वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ११/८ पृ. २५-२७
  • माझ्या भावाकडेच लक्ष का दिलं जातं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • माझ्या भावाकडेच लक्ष का दिलं जातं?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ते पक्षपात का करतात
  • असमान वागणूक—एक अन्याय?
  • समंजस असण्यास शिकणे
  • मी पक्षपाताचा सामना कसा करू शकते?
    सावध राहा!—१९९७
  • माझ्या भावासोबत आणि बहिणीसोबत माझे का जमत नाही?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • माझ्या भावंडाच्या सावलीतून मी कशी मुक्‍त होऊ शकते?
    सावध राहा!—२००४
  • माझे पालक मला का समजून घेत नाहीत?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ११/८ पृ. २५-२७

तरुण लोक विचारात  . . .

माझ्या भावाकडेच लक्ष का दिलं जातं?

“एक गोष्ट मला सतत डिवचत राहते आणि ती म्हणजे, माझी भावंडं बेशिस्त वागतात तेव्हा—सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे त्यांच्याकडे काही अधिकच लक्ष दिलं जातं. पण मी मात्र गरीब गायीप्रमाणं सगळं काही ऐकून घेत असल्यामुळं माझ्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं.”—१८-वर्षांची कविता.a

“माझ्या भावंडांकडे जास्तच लक्ष दिलं जातं आणि इतकंच नाही तर त्यांना चांगलं वागवलंही जातं. माझ्याकडे कधी लक्ष दिलं असेल तर ते निव्वळ सल्ल्याच्याच स्वरूपात. त्यांनाही सल्ला दिला जातो, हे जाणून मला बरं वाटलं असतं.”—१५-वर्षांची लता.

“मला असं वाटतं, की माझ्या थोरल्या भावंडांना अधिक विशेषाधिकार मिळतात आणि त्यांच्याकडे अधिक लक्षही दिलं जातं.”—१३-वर्षांचा विनोद.

आपण जन्मलो अगदी त्या दिवसापासूनच, आपल्या पालकांनी आपल्याकडे लक्ष द्यावे असेच आपल्याला वाटत असते. आणि मग, त्यापैकीचा तुमचा माफक वाटा तुम्हाला मिळत नाही, असे वाटते तेव्हा तुमच्या पोटात तुटते व तुम्हाला रागही येतो, हे समजण्याजोगे आहे. विषेशकरून असे तेव्हा वाटते जेव्हा तुमचे बहीणभाऊ—मग ते सर्वांत थोरले असोत, किंवा धाकटे, शिष्टाचारी असोत किंवा सर्वांत आज्ञाभंजकही असोत—ते नेहमीच सर्वांच्या अवधानाचे केंद्र असतात. दाविदाला वाटले तसे तुम्हालाही कदाचित वाटेल; त्याने लिहिले: “स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे. फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे.”—स्तोत्र ३१:१२.

तुम्हाला हवे असणारे लक्ष तुमच्या बहिणीला अथवा भावाला दिले जात असल्याचे पाहून तुम्ही कदाचित सद्‌गतीत व्हाल. परंतु, याचा अर्थ तुमच्यावर प्रेम केले जात नाही असा होतो का? निश्‍चितच नाही. काहीवेळा युवक हरहुन्‍नरी व मनमोकळ्या स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्याकडे अतिरिक्‍त लक्ष दिले जाते. ११ वर्षांचा मोहन म्हणतो: “माझा धाकटा भाऊ, कुमार केवळ तिसरीत आहे पण तरी पाचवीतील विद्यार्थ्यांच्या बँडमध्ये तो सामील आहे. खेळात आणि गणिताच्या विषयात देखील तो सगळ्यांना मागे पाडतो. खरं तर, शाळेत प्रत्येक विषयात त्याला ‘ए’ ग्रेड मिळालाच पाहिजे. कधीकधी असा एक विचार माझ्या मनाला शिवून जातो, की लोक माझ्यापेक्षा जास्त त्याच्यावरच प्रेम करतात, पण त्यामुळं मला त्याचा हेवा वाटत नाही. तरी काळजाच्या आत, खोल कुठंतरी त्याच्याविषयी थोडा का होईना, हेवा वाटतोच.”

मग असेही काही तरुण आहेत जे केवळ थोरले अथवा धाकटे असल्यामुळे त्यांना आपल्या पालकांच्या वेळातला सिंहाचा वाटा मिळतो. योसेफ या तरुणाविषयी बायबल म्हणते: “इस्राएल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीति करीत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता.” (उत्पत्ति ३७:३, ४) दुसऱ्‍या बाजूला पाहता, १८ वर्षांच्या टॉडला वाटले, की त्याचा भाऊ थोरला असल्यामुळे त्याच्यावर अधिक प्रेम केले जाते. तो आठवून सांगतो: “एकदा शाळेच्या प्रोजेक्टसाठी आम्हाला आमच्या लहानपणाचा एक आवडता फोटो आणण्यास सांगितलं होतं. मला माझे बोटावर मोजण्याइतकेच फोटो घरात सापडले, पण माझ्या थोरल्या भावाचे मात्र भरमसाट फोटो होते. त्या गोष्टीवरून माझ्या मनात प्रश्‍नांचं चक्र सुरू झालं.”

तथापि, तुम्हाला कदाचित पुसटशी देखील कल्पना नसेल अशा एखाद्या बहिणीच्या अथवा भावाच्या काही समस्या असल्यामुळे तिच्याकडे अथवा त्याच्याकडे वाजवीपेक्षा जास्तच लक्ष पुरवले जात असेल. सध्या २२ वर्षांची कमल खुलासा करते: “मी सुमारे १६ वर्षांची होते तेव्हा माझा थोरला भाऊ एका कठीण काळातून वाटचाल करत होता. तो खरोखरच यहोवाची सेवा करू इच्छित होता की नाही त्याबद्दल तो स्वतःच साशंक होता, आणि माझ्या आईबाबांनी आपलं सर्वस्वी लक्ष त्याच्याकडे पुरवलं होतं. त्यावेळी मला याचं कारण समजलं नव्हतं. मला असं वाटलं जणू त्यांना माझी काडीमात्रही काळजी नव्हती. त्यामुळं असूरी दुःखाच्या डोहात लोटल्यासारखं, वाऱ्‍यावर सोडल्यासारखं—काहीसं वेडंपिसं देखील मला वाटलं.”

ते पक्षपात का करतात

काहीवेळा पालक उघडउघड पक्षपात करत असल्यामुळे दोषास पात्र ठरतात. एका आईने कबूल केले: “आम्हाला आमच्या मुलीबद्दल जे कोडकौतुक वाटतं त्याची, माझा मुलगा, पॉल याला भेदक जाणीव आहे हे मला ठाऊक आहे. त्यानं आमच्या तोंडावर, परखडपणे सांगितलं, ‘जेव्हा केव्हा लीज काही म्हणते तेव्हा तू आणि पप्पा नेहमीच एकमेकांना डोळ्यांनी खुणवता.’ तो काय म्हणत होता ते सुरवातीला आम्हाला समजलंच नाही. पण नंतर कुठं आम्हाला कळून चुकलं की, ‘आहे की नाही आपली लेक अजब!’ असं सूचित करण्यासाठी आम्ही नेहमीच एकमेकांना डोळ्यांनी खुणवत असू. त्यानं ही गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली, तेव्हापासून तसलं काहीही न करण्याचाच आमचा खरा प्रयत्न राहिला आहे.”

पण प्रश्‍न असा आहे, की पालक पक्षपात करतातच का? कदाचित, त्यांचे ज्याप्रकारे संगोपन करण्यात आले आहे ते यामागील एक कारण असू शकते. उदाहरणार्थ, शेंडेफळ म्हणून तुमच्या आईचे संगोपन झाले असेल तर ती आपल्या शेंडेफळाशी निकटचे साधर्म्य दर्शवील. तीळमात्र जाणीव नसताना, त्याचीच कड घेण्याकडे तिचा कल असेल. किंवा मग, एकसारखाच स्वभाव किंवा समान आवडीनिवडी असल्यामुळे त्या लेकराशी कदाचित पालकांची अधिक जवळीक असेल. याकोब व एसाव, या आपल्या जुळ्या पुत्रांसंबंधी इसहाक व रिबकेविषयी बायबल काय सांगते ते लक्षात घ्या: “ते मुलगे मोठे झाले एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला; व याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. एसाव हरणाचे मांस आणीत असे ते इसहाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता, आणि याकोब रिबकेचा आवडता होता.”—उत्पत्ति २५:२७, २८.

तुमचे पालक तुमच्या एखाद्या बहिणीवर अथवा भावावर अधिकच प्रेम करत असल्याचे दिसून आल्यास काय?b अशावेळी त्यांच्यावर दोष लावण्याच्या मार्गाने नव्हे तर शांतीने त्यांच्याशी त्याबद्दल बोलावे. (नीतिसूत्रे १५:२२) आदराने त्यांचे ऐकल्याने तुम्ही त्यांच्या नजरेतून गोष्टी पाहू शकाल. यामुळे तुमची निराशा शमविण्यास मदत मिळेल. (नीतिसूत्रे १९:११) एक किशोरवयीन म्हणते: “माझी मम्मी माझ्यापेक्षा माझ्या भावावरच अधिक प्रेम करत असल्यामुळं मला खरोखर चीड यायची. मी याबद्दल तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं, की तो जास्त पप्पांसारखा दिसत असल्यामुळं ती सहजासहजी त्याच्याकडे आकृष्ट होते. आणि मी जास्त तिच्यासारखी दिसत असल्यामुळं पप्पा माझ्याकडे आकृष्ट होतात. त्याचप्रमाणे, आम्ही दोघीही पुष्कळशा बाबतीत एकमेकींसारख्याच असल्यामुळं आम्ही एकमेकींना अक्षरशः चिरडीस आणत असतो. आणि माझे पप्पा आणि भाऊ एकमेकांसारखे असल्यामुळं ते तर एकमेकांना भंडावून सोडतात. एकदा तिनं मला असं स्पष्टीकरण दिलं—मला ते फारसं भावलं नसलं तरी—मी ते मान्य करू शकले.”

असमान वागणूक—एक अन्याय?

तथापि, पालक सर्वांना एकसारखीच वागणूक का देऊ शकत नाही बरे? सध्या १८ वर्षांची बीना म्हणते: “मी १३ वर्षांची होते तेव्हा मला आणि माझ्या भावाला समान वागवले जावे—अगदी एकसारखेच, असंच मला वाटायचं. परंतु, येऊन-जाऊन मलाच खडसावलं जायचं आणि त्याचं मात्र सर्व काही सहन केलं जायचं. शिवाय, पप्पांबरोबर कार दुरुस्त करण्यात तो अधिक वेळ घालवू लागला. ते फारच अन्यायी वाटायचं.”

परंतु, असमान वागणूक ही नेहमीच अन्यायी नसते. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना कसे वागवले त्याचा जरा विचार करा. प्रश्‍नच नाही, की सर्व १२ जणांवर त्याचे प्रेम होते, पण तरी याईराच्या मुलीचे पुनरुत्थान, तसेच त्याचे रूपांतर यांबरोबरच काही खास घटना प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्याने केवळ ३ जणांनाच सोबत घेतले होते. (मत्तय १७:१; मार्क ५:३७) याशिवाय, प्रेषित योहानाबरोबर येशूचे एक खास स्नेहबंधन होते. (योहान १३:२३; १९:२६; २०:२; २१:७, २०) हे असमान होते का? निश्‍चितच. पण अन्याय होता का? निश्‍चितच नाही. कारण येशू काही विशिष्ट लोकांकडे विशेष आकृष्ट झाला असला तरी, इतर प्रेषितांच्या गरजांकडे मात्र त्याने डोळेझाक केली नाही.—मार्क ६:३१-३४.

अशाच प्रकारे, तुमच्या एखाद्या भावाकडे अथवा बहिणीकडे त्यांचे हुन्‍नर, व्यक्‍तिमत्त्व किंवा त्याच्या अथवा तिच्या गरजांमुळे विशेष लक्ष दिले जात असेल. ते पाहणे साहजिकच क्लेशकारक असू शकते. परंतु, प्रश्‍न असा आहे, की तुमच्या गरजांकडे खरोखरच डोळेझाक केली जात आहे का? तुम्हाला तुमच्या पालकांच्या सल्ल्याची, मदतीची किंवा पाठबळाची गरज असते तेव्हा तुम्हाला मदत करण्यासाठी ते तयार असतात का? असल्यास, तुम्ही खरोखरच असे म्हणू शकता का, की तुम्ही अन्यायाचे बळी आहात? इतरांबरोबर ‘त्यांच्या गरजांनुसार’ व्यवहार करण्याचे उत्तेजन बायबल आम्हाला देते. (रोमकर १२:१३) तुम्ही आणि तुमची भावंडे विविध गरजा असणाऱ्‍या व्यक्‍ती असल्यामुळे, सर्व प्रसंगी तुम्हाला एकसारखी वागणूक देणे ही तुमच्या पालकांकरता अशक्य कोटीतील बाब आहे.

आधी उल्लेखिलेल्या बीनाला कळून चुकले, की असमान वागणूक नेहमीच अन्यायी नसते आणि अन्याय म्हणजे नेहमीच असमान वागणूक नसते. ती म्हणते: “मला हे समजलं की मी आणि माझा भाऊ दोन वेगवेगळ्या व्यक्‍ती असून आम्हाला वेगळंच वागवण्याची गरज आहे. मागं वळून पाहताना, मी लहान होते तेव्हा ही गोष्ट मला कशी समजली नाही, याचा मलाच विश्‍वास बसत नाही. मला वाटतं, त्या वयात आपण ज्याप्रकारे गोष्टींकडे पाहतो तेच या मागचं कारण असावं.”

समंजस असण्यास शिकणे

होय, “आपण ज्याप्रकारे गोष्टींकडे पाहतो” त्याचा, एखाद्या परिस्थितीसंबंधी तुम्ही जी प्रतिक्रिया दर्शविता याच्याशी खूपसा संबंध आहे. रंगीत चष्म्यातून पाहिल्यासारखे, तुम्हाला ज्याप्रकारे गोष्टी दिसतात त्यांस तुमच्या भावना विरूप करू शकतात. आणि मग पालकांच्या अवधानाची व पसंतीची भावनिक गरज अनावर होते. संशोधक, स्टीवन बँक आणि मीकल कॉन असे निरीक्षण करतात: “भिन्‍न असलेल्या आपल्या मुलांना, पालक निःपक्षपातीपणे वागवण्याचे अशक्यप्राय स्वप्न सत्यात उतरवू शकले असते तरी देखील प्रत्येक मुलाला असंच वाटलं असतं, की पालक दुसऱ्‍या मुलावरच अधिक प्रेम करत आहेत.”

उदाहरणार्थ, सुरवातीच्या तीन्ही युवकांनी जे काही म्हटले त्याकडे पुन्हा एकवार लक्ष द्या. त्यांची परिस्थिती खेदजनक वाटेल, परंतु सत्य असे आहे की, ती सख्खी भावंडं आहेत! होय, प्रत्येकाला असे वाटते, की इतरांकडेच अधिक लक्ष दिले जाते व त्यामुळे आपली उपेक्षा केली जाते! बहुतेक वेळा मग, गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन थोडाफार विकृत बनतो. नीतिसूत्रे १७:२७ म्हणते: “ज्याची वृत्ति शांत तो समंजस असतो.” समंजस असणे म्हणजे, भावनेच्या आहारी जाऊन नव्हे तर वास्तविकपणे, वस्तुनिष्ठपणे गोष्टींकडे पाहणे. समंजसपणामुळे तुम्हाला याची जाणीव होईल, की तुमचे पालक तुम्हाला एकसारखी वागणूक देत नसले तरी त्यांच्या मनात तुम्हा सर्वांविषयीच कल्याणकारक विचार आहेत! ही जाणीव राखल्यामुळे, राग व कटूता टाळण्यास तुम्हाला मदत करील.

तथापि, तुम्हाला अवधानाचा तुमचा हक्काचा वाटा मिळत नाही असे खरेच दिसत असल्यास काय? तुम्ही काय करू शकता? सावध राहा! याच्या आगामी अंकात हे विचारात घेतले जाईल.

[तळटीपा]

a काही नावे बदलली आहेत.

b पक्षपाताचा सामना कसा करावा याविषयी आगामी लेखात अधिक सविस्तर चर्चा केली जाईल.

[२६ पानांवरील चित्र]

असमान वागणूक अन्यायी वाटेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा