शांतता कधी असेल का?
परदेशी जाऊन सुटी घालवताना नेमके आपण कशाच्या शोधात असता असा प्रश्न केला असता, ४ पैकी जवळजवळ ३ ब्रिटिश पर्यटकांचे उत्तर होते, “शांती.” पण, ध्वनी प्रदूषण ही जागतिक समस्या असल्यामुळे अनेकांना खरी शांती म्हणजे स्वप्नच आहे असे वाटते.
ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत खरे पण संपूर्ण यश मिळेल असा विश्वास धरणे वास्तविक ठरेल का असा तुम्ही विचार करत असाल. तुमच्याप्रमाणे ज्यांना ही गोष्ट चिंतेची वाटत नाही त्यांच्याविषयी काय?
मात करावयाचे अडथळे
विरोध करणाऱ्या लोकांशी बोलणेच कठीण असते तर त्यांना तुमचा दृष्टिकोन समजावून सांगणे दूरचीच गोष्ट समजा. रॉन राहायचा तेथे गोंधळ माजवणाऱ्या किशोरवयीनांची एक टोळकी जमायची, तेव्हा त्याने आपणहून त्यांच्याशी मैत्री केली. त्याने त्यांची नावे जाणून घेतली. एकदा तर त्याने एकाची सायकल सुद्धा दुरुस्त करून दिली. तेव्हापासून त्याला त्यांच्याकडून काहीच त्रास झाला नाही.
मार्जरीची गोष्ट पाहा, ती एकटी पालक असून तिची एक किशोरवयीन मुलगी आहे आणि तिच्या दोन्हीकडच्या शेजाऱ्यांच्या घरात नुसता दंगा चाललेला असतो. वरती राहणाऱ्यांच्या घरात गालिचा नाही. आणि म्हणून जेव्हा मुले रोलर स्केटिंग करतात, बॉल खेळतात, किंवा पलंगावरून साधी उडी मारतात तेव्हासुद्धा तिला त्रास होतो. त्यातल्या त्यात, त्या मुलांची आई घरी उंच टाचेचे बूट घालते. मार्जरीने अगदी प्रेमाने आपल्या शेजारणीला आवाज कमी करायला सांगितले, पण तिला तिची भाषा समजत नसल्यामुळे काही फायदा झाला नाही. ही समस्या सोडवायला स्थानिक नगरपालिका मंडळ एक भाषांतरकार पाठवायला तयार झाले आणि म्हणून मार्जरी आता काहीतरी सुधारणा होण्याची वाट पाहत आहे.
खालच्या मजल्यावर राहणारा माणूस दररोज सकाळी सात ते आठच्या दरम्यान अगदी मोठ्याने संगीत चालवतो; त्या संगीतातले ठोके एकसारखे ऐकू येतात. ती कुशलतेने त्याच्याशी बोलली तेव्हा ‘माझ्या कामासाठी माझा मूड चांगला व्हावा म्हणून मी लावतो’ असे तिला उत्तर मिळाले. मग मार्जरी काय करते?
“मी आत्मसंयमी आणि सहनशील असण्याचा प्रयत्न करतेय,” असे ती म्हणते. “मी माझ्या नित्यक्रमात जरा बदल केलाय, आवाज असला तरी मी वाचन करत बसते. मग माझं मन लगेचच वाचनात रमून जातं असं मी पाहिलंय. तेव्हा आवाजाचा मला इतका त्रास होत नाही.”
दुसऱ्या एका उदाहरणात, हेथरच्या घरासमोर एक नाईटक्लब आहे; रात्रभर धिंगाणा झाल्यावर सकाळी सहाला तो क्लब बंद होतो. तिने काही काळानंतर स्थानिक अधिकाऱ्यांना तक्रार केल्यावरही फारसे काही करण्यात आलेले नाही.
आवाज नाहीसा होणार?
“अनेक लोकांना एकदमच शांत वातावरण नकोसे आणि भीतीदायक वाटते,” असे ब्रिटनच्या मेडिकल रिसर्च काऊन्सिल्स इंन्स्टिट्यूट ऑफ हियरिंग रिसर्चचे डॉ. रॉस कोल्स यांचे निरीक्षण आहे. पक्ष्यांची मंजूळ गाणी, समुद्रकिनाऱ्यावर लाटांचा चाललेला अलगद खेळ, मुलांचे आनंदाने ओरडणे-किंचाळणे—या तसेच इतर आवाजांमुळे आपण प्रसन्न होतो. आपल्याला आता जराशी शांतता हवी असली तरी गप्पागोष्टी करणाऱ्या हितकारक मित्रमैत्रिणींसोबत राहायला मात्र आपल्याला आवडते. देवाने आपल्या विश्वासू सेवकांकरता शांती पुरवण्याचे वचन दिले आहे.
बायबलमध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:११) देवाचे स्वर्गीय राज्य सरकार लवकरच मानवी व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करणार आहे. (दानीएल २:४४) मग, ख्रिस्त येशूच्या शासनाधीन “चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांति” वास करील.—स्तोत्र ७२:७; यशया ९:६, ७.
ईश्वरी हस्तक्षेपाने आपल्या सर्वांना इच्छित असलेली शांतता पुन्हा मिळवून दिली जाईल ही खात्री तुम्ही बाळगू शकता ज्याप्रमाणे देवाचा संदेष्टा, यशया याने भाकीत केले: “नीतिमत्तेचा परिणाम शांति व तिचे फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. आणि माझे लोक . . . सुखाश्रमांत राहतील.”—यशया ३२:१७, १८.
आता देखील तुम्ही तुमच्या परिसरातल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये आध्यात्मिक शांतता अनुभवू शकता. काही प्रसंगी, मोठमोठाल्या अधिवेशनांमध्ये जरी हजारो लोक उपासनेसाठी एकत्र आले असले—आणि या मेळाव्यांमध्ये ‘पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांचा गोंगाट’ असला तरी तो कलकलाट त्रासदायक नव्हे तर आनंददायक वाटतो. (मीखा २:१२, पं.र.भा.) स्थानिक साक्षीदारांची भेट घेऊन किंवा त्यांच्याशी संपर्क साधायला या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील पत्त्यावर पत्र पाठवून तुम्ही स्वतःच त्याचा अनुभव घेऊन पाहा. सध्या त्याचप्रमाणे अनंतकाळासाठी त्यांच्या सहवासात खरी शांतता अनुभवा.