त्रासमुक्त परादीसचा शोध
एक ब्रिटिश जोडपे म्हणाले: “आम्हाला फक्त एक सुरक्षित आणि कदाचित जुन्या राहणीमानाचं वातावरण निर्माण करायचंय जिथं लोक एकमेकांची काळजी घेतील.” त्यांनी उष्णकटिबंधातले एक रमणीय बेट निवडून त्यावर एक समाज स्थापण्याचे ठरवले की जेथे लोक खेळीमेळीने राहतील. निश्चितच तुम्हाला त्यांच्या भावना समजत असतील. त्रासमुक्त परादीसमध्ये राहायची संधी सोडायला कोणाला आवडेल?
एकान्त त्याचे उत्तर आहे का?
परादीस शोधणाऱ्या अनेकांना बेटावर जाऊन राहण्याची कल्पना मोहक वाटत असेल, कारण एकान्तात राहिल्याने थोडीफार सुरक्षा मिळते. काहीजण पनामाच्या प्रशांत किनाऱ्यापासून दूर असलेल्या बेटांवर किंवा कॅरिबियनमधल्या बेटांवर, जसे की, बेलिझपासून दूर असलेल्या बेटांवर जायचे ठरवतात. इतर हिंदी महासागरातल्या रम्य ठिकाणांचा, उदाहरणार्थ, सेशायल्ससारख्या बेटांचा विचार करतात.
असा एखादा एकाकी समाज स्थापन करण्याची कल्पना अशक्य कोटीतली गोष्ट वाटते. पैसा असला, तरीसुद्धा सध्याच्या सरकारी कायद्यांनुसार झटपट जमिनीची खरेदी करण्याला निर्बंध असेल. पण समजा हे हवेहवेसे उष्णकटिबंधातले बेट मिळाले तरी तुम्ही तेथे सुखात राहाल का? तुमचे परादीस त्रासमुक्त असेल का?
ब्रिटनच्या किनाऱ्याभोवतीच्या दूरवरील बेटांवरची लोकसंख्या वाढत आहे. तिथले नवीन रहिवाशी मुख्यतः एकान्त आणि शांतीच्या शोधात तेथे येतात. स्कॉटलंडच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर, २५० एकर इओरसा बेटावर एकटाच राहणारा एक माणूस म्हणतो की मला कधीच एकाकीपणा जाणवत नाही कारण माझ्या शंभर मेंढरांची काळजी घेण्यातच माझा वेळ जातो. पण दूरवरच्या बेटांवर राहायला आलेल्या इतर जणांना लगेचच एकाकीपणा जाणवू लागतो. काहींनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केलाय आणि त्यांना वाचवावे लागले असे वृत्त आहे.
अनेक लोकांना वाटते की, उष्णकटिबंधातील रमणीय बेट म्हणजे आपले परादीस. जिथले हवामान मध्यम असते असे मनप्रसन्न करणारे वातावरण त्यांना मोहक वाटते. पण संभवनीय हरितगृह प्रभाव आणि त्यामुळे वाढलेली समुद्राची पातळी यांनी बेटांवर राहणाऱ्या अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. पश्चिम प्रशांत महासागरातल्या तोकेलाऊ क्षेत्राच्या सखल कंकणद्वीपांवरील तसेच ओहोटीच्या वेळी समुद्राच्या पातळीपेक्षा फक्त दोन मीटर वरती असणाऱ्या हिंदी महासागरातल्या विखुरलेल्या मालदीव बेटांवरील रहिवाश्यांना देखील हीच भीती वाटते.
आपल्या दयनीय स्थितीस्तव पाठबळ मिळवण्यासाठी सुमारे ४० निरनिराळ्या सरकारांनी एकत्र मिळून लहान बेट विकास राज्यांचा एक संघ तयार केला. लहान बेटांवरच्या रहिवाश्यांची आयुमर्यादा सहसा अधिक असली आणि त्यांचे बालमृत्यूमान कमी असले तरी त्यांना गंभीर पर्यावरण समस्यांना सामोरे जावे लागते. पाण्यावर तेलाचा थर जमल्यामुळे आणि दूषित समुद्रांमुळे काही बेटांची आर्थिक स्थिती खालावली आहे. तर इतर बेटे, मोठ्या राष्ट्रांचा विषारी मल फेकण्याची ठिकाणे बनली आहेत.
एवढेच नव्हे तर, परादीसच्या चाहत्यांना ही बेटे रमणीय ठिकाणे म्हणून हवीहवीशी वाटतात खरी पण त्यामुळे सुद्धा धोका निर्माण होतो. तो कसा? बेटांच्या ऊन पडलेल्या किनाऱ्यांवर जाणाऱ्या पर्यटकांची तेथे अति गर्दी होते आणि तिथल्या तुरळक साधनसंपत्तींचा नाश होतो. या पर्यटकांमुळे प्रदूषणाची समस्याही वाढते. उदाहरणार्थ, कॅरिबियनमध्ये, दर वर्षी तिथे येणाऱ्या दोन कोटी पर्यटकांमुळे होणाऱ्या केवळ एक दशांश मलावर प्रक्रिया करण्यात येते.
इतर रमणीय ठिकाणीही हेच घडते. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोव्याचेच उदाहरण घ्या. “अति पर्यटनामुळे ‘नंदनवन दूषित,’” हा ठळक मथळा द इंडिपेन्डंट ऑन सन्डे या लंडनच्या वृत्तपत्रात झळकला. अधिकृत अंदाजांनुसार, १९७२ मधील १०,००० पर्यटकांची संख्या १९९० च्या दशकात दहा लाखांपेक्षा अधिक झाली. एक गट इशारा देतो की, गोव्याच्या नाजूक परिस्थितीकीला आणि अनोख्या संस्कृतीला आता हव्यासी हॉटेल चालकांकडून धोका संभावत आहे कारण ते पर्यटकांच्या आलेल्या लोंढ्याकडून पैसा उकळायला टपून बसलेले असतात. भारत सरकारच्या एका अहवालानुसार समुद्रकिनाऱ्यावर काही अनाधिकृत हॉटेल्स उभी राहिली आहेत याची निश्चिती मिळते. तिथली वाळू नेली आहे, झाडे पाडली आहेत आणि वाळूच्या टेकड्या समतल केल्या आहेत. किनाऱ्यावरच मल सोडण्यात येतो किंवा जवळपासच्या भाताच्या शेतांमध्ये त्याची गळती होते आणि प्रदूषण पसरते.
गुन्हेगारी नाही?
गुन्हेगारीच्या संथ आक्रमणामुळे सर्वात शांतीमय ठिकाणांच्याही नावलौकिकाला कलंक लागतो. बर्ब्युडाच्या इवल्याशा कॅरिबियन द्वीपाच्या एका अहवालाचा मथळा होता, “नंदनवनात हत्या.” या अहवालात, त्या बेटाच्या किनाऱ्यापासून दूर नांगरलेल्या ऐषआरामाच्या याट बोटीवर असलेल्या चार लोकांच्या निर्घुण हत्येविषयी माहिती होती. अशा घटनांमुळे त्या भागांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याविषयी चिंता बळावते.
“नंदनवनात मादक पदार्थांमुळे टोळी युद्धे” असा मथळा असलेले वृत्त लंडनच्या द सन्डे टाईम्समध्ये छापले होते; एका मध्य अमेरिकन देशाविषयी तो अहवाल होता. शांती उरली नसल्यामुळे एका स्थानिक संपादकाने खेद व्यक्त करत म्हटले: “आता सकाळी सकाळी रस्त्यावर १६ वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात मरून पडल्याचं दृश्य पाहून काही नवीन वाटत नाही.”
सामाजिक नंदनवनात राहू इच्छिणारे लोक, शांतीने राहण्याचे मान्य करणाऱ्या लोकांना विनंती करण्याची आशा करतात. पण वास्तविकता काय आहे? सुरवातीला उल्लेखिलेल्या ब्रिटिश जोडप्याच्या बाबतीत मतभेद लगचेच दिसून आले. या योजनेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या काहींचा तर त्यातून पैसा कमावण्याचाच हेतू होता. “आम्हाला पुढारी नकोत,” असे तो पती म्हणाला. “पण सर्वांनी आपली साधनसंपत्ती देऊन हे साध्य केलं पाहिजे. तो खरा युटोपियन समाज आहे.” हा काही पहिलाच प्रकल्प नव्हे.—“नंदनवन समाज प्रयोग” ही पेटी पाहा.
नंदनवनाच्या शोधात असणाऱ्या इतरांना वाटते की, एखादी लॉटरी जिंकून आपण आपले ध्येय साधू शकतो. पण अशा तऱ्हेने मिळवलेल्या पैशाने काही आनंद थोडीच मिळतो? फेब्रुवारी १९९५ मध्ये, द सन्डे टाईम्सने अहवाल दिला की, आतापर्यंत ब्रिटनची सर्वात मोठी लॉटरी जिंकलेल्या कुटुंबात आपापसात झगडे होऊ लागले; जिंकण्याने फक्त “क्रोध, भांडण आणि भम्रनिरास” त्यांच्या हाती लागला. अशा स्थितींमध्ये असे घडणे काही नवीन नाही.
मानवाचा सर्वसुखयुक्त राज्याचा शोध यावरील एका अभ्यासात पत्रकार बर्नार्ड लेविन “झटपट धनसंपत्ती मिळवण्याच्या स्वप्नाविषयी” सांगून खात्रीने म्हणतात: “इतर कित्येक स्वप्नांप्रमाणेच दुःस्वप्न काही दूर नाही. झटपट धनसंपत्तीने सत्यानाश होतो (आत्महत्या सुद्धा घडतात) अशा इतक्या सत्य घटना आहेत की त्यांना योगायोग म्हणताच येणार नाही.”
डूम्सडे पंथांविषयी काय?
नंदनवनाच्या इतर योजनांना तर भेसूर छटा होत्या. सन १९९३ मध्ये, ब्रँच डेविडियन्स यांच्या क्षेत्रावर टेक्सासमधील वॅको येथे सरकारी कायदे अंमलबजावणी करणाऱ्या एजंटांनी छापा घातल्याबद्दल अहवाल देताना, हा सर्व अनर्थ “बंदुका, ब्रेन वॉशिंग आणि न्यायदिवसाचा संदेष्टा यांच्या भयंकर संयोगामुळेच” घडला असे एका वृत्तपत्रकाने म्हटले. पण दुःखाची गोष्ट अशी की ही एकच घटना नाही.
अलीकडच्याच श्री. रजनीश या भारतीय आध्यात्मिक पुढाऱ्याच्या अनुयायांनी, ओरेगनमध्ये एक समाज स्थापला पण आपल्या शेजारपाजारच्या लोकांच्या नैतिक भावना दुखावल्या. त्यांच्या पुढाऱ्याच्या संपन्नतेने आणि लैंगिक प्रयोगाने, “सुंदर मरूद्यान” निर्माण करण्याचा त्यांचा दावा हाणून पाडला.
नंदनवनाची आशा बाळगणाऱ्या लोकांचे अनेक पंथ आपल्या अनुयायांनी विचित्र चालीरीती अनुसराव्यात अशी अपेक्षा करतात; यांमुळे काहीवेळा हिंसक झगडे देखील घडतात. इयन ब्रोडी हे पत्रकार म्हणतात: “आपण एकटे आहोत किंवा वास्तविक जगाच्या दबावांना आपण तोंड देऊ शकत नाही असे वाटणाऱ्यांसाठी, पंथ, आश्रयस्थान आणि पद्धतशीर संस्था देऊ करतात.” तथापि, त्यांच्या शब्दांवरून ही प्रचिती येते की अनेकांना नंदनवनात राहायला निश्चितच आवडेल.
त्रासापासून मुक्त असलेले परादीस
समस्यांची यादी अंतहीन वाटते: प्रदूषण, गुन्हेगारी, मादक पदार्थांचा दुरुपयोग, अति गर्दी, जातीय झगडे, राजकीय चळवळ—आणि सर्व मानवांना भेडसावणाऱ्या रोग आणि मृत्यूसारख्या समस्यांबद्दल काही वेगळे सांगायला नको. निष्कर्ष असा आहे की, या पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात त्रासमुक्त नंदनवन आढळणार नाही. बर्नार्ड लेविन मान्य करतात त्याप्रमाणे: “मानवजातीच्या अहवाल-पत्रिकेवर एक काळा डाग लागलेला आहे आणि तो मानवजातीच्या सुरवातीपासून असल्यासारखा दिसून येतो. आणि हा काळा डाग, मानवांना बोटांवर मोजण्याइतक्या लोकांपेक्षा अधिक लोकांसोबत शांतीने एकत्र राहता न येण्याची असमर्थता आहे.”
परंतु, त्रासापासून खरोखर मुक्त असलेले एक जागतिक परादीस असेल. त्याच्या कालावधीची खात्री एका अतिमानवी शक्तीकडून मिळते. खरे तर, आताच ५० लाखांपेक्षा अधिक लोक त्याकडे वाटचाल करत आहेत आणि त्यांच्यात सध्याच मोलवान ऐक्य आहे आणि आपापसात तुलनात्मकपणे त्रासरहित वातावरण आहे. तुम्हाला ते कोठे सापडतील? ते ज्या आशा आणि फायद्यांचा आनंद लुटत आहेत त्यांचा आनंद तुम्ही सुद्धा कसे घेऊ शकाल? आणि ते येणारे परादीस किती काळ टिकेल?
[६ पानांवरील चौकट]
नंदनवन समाज प्रयोग
एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला, फ्रेंच समाजसत्तावादी एट्येन काबे (१७८८-१८५६) आणि २८० सहकार्यांनी त्याच्या आदर्शांनुरूप नॉवु इलिनॉइस येथे एका सामाजिक वसतीची स्थापना केली. पण आठ वर्षांतच त्या समाजात असा मतभेद झाला की आयोवा आणि कॅलिफोर्नियातल्या इतर गटांप्रमाणेच त्याची पांगापांग झाली.
शार्ल फुरीये (१७७२-१८३७) या आणखी एका फ्रेंच व्यक्तीने सहकारी कृषी समाज स्थापण्याची योजना केली ज्यात प्रत्येक सदस्याचे काम बदलणार होते. त्या संपूर्ण समाजाच्या यशावर आधारित प्रत्येक व्यक्तीला मोबदला मिळणार होता. पण, या पद्धतीचे फ्रान्स आणि संयुक्त संस्थानांतील समाजही फार जास्त काळ टिकले नाहीत.
त्याच सुमारास, रॉबर्ट ओवन (१७७१-१८५८) या वेल्श सुधारकाने सहकारी गावांची कल्पना मांडली ज्यात शेकडो लोक एकत्र राहतील आणि त्यांच्या स्वयंपाकाच्या आणि डायनींग सोयी एकाच ठिकाणी असतील. प्रत्येक कुटुंब स्वतःच्या अपार्टमेंटमध्ये राहील आणि तीन वर्षांचे होईपर्यंत मुलांची काळजी घेईल. त्यानंतर त्यांची काळजी संपूर्ण समाजाला घ्यायची होती. पण ओवनचे प्रयोग विफल झाले आणि त्यांची बहुतांश संपत्तीही त्यात गेली.
द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका ज्याला “संयुक्त संस्थानांतील सर्वात यशस्वी युटोपियन सोशलिस्ट समाज” म्हणते त्याचे जॉन नॉएस (१८११-१८८६) हे संस्थापक बनले. नॉएसच्या अनुयायांनी जेव्हा एकविवाह सोडून आपापसांतल्या सहमतीने लैंगिक संबंधास अनुमती दिली तेव्हा नॉएस यांना जारकर्मासाठी अटक करण्यात आली.
मध्य अमेरिकेतले लेझे फेर हे “भांडवलशाही युटोपिया” प्रकाराचे एक शहर म्हणजे युटोपियन समाज निर्माण करायला केलेला अलीकडचाच प्रयत्न आहे असे वृत्त लंडनचे द सन्डे टाईम्स देते. या प्रकल्पासाठी गुंतवणूक करणारे मिळाले. “२१ व्या शतकातल्या चमत्कारिक शहरात” राहायला मिळणार या आशेचे आकर्षण दाखवून, ५,००० डॉलर पाठवायचे आणि एक प्रकारच्या पिरॅमिड विक्रीत सहभागी होऊन जे यात पैसे गुंतवतील अशा इतरांनाही शोधायचे असे त्यांना सांगण्यात आले. अहवालानुसार, या पैशांनी फक्त तो प्रकल्प पाहता येण्यासाठी विमानाचे एक तिकीट मिळाले असते; बाकी “असे एखादे राष्ट्र त्यांना जागा देईल आणि एक लहानसे हॉटेल तेथे बांधता येईल ही खूप पुढची गोष्ट झाली” असे त्या वृत्तपत्राने सांगितले. तेथे “नंदनवन” स्थापण्याची कोणतीच वास्तविक आशा नाही.
[७ पानांवरील चित्र]
अनेक नंदनवन शोधकांना बेट आकर्षक वाटते. पण आज सर्वात शांतीमय ठिकाण सुद्धा गुन्हेगारीने डागले आहे