रिकाम्या घरट्यात आनंदाने राहणे
“आमच्यातील पुष्कळांना, आम्ही मनाची कितीही तयारी केली असली, तरी शेवटी विलग होण्याचा धक्का बसायचा तो बसतोच,” असं एका पालकानं कबूल केलं. होय, आपल्या मुलानं घर सोडून जाणं अनिवार्य असलं, तरी जेव्हा तो क्षण येतो तेव्हा मात्र ते कठीण जातं. आपल्या मुलाला निरोप दिल्यानंतर आपल्याला काय वाटलं त्याविषयी एक पिता म्हणतात: “माझ्या जीवनात पहिल्यांदा . . . , मी रडलो, खूप रडलो.”
मुलं घर सोडून गेल्यावर अनेक पालकांच्या जीवनात एक प्रकारचं रिकामंपण येतं—एक हळवी जखम होते. आपल्या मुलांसोबत दररोज सहवास नसल्यानं काहींना खूप एकाकीपणा, दुःख आणि काहीतरी गमावलंय असं वाटतं. आणि फक्त पालकांनाच जड जातं असं नाही. एडवर्ड आणि ॲव्रल नामक जोडपं आपल्याला आठवण करून देतं: “घरी इतर मुलं असली, तर त्यांना सुद्धा हे दुःख जाणवतं.” या जोडप्याचा काय सल्ला आहे? “त्यांना तुमचा वेळ द्या आणि त्यांना समजून घ्या. यामुळे बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला त्यांना मदत मिळेल.”
होय, जीवन हे असंच चालत राहतं. तुमच्या बाकीच्या मुलांची—शिवाय तुमची नोकरी, घरातली कामं यांची—तुम्हाला काळजी घ्यायची असेल, तर असं दुःख उरात बाळगून चालणार नाही. म्हणून, तुमची मुलं घर सोडून गेल्यावर आनंद मिळवण्याच्या काही मार्गांचा आपण विचार करू या.
सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्या
अर्थात, तुम्हाला दुःखी किंवा एकटं-एकटं वाटत असलं आणि म्हणून कोणा सहानुभूती दाखवणाऱ्या स्नेह्यासमोर तुम्हाला मनसोक्त रडावंसं किंवा मन मोकळं करावंसं वाटत असेल, तर तसं जरूर करा. बायबल म्हणतं: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करितो.” (नीतिसूत्रे १२:२५) काहीवेळा इतरांकडून अगदी नवीन दृष्टिकोनातून पाहायला मिळू शकतं. उदाहरणासाठी, वाल्डमार आणि मारियान नामक जोडपं असा सल्ला देतं: “या घटनेमुळं तुमचं काही गमावलं आहे असं न समजता यशस्वीपणे आपलं ध्येय साध्य झालं आहे असं समजा.” केवढा हा सकारात्मक दृष्टिकोन! “आमच्या मुलांना आम्ही जबाबदार प्रौढ बनवू शकलो याचा आम्हाला आनंद वाटतो,” असं रुडॉल्फ आणि हिल्डे हे जोडपं म्हणतं.
तुम्ही परिश्रमाने आपल्या मुलांना “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्याचा प्रयत्न केला आहे का? (इफिसकर ६:४) तुम्ही जरी परिश्रम केला असला, तरी त्याच्या किंवा तिच्या घर सोडल्यामुळं तुम्हाला चिंता वाटत असेल. परंतु, आपल्या मुलाला असं शिक्षण देणाऱ्यांना बायबलची ही शाश्वती आहे की “वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” (नीतिसूत्रे २२:६) तुम्ही दिलेल्या शिक्षणानुरूप तुमचं मूल वागत आहे हे पाहून तुम्हाला खूप समाधान वाटत नाही का? प्रेषित योहानाने आपल्या आध्यात्मिक कुटुंबाविषयी म्हटलं: “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेहि होत नाही.” (३ योहान ४) कदाचित तुम्हालाही तुमच्या मुलांबद्दल असंच वाटत असावं.
सर्वच मुलं ख्रिस्ती शिक्षणानुसार वागतात असं नाही. तुमच्या मोठ्या झालेल्या मुलांच्या बाबतीत असंच घडलं, तर पालक म्हणून तुम्ही अपयशी ठरलात असा त्याचा अर्थ होत नाही. त्याला ईश्वरी मार्गानं वाढवण्याचा तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला असल्यास उगाच स्वतःला दोष देऊ नका. हे जाणून घ्या की, तुमचं मूल आता प्रौढ असल्यानं देवासमोर स्वतःचा भार वाहण्यास ते जबाबदार आहे. (गलतीकर ६:५) कदाचित कालांतराने ते आपल्या निवडींवर पुनर्विचार करील आणि सरतेशेवटी “बाण” नेमावर लागेल अशी आशा करा.—स्तोत्र १२७:४.
अद्यापही पालकच!
तुमचं मूल घर सोडून गेल्यानं मोठा बदल झाला असला, तरी पालक म्हणून तुमची जबाबदारी येथेच संपली असं नाही. मानसतज्ज्ञ हॉवर्ड हॅल्पर्न म्हणतात: “तुम्ही मरेपर्यंत पालक असता पण फक्त देणे आणि काळजी घेणे यात थोडाफार बदल करावा लागतो.”
मूल मोठं झाल्यामुळं पालकांची जबाबदारी संपत नाही हे बायबलने पुष्कळ आधीच मान्य केलं. नीतिसूत्रे २३:२२ म्हणते: “तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको.” होय, पालक “वृद्ध” झाले असले आणि त्यांची मुलं प्रौढ झाली असली, तरी सुद्धा पालक आपल्या मुलांच्या जीवनावर एक महत्त्वपूर्ण प्रभाव पाडू शकतात. अर्थात, काही फेरबदल तर करावेच लागतात. पण, सगळ्या नातेसंबंधांना आनंददायक आणि समाधानकारक ठेवण्याकरता वेळोवेळी त्यांच्यात बदल करावेच लागतात. तर आता तुमची मुलं मोठी झाली असल्यानं, त्यांच्यासोबत प्रौढासारखं वागा. मनोरंजक गोष्ट अशी, की अभ्यासांवरून असं दिसून येतं की, मुलं एकदा घर सोडून गेली तर मग पालक आणि मुलांमधले नातेसंबंध सहसा सुधारतात! बाहेरील जगाच्या दबावांचा मुलांना सामना करावा लागतो तेव्हा, आपल्या पालकांबद्दल त्यांचा दृष्टिकोन बहुधा बदलतो. हॉर्टमट नामक एक जर्मन गृहस्थ म्हणतो: “आता मी माझ्या पालकांना चांगलं ओळखू लागलोय आणि ते एखादी गोष्ट अमुक पद्धतीनंच का करायचे ते मला आता कळतंय.”
लुडबुड करू नका
तथापि, आपल्या प्रौढ मुलाच्या व्यक्तिगत जीवनात लुडबुड केल्यास बरंच नुकसान होऊ शकतं. (पडताळा १ तीमथ्य ५:१३.) आपल्या सासू-सासऱ्यांसोबत जिचं बिलकुल पटत नाही अशी एक विवाहित स्त्री खेदानं म्हणते: “आमचं त्यांच्यावर प्रेम आहे, पण आम्हाला आमच्या पद्धतीनं आमचं जीवन जगायचंय आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचेत.” अर्थात, आपलं प्रौढ मूल स्वतःवर काहीतरी अनर्थ ओढवून घेत असताना कोणीही प्रेमळ पालक मूग गिळून गप्प बसणार नाहीत. पण बहुतेक वेळा, पालकांचा सल्ला कितीही सुज्ञ किंवा हिताचा असला, तरीही तो मागितलेला नसल्यानं तो न देणंच उत्तम. विशेषतः, मुलाचा विवाह होतो तेव्हा ही गोष्ट अधिक लागू होते.
सावध राहाने! हा सल्ला १९८३ मध्येच दिला: “तुमच्या बदललेल्या भूमिकेचा स्वीकार करा. बाळ चालायला सुरवात करतं तेव्हा तुम्ही त्याला अंगावर पाजायचं सोडून देता. तसेच, आता सांभाळकर्त्याची प्रिय असलेली भूमिका सोडून तुम्ही आता सल्लागाराची भूमिका घेतली पाहिजे. जीवनाच्या या टप्प्यात तुमच्या मुलासाठी निर्णय घेणे म्हणजे त्याच्या पाठीवर चोळून ढेकर द्यायला लावण्यासारखं किंवा अंगावर पाजण्यासारखं अनुचित असेल. सल्लागार या नात्याने तुमच्या काही निश्चित मर्यादा आहेत. आता तुम्ही पालक म्हणून आपला अधिकार इतक्या प्रभावीपणे गाजवू शकत नाही. (‘मी कर म्हणते/म्हणतो ना, तर कर.’) तुमच्या मुलाच्या प्रौढत्वाचा आदर करायला हवा.”a
तुमच्या मुलाचे किंवा त्याच्या अथवा तिच्या सोबत्याचे सर्वच निर्णय तुम्हाला मान्य नसतील. परंतु, विवाहाच्या पावित्र्याविषयी आदर असल्यामुळे तुम्ही उगाच चिंता करत बसणार नाही आणि अनावश्यकपणे त्यांच्यामध्ये पडणार नाही. सत्य हे आहे की, सहसा तरुण जोडप्यांनाच त्यांच्या स्वतःच्या समस्या सोडवायला देणं सर्वात उत्तम. नाहीतर, जावयाला किंवा सुनेला नको असलेला सल्ला देताना उगाच बाचाबाची होण्याची भीती असते कारण विवाहाच्या अशा नाजूक क्षणी त्याच्या किंवा तिच्या जिव्हारी लागेल. वर उल्लेखिलेल्या सावध राहा! मधील लेखाने पुढे असा सल्ला दिला: “सल्ल्यावर सल्ले, तेही नको असलेले सल्ले देण्याच्या इच्छेला दाबून टाका नाहीतर जावई किंवा सूनेसोबत वैमनस्य वाढू शकते.” पाठिंबा देणारे असा—कह्यात ठेवणारे असू नका. चांगला नातेसंबंध राखल्यानं, तुमच्या मुलाला खरोखर सल्ला हवा असतो तेव्हा त्याला तुमच्याकडं येणं सोपं वाटेल.
वैवाहिक बंधनात नवे रंग भरा
अनेक जोडप्यांच्या बाबतीत, घरटं रिकामं झाल्यामुळं वैवाहिक आनंद अधिक वाढण्याची शक्यता असेल. पालकत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये इतका वेळ आणि प्रयत्न द्यावा लागला असेल, की जोडप्यांच्या आपापसातल्या नातेसंबंधाकडं दुर्लक्ष होतं. एक पत्नी म्हणते: “आता मुलं घर सोडून गेल्यामुळं कोनराड आणि मी नव्याने एकमेकांना जाणून घेऊ लागलो आहोत.”
पालकत्वाच्या दररोजच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त झाल्याने, आता तुमच्याजवळ एकमेकांसाठी जास्त वेळ असेल. एका पालकाने असे निरीक्षिले: “या नव्यानेच लाभलेल्या रिकाम्या वेळेमुळं . . . आम्ही कोण आहोत याचा अधिक विचार करायला, आमच्या नातेसंबंधांबद्दल आणखी शिकून घेण्यावर जास्त लक्ष केंद्रित करायला आणि आमच्या गरजा भागवणाऱ्या कार्यहालचालींमध्ये सामील व्हायला आम्हाला शक्य झालं आहे.” ती पुढं म्हणते: “हा काहीतरी नवीन शिकण्याचा आणि उल्लेखनीय वाढीचा वेळ असतो आणि हा काळ अस्वस्थतेचा असला तरी तो अत्यानंदाचा देखील असतो.”
काही जोडप्यांना जास्त आर्थिक मोकळीक देखील असते. इतके दिवस रोखून धरलेले छंद आणि करियर आता पुरे केले जाऊ शकतात. यहोवाच्या साक्षीदारांपैकी, अनेक जोडपी आपल्या या नवीन स्वातंत्र्याचा आध्यात्मिक गोष्टींचा पाठलाग करण्यासाठी उपयोग करतात. हरमॉन नामक एक वडील म्हणतात की, त्यांची मुलं घर सोडून गेल्यावर त्यांनी व त्यांच्या पत्नीनं लगेचच पूर्ण-वेळेची सेवा सुरू करण्याचा विचार केला.
एकट्या पालकांसाठी स्वतंत्र होऊ देणं
एकट्या पालकांना रिकाम्या झालेल्या घरट्यामध्ये राहणं विशेषकरून कठीण वाटू शकतं. दोन मुलींची एकटी पालक असलेली आई, रिबेका म्हणते: “आमची मुलं घर सोडून जातात तेव्हा आम्हाला सोबत आणि प्रेम देणारा पती नसतो.” एखाद्या एकट्या पालकाला आपल्या मुलांकडून भावनिक आधार मिळाला असेल. आणि ती मुलं घरातल्या खर्चाला हातभार लावत असल्यास त्यांच्या जाण्यामुळं आर्थिक अडचणही होऊ शकते.
काहीजणी, नोकरी-प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये किंवा लहान प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये नाव नोंदवून आपली आर्थिक परिस्थिती सुधारतात. परंतु, एकाकीपणाची पोकळी कशी भरून काढायची? एक एकटी-पालक म्हणते: “मी तर कोणत्या न कोणत्या तरी कामात स्वतःला दंग ठेवते. बायबलचं वाचन करते, घराची साफ-सफाई करते किंवा वॉकिंग अथवा रनींग करून येते. परंतु कोणा आध्यात्मिक मैत्रिणीशी बोलणं हा माझा एकटेपणा घालवण्याचा सर्वात फायदेकारक मार्ग ठरला आहे.” होय, “विशाल” व्हा, व नवीन आणि समाधानकारक मैत्री करा. (२ करिंथकर ६:१३) अस्वस्थपणा वाटतो तेव्हा “विनवण्या व प्रार्थना करीत” राहा. (१ तीमथ्य ५:५) जमवून घेण्याच्या या कठीण काळात यहोवा तुम्हाला सामर्थ्य आणि पाठिंबा देईल याची खात्री बाळगा.
आनंदानं स्वतंत्र होऊ देणं
तुमची परिस्थिती कसलीही असली, तरी मुलं घर सोडून गेल्यावर जीवन काही संपत नाही हे जाणून घ्या. त्याचप्रमाणे कुटुंबातले नातेसंबंधही काही तुटत नाहीत. बायबलमध्ये वर्णन केलेली हितकर प्रीती, एकमेकांपासून दूर असतानाही लोकांना जवळ ठेवण्यास समर्थ आहे. प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो की, प्रीती “सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही.” (१ करिंथकर १३:७, ८) तुमच्या कुटुंबात तुम्ही विकसित केलेली निःस्वार्थ प्रीती मात्र तुमची मुलं घर सोडून गेल्यामुळं काही अंतर देणार नाही.
मनोवेधक गोष्ट अशी की, मुलांना जेव्हा विलग होण्याचं दुःख जाणवू लागतं आणि घराची ओढ लागते किंवा त्यांना आर्थिक दबावांची अडचण जाणवू लागते तेव्हा तेच स्वतःहून तुमच्याकडे येतात. हान्स आणि इन्ग्रीट सल्ला देतात: “तुमच्या मुलांसाठी तुमचं घर नेहमी खुलं आहे हे त्यांना सांगा.” नियमित भेटी, पत्रव्यवहार किंवा अधूनमधून फोन केल्यावर तुम्हाला काय चाललंय ते माहीत होईल. “त्यांच्या मामल्यांमध्ये दखल न घेता त्यांच्यात आस्था दाखवा” असं जॅक आणि नॉराचं मत आहे.
मुलं घर सोडून जातात तेव्हा तुमचं जीवन बदलतं. परंतु रिकाम्या घरट्यातलं जीवनही व्यस्त, सक्रिय आणि समाधानी असू शकतं. त्याचप्रमाणे, तुमच्या मुलांसोबतचं तुमचं नातंही बदलतं. तरीही, ते नातं आनंदी आणि संतुष्टकारक असतं. प्राध्यापक जेफ्री ली आणि गॅरी पीटरसन यांचं म्हणणं आहे की, “पालकांपासून स्वतंत्र झाल्यामुळे, त्यांच्याविषयी प्रेम, विश्वास किंवा आदर उरला नाही असा अर्थ होत नाही. . . . कुटुंबातले मजबूत नातेसंबंध संपूर्ण आयुष्यभर टिकून राहतात.” होय, तुमच्या मुलांवरचं तुमचं प्रेम कधी संपणार नाही आणि तुमच्या पालकांची भूमिकाही कधी संपणार नाही. आणि आपल्या मुलांवरील प्रेमापोटी तुम्ही त्यांना स्वतंत्र होऊ दिलं असल्यामुळं तुम्ही त्यांना गमावून बसला नाहीत.
[तळटीप]
a फेब्रुवारी ८, १९८३ च्या सावध राहा! (इंग्रजी) अंकातला “तुमचे पालकपण संपत नाही” हा लेख पाहा.
[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]
“माझ्या जीवनात पहिल्यांदा . . . , मी रडलो, खूप रडलो”
[१० पानांवरील चौकट/चित्र]
मोठ्या मुलांसाठी एक सल्ला —स्वतंत्र करू देण्यासाठी पालकांची मदत करा
सोडून जाणं तितकं जड नसतं, पण मुलं सोडून गेल्यावर मागे सोडलेल्या त्यांच्या आईवडिलांना सोपं जात नाही. म्हणून आपल्या स्वातंत्र्याचा आणि प्रौढत्वाचा आनंद लुटत असताना, तुमच्या पालकांना जमवून घेणं कठीण जात असेल तर त्यांच्याशी प्रेमानं आणि समजुतदारीनं वागा. त्यांना तुमच्या अविरत प्रेमाची आणि जिव्हाळ्याची शाश्वती करून द्या. छोटीशी चिठ्ठी, अनपेक्षित भेटवस्तू, किंवा मैत्रिपूर्ण फोन अशा गोष्टींनी उदास पालकाला पुष्कळ आनंद मिळू शकतो! तुमच्या जीवनातल्या महत्त्वपूर्ण घटनांविषयी त्यांना सांगत चला. यामुळं कुटुंबातले हे संबंध अजूनही मजबूत आहेत याची त्यांना शाश्वती मिळते.
प्रौढ जीवनाच्या दबावांना तुम्ही तोंड देता तेव्हा, तुमची काळजी घेण्यासाठी पालकांना काय काय सोसावं लागलं याची जाणीव तुम्हाला होईल. कदाचित यामुळं तुम्ही आपल्या पालकांना असं म्हणाल: “माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं त्यासाठी मी तुमचा आभारी आहे!”