फ्रेंच बायबलचा निभावण्याकरता संघर्ष
फ्रान्समधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
जगात दहा कोटींपेक्षा अधिक लोक फ्रेंच बोलतात. तुम्ही त्यांच्यापैकी नसला, तरी फ्रेंच बायबलला निभावण्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्याविषयी वाचणे केव्हाही रोचक वाटते; बव्हंशी धार्मिक स्वातंत्र्यासोबत त्याचा संबंध असल्यामुळे हे असावे. गेल्या शतकांमध्ये, कित्येक फ्रेंच बायबल, शत्रूंच्या आणि विश्वासघातकी मित्रांच्या हातून क्रूरपणे नष्ट करण्यात आले. इतका भयंकर विरोध असतानाही हा लढा जिंकण्यासाठी भाषांतरकारांनी आणि मुद्रकांनी आपला प्राण पणास लावला.
बाराव्या शतकादरम्यान, बायबलच्या काही भागांची भाषांतरे अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्याचप्रमाणे फ्रेंचमध्ये देखील उपलब्ध होती. कॅथोलिक चर्च ज्यांना पाखंडी म्हणत त्यांचे गट बायबलचा उपयोग करण्यास प्रोत्साहन द्यायचे. परंतु, फ्रेंचमध्ये बायबलचे व्यापकपणे वितरण होऊ लागले ते १९ व्या शतकातच. दरम्यान, इतकी शतके उलटली यावरून फ्रेंच बायबलला टिकून राहायला कोणकोणत्या धोकेदायक परीक्षांतून पार पडावे लागले ते दिसून येते.
फ्रेंचमध्ये सर्वात प्रथम छापलेले पुस्तक म्हणजे सा. यु. ९०० च्या दरम्यान प्रकाशित झालेला बायबलचा शब्दकोश होय. तो शब्दकोश, वाचकांना लॅटिनमधील बायबलचा अर्थबोध होण्यासाठी तयार करण्यात आला होता; त्यावेळी कॅथोलिक चर्च लॅटिन ही भाषा वापरत होते. पण त्या दरम्यान लॅटिन ही सामान्य लोकांची भाषा राहिली नव्हती, त्याऐवजी हे लोक दुसऱ्या अनेक पोटभाषा बोलत होते. त्यामुळे त्यांना देवाचे वचन वाचायला मिळत नव्हते. तर हा विशेष अधिकार केवळ लॅटिन-पारंगत पाळकवर्गाचा राहिला होता ज्यांना ते वाचता येत होते.
सा. यु. ८४२ मध्ये, फ्रेंचमधील पहिली अधिकृत सरकारी दस्तऐवज सामोरा आला. बहुतांश लोक आता लॅटिन बोलत नव्हते याची ही अभिप्रेत कबुली होती. सा. यु. ८८० च्या सुमारास फ्रान्समध्ये सामान्य बोलीतल्या धार्मिक कविता निघू लागल्या. तथापि, बायबल भाषांतरे मात्र आणखीन दोन शतकांपर्यंत तरी दिसून आली नाहीत. सर्वात जुनी भाषांतरे म्हणजे बायबलच्या काही भागांची नॉर्मन फ्रेंच भाषांतरे होती; ही १२ व्या शतकाच्या सुरवातीला तयार करण्यात आली होती.
लढ्याची खरीखुरी सुरवात
पवित्र शास्त्रवचने वाचनीय स्वरूपात फ्रान्समधील लोकांना उपलब्ध व्हावीत म्हणून प्रथम सातत्याचा प्रयत्न, मध्य फ्रान्स येथील लिअन्सचा १२ व्या शतकातला व्यापारी, पीटर वालडो यांनी केला. वॉलडो यांनी बायबलच्या काही भागांचे प्रॉवेंसल या आग्नेय फ्रान्समध्ये बोलल्या जाणाऱ्या पोटभाषेत भाषांतर करण्याचे काम हाती घेतले. सन ११७९ मध्ये, तिसऱ्या लेटरन धर्मसभेदरम्यान, त्यांनी पोप ॲलेक्झांडर तिसरे यांना आपण भाषांतर केलेला बायबलचा काही भाग सादर केला.
नंतर, चर्चने वॉलडो आणि त्यांच्या अनुयायांना पाखंडी ठरवले आणि त्यांची भाषांतरणे मठवासियांनी जाळून टाकली. तेव्हापासून, देवाचे वचन सामान्य लोकांना उपलब्ध करून देण्याच्या प्रत्येक प्रयत्नाचा चर्चने कडा विरोध केला.
पूर्व फ्रान्समधील मेट्झ शहरात बायबलांची होळी करून १२११ या साली चर्चने आपला पावित्रा एकदम स्पष्ट मांडला. सन १२२९ मध्ये तर काउन्सिल ऑफ टुल्यूसने साधारण लोकांनी कोणत्याही भाषेतली प्रादेशिक बायबल वापरण्यास स्पष्टपणे मनाई केली. त्यानंतर १२३४ मध्ये, स्पेनच्या काउन्सिल ऑफ टॅरागोनाने कोणत्याही रोमान्स भाषेतले (लॅटिनपासून निर्माण झालेली भाषा) बायबल अगदी पाळकांनी देखील बाळगण्याची मनाई केली.
असा एकसारखा विरोध असतानाही, फ्रेंच भाषेत बायबलचे प्रथम संपूर्ण भाषांतर १३ व्या शतकाच्या उत्तरार्धात तयार झाले. या निनावी बायबल भाषांतराचे इतके काही खास वितरण झाले नाही. या वेळी, सामान्य लोकांकडे बायबल कोणत्याच रूपात उपलब्ध नव्हते. त्याच्या प्रती हाताने करण्यात आल्या. फार अधिक किंमत आणि मर्यादित साठा असल्यामुळे केवळ महाकुलीन व पाळकवर्गच बायबल जवळ बाळगू शकत होते.
बायबलचे रक्षण कार्यरत
चौदाशे पन्नासच्या सुमारास, योहॉनस गुटनबर्गने छपाई यंत्र आणि चल अक्षरांचा शोध लावल्याने युरोपमधल्या छपाई क्रांतीने फ्रान्स अगदीच झपाटून गेले. पॅरिस, लिअन्स आणि रूऑन ही तीन फ्रेंच शहरे छपाईसाठी प्रमुख केंद्रे बनली, बायबलचे रक्षण करणारे जणू तट बनले.a
झटापटीच्या या टप्प्यापर्यंत, फ्रेंच बायबल भाषांतरे लॅटिन व्हल्गेटवर आधारलेली होती. हजार वर्षे वारंवार नकल केल्यामुळे लॅटिन मजकुरात कित्येक चुका झाल्या होत्या पण चर्च मात्र व्हल्गेटलाच धरून राहिले. तथापि, फ्रेंच कॅथोलिक झॉक लफेवरे डेटापले यांनी लोकांना बायबल उपलब्ध करून देण्याचे ठरवले. सन १५३० मध्ये त्यांनी व्हल्गेटचे फ्रेंचमध्ये भाषांतर केले व नुकतेच उपलब्ध झालेल्या इब्री आणि ग्रीक हस्तलिखितांचा संदर्भ घेऊन त्यातल्या काही चुका दुरुस्त केल्या. त्याचप्रमाणे चर्चने घातलेली काही गोंधळविणारी सैद्धांतिक स्पष्टीकरणे देखील त्याने काढून टाकली.
लफेवरेंच्या भाषांतरावर लागलीच आक्रमण झाले. काही आवृत्त्या फ्रान्सबाहेर छापाव्या लागल्या. हे बायबल, चर्चने बंदी घातलेल्या पुस्तकांच्या यादीत जोडण्यात आले. काही काळासाठी, लफेवरेला पूर्व फ्रान्समधील स्ट्रासबूर या त्या वेळी स्वतंत्र साम्राज्य शहरात शरण घ्यावे लागले. तरीपण, त्याचे भाषांतर यशस्वी ठरले.
मूळ भाषेतल्या शास्त्रवचनावर आधारित बायबलचे पहिले फ्रेंच भाषांतर १५३५ मध्ये प्रकाशित झाले. जॉन कॅल्विन या धर्मसुधारकाचा भाऊ पायर रोबर ऑलीवेटॉन हा फ्रेंच प्रोटेस्टंट त्याचा भाषांतरकार होता. चर्चचा विरोध असल्यामुळे, हे भाषांतर फ्रान्समध्ये छापले जाऊ शकत नव्हते म्हणून ते स्वीत्झर्लंडमधील न्यूशेटल येथे छापण्यात आले जेथे नवीनच प्रोटेस्टंट समाज तयार झाला होता. ऑलीवेटॉनचे फ्रेंच बायबल भाषांतर नंतरच्या अनेक सुधारित आवृत्त्यांसाठी आणि इतर भाषांमध्ये बायबलचे भाषांतर करण्यासाठी प्रमाण ठरले.
धोकेदायक संघर्ष
फ्रान्समध्ये एट्येन डॉलेसारख्या काही धाडशी मुद्रकांना १५४६ साली बायबल छापण्यासाठी खांबावर जाळण्यात आले. सन १५४६ मध्ये, काउन्सिल ऑफ ट्रेंटने चुका असतानाही व्हल्गेटच्या “सत्यतेची” खात्री पुन्हा पटवली आणि तेव्हापासून चर्च, प्रादेशिक भाषांतरांचा खूपच विरोध करू लागले. सन १६१२ मध्ये, स्पॅनिश इन्क्विझिशनने प्रादेशिक बायबलचा संपूर्ण नाश करण्याची भयानक मोहीम हाती घेतली.
काहीवेळा छळामुळे कल्पक मार्ग शोधून काढण्यात आले. “शीन्यॉन” किंवा “बन” बायबल तयार करण्यात येऊ लागले जे एका स्त्रीच्या केसांच्या अंबाड्यात लपवण्याइतके लहान होते. आणि १७५४ मध्ये तर, इब्री आणि ग्रीक शास्त्रवचनांतले काही भाग तीन बाय पाच सेंटीमीटरच्या इवल्याशा पुस्तकात छापले गेले.
प्रतिहल्ले
परंतु, कालांतराने मोठाच बदल झाला. बायबलने कित्येक शतके रानटी हल्ले सहन केल्यानंतर त्याच्या बाजूने प्रतिहल्ले करण्यात येऊ लागले. फ्रेंच क्रांतीनंतर, नवीन कल्पना आणि संमती दिलेल्या उपासनेच्या स्वातंत्र्यामुळे चर्चच्या विरोधाला तोंडात मारल्यासारखे झाले. म्हणून १८०३ साली, फ्रान्समध्ये प्रोटेस्टंट नवा करार छापण्यात आला; १२५ वर्षांमधले हे पहिले बायबल होते!
बायबल संस्थांकडूनही मदत मिळू लागली. १७९२ साली, इंग्लंडमधील लंडन येथे “समजणाऱ्या भाषेतला ईश्वरी खजिना ज्या फ्रेंच लोकांकडे नव्हता त्यांच्याकरता फ्रेंच बायबल प्राप्त करायला होता होईल तितका प्रयत्न करण्यासाठी” फ्रेंच बायबल संस्था स्थापण्यात आली. इतर बायबल संस्थाही मग या संघर्षात भाग घेऊ लागल्या. फ्रेंच भाषेत बायबल तयार करून त्याचे वितरण करण्याच्या त्यांच्या उद्देशाला यश मिळाले.
शेवटचा हल्ला
आपल्या डावपेचात कोणताही बदल करण्याला कॅथोलिक चर्चने नकार दर्शवला, पण ते पराजयाच्या मार्गावर होते. संपूर्ण १९ व्या शतकात, प्रादेशिक बायबलांचा अविरत विरोध करणारे कितीतरी आदेश पोपांनी जाहीर केले. अगदी १८९७ मध्ये देखील, पोप लिओ तेरावे यांनी पुन्हा एकदा निक्षून सांगितले की, “कोणत्याही गैर-कॅथोलिक लेखकाने बनवलेल्या आणि कोणत्याही भाषेतल्या पवित्र पुस्तकाच्या सर्व आवृत्तींवर बंदी आहे, विशेषेकरून बायबल संस्थांद्वारे प्रकाशित केलेल्या बायबलवर ज्यांचा रोमच्या पोपने अनेकदा धिक्कार केला आहे.”
तथापि, बायबल संस्थांनी प्रकाशित केलेले स्वस्त प्रोटेस्टंट बायबल सहज उपलब्ध असल्यामुळे कॅथोलिक चर्चने कॅथोलिक पंडितांना फ्रेंचमध्ये बायबलचे भाषांतर करण्यास परवानगी दिली. ऑगस्टीन क्राम्पॉन भाषांतर हे प्रथम सात खंडांमध्ये (१८९४-१९०४) आणि नंतर एका खंडात (१९०४) प्रकाशित करण्यात आले; मूळ शास्त्रवचनांवर आधारित असलेले ते पहिले फ्रेंच कॅथोलिक भाषांतर होते. यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, त्यात अनेक विद्वत्तापूर्ण टीपा होत्या आणि क्राम्पॉनने झेओवा हे देवाच्या नावाचे फ्रेंच रूप विस्तृतपणे वापरले होते.
व्हॅटीकनने डीव्हीनो ऑफ्लॉन्ते स्पीरिट्यू या १९४३ च्या पोपच्या पत्रात आपला दृष्टिकोन एकदमच बदलून सरतेशेवटी प्रादेशिक भाषांमध्ये बायबलचे भाषांतर करण्यासाठी नियम आखले. त्यानंतर अनेक कॅथोलिक भाषांतरणे प्रकाशित झाली; त्यामध्ये प्रसिद्ध जेरूसलेम बायबल सुद्धा होते, जे प्रथम फ्रेंचमध्ये प्रकाशित झाले आणि नंतर इतर अनेक भाषांमध्ये, तसेच इंग्रजीत देखील भाषांतर करण्यात आले.
सबंध जगभर फ्रेंच भाषिकांना सहायक ठरलेले एक बायबल म्हणजे न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स याची फ्रेंच आवृत्ती होय. प्रथम १९७४ मध्ये, संपूर्ण स्वरूपात प्रकाशित झालेल्या या बायबलची १९९५ मध्ये सुधारित आवृत्ती काढण्यात आली. आतापर्यंत ज्या भाषांमध्ये न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन प्रकाशित झाले आहे त्या अनेक भाषांमध्ये ते इब्री शास्त्रवचनांमध्ये आणि उचित आहे तेथे ग्रीक शास्त्रवचनांमध्येही यहोवा हे बायबलच्या लेखकाचे नाव वापरून ते त्याला श्रेय देतात. आतापर्यंत, फ्रेंच आवृत्तीचे ५० लाख प्रतींपेक्षा अधिक प्रती छापण्यात आल्या आहेत. निःसंदेह, बायबलने फ्रेंच भाषेत निभावण्याच्या संघर्षात जय मिळवला आहे.
[तळटीप]
a फ्रेंच छपाई इतकी यशस्वी ठरली की, १५५२ मध्ये स्पॅनिश इन्क्विझिशनने जेव्हा परदेशी बायबल गोळा करण्याचा आदेश दिला तेव्हा सविलच्या न्यायसभेच्या वृत्तानुसार जप्त केलेले सुमारे ९० टक्के बायबल फ्रान्समध्ये छापण्यात आले होते!
[१३ पानांवरील चित्र]
लफेवरे डेटापले यांचे १५३० चे बायबल
[१३ पानांवरील चित्र]
ऑलीवेटॉन यांचे १५३५ चे बायबल
[१४ पानांवरील चित्र]
“१३ वे-शतक बायबल” याचा दुर्मिळ नमुना
[१४ पानांवरील चित्र]
बायबल: Bibliothèque Nationale de France