वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १२/८ पृ. ५-१०
  • ध्वनी प्रदूषण तुम्ही काय करू शकता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ध्वनी प्रदूषण तुम्ही काय करू शकता
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ध्वनी प्रदूषण म्हणजे काय?
  • ध्वनीचे परिणाम
  • तुमच्या परीने प्रयत्न
  • आवाजापासून संरक्षण कसे मिळवावे
  • ध्वनी प्रदूषण आधुनिक पीडा
    सावध राहा!—१९९७
  • शांतता कधी असेल का?
    सावध राहा!—१९९७
  • जेरूसलेममध्ये वाट पाहणं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 १२/८ पृ. ५-१०

ध्वनी प्रदूषण तुम्ही काय करू शकता

दिवसभर थकून आल्यावर तुम्हाला गाढ झोप लागते. पण, अचानक शेजाऱ्‍यांच्या कुत्र्यांच्या भुंकण्याने तुमची झोपमोड होते. तुम्ही कूस बदलता आणि केकाटणे आताच थांबेल, मगच थांबेल अशी वाट पाहत राहता. पण भुंकणे काही केल्या थांबत नाही. कुत्र्यांचे केकाटणे चालूच राहते. तुमचे डोके उठते, झोपमोड झाल्यामुळे चिडचिड होते आणि सगळी झोप उडून गेलेली असते; असला हा त्रास तुमच्या शेजाऱ्‍यांना सहन तरी कसा होतो असा तुम्ही विचार करता.

प्रत्येकाची आवाज सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. धावपट्टीच्या जवळपास राहणाऱ्‍या विमानतळाच्या कामगारांना विमानाच्या आवाजाचा तितका त्रास होत नाही जितका विमानांशी काहीच संबंध नसलेल्या ठिकाणी काम करणाऱ्‍यांना होतो. एखाद्या गृहिणीला इलेक्ट्रिक फूड प्रोसेस्सरचा आवाज, दुसऱ्‍या खोलीत पुस्तक वाचत किंवा टीव्ही पाहत बसलेल्या व्यक्‍तीपेक्षा निश्‍चितच अधिक सहन करता येतो.

ध्वनी प्रदूषण म्हणजे काय?

वेगवेगळी राष्ट्रे ध्वनी प्रदूषणाची व्याख्या निरनिराळ्या पद्धतीने देतात. मेक्सिकोत, “इतरांना त्रासदायक किंवा अपायकारक असलेला कोणताही नकोसा असणारा आवाज” म्हणजे गोंगाट. न्यूझीलंडमध्ये, “कोणाच्याही शांतीचा, आरामाचा आणि सुविधेचा विनाकारण भंग करणारा” कोणताही आवाज त्रासदायक मानला जातो.

टेलिफोनचा शोध लावलेले अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल आणि जर्मन भौतिकीविज्ञ हाइनरिक हट्‌र्झ या दोन प्रख्यात वैज्ञानिकांचा ध्वनी मापनाशी जवळचा संबंध आहे. बेल किंवा सहसा डेसिबेल म्हटले जाणारे (बेलचा एक दशांश), तुलनात्मक आवाजाच्या प्रखरतेचे मापन करते तर हट्‌र्झने ध्वनीचा ध्वनीस्तर किंवा वारंवारता मापली जाते. ध्वनी मापन केले जाते तेव्हा अहवालांमध्ये सहसा ध्वनीची डेसिबेल पातळी दाखवली जाते.a

पण एखाद्या आवाजामुळे किती त्रास होतो हे कोणी ठरवायचे? तुम्हीच, म्हणजे ऐकणाऱ्‍यानेच! “आवाज त्रासदायक आहे की नाही हे ओळखणारे सर्वात उत्तम यंत्र म्हणजे मानवी कान,” असे लंडनचे द इंडिपेंडेंट म्हणते.

ध्वनीचे परिणाम

कान हे ध्वनी ओळखण्याचे “सर्वात उत्तम यंत्र” असल्यामुळे त्यालाच जास्त हानी होते हे काही वेगळे सांगायला नको. तुमच्या अंतकर्णाच्या संवेदनशील तंत्रिका कोशिकांना इजा पोचल्याने कायम स्वरूपाचा श्रवण दोष होऊ शकतो. उच्चस्वरी आवाजाप्रती लोक विविध तऱ्‍हेने प्रतिक्रिया दाखवतात हे खरे. पण, ८० ते ९० डेसिबेलपेक्षा उच्चस्वरी आवाज सतत ऐकत राहिल्याने हळूहळू श्रवणशक्‍ती कमी होऊ शकते. खरे तर, आवाज खूपच जास्त असेल तर तुमच्या श्रवणशक्‍तीला इजा पोचू नये म्हणून त्या वातावरणात तुम्हाला कमीत कमी वेळ राहावे लागेल.

नव वैज्ञानिक (इंग्रजी) पत्रिका असे वृत्त देते, की फ्रान्समध्ये विकल्या जाणाऱ्‍या पुष्कळ व्यक्‍तिगत स्टेरिओंचा कमाल ध्वनी ११३ डेसिबेल असतो. त्यात एका अभ्यासाचा उल्लेख केला होता आणि त्या अभ्यासानुसार “व्यक्‍तिगत कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयरवरती एका तासासाठी एकदम जोरात लावलेले रॉक संगीत बहुधा १०० डेसिबेलपेक्षा अधिक होते आणि कधीकधी तर चक्क १२७ डेसिबेल इतकेही होते.” लाईव्ह कॉन्सर्टच्या वेळी होणाऱ्‍या आवाजाचा परिणाम तर याहीपेक्षा घातक असतो. एका संशोधकाने पाहिले की, काही लोक लाऊडस्पीकर जिथे ठेवले होते तिथे शुद्धी हरपलेल्या अवस्थेत गर्दी करून उभे होते. तो म्हणतो, “माझ्या डोळ्यांपुढं अंधारी येत होती, त्या बास ठोक्यांमुळं मी सुन्‍न झालो होतो आणि माझ्या कानठाळ्या बसत होत्या.”

आवाजाचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो? एका अधिकारसूत्रानुसार: “मध्यम ते उच्चस्वराच्या सतत आवाजांमुळे तणाव, थकवा आणि चिडचिड निर्माण होऊ शकते.” “आवाजाच्या त्रासामुळे फक्‍त माणूस वैतागूनच जात नाही, तर तो शारीरिक आणि भावनिकरित्याही अगदी गळून जाऊ शकतो,” असे जर्मनीच्या गीसन विद्यापीठाचे प्राध्यापक गेरॉल्ट फ्लायशर म्हणतात. इतर तणावपूर्ण स्थितींखेरीज आवाजाचाही त्रास होत असल्यास, खिन्‍नता आणि आंगिक रोगही उद्‌भवू शकतात, असे प्राध्यापक मॉकीस त्सॉपोगॉस यांचे म्हणणे आहे.

सततच्या आवाजामुळे तुमच्या व्यक्‍तिमत्त्वावर परिणाम होऊ शकतो. ब्रिटिश सरकारच्या संशोधकांनी जेव्हा ध्वनी प्रदूषणाच्या पीडितांना, गोंधळ करणाऱ्‍या लोकांविषयी त्यांना काय वाटते असे विचारले तेव्हा त्यांनी द्वेष, बदला आणि खून यांचाही उल्लेख केला. दुसऱ्‍या बाजूला पाहता, गोंधळ करणाऱ्‍या लोकांची वारंवार तक्रार केली जाते तेव्हा ते क्रोधित होतात. “आवाजामुळे इतरांच्या हिताविषयीची जाणीव कमी होते आणि क्रोध आणि वैरभाव निर्माण होतो,” असे एका आवाजविरोधी मोहिमेत भाग घेणाऱ्‍याचे म्हणणे आहे.

ज्यांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो अशांना हळूहळू तो सहन होईनासा होतो असे दिसून आले आहे. त्यांचे मत या स्त्रीसारखेच आहे जिचे शेजारी दिवस न्‌ रात्र अगदी मोठ्याने संगीत वाजवायचे: “तुम्हाला नको असलेला आवाज तुम्हाला नाइलाजाने ऐकावा लागतो तेव्हा ते हानीकारक ठरते. . . . आवाज थांबला तरी तो इतक्यात सुरू होईल हे माहीतच असायचं.”

मग ध्वनी प्रदूषणावर काही उपाय नाही का?

तुमच्या परीने प्रयत्न

जिकडे-तिकडे आवाज असल्यामुळे, आपण दुसऱ्‍यांना त्रास देत आहोत असे अनेक लोकांना जाणवतही नाही. त्यांना कळाले असते, तर त्यांनी हा त्रास निश्‍चितच थांबवला असता. म्हणून, गोंधळ घालणाऱ्‍या शेजाऱ्‍यांसोबत प्रेमाने बोलल्यास थोडाफार लाभ होऊ शकतो. एका व्यक्‍तीने दुसऱ्‍या एका व्यक्‍तीबद्दल तो गोंधळ करत असल्याची तक्रार नेहमी केल्यामुळे तो भयंकर चिडला. तो म्हणाला: “त्यांना आवाजाचा त्रास व्हायचा तर त्यांनी मला येऊन सांगायचं होतं.” एका आईने लहान मुलांसाठी एक पार्टी ठेवली असताना आवाजाचा त्रास होण्याची तक्रार घेऊन एक अधिकारी तिच्या घरी विचारपूस करायला आले तेव्हा तिला धक्काच बसला. “ज्यांनी तक्रार दिली त्यांनी जरा मला येऊन त्यांना त्रास होतोय असं सांगण्याची तसदी घेतली असती तर बरं झालं असतं,” असे ती म्हणाली. घरातल्या आवाजाबद्दल तक्रार करणाऱ्‍या ८० टक्के लोकांनी आपल्या शेजाऱ्‍यांना त्याविषयी काहीच सांगितलेले नव्हते हे पाहून एका ब्रिटिश पर्यावरण आरोग्य अधिकाऱ्‍याला आश्‍चर्य वाटले यात काही नवल नाही.

गोंधळ माजवणाऱ्‍या शेजाऱ्‍यांशी लोक बोलायला कचरतात यावरून आपापसाबद्दल आदरभाव नाही हे प्रकट होते. ‘मला संगीत लावायचंय तर मी लावीन. माझी मर्जी!’ हीच प्रतिक्रिया दाखवली जाईल असे त्यांना वाटते आणि सहसा तसेच घडते. त्यांनी आवाज जरा कमी करायला सांगितले तर गोंधळ करणारा शेजारी, तुम्ही दुसऱ्‍यांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसता असे म्हणेल आणि तेथे भांडण होईल अशी भीती त्यांना वाटते. सद्य काळातल्या समाजाचे हे किती दयनीय चित्र! हे अगदी बायबलमधल्या वर्णनासारखे आहे की, “कठीण दिवस येतील” आणि सर्वसामान्यपणे लोक ‘स्वार्थी, गर्विष्ठ, क्रूर आणि हूड’ बनतील!—२ तीमथ्य ३:१-४.

त्रासलेली व्यक्‍ती कशा तऱ्‍हेने समस्या मांडते यावर पुष्कळसे निर्भर करते. कंटाळून तक्रार केल्यामुळे जर त्रास देणारी व्यक्‍ती उलट तुमच्यावरच चिडली तर वातावरण कसे शांत करावे यासाठी वुमन्स वीकली पत्रिकेत पुढील उपाय दिला: “‘हे पाहा, मला माफ करा—माझा पारा चढला खरा पण मला झोप लागत नाही तेव्हा मी खरंच थकून जातो’ एवढेच फक्‍त शांत आणि समंजसपणे म्हटले तरी [विरोध करणाऱ्‍या शेजाऱ्‍यांशी] समेट करता येतो.” कदाचित ते आनंदाने आपली ॲम्प्लीफाईंग साधने भिंतीजवळून हलवून दुसरीकडे ठेवतील आणि आवाज कमी करतील.

खरे पाहता, शेजाऱ्‍यांसोबत चांगले नातेसंबंध ठेवल्याने आपलाच फायदा होतो. काही स्थानिक सरकारी अधिकारी दोन विरोधी शेजाऱ्‍यांमधल्या समस्या मिटवण्याकरता समेट घडवणारी सेवा पुरवतात. थेट अधिकाऱ्‍यांकडे जाऊन तक्रार केल्यामुळे निर्माण होणाऱ्‍या वैरभावाचा विचार करता, अधिकाऱ्‍यांकडून समस्या सोडवण्याला “अगदी शेवटचा पर्याय” समजावा.

तुम्ही घर बदलणार असल्यास, सगळेकाही नक्की करण्याआधी तेथे आवाजाचा काही त्रास होतो का याची आधीच चौकशी करून घेणे बरे राहील. स्थावर संपत्तीचे एजंट, दिवसातून वेगवेगळ्या वेळी नवीन घरी येऊन आवाजाचा काही त्रास आहे का ते पाहायला सुचवतात. तुम्ही शेजाऱ्‍यांकडेही विचारपूस करू शकता. नवीन घरात गेल्यावर समस्या निर्माण झाल्याच तर प्रेमाने त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. एकदमच तक्रार वगैरे करण्यावर उतरल्यावर वैरभाव निर्माण होतो.

पण तुमच्या शेजारचा परिसर खूप गोंधळाचा असला आणि दुसऱ्‍या ठिकाणी जाण्याचा काही मार्ग नसला तर? ही कायमचीच डोकेदुखी असणार का? तसे काही नाही.

आवाजापासून संरक्षण कसे मिळवावे

बाहेरचा आवाज घरात येऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता ते पाहा. भिंती आणि जमीन तपासून काही बिळे असली तर ती भरता येतील का ते पाहा. खासकरून इलेक्ट्रिक सॉकेटजवळची जागा पाहा. ती नीट बसवलेली आहेत का?

बहुधा दारे किंवा खिडक्यांमधून आवाज घरात शिरतो. खिडक्यांना दोन काचा (डबल ग्लेजिंग) लावून घेतल्यास कदाचित आवाज कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे दाराच्या कडेने जर फोमची एक पातळ पट्टी लावली तरी दार घट्ट बसेल. कदाचित समोर पोर्च बांधून दुसरा दरवाजा लावला तरीही तुमच्या घरातल्या खोल्यांमध्ये वाहतुकीच्या आवाजाचा त्रास होणार नाही.

वाहतुकीचा आवाज अधिकाधिक वाढत असल्यामुळे वाहनाचा आवाज कमी करण्यासाठी मोटार उत्पादक नवनवीन मटेरियल आणि पद्धती बनवण्याच्या सतत प्रयत्नात आहेत. तुमच्या वाहनाला कमी आवाज करणारे टायर बसवल्यासही मदत होऊ शकते. अनेक राष्ट्रांमध्ये, विविध रस्त्यांचा प्रयोग केल्यामुळे “विस्पर काँक्रीट” सारखी उत्पादने निर्माण करण्यात आली आहेत, जेथे काँक्रीटमधली थोडी खडी उघडी सोडली जाते आणि त्यामुळे त्या उघड्या खडीशी टायरचा जास्त संपर्क येत नाही. या रस्त्यांचा उपयोग केल्याने अहवालांनुसार हलक्या वाहनांचा २ डेसिबेलने आवाज कमी होतो, तर जड वाहनांचा १ डेसिबेलने आवाज कमी होतो. हे इतके काही खास वाटत नसले, तरी तीन डेसिबेल कमी होणे म्हणजे सरासरी निम्मा वाहतुकीचा आवाज कमी होण्यासारखा आहे!

आजकाल, रस्ता बांधणारे, असले महामार्ग बनवतात ज्यांच्या दोन्ही बाजूने कठडे असतात किंवा मातीचा ढीग असतो आणि आवाज कमी करण्यात हे खूप परिणामकारक ठरले आहे. असे करण्यासाठी जागा नसली, तरी खास कुंपणे असतात ज्यांमुळे महामार्गाजवळ राहणाऱ्‍या लोकांना अनावश्‍यक आवाजाचा त्रास होत नाही; पूर्व लंडनमध्ये ही कुंपणे वाळुंजाच्या फांद्या आणि सदापर्णीच्या झुडुपांना गुंफून बनवली आहेत.

पांढरा आवाज—विद्युत गोंगाट किंवा वारा सोडणे—असे विचलित करणारे आवाज ऑफिससारख्या ठिकाणी उपयुक्‍त ठरू शकतात.b जपानमध्ये, बाजारात विनाआवाजाचे पियानो आले आहेत. त्यातला हातोडा तारांवर आघात करण्याऐवजी एका इलेक्ट्रॉनिक सर्किटला क्रियाशील करतो जो वादकाच्या इयरफोनमध्ये नाद निर्माण करतो.

वैज्ञानिकांनी आधीच आवाजनिरोधकाच्या उत्पादनाच्या संशोधनात तास न्‌ तास घालवले आहेत. खरे म्हणजे, आवाजाचे परिणाम नाहीसे करण्यासाठी कंपन निर्माण करणारा दुसरा आवाज यात वापरला जातो. अर्थात, यासाठी अतिरिक्‍त साधने आणि खर्च लागतो आणि तसे पाहता यामुळे मूळ समस्येचे निरसन होत नाही. यु.एस.न्यूझ ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट म्हणते की, “आवाजाला जोपर्यंत श्राव्य कचरा समजला जात नाही तोपर्यंत केवळ आवाजनिरोधकानेच थोडीफार शांती मिळू शकते.” कदाचित हे खरेही असेल, पण शांतता हा ध्वनी प्रदूषणावरील उपाय आहे का?

तुमच्या घरात आणि शेजारच्या परिसरात कधी शांतता येण्याची खरीच काही आशा आहे का? आमच्या पुढील लेखात खरी आशा प्रदान केली आहे.

[६ पानांवरील चौकट]

तुम्ही दंगा करणारे शेजारी न होण्याचे कसे टाळू शकता

● आवाज निर्माण होणारे असे काही तुम्ही करणार असल्यास शेजाऱ्‍यांचा विचार करा आणि त्यांना आधीच त्याची सूचना द्या.

● शेजाऱ्‍याने आवाज कमी करायला सांगितल्यास त्यांच्याशी सहकार्य करा.

● याची जाणीव असू द्या की तुमचा आनंद शेजाऱ्‍यांसाठी त्रासदायक ठरू नये.

● लक्षात असू द्या की, खोल्यांतून आणि जमिनीतून आवाज आणि कंपन सहजगत्या ऐकू येते.

● आवाज होणाऱ्‍या घरगुती साधनांखाली एखादे पॅडिंग ठेवा.

● घरातले किंवा कारमधले चुकून सुरू झालेले अलार्म बंद करायला कोणी तरी असेल याची खात्री करा.

● रात्री उशिरा कोणतेही आवाज होणारे काम करू नये किंवा आवाज करणारी घरगुती साधने वापरू नयेत.

● तुमच्या शेजाऱ्‍यांचे डोके उठेल इतक्या जोरात संगीत वाजवू नका.

● घरातल्या कुत्र्यांना खूप वेळेपर्यंत एकटेच राहू देऊ नका.

● तुमच्या मुलांना फरशीवर उड्या मारायला परवानगी देऊ नका ज्यामुळे खाली राहणाऱ्‍या लोकांना त्रास होईल.

● रात्रीच्या वेळी मोटारीचे हॉर्न वाजवू नका, दरवाजे आपटू नका किंवा गाडी जोरात चालवू नका.

[७ पानांवरील चौकट]

आवाज आणि तुम्ही

“आज ब्रिटनमध्ये आवाज हा सर्वात व्यापक औद्योगिक धोका आहे आणि बहिरेपणा हा त्याचा सर्वात सामान्य परिणाम आहे,” असे द टाईम्स सांगते. काही व्यवसाय-आरोग्य अभ्यास असे दाखवून देतात की, ८५ डेसिबेलपेक्षा अधिक आवाजामुळे भ्रूणाला हानी पोचू शकते. बालकाच्या श्रवणशक्‍तीला इजा पोचते आणि त्या बालकामध्ये काही होर्मोनल बिघाड त्याचप्रमाणे जन्मदोष निर्माण होऊ शकतात.

उच्चस्वरी आवाजामुळे रक्‍तवाहिन्या आकुंचन पावतात आणि तुमच्या अवयवांना योग्य तितका रक्‍त पुरवठा होत नाही. शिवाय, त्यामुळे तुमच्या शरीरात होर्मोन्स सोडली जातात ज्यामुळे रक्‍तदाब वाढतो आणि हृदयाचे ठोके वाढतात आणि काहीवेळा तर हृदय धडधडू लागते किंवा हृदयात तीव्र चमकाही उठतात.

आवाजामुळे तुमचा नित्यक्रम बिघडतो तेव्हा इतर समस्या उद्‌भवण्याची शक्यता असते. झोपमोड झाल्यामुळे दिवसातल्या कामकाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आवाजामुळे तुमच्या कामाच्या गतीमध्ये फारसा बदल होत नसला तरीही तुम्ही किती चुका करता यावर मात्र त्याचा परिणाम होऊ शकतो.

[९ पानांवरील चौकट]

कामाच्या ठिकाणी सुरक्षा

कामाच्या ठिकाणी तुम्हाला आवाजाचा त्रास होत असल्यास, कानासाठी काही संरक्षण वापरण्याचा विचार करा.c इयरमफ अगदी हेडफोनसारखे बसतात आणि आवाज जेथे फारच मोठा असतो तेथे उपयोगी ठरतात. ते घालूनही तुम्हाला लोकांचे बोलणे आणि मशिनचे संकेत ऐकू येतात पण फक्‍त आवाज कोणत्या दिशेने येतोय हे जाणणे कठीण होते. इयरप्लग तुमच्या कानामध्ये नीट बसतील अशी असावीत पण तुम्हाला कानाचा काही रोग किंवा श्रवणनलिकेत त्रास होत असल्यास ती उचित ठरणार नाहीत.

यंत्रांची उत्तम देखभाल केली तर कंपने कमी होऊ शकतात. यंत्रांना रबरी शीटवर ठेवले किंवा जास्त आवाज होणाऱ्‍या यंत्रांना वेगळ्या ठिकाणी ठेवले तरी ध्वनी प्रदूषण कमी होऊ शकते.

[८ पानांवरील चित्र]

आजच्या वाहन समाजामुळे निर्माण होणाऱ्‍या आवाजापासून तुम्ही स्वतःचे संरक्षण कसे करू शकता?

[तळटीपा]

a बहुधा डेसिबेलमध्ये आवाजाचे मापन करणाऱ्‍या मापक यंत्राद्वारे ध्वनीची पातळी ठरवली जाते. आपल्या कानाला काही वारंवारता इतर वारंवारतांपेक्षा अधिक स्पष्टतेने ऐकू येत असल्यामुळे, मापकही त्यानुसारच बनवलेले असते.

b पांढरा प्रकाश ज्याप्रमाणे प्रकाशाच्या पंक्‍तीमधल्या वेगवेगळ्या रंगांचे मिश्रण असते त्याचप्रमाणे पांढरा आवाज म्हणजे ऐकू येणाऱ्‍या सर्व वारंवारतांचा ध्वनी असतो.

c काही राष्ट्रांच्या कायद्यांतर्गत, आपल्या कामगारांनी उचित श्रवण संरक्षण घातल्याची मालकांनी खात्री करावी अशी अपेक्षा केली जाते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा