वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १/८ पृ. ४-९
  • विजय आणि दुर्दशा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विजय आणि दुर्दशा
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सरतेशेवटी, उपाय!
  • प्राणघातक पुनरागमन
  • हे प्राणघातक पुनरागमन का?
  • एचआयव्ही आणि टीबी—त्रासात त्रास
  • बहुऔषधी-प्रतिरोधक टीबी
  • प्रतिबंध आणि उपचार
  • क्षयरोगाविरुद्ध एक नवीन पावित्रा
    सावध राहा!—१९९९
  • प्राणघातक मिलाफ
    सावध राहा!—१९९८
  • युद्धाच्या बरोबरीचा जीवघेणा हल्ला
    सावध राहा!—१९९८
  • क्षयाचे पुन्हा आक्रमण!
    सावध राहा!—१९९६
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 १/८ पृ. ४-९

विजय आणि दुर्दशा

“क्षयाचा गेल्या ३० वर्षांचा इतिहास विजय आणि दुर्दशेचा आहे—या रोगावर नियंत्रण करण्यासाठी आणि सरतेशेवटी त्याचे निर्मूलन करण्यासाठी ज्यांनी साधन पुरवले त्या वैज्ञानिकांचा हा विजय तर त्याचा शोध अंमलात आणण्यामध्ये जगव्याप्त विफलता हाती लागल्याची ही दुर्दशा.”—जे. आर. बिग्नॉल, १९८२.

क्षयरोग (टीबी) दीर्घकाळापासून लोकांचे प्राण घेत आला आहे. युरोपियन लोक दक्षिण अमेरिकेत समुद्रावाटे येण्याआधीच पेरूमधले इन्का लोक या रोगाने ग्रस्त झाले होते. इजिप्तमध्ये फारोंचे वैभवी राज्य असताना त्याने इजिप्शियन लोकांवर हल्ला चढवला. प्राचीन काळातल्या लिखाणांवरून स्पष्ट होते की टीबीने प्राचीन बॅबिलोन, ग्रीस आणि चीनमधल्या राजापासून रंकापर्यंत सर्वांना ग्रासले होते.

टीबी, १८ व्या शतकापासून ते २० व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत पाश्‍चात्त्य जगातल्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरले होते. शेवटी, १८८२ मध्ये, रोबर्ट कोख या जर्मन डॉक्टरांनी त्यांना या रोगासाठी कारणीभूत असलेला बॅसिलस जिवाणू सापडल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. तेरा वर्षांनंतर, विल्हेल्म रंटजन यांनी क्ष-किरणांचा शोध लावला ज्यायोगे जिवंत व्यक्‍तीच्या फुफ्फुसांमध्ये क्षयाच्या दोषस्थलाची काही चिन्हे पाहता येणे शक्य झाले. त्यानंतर, १९२१ मध्ये, फ्रेंच वैज्ञानिकांनी टीबीची एक लस तयार केली. ज्या वैज्ञानिकांनी या लशीचा शोध लावला त्यांच्या नावावरून तिला बीसीजी (बॅसिलस काल्मेट-गेरान) नाव पडले; या रोगावर अद्यापही हीच एकमेव उपलब्ध लस आहे. तरीसुद्धा, टीबीने आपला भयंकर मारा काही थांबवलेला नाही.

सरतेशेवटी, उपाय!

टीबी रुग्णांना डॉक्टर आरोग्यभुवनांमध्ये पाठवत असत. हे दवाखाने बहुधा पर्वतांमध्ये वसलेले असायचे जेथे रुग्णांना आराम करता यायचा आणि ताजी हवा मिळायची. मग, १९४४ मध्ये संयुक्‍त संस्थानांतल्या डॉक्टरांना टीबीवर गुणकारी ठरलेले सर्वात पहिले प्रतिजैव औषध, स्ट्रेपटोमायसिन याचा शोध लागला. त्यानंतर टीबी-रोधक औषधांमध्ये भराभर वाढ होऊ लागली. अखेरीस, टीबी रुग्णांवर घरातल्या घरातही उपचार करता येऊ लागले.

संसर्ग होण्याचे प्रमाण ढासळत गेले तसे भवितव्य आशादायक वाटू लागले. आरोग्यभुवनांना टाळे लागले आणि टीबीवरील संशोधनासाठी निधी पुरवणे हळूहळू बंदच झाले. प्रतिबंधक कार्यक्रम थांबवण्यात आले आणि वैज्ञानिक आणि डॉक्टर नवनवीन वैद्यकीय आव्हानांचा शोध घेऊ लागले.

टीबीने विकसनशील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचे प्राण जात असले, तरी सुधारणा होणारच अशी खात्री वाटत होती. टीबी जणू गतकाळात जमा झाला होता. लोकांची हीच धारणा होती पण लोकांच्या या धारणेत गफलत झाली.

प्राणघातक पुनरागमन

एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या मध्यात, टीबीचे भयंकर आणि घातक पुनरागमन सुरू झाले. मग एप्रिल १९९३ मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) टीबी “जागतिक संकटप्रसंग” बनली आहे अशी घोषणा करून पुढे म्हटले की, “या रोगाला आळा घालण्यासाठी तातडीने कार्यहालचाल केली नाही तर पुढच्या दशकात हा रोग तीन कोटींपेक्षा अधिक लोकांचा बळी घेईल.” डब्ल्यूएचओच्या इतिहासात अशा प्रकारची घोषणा पहिल्यांदाच करण्यात आली.

त्यानंतर, कोणत्याच ‘तातडीच्या कार्यहालचालीने’ या रोगाचा फैलाव होण्यावर अटकाव घातलेला नाही. उलट, परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अलीकडेच, डब्ल्यूएचओने अहवाल दिला की, इतिहासातल्या इतर कोणत्याही वर्षापेक्षा १९९५ दरम्यान टीबीने अधिक लोक दगावले. डब्ल्यूएचओने अशीही सूचना दिली आहे की, पुढील ५० वर्षांत टीबी ५० कोटी लोकांना ग्रासू शकतो. अधिकाधिक लोक अनेक औषधांप्रती प्रतिकारक असलेल्या बहुधा असाध्य टीबीला बळी पडतील.

हे प्राणघातक पुनरागमन का?

त्याचे एक कारण म्हणजे, गेल्या २० वर्षांमध्ये जगाच्या काही भागांमध्ये टीबी-रोधक कार्यक्रमांचा ऱ्‍हास झाला आहे किंवा ते पूर्णतः नाहीसेच झाले आहेत. यामुळे लागण झालेल्या लोकांचे निदान करण्यात आणि त्यांच्यावर उपचार करण्यात दिरंगाई झाली. आणि त्यामुळे अधिक मृत्यू संभवले आहेत आणि रोगाचा फैलाव झाला आहे.

टीबी पुन्हा उद्‌भवण्याचे आणखी एक कारण म्हणजे, गजबजलेल्या शहरांमधल्या, विशेषतः विकसनशील देशांतील महानगरांमधल्या गरीब, कुपोषित लोकांच्या संख्येतील वाढ. गरीब लोकांपर्यंतच टीबीचा संसर्ग मर्यादित नसला—कारण टीबी कोणालाही होऊ शकतो—तरीपण घाणेरड्या आणि गजबजलेल्या वसाहतींमधल्या परिस्थितींमुळे एका व्यक्‍तीकडून दुसऱ्‍या व्यक्‍तीला संसर्ग अगदी सहजगत्या होऊ शकतो. या परिस्थितींमुळे, रोगाप्रती लोकांची प्रतिकार क्षमता पार ढासळून जाण्याची शक्यताही वाढते.

एचआयव्ही आणि टीबी—त्रासात त्रास

एक मोठी समस्या म्हणजे, टीबी आणि एचआयव्ही या एड्‌सच्या विषाणूची जोडगोळी तयार झाली आहे. सन १९९५ दरम्यान, एड्‌स संबंधित कारणांनी मृत्यूमुखी पडलेल्या अंदाजे दहा लाख लोकांपैकी कदाचित एक तृतीयांश लोक टीबीने दगावले. याचे कारण म्हणजे, एचआयव्हीमुळे टीबीप्रती शरीराची प्रतिकार शक्‍ती कमी होते.

बहुतांश लोकांमध्ये टीबीचा संसर्ग अगदीच आजारी पडण्याइतका कधीच पुढे जात नाही. ते का? कारण टीबी बॅसिलाय हे महाभक्षी नामक कोशिकांमध्ये कैद असतात. त्या व्यक्‍तीची प्रतिकार संस्था विशेषतः टी लसिका कोशिका किंवा टी कोशिका त्यांना तेथे कैद करून ठेवतात.

टीबी बॅसिलाय म्हणजे घट्ट झाकण बसवलेल्या टोपल्यांमधले नाग. या टोपल्या महाभक्षी कोशिका आहेत आणि त्यांची झाकणे म्हणजे टी कोशिका आहेत. परंतु, एड्‌स विषाणू जेव्हा येतो तेव्हा तो या टोपल्यांची झाकणे जणू उडवून टाकतो. हे घडते तेव्हा बॅसिलाय मुक्‍त होतात आणि शरीराच्या कोणत्याही भागाला नष्ट करण्यास मोकळे होतात.

म्हणूनच, निरोगी प्रतिकार संस्था असलेल्या लोकांपेक्षा एड्‌स रुग्णांना सक्रिय टीबी होण्याची अधिक शक्यता असते. “एचआयव्ही असणाऱ्‍या लोकांना टीबी होण्याची विलक्षण रोगप्रवृत्ती असते,” असे स्कॉटलंडमधील एक टीबी तज्ज्ञ म्हणाले. “लंडनमध्ये दोन एचआयव्ही रुग्ण दवाखान्याच्या दालनात बसले असता त्यांच्यासमोरून एक टीबीचा रुग्ण स्ट्रेचरवरून नेल्यामुळे त्यांना टीबी झाला.”

अशाप्रकारे, एड्‌सने टीबीच्या साथीरूपी आगीत आणखीनच तेल ओतले आहे. एका अंदाजानुसार, २००० या सालापर्यंत एड्‌सच्या साथीमुळे टीबीची १४ लाख प्रकरणे निर्माण होतील जी अन्यथा टाळता आली असती. टीबीचा फैलाव होण्यात एक महत्त्वाचा घटक म्हणजे, एड्‌सच्या रुग्णांना या रोगाची अधिक रोगप्रवृत्ती तर असतेच असते पण त्यांच्यामुळे इतरांनाही, ज्यांना एड्‌स नाही अशांनाही टीबी होऊ शकतो.

बहुऔषधी-प्रतिरोधक टीबी

टीबीविरुद्धचा लढा आणखीनच मुश्‍किलीचा होण्याचे एक शेवटचे कारण म्हणजे, औषधांना प्रतिरोधक असणाऱ्‍या टीबीच्या जिवाणूंची निर्मिती. हे अति शक्‍तिशाली जिवाणूंचे प्रकार, प्रतिजैव औषधांच्या काळाआधी रोग जसा असाध्य होता तशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण करण्याची भीती पसरवत आहेत.

उपरोधिक गोष्ट म्हणजे, टीबीची प्रतिरोधक औषधे देण्यासंबंधी गैरव्यवस्थापन हेच बहुऔषधी-प्रतिरोधक टीबी निर्माण करण्याचे प्रमुख कारण आहे. टीबीवरील गुणकारक उपचार निदान सहा महिन्यांचा तरी असतो आणि त्यासाठी रुग्णांनी अगदी न चुकता चार औषधे घेण्याची जरूरी आहे. रुग्णाला दिवसा एक डझन गोळ्या देखील खाव्या लागू शकतात. रुग्णांनी नियमितपणे औषधे घेतली नाहीत किंवा उपचार पूर्ण केला नाही तर टीबीच्या जिवाणूंचे असे प्रकार निर्माण होतात ज्यांचा नाश करणे कठीण किंवा अशक्यच होऊन बसते. काही जिवाणूंचे प्रकार तर, टीबीच्या नेहमीच्या सात औषधांना प्रतिरोधक आहेत.

बहुऔषधी-प्रतिरोधक टीबी असलेल्या रुग्णांवर उपचार करणे केवळ कठीणच नाही तर ते खर्चीक देखील आहे. त्याचा खर्च इतर टीबी रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्‍या खर्चापेक्षा जवळजवळ १०० पटीने अधिक असू शकतो. उदाहरणार्थ, संयुक्‍त संस्थानांत, एका व्यक्‍तीच्या उपचाराचा खर्च २,५०,००० डॉलरपेक्षाही अधिक होऊ शकतो!

डब्ल्यूएचओचा अंदाज आहे की, जगभर सुमारे १० कोटी लोकांना, औषधांना प्रतिरोधक असलेल्या टीबी जिवाणूंच्या प्रकारांचा संसर्ग झालेला असावा, ज्यांपैकी काहींचा टीबी तर उपलब्ध असलेल्या कोणत्याही टीबी प्रतिरोधक औषधांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. हे जिवाणूंचे घातक प्रकार इतर सामान्य प्रकारांइतकेच संसर्गजन्य आहेत.

प्रतिबंध आणि उपचार

या जागतिक संकटप्रसंगाला आटोक्यात आणण्यासाठी काय केले जात आहे? रोगावर नियंत्रण करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे लवकरात लवकर सांसर्गिक रुग्णांचे निदान करून त्यांना बरे करणे होय. यामुळे केवळ आजारी असलेल्यांनाच मदत मिळते असे नाही तर इतरांपर्यंत रोगाचा फैलाव होण्यासही आळा बसतो.

टीबीवर काहीच उपचार केला जात नाही तेव्हा तो निम्म्यापेक्षा अधिक रुग्णांचे प्राण घेतो. तथापि, योग्य उपचार केल्यास, जवळजवळ प्रत्येक प्रकरणात टीबी बरा केला जाऊ शकतो; अर्थात, अनेक औषधांना प्रतिरोधक असलेल्या जिवाणूच्या प्रकारांची लागण झाली असल्यास गोष्ट वेगळी.

आपण आधी पाहिल्यानुसार, गुणकारी उपचारासाठी रुग्णांनी औषधांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करावा हे जरूरीचे आहे. बहुधा, ते असे करत नाहीत. का नाही? कारण उपचार सुरू झाल्यावर काही आठवड्यांमध्येच खोकला, ताप आणि इतर लक्षणे सहसा दिसेनाशी होतात. म्हणून, अनेक रुग्णांना वाटते की ते बरे झालेत आणि म्हणून ते औषधे घेण्याचे थांबवतात.

ही समस्या सोडवण्यासाठी डब्ल्यूएचओ डॉट्‌स नावाचा एक कार्यक्रम राबवते; त्याचे पूर्ण नाव “प्रत्यक्ष देखरेखीखाली अल्पावधी उपचार” असे आहे. नावावरून स्पष्ट होते त्यानुसार, निदान उपचाराच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये, औषधांचा प्रत्येक डोस घेतला जातो की नाही यासाठी आरोग्य कार्यकर्ते रुग्णांवर लक्ष ठेवतात. तरीही, हे काम म्हणावे तितके सोपे नसते कारण टीबीने ग्रस्त असलेले पुष्कळ लोक समाजाच्या तळागाळातले लोक असतात. त्यांचे जीवन त्रास आणि समस्यांनी भरलेले असल्यामुळे—काही तर बेघरही असल्यामुळे—ते नियमितपणे औषध घेतात किंवा नाही अशी त्यांच्यावर पाळत ठेवणे महामुश्‍किलीचे असू शकते.

तर मग, मानवजातीवरील या पीडेवर सरतेशेवटी विजय मिळवण्याची काही आशा आहे का?

[५ पानांवरील चौकट]

टीबी वस्तुस्थिती अहवाल

वर्णन: टीबी हा असा रोग आहे ज्यामध्ये बहुधा फुफ्फुसांवर हल्ला होतो आणि हळूहळू त्यांचा नाश होतो, पण तो शरीराच्या इतर भागांपर्यंतही फैलावू शकतो विशेषतः, मेंदू, मूत्रपिंडे आणि हाडांपर्यंतही.

लक्षणे: फुफ्फुसांचा टीबी झाल्यास खोकला, वजनात घट आणि भूक मंदावणे, रात्रीच्या वेळी खूप घाम फुटणे, कमजोरपणा, धाप लागणे आणि छातीत कळा येणे हे होऊ शकते.

निदान कसे केले जाते: ट्यूबरक्यूलिन त्वचा चाचणी केली तर एखादी व्यक्‍ती बॅसिलसच्या संपर्कात आली का हे दिसून येऊ शकते. छातीचा एक्स-रे काढून फुफ्फुसांना काही अपाय झाला का ते पाहता येते ज्यावरून टीबीचा सक्रिय संसर्ग झाल्याचे निष्पन्‍न होऊ शकते. रुग्णाच्या थुंकीची प्रयोगशाळेत तपासणी करणे ही टीबी बॅसिलाय शोधण्याची सर्वात विश्‍वसनीय पद्धत आहे.

कोणाची तपासणी केली जावी: ज्यांमध्ये टीबीची लक्षणे दिसून येतात किंवा टीबी असलेल्या रुग्णाच्या जवळून, वारंवार संपर्कात आले असलेल्यांची—विशेषतः पुरेशी खेळती हवा नसलेल्या खोल्यांमध्ये राहणाऱ्‍यांची.

लस: सध्या एकच लस उपलब्ध आहे—बीसीजी नावाची. मुलांना होणाऱ्‍या तीव्र स्वरूपाच्या टीबीचा ती प्रतिरोध करते पण किशोरवयीन आणि प्रौढांवर तिचा काहीच परिणाम होत नाही. जास्तीत जास्त, ही लस सुमारे १५ वर्षांपर्यंत संरक्षण देऊ शकते. संसर्ग न झालेल्यांनाच बीसीजीची मदत होते; आधीच संसर्ग झालेल्या लोकांवर तिचा परिणाम होत नाही.

[५ पानांवरील चौकट]

टीबी आणि फॅशन

विचित्र गोष्ट अशी की, १९ व्या शतकादरम्यान टीबीला वाङ्‌मयीन मूल्य देण्यात आले कारण लोकांचे असे मत होते की, त्या रोगाच्या लक्षणांमुळे हळव्या कलात्मक प्रवृत्तीत भर पडते.

फ्रेंच नाटककार आणि कादंबरीकार एलेक्सॉन्द्रे ड्यूमस यांनी मेमवॉर यात १८२० च्या दशकाच्या पूर्वार्धाबद्दल लिहिले: “छातीचे रोग फॅशनबल मानले जात होते; सर्वच जण क्षयाने ग्रासले गेले होते, विशेषतः कवी; तीस वर्षांचे होण्याआधी मरणे म्हणजे महान गोष्ट होती.”

इंग्रज कवी लॉर्ड बायरन अहवालांनुसार असे म्हणाले: “मला क्षयरोग [टीबी] होऊन मरायला आवडेल . . . कारण मग सगळ्या स्त्रिया म्हणतील, ‘त्या बिचाऱ्‍या बायरनकडे पाहा, मरणावस्थेत किती छान दिसतोय!’”

अमेरिकन लेखक हेन्री डेव्हिड थॉरो, जे स्पष्टतः टीबीनेच वारले त्यांनी लिहिले: “आजारपण आणि रोग हे बहुधा सुंदर असतात, . . . क्षयाने फिकट पडलेल्या त्वचेसारखी.”

टीबीबद्दलच्या या आकर्षणाबद्दल सांगताना द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन मधील एका लेखात म्हटले होते: “या रोगासाठी असलेल्या विचित्र आकर्षणाने फॅशनच्या आवडीनिवडींवर परिणाम केला; स्त्रियांना उतरलेला चेहरा, दुबळेपणा हवाहवासा वाटू लागला, त्या फिकट रंगाचा मेकअप वापरू लागल्या, आणि पातळ, मलमलीचे कपडे घालायच्या—अगदी आजकालच्या अवपोषित दिसणाऱ्‍या मॉडेल्ससारख्या.”

[७ पानांवरील चौकट]

टीबीची लागण सहजपणे होते का?

“क्षयरोगाच्या जिवाणूंपासून कोठेच सुटका नाही,” असा इशारा डब्ल्यूएचओ जागतिक टीबी कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ. एरॉटॉ कोची देतात. “हवेमध्ये खोकून किंवा शिंकून सोडलेला टीबी जंतू श्‍वसनाद्वारे आत जाऊन कोणालाही टीबी होऊ शकतो. हे जंतू तासन्‌तास हवेत राहतात; इतकेच काय तर वर्षानुवर्षे देखील राहतात. आपल्या सर्वांना त्याचा धोका आहे.”

तथापि, टीबीने आजारी पडण्याआधी दोन गोष्टी व्हाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे, त्याला किंवा तिला टीबी जिवाणूंचा संसर्ग व्हावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे, या संसर्गाचे रोगात रूपांतर व्हावे लागते.

अत्यंत सांसर्गिक व्यक्‍तीसोबत संक्षिप्त संपर्क आल्यावरही टीबी होण्याची शक्यता असली, तरी वारंवार संपर्क आल्यावर टीबीचा फैलाव होण्याची अधिक शक्यता असते जसे की, लहानशा खोलीत कौटुंबिक सदस्यांमध्ये जसा संपर्क येतो तसा.

संसर्गी व्यक्‍तीच्या छातीत श्‍वसनाद्वारे आत घेतलेले बॅसिलाय वाढतात. परंतु, १० पैकी ९ जणांमध्ये, प्रतिकार संस्था या संसर्गावर अटकाव घालते आणि संसर्गित झालेली व्यक्‍ती आजारी पडत नाही. तथापि, काहीवेळा एचआयव्ही, मधुमेह, केमोथेरपी कर्करोग उपचार किंवा इतर कारणांमुळे प्रतिकार संस्था अगदीच कमकुवत झाल्याने हे सुप्त बॅसिलाय सक्रिय होऊ शकतात.

[४ पानांवरील चित्राचे श्रेय]

New Jersey Medical School—National Tuberculosis Center

[७ पानांवरील चित्र]]

एड्‌स विषाणूंद्वारे मोकळे केलेले टीबी बॅसिलाय टोपल्यांतून मोकळे केलेल्या नागांसारखे असतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा