युद्धाच्या बरोबरीचा जीवघेणा हल्ला
जेव्हा २३ वर्षीय मेर्लिनचे वजन घटले आणि तिला गळून गेल्यासारखे वाटू लागले, तेव्हा अलीकडेच झालेल्या बाळंतपणामुळे कदाचित हे होत असावे असे तिला वाटले. तिला खूप दिवसांपासून खोकलाही होता ज्याबद्दल तिने आपल्या डॉक्टरांना सांगितले. त्यांनी म्हटले की घशाचे इन्फेक्शन झाले आहे आणि म्हणून काही ॲन्टीबायोटिक्स दिली. नंतर जेव्हा रात्रीच्या वेळी तिला दरदरून घाम फुटू लागला तेव्हा मात्र मेर्लिन काळजीत पडली. ती पुन्हा एकदा डॉक्टरांकडे गेली आणि तेव्हा त्यांनी छातीचा एक्स-रे काढायला सांगितला.
एक्स-रेवरचा डाग पाहता मेर्लिनवर लागलीच उपचार करायची गरज होती पण तिच्यासोबत फोनवरून संपर्क साधता आला नाही. “पण डॉक्टरांनी फोनवरून माझ्या आईला गाठलं आणि मला गंभीर आजार झाला आहे असं तिला सांगितलं,” असे मेर्लिन म्हणाली. “माझी आई तडक माझ्याकडे निघून आली आणि मला लागलीच [डॉक्टरांकडं] धाडलं. मग दवाखान्यात माझा आणखी एक एक्स-रे काढला आणि मला तिथंच ठेवलं.”
आपल्याला क्षयरोग (टीबी) झाला आहे हे ऐकल्यावर मेर्लिनला धक्काच बसला. आता आपण काही वाचणार नाही असे तिला वाटले, पण टीबी-रोधक औषधांचा उपचार घेतल्यावर ती लवकरच बरी झाली.
आपल्याला क्षयरोग झाला आहे याचा मेर्लिनला धक्का का बसला हे समजण्याजोगे आहे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत, अनेक आरोग्य तज्ज्ञांचाही असा ग्रह होता की, विकसित देशांत क्षयाचे उच्चाटन करण्यात आले होते. “प्लेगसोबत क्षयही नाहीसा झाला असा माझा समज होता,” असे लंडनमधल्या एका उपचार केंद्रातल्या चिकित्सालयीन सहायक महिलेने म्हटले. “पण मी इथं कामाला लागले तेव्हा क्षय तर अजूनही आहे नी शहराच्या आतील भागात फोफावतोय असं मला दिसलं.”
ज्या ठिकाणी क्षयाचे उच्चाटन झाले होते तेथे तो परतला आहे; जेथे उच्चाटन झालेले नव्हते, तेथे तर त्याने आणखीनच रौद्र रूप धारण केले आहे. क्षयाचे निर्मूलन झालेले नसून उलट तो आता एक प्राणघातकी म्हणून युद्ध आणि दुष्काळाच्या बरोबरीने उभा आहे. खालील मुद्दे विचारात घ्या:
◼ आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती झाली असतानाही गेल्या शंभर वर्षांमध्ये क्षयाने जवळजवळ २० कोटी लोकांना स्मशानात पाठवले आहे.
◼ सुमारे दोन अब्ज लोक—जगाची एक तृतीयांश लोकसंख्या—आधीच टीबी बॅसिलस या एक प्रकारच्या जिवाणूने संसर्गित झालेली आहे. शिवाय, प्रती सेकंदाला एका व्यक्तीला क्षयाचा संसर्ग होत असतो!
◼ सन १९९५ मध्ये, अगदीच टोकाला पोचलेल्या क्षयाची सुमारे २.२ कोटी प्रकरणे होती. जवळजवळ ३० लाख लोक दगावले, त्यातील बहुतांश विकसनशील देशांतले होते.
क्षयाच्या उपचारासाठी गुणकारी औषधे असतानाही मानवजातीवर या रोगाची पीडा कशाला? त्याच्यावर कधी मात करता येईल का? स्वतःचे संरक्षण करण्याचा काही मार्ग आहे का? पुढील लेख या प्रश्नांची उत्तरे सादर करतील.
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
New Jersey Medical School—National Tuberculosis Center