वाभाविक असलं तरी पालक आणि मुलांमधील देवाने नेमलेल्या मर्यादांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, एक पालकीय कुटुंबात मातेनं आपल्या मुलाकडून घरातील कर्त्याधर्त्या पुरुषाची जबाबदारी स्वीकारण्याची अपेक्षा केल्यास किंवा आपल्या मुलीला आपल्या गुप्त गोष्टी सांगून स्वतःच्या खाजगी समस्यांचं ओझं तिच्यावर लादल्यास गंभीर समस्या उद्‌भवू शकतात. असं करणं अनुचित, तणावपूर्ण आणि कदाचित मुलाला गोंधळून टाकणारं आहे. “मुले, ते नव्हे तर तुम्ही पालक आहात, तुम्ही त्यांची काळजी घ्याल याची त्यांना शाश्‍वती द्या. (पडताळा २ करिंथकर १२:१४.) काही वेळा तुम्हाला सल्ला किंवा साह्‍याची आवश्‍यकता भासेल. तो सल्ला किंवा ते साह्‍य तुमच्या अल्पवयीनांकडून नव्हे, तर ख्रिस्ती वडिलांकडून अथवा कदाचित प्रौढ ख्रिस्ती स्त्रियांकडून मिळवा.—तीत २:३.” एकटे-पालक जेव्हा योग्य मर्यादा पाळतात आणि आपल्या मुलांसोबत हितकर नातेसंबंध ठेवतात तेव्हा त्यांना स्वतंत्र होऊ देणं सहसा सोपं जातं.

[तळटीपा]

c वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित

[पानांवरील चित्र]

व्यावहारिक प्रशिक्षण मुलांना अधिक जबाबदार प्रौढ बनण्यास मदत करू शकतं

[पानांवरील चित्र]

बायबलचा कौटुंबिक अभ्यास केल्याने मुलांना प्रौढावस्थेला तोंड देण्यास बुद्धी प्राप्त होऊ शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा