बायबलचा दृष्टिकोन
ख्रिश्चनांनी समलिंगींचा तिरस्कार करावा का?
सन १९६९ मध्ये, इंग्रजी भाषेत समलिंगी व्यक्तींबद्दल उगाच भीती किंवा तिटकाऱ्याच्या भावनांचे वर्णन करण्यासाठी एक शब्द ठरवण्यात आला. तो शब्द म्हणजे “होमोफोबिया.” अनेक भाषांमध्ये असा विशिष्ट शब्द नाही, तरीही हजारो वर्षांपासून पुष्कळ राष्ट्रांच्या आणि बोलीच्या लोकांनी समलिंगी व्यक्तींप्रती नावड प्रदर्शित केली आहे.
तथापि, अलीकडील काळात, समलैंगिकता ही केवळ लैंगिक इच्छा प्रकट करण्याची निराळी पद्धत आहे या व्यापक दृष्टिकोनास प्रोत्साहन दिले गेले. इतिहासकार जेरी झेड. मुलर यांनी अलीकडेच “समलैंगिकतेबद्दल जन संमती आणि आदर यांची वाढती मागणी” याविषयी लिहिले. त्यांनी सांगितले की समलिंगी व्यक्ती “मोठ्या प्रमाणात एकजूट होऊन आमची जीवनशैली प्रशंसनीय आहे असे जाहीर करू लागले आहेत आणि इतरांनीही तसेच मानावे अशी मागणी करत आहेत.” हे खासकरून पाश्चात्त्य देशांमध्ये दिसून येते. परंतु, जगाच्या अनेक भागांमध्ये, तथाकथित स्वतंत्र विचारशैलीच्या राष्ट्रांमध्ये सुद्धा अनेकजण अजूनही समलैंगिकतेचा धिक्कार आणि तिरस्कार करतात.
समलिंगी आणि समलैंगिकता आचरत असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना बहुधा खोचक टोमणे, छळवणूक आणि हिंसा यांचा सामना करावा लागतो. धार्मिक पुढाऱ्यांनी देखील असा द्वेष प्रकट केला आहे. काहींनी तर समलिंगींविरुद्ध आपलेच युद्ध सुरू केले. उदाहरणार्थ, ग्रीक कर्मठ चर्चच्या बिशपची टिपणी लक्षात घ्या जी अलीकडेच ग्रीक राष्ट्रीय रेडिओवरून प्रक्षेपित करण्यात आली. ते म्हणाले: “समलिंगींना देव अग्नीमय नरकात हमेशासाठी होरपळत राहील. त्यांच्या घाणेरड्या मुखांतून निघणाऱ्या किंचाळ्या सर्वकाळ घुमत राहतील. त्यांची विकृत शरीरे असह्य यातना भोगतील.” असे खरेच होईल का? देवाला समलिंगींविषयी काय वाटते?
देवाचा दृष्टिकोन
ख्रिश्चनांनी समलिंगी व्यक्तींना बहिष्कृत समजावे किंवा त्यांचा द्वेष करावा म्हणून बायबल त्यांच्याकडे खास लक्ष वेधत नाही. शिवाय, देव समलिंगी व्यक्तींना—किंवा आपल्या कोणत्याच प्राणीमात्रांना—सर्वकाळ अग्नीमय नरकात जाळून शिक्षा देईल असे ते शिकवत नाही.—पडताळा रोमकर ६:२३.
परंतु, शास्त्रवचनांमध्ये आपल्या निर्माणकर्त्याचे नैतिक दर्जे दिले आहेत जे बहुतेक वेळा आधुनिक नीतीमूल्यांच्या अगदीच विरोधात असतात. समलिंगी कृत्ये, अविवाहित व्यक्तींमधील विषमलिंगी शरीर संबंध आणि पशुगमन या सर्व जीवनशैलींचा बायबल धिक्कार करते. (निर्गम २२:१९; इफिसकर ५:३-५) अशाच लैंगिक चालीरीतींमुळे देवाने सदोम आणि गमोरा या शहरांचा नाश केला.—उत्पत्ति १३:१३; १८:२०; १९:४, ५, २४, २५.
समलैंगिकतेविषयी देवाचे वचन स्पष्ट शब्दात म्हणते: “हे अमंगळ कृत्य होय.” (लेवीय १८:२२) इस्राएलला देवाने दिलेल्या नियमात अशी मागणी होती: “कोणी पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते त्या दोघांचे अमंगळ कृत्य होय. त्यांना अवश्य जिवे मारावे.” (लेवीय २०:१३) हीच शिक्षा पशुगमन, गोत्रगमन आणि व्यभिचार करणाऱ्यांसाठी देखील देण्यात आली होती.—लेवीय २०:१०-१२, १४-१७.
‘दुर्वासना’ आणि ‘अनैसर्गिक’ अशा अभिव्यक्ती वापरून समलैंगिक कृत्यांचे वर्णन करण्यास प्रेषित पौल प्रेरित झाला. तो लिहितो: “ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले; तसेच पुरुषांनीहि स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले. आणखी ज्याअर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्याअर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.”—रोमकर १:२६-२८.
शास्त्रवचनांमध्ये कसलीही सबब, कोणतीही सूट, कसलाही अस्पष्टपणा नाही; समलैंगिक कृत्ये, व्यभिचार, जारकर्म हे सर्व देवाच्या नजरेत किळसवाणे आहे. यानुसार, खरे ख्रिस्ती केवळ आणखी लोकप्रिय होण्याकरता किंवा आधुनिक संस्कृतीला साजेसे होण्याकरता ‘दुर्वासनांविषयी’ बायबलचे मत क्षुल्लक लेखत नाहीत. किंवा, समलैंगिकता ही नॉर्मल जीवनशैली आहे यास दुजोरा देणाऱ्या कोणत्याही चळवळीशी त्यांचे सहमत नाही.
“वाइटाचा द्वेष करा”
बायबल ताकीद देते: “अहो परमेश्वरावर प्रीति करणाऱ्यांनो, वाइटाचा द्वेष करा.” (स्तोत्र ९७:१०) यास्तव, यहोवाच्या नियमांचा भंग करणाऱ्या प्रत्येक चालीरीतीचा ख्रिश्चनांनी द्वेष करण्याची अपेक्षा केली जाते. काही लोकांना कदाचित अनैतिकतेच्या इतर प्रकारांपेक्षा समलैंगिकतेबद्दल अधिक तिटकारा किंवा वीट येत असावा; समलैंगिकता ही अनैसर्गिक लैंगिक विकृती आहे असे त्यांचे मत असेल. तथापि, ख्रिश्चनांनी अशा गोष्टी आचरणाऱ्या व्यक्तींचा द्वेष करावा का?
स्तोत्र १३९:२१, २२ येथे स्तोत्रकर्ता यावर प्रकाश पाडतो: “तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणाऱ्यांचा मला वीट का येऊ नये? मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करितो. मी त्यांना आपले शत्रू मानितो.” यहोवाप्रती आणि त्याच्या तत्त्वांप्रती निष्ठावान असल्यामुळे आपल्यामध्ये यहोवाविरुद्ध जाणूनबुजून बंड करणाऱ्यांबद्दल आणि देवाचे शत्रू होणाऱ्यांबद्दल तीव्र नापसंती निर्माण झाली पाहिजे. सैतान आणि त्याचे दुरात्मे हे देवाच्या अशा निश्चित शत्रूंपैकी आहेत. काही मानव देखील या वर्गात मोडतात. परंतु, एखाद्या ख्रिश्चनाला अशा लोकांना बाह्य स्वरूपांवरून ओळखणे इतके सोपे नसेल. आपल्याला अंतःकरणे वाचता येत नाहीत. (यिर्मया १७:९, १०) एखादी व्यक्ती काही चूक करत आहे म्हणून ती देवासमोर कधीही न सुधरणारा एक शत्रू आहे असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल. अनेक बाबतीत अपराध्यांना देवाच्या दर्जांचे ज्ञानच नसते.
म्हणून सहसा ख्रिस्ती, सहमानवांचा द्वेष करण्यात धीमे असतात. विशिष्ट जीवनशैलींचा त्यांना तीव्र वीट येत असला, तरीही इतरांना इजा पोचवण्याचा ते प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांच्याविषयी मनात द्वेष किंवा मत्सरही बाळगत नाहीत. उलटपक्षी, “सर्व माणसांबरोबर . . . शांतीने राहा” असा सल्ला बायबल ख्रिश्चनांना देते.—रोमकर १२:९, १७-१९.
“देव पक्षपाती नाही”
खरा पश्चात्ताप करणाऱ्या व्यक्तीला यहोवा क्षमा करील मग त्या व्यक्तीने कसल्याही प्रकारची अनैतिकता आचरली असली तरीही. एक प्रकारची अनैतिकता दुसऱ्या प्रकारापेक्षा वाईट आहे असा यहोवाचा दृष्टिकोन असल्याचा कोणताही पुरावा नाही. “देव पक्षपाती नाही.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) उदाहरणासाठी, करिंथमधील पहिल्या शतकातल्या मंडळीचीच गोष्ट पाहा. प्रेषित पौलाने त्यांना लिहिले: “जारकर्मी, मुर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” मग पौल कबूल करतो की, पूर्वी व्यभिचारी, जारकर्मी, समलिंगी आणि चोर असलेल्या काहींचा करिंथमधल्या ख्रिस्ती मंडळीत स्वीकार करण्यात आला होता. त्याने स्पष्टीकरण दिले: “तुम्हापैकी कित्येक तसे होते. तरी तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला.”—१ करिंथकर ६:९-११.
अर्थात, आपल्या परिपूर्ण नैतिक दर्जांचा सातत्याने आणि नेहमी भंग केल्यास यहोवा ते सहन करत नाही. त्याच्या तत्त्वांकडे हट्टीपणाने कानाडोळा केल्याचा त्याला निश्चितच द्वेष वाटतो. तरीही, तो समेटाचा मार्ग मात्र खुला ठेवतो. (स्तोत्र ८६:५; यशया ५५:७) याच्या सुसंगतेत, समलिंगी व्यक्तींना किंवा इतर कोणालाही ख्रिस्ती लोक वाईट वागणूक देत नाहीत, त्यांचा उपहास किंवा छळ करत नाहीत. खरे ख्रिस्ती त्यांच्या सहमानवांना ख्रिस्ताचे संभवनीय शिष्य समजतात आणि त्यांना आदराने व सन्मानाने वागवतात. बायबल म्हणते: “हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोंहचावे.”—१ तीमथ्य २:३, ४.
ख्रिस्ती पश्चात्तापी जनांचे स्वागत करतात
देव क्षमाशील आहे असे बायबल वारंवार सांगते. “क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव” असे ते त्याचे वर्णन करते. (नहेम्या ९:१७; यहेज्केल ३३:११; २ पेत्र ३:९) पुढे, बायबल त्याची तुलना येशूच्या उधळ्या पुत्राच्या दाखल्यातील बापाशी करते; या दाखल्यातील पुत्राने दूर देशात चैनबाजीच्या जीवनात आपली सर्व मालमत्ता उधळून टाकली होती. शेवटी पुत्राचे डोळे उघडले, त्याने पश्चात्ताप केला आणि पुन्हा आपल्या घरी परतला तेव्हा पित्याने त्याचे धावत जाऊन स्वागत केले.—लूक १५:११-२४.
होय, अपराध्यास आपला मार्ग बदलणे शक्य आहे. लोकांना जुन्या व्यक्तिमत्त्वाचा त्याग करून नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करायला आणि ‘आपल्या मनोवृत्तीत नवे केले जाण्याला’ प्रोत्साहन देऊन शास्त्रवचने हे कबूल करतात. (इफिसकर ४:२२-२४) वाईट आचरण करणारे, समलिंगी देखील, आपल्या विचारशैलीत आणि वर्तणुकीत संपूर्णतः बदल करू शकतात आणि अनेकजण असे परिवर्तन करण्यात यशस्वी झाले आहेत.a खुद्द येशूने अशांना प्रचार केला; आणि त्यांनी पश्चात्ताप केल्यावर त्याने त्यांचा स्वीकार केला.—मत्तय २१:३१, ३२.
निरनिराळ्या जीवनपद्धतींच्या पश्चात्तापी लोकांचे ख्रिस्ती स्वागत करतात. अनैतिक चालचलन सोडून दिल्यावर, आधी ते काहीही करत असले तरीही सर्वजण देवाच्या क्षमाशीलतेचा पूर्ण लाभ घेऊ शकतात कारण “परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.”—स्तोत्र १४५:९.
ख्रिस्ती, आवश्यक असलेली आध्यात्मिक मदत द्यायला तयार असतात; अजूनही समलैंगिक प्रवृत्तींशी झुंज देणाऱ्या व्यक्तींना देखील. हे देवाच्या स्वतःच्या प्रीतीच्या प्रकटनाच्या एकवाक्यतेत आहे, कारण बायबल म्हणते: “परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.”—रोमकर ५:८.
[तळटीप]
a सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकाच्या मार्च २२, १९९५ अंकातील, “या भावना मी कशा घालवू शकतो?” हा लेख पाहा.
[१७ पानांवरील चित्र]
ख्रिस्ती, समलैंगिकतेविषयी बायबलच्या दृष्टिकोनास क्षुल्लक लेखत नाहीत
[१६ पानांवरील चित्राचे श्रेय]
Punch