वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ११/८ पृ. १२-१५
  • डाऊन अंडर येथे जीवनच निराळे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डाऊन अंडर येथे जीवनच निराळे
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • युरोपियन वसाहतीकरण
  • लोकही निराळे
  • वाहतूक—एक मुख्य फरक
  • निराळे हवामान
  • इतर निराळ्या गोष्टी
  • खुले विस्तार
सावध राहा!—१९९७
g97 ११/८ पृ. १२-१५

डाऊन अंडर येथे जीवनच निराळे

ऑस्टेलियामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

“डाऊन अंडर” हा एक इंग्रजी शब्दप्रयोग आहे, जो अलीकडील वर्षांत अनेकांच्या परिचयाचा झाला आहे. पण डाऊन अंडर म्हणजे नेमके काय? विषुववृत्ताच्या खाली असणाऱ्‍या देशांच्या संदर्भात हा शब्दप्रयोग वापरण्यात येतो. शास्त्रशुद्ध अर्थाने, दक्षिण गोलार्धातील सर्व देश ‘डाऊन अंडरमध्ये’ मोडतात. पण सहसा फक्‍त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड याच देशांच्या संदर्भात हे संबोधन वापरण्यात येते. या लेखात विशेषतः ऑस्ट्रेलिया विचारात घेतले जाईल; ऑस्ट्रेलिया हे नाव “दक्षिण” या अर्थाच्या ऑस्ट्रॅलिस या लॅटिन भाषेतील शब्दापासून आले आहे.

ऑस्ट्रेलियातील जीवन उत्तर गोलार्धातील इतर अनेक देशांतील जीवनापेक्षा वेगळे आहे. आणि हे केवळ भौगोलिक स्थितीमुळे नाही; इतरही अनेक बाबतीत येथे वेगळेपणा आढळतो, जो पर्यटकांच्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही.

युरोपियन वसाहतीकरण

या विस्तीर्ण कोरड्या देशात १७८८ साली युरोपियन वसाहतीकरण सुरू झाले. फर्स्ट फ्लीट नावाची काही जहाजे सिड्‌नी कोव येथे येऊन थांबली. या जहाजांतील अधिकांश प्रवासी हे इंग्लंड, आयर्लंड, आणि स्कॉटलंड येथील शिक्षा झालेले गुन्हेगार असल्यामुळे ते आपल्यासोबत इंग्रजी भाषा घेऊन आले होते. पुढच्या १५० वर्षांपर्यंत, स्थानांतर करून येथे येणारे बव्हंशी लोक ब्रिटिश होते.

दुसऱ्‍या जागतिक महायुद्धानंतर मात्र परिस्थिती बदलली. आज, येथे कितीतरी वेगवेगळ्या देशांतून आलेले हजारो “नव ऑस्ट्रेलियन” आढळतात; पैकी इटली आणि ग्रीस येथून आलेल्यांची संख्या सर्वात मोठी आहे. आपआपल्या देशांच्या भाषा, इंग्रजीचे वेगळेच उच्चारण, शिवाय त्यांच्या देशांतील खास खाद्यपदार्थ, संस्कृती इत्यादी सोबत आणल्यामुळे या स्थानांतर करून येणाऱ्‍यांनी ऑस्ट्रेलियातील सामान्य जीवनात कितीतरी रंग भरले आहेत.

येथे ऐकायला मिळणाऱ्‍या अनेकविध उच्चार पद्धतींमागचे कारणही हेच आहे. पण वाडवडिलांच्या काळापासून येथे स्थायिक असणाऱ्‍यांच्या इंग्रजीचीही उच्चारपद्धती आणि बोलण्याची ढब वेगळीच आहे. ए, ई, आय, ओ, यू या इंग्रजी स्वरांचे ऑस्ट्रेलियन उच्चारण काहीसे सपाट, चटकन न समजणारे असे असल्यामुळे ऐकणाऱ्‍याला नीट समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. याशिवाय, ऑस्ट्रेलियात असेही काही खास शब्दप्रयोग आहे, जे केवळ येथेच आढळतात. उदाहरणार्थ, “गुड मॉर्निंग” किंवा “गुड ईव्हनिंग” यांपेक्षा येथे लोक एकमेकांना भेटतात तेव्हा “गुड डे, मेट,” असे अभिवादन करताना आढळतात, मग त्या वेळेस सकाळ असो किंवा संध्याकाळ! शिवाय या अभिवादनासोबतच, “हाउ येर गोइन, मेट, ऑराइट?,” असे म्हणून एकमेकांच्या तब्येतीविषयी देखील विनयशीलपणे विचारपूस करण्याची येथे पद्धत आहे.

लोकही निराळे

येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची प्रवृत्ती आणि प्रचंड मनोधैर्य यांशिवाय या रुक्ष प्रदेशात टिकून राहणे शक्यच नव्हते. अनेक ऑस्ट्रेलियन लोक स्वभावतःच आशावादी असण्यामागचे कारण कदाचित हेच असावे आणि म्हणूनच कदाचित, “शी विल बी राइट, मेट!” हा वाक्प्रचार येथे अस्तित्वात आला असावा. या वाक्प्रचाराचा असा अर्थ होतो की परिस्थिती कितीही निराशाजनक भासत असली तरीसुद्धा माणसाने काळजी करत बसू नये, कारण शेवटी सर्वकाही सुरळीत होईलच.

दी ऑस्ट्रेलियन्स या प्रकाशनाच्या प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे: “साखळ्यांनी जखडलेल्या अवस्थेत जन्माला आलेला जो देश अवघ्या दोनशे वर्षांत, लहान देशांच्या यादीतला सर्वात सशक्‍त आणि समृद्ध देश बनतो, त्या देशातून काही लक्षवेधक आणि बहुविध व्यक्‍तिमत्त्वे सामोरी येतील, हे तर अपेक्षितच आहे. . . . अगदी अशाच व्यक्‍तिमत्त्वांचे आहेत . . . दी ऑस्ट्रेलियन्स.”

मागील दोन शतकांदरम्यान अनेक कठीण परिस्थितींतही टिकून राहण्याच्या तीव्र इच्छेमुळेच परस्परांविषयी ही बंधुत्वाची भावना उत्पन्‍न झाली आहे, असे अनेक ऑस्ट्रेलियन लोकांचे मत आहे. पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलियन सैनिकांच्या चिकाटीचे ते उदाहरण देतात. न्यूझीलंडच्या सशस्त्र सैन्यासोबत लढणाऱ्‍या या सैनिकांचे, Australian and New Zealand Army Corps (ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंड सैनिक दल) या त्यांच्या नावातील पहिल्या अक्षरांवरून Anzacs हे संक्षिप्त नाव पडले. “डिगर्स” (खोदणारे) या नावानेही ते प्रसिद्ध झाले होते; पण, हे नाव युद्धांतील खंदक खोदण्याच्या संदर्भात होते किंवा १८०० च्या शतकात ऑस्ट्रेलियातील ज्या सोन्याच्या खाणींनी अनेकांना आकर्षित केले होते, त्यांच्या संदर्भात होते हे निश्‍चित सांगता येणार नाही.

वाहतूक—एक मुख्य फरक

ज्या देशांत वाहतूक रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहते तेथील लोक ऑस्ट्रेलियाला येतात तेव्हा त्यांचा चांगलाच गोंधळ होतो. येथे सबंध देशभर, वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवली जातात.

जेथे उजव्या बाजूने वाहतूक वाहते अशा देशातून तुम्ही ऑस्ट्रेलियाला आला असल्यास, वाहत्या रस्त्यावरून पहिल्यांदा चालणे जरा धोकेदायकच आहे. रस्ता ओलांडताना जर नेहमीच्या सवयीप्रमाणे, ‘पहिल्यांदा डावीकडे पाहा, मग उजवीकडे आणि मग पुन्हा डावीकडे पाहा’ हा नियम तुम्ही पाळला तर पस्तावण्याची पाळी येऊ शकते. येथे रस्ता ओलांडण्याआधी लक्षात असू द्या, ‘पहिल्यांदा उजवीकडे पाहा, मग डावीकडे आणि मग पुन्हा उजवीकडे.’ शाब्बास! भराभर शिकताहात तुम्ही. अरे अरे! कारमध्ये बसताना गोंधळलात ना. या देशात ड्रायव्हर गाडीच्या उजव्या बाजूला बसतो हे विसरलात की काय!

निराळे हवामान

डाऊन अंडरच्या प्रदेशात उत्तर गोलार्धातील ऋतूंच्या उलट ऋतू असतात. उष्ण, कोरडे वारे उत्तर आणि वायव्य दिशेकडून येतात पण गारठा मात्र नेहमी दक्षिणेकडूनच येतो. थंड वारे उत्तरेकडून वाहतात हे गणित येथे नाहीच; पण दक्षिणेकडून मात्र अचानक अतिशय थंड वाऱ्‍यांची वादळे येतात, यामुळे हवेत गारठा येतो आणि कधी कधी तर हिमवर्षा आणि बर्फाची वादळे देखील येतात.

ऑस्ट्रेलिया हा जगातला सर्वात कोरडा आणि उष्ण खंड आहे; देशातील कोरड्या अंतर्भागांत, तापमान ३० अंश सेल्सियसपर्यंत पोहंचते. आजवर नोंदलेले सर्वाधिक तापमान ५३.१ अंश इतके होते. सर्वात कमी तापमानाची, म्हणजे –२२ अंश सेल्सियसची नोंद स्नोई माउंटन्सच्या प्रदेशात, माउंट कॉझियस्को या ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच पर्वत शिखराजवळ करण्यात आली होती.

उत्तर गोलार्धाच्या मानाने येथे फारशी थंडी पडत नाही. उदाहरणार्थ, व्हिक्टोरिया प्रांताची राजधानी असलेल्या मेलबर्न शहराचेच पाहा. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेस अगदी टोकावर असले तरीसुद्धा जुलै महिन्यातील या शहराचे दररोजचे सरासरी तापमान ६ ते १३ अंश सेल्सियस इतके असते. याच्या तुलनेत, जानेवारी महिन्यात चीनमधील बिजींग शहरात –१० ते +१ अंश सेल्सियस इतके आणि न्यूयॉर्क शहरात –४ ते +३ अंश सेल्सियस इतके दररोजचे सरासरी तापमान असते. या दोन्ही शहरांचे आणि मेलबर्नचे, विषुववृत्तापासून जवळजवळ सारखेच अंतर आहे. मग, डाऊन अंडर म्हणजे विषुववृत्ताच्या खालच्या प्रदेशात हवामान जास्त का असावे, तेसुद्धा ऑस्ट्रेलिया हे जगातल्या सर्वात थंड प्रदेशाच्या, अर्थात ॲन्टार्टिका इतक्या जवळ असताना?

फरक हा आहे की उत्तर गोलार्धात भूप्रदेश अधिक तर दक्षिणी गोलार्धात समुद्रे अधिक आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याभोवती हजारो चौरस किलोमीटरपर्यंत समुद्रच समुद्र असल्यामुळे ॲन्टार्टिकाकडून येणाऱ्‍या अतिशय थंड वाऱ्‍यांना अडविणारे जणू एक प्रतिरोधक क्षेत्र तयार होते, आणि यामुळे हवामान उष्ण राहते.

ऑस्ट्रेलिया हा एक मोठा खंड असल्यामुळे, येथील वेगवेगळ्या भागांत अगदी वेगवेगळे हवामान असते. दक्षिणेकडील प्रांतांत, चार विशिष्ट ऋतू असतात; हिवाळ्यांत रात्रीचे आकाश निरभ्र असते आणि हवामान थंड तर कधीकधी गारठलेले असते, दिवसा तितकासा गारठा नसतो आणि वातावरण प्रसन्‍न असते. हिवाळ्यांतील हे प्रसन्‍न वातावरण उत्तर गोलार्धातील बऱ्‍याचशा देशांमध्ये असणाऱ्‍या उन्हाळ्यातील हवामानासारखे असते. पण ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील प्रांतांत, सबंध वर्षभर दोनच ऋतू आढळतात—प्रदीर्घ कोरडा ऋतू आणि मॉन्सूनचा पावसाळी ऋतू. उत्तर क्षेत्राची राजधानी असणाऱ्‍या डार्विन शहरात, तापमान ३२ अंश सेल्सियसवरच रेंगाळते.

इतर निराळ्या गोष्टी

ऑस्ट्रेलिया खंडातील बऱ्‍याचशा भागांत प्रामुख्याने उष्ण हवामान असल्यामुळे, येथील लोकांना सहसा सुटसुटीत कपडे घालायला आवडतात. शिवाय, एक मोठी हॅट तर हवीच हवी. समशीतोष्ण हवामान असलेल्या देशांपेक्षा येथे लोकांना अधिक सूर्यप्रकाशात वावरावे लागत असल्यामुळे त्वचेचा कर्करोग येथे जास्त आढळतो.

ऑस्ट्रेलियात अद्यापही बरीच विस्तीर्ण खुली मैदाने असल्यामुळे सहलीला जाण्यासारखी अनेक ठिकाणे असून तेथे खुल्या हवेत आउटडोअर बार्बेक्यूजचा आनंद लुटता येतो. मांस फारसे महाग नसल्यामुळे बार्बेक्यू म्हटले की सॉसेजेस आणि स्टेक हे पदार्थ ठरलेलेच असतात. त्या आउटडोअर बार्बेक्यूजवळ उभे असलेले ते लोक एकमेकांना असे हातवारे करून सांकेतिक भाषेत बोलताहेत की काय? नाही, ते बिचारे एका हाताने मांस भाजताना, मोकळ्या हाताने माश्‍यांना हाकलण्याचा प्रयत्न करताहेत! बाहेर खुल्या हवेत जेवणाचा बेत केला, की माश्‍या आणि डास जीव नकोसा करून सोडतात, विशेषतः हवामान उष्ण असते तेव्हा.

डाऊन अंडरच्या प्रदेशात राहायचे म्हणजे माश्‍या आणि डास यांच्याशी जुळवून घ्यायला शिकावे लागते, म्हणूनच बऱ्‍याच घरांना पुढे आणि मागे देखील जाळीची दारे असतात. पूर्वी, लोक माश्‍या तोंडाजवळ येऊ नयेत म्हणून एक विशिष्ट प्रकारची हॅट घालायचे; या हॅटच्या पुढे आलेल्या कडेला दोऱ्‍याने बांधलेली बाटलीची बुचे लटकायची. पण आजकाल कितीतरी प्रकारचे कीटक निरोधक निघाल्यामुळे असल्या हॅट्‌स आता क्वचितच पाहायला मिळतात.

या प्रदेशाचे आणखी एक निराळेपण म्हणजे येथील रंगीबेरंगी फुले, फुलझाडे आणि वृक्षवल्ली. उत्तर गोलार्धातील फुलांसारखी येथे उगवणारी फुले फारशी सुवासिक नसतात. येथे फुलांचा सुवास घ्यायचा म्हणजे अगदी नाक फुलाजवळ न्यावे लागते. अर्थात सर्व ऑस्ट्रेलियन फुलांबद्दल असे म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ, येथे फुलणाऱ्‍या डॅफ्ने आणि जॅस्मीनच्या दरवळाने मन कसे प्रसन्‍न होते. पण स्थूलमानाने बोलायचे झाल्यास, थंड हवामानांतील फुलांच्या तुलनेत येथील फुले तितकी सुवासिक नसतात.

खुले विस्तार

डाऊन अंडरच्या प्रदेशात राहण्याचे आणखी एक विशेष निराळेपण म्हणजे, येथे आढळणारे खुले विस्तार. उत्तरेतील देशांच्या तुलनेत येथे जवळ आणि दूरच्या संकल्पनाच वेगळ्या आहेत. काही गावांमधील अंतर इतके असते की मोटारीतून तासन्‌तास प्रवास करूनही पुढच्या गावाचा पत्ताच नसतो. असे विशेषतः येथील लोक ज्याला आउटबॅक म्हणतात, तेथे घडते. या खुल्या विस्तारांतील नीरव शांततेत स्वच्छ मोकळ्या हवेत मनमुराद श्‍वास घेण्याचा अनुभव आगळाच आहे. निलगिरीची झाडे ठिकठिकाणी पाहायला मिळतात; येथे यांना गम ट्री (डिंकाचे झाड) म्हणतात. अंतर्भागात प्रामुख्याने गम ट्रीज आणि वॉटल म्हणजेच अकॅशियाची झाडे आढळतात.

मावळतीला, सूर्यास्त डोळ्यांचे पारणे फेडून जातो. पण त्यानंतर अगदी अचानकच अंधार पडतो, कारण डाऊन अंडरच्या या प्रदेशात संधिप्रकाश फारवेळ राहात नाही. पाहता पाहता, दक्षिण गोलार्धावरील स्वच्छ, निरभ्र आकाशात असंख्य तारे चमकू लागतात; मग सदर्न क्रॉस या नावाने प्रसिद्ध असलेले तारांगणही दिसू लागते. निलगिरी वृक्षांच्या सावल्यांमध्ये सारे वनजीवन हळूहळू निद्रेच्या स्वाधीन होत असताना सगळीकडे एक निःशब्द शांतता पसरते; मैलोन्‌मैल पसरलेल्या खुल्या विस्तारांत ती शांतता अधिकच जाणवते.

तुमच्या स्लीपिंग बॅगेत दडून झोपी जाण्याआधी, शेकोटी पूर्णपणे विझवायला विसरू नका. हे फार महत्त्वाचे आहे, कारण ऑस्ट्रेलियातील जंगलांत एकदा का आग नियंत्रणाबाहेर गेली की मग ती पाहता पाहता अतिशय रौद्र रूप धारण करून, वाटेत येईल ते बेचिराख करते. तीव्र उष्णतेमुळे निलगिरीची झाडेच्या झाडे पेट घेऊन त्यांचा अक्षरशः भडका उडतो आणि यामुळे आग आणखीनच झपाट्याने पसरते. उन्हाळ्यातील उष्ण, कोरड्या दिवसांत जंगलाच्या आसपास राहणाऱ्‍या लोकांना अशा वणव्यांची सतत भीती असते. मोकळ्या ठिकाणी आग पेटवण्याविरुद्ध असणाऱ्‍या कडक प्रतिबंधांचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे लागते.

भल्या पहाटे, तुम्हाला जवळच्याच एका निलगिरी वृक्षातून येणाऱ्‍या हास्यकल्लोळाने जाग येते, हा कुक्कुबरा पक्षांचा आवाज आहे. तुम्ही तंबूतून बाहेर डोकावून पाहता तेव्हा तुम्हाला इतर झाडांवर पण निरनिराळ्या प्रकारचे सुंदर रंगीबेरंगी पक्षी दिसतात. एव्हाना तुम्ही यांपैकी पुष्कळसे पक्षी, आणि कांगारू, कोआला, एमू आणि कदाचित वॉम्बॅट यांसारखे इतर प्राणी देखील आधीच पाहिले असतील. आणि बरे का, येथे साप आणि कोळ्यांसारख्या काही नकोशा प्राण्यांशीही गाठ पडू शकते. कारण या खंडात जगातले काही सर्वात विषारी साप आणि कोळी आहेत. पण तुम्ही जर त्यांना त्रास दिला नाही, तर यांपैकी पुष्कळसे तुम्हाला काहीही इजा करणार नाहीत.

आता शेकोटीजवळ बसून ब्रेकफास्ट करू या—ब्रेकफास्टमध्ये सहसा बेकन, अंडी आणि खुसखुशीत टोस्ट असे ठरलेले पदार्थ असतात. सकाळच्या त्या स्वच्छ वातावरणात कोणालाही दोन घास जास्तच खावेसे वाटतात. माश्‍यांकडे दुर्लक्ष करीत ब्रेकफास्टचा आनंद घेत तुम्ही ऑस्ट्रेलियन जंगलात आलेल्या नवनवीन अनुभवांच्या आठवणी ताज्या करता; या अनुभवांतून तुम्हाला अतिविस्तीर्ण ऑस्ट्रेलियन खंडाची झलक मिळाली.

या अफाट देशातील तुमचे भ्रमण संपले आहे, आता परतीचा प्रवास. पण मनमिळावू ऑस्ट्रेलियन लोक आणि त्यांची साधीसुधी राहणी तुम्हाला कायम आठवणीत राहील. पुष्कळशा पर्यटकांसारखे तुम्ही पण कदाचित पुन्हा कधीतरी येण्याच्या इच्छेनेच येथून निघता. पण या प्रवासाच्या शेवटी तुम्ही एक मात्र नक्कीच म्हणाल: डाऊन अंडरचे जीवनच निराळे बुवा!

[१३ पानांवरील चित्राचे श्रेय]

पॅराकीट आणि पिंक कॉकटू: By courtesy of Australian International Public Relations; बाला: By courtesy of West Australian Tourist Commission

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा