तरुण लोक विचारतात . . .
नेहमीच दोषी ठरवले जाण्याचे मी कसे टाळावे?
“सर्व गोष्टींसाठी नेहमी मलाच दोषी ठरवलं जायचं. दाराला कुलूप लावायचं राहिलं, गॅसची शेगडी सुरूच राहिली, किंवा काहीही बिघडलं, चुकलं, की लगेच म्हणायचे, रमनचीच चूक होती!”—रमन.
कि शोरावस्थेत, कधीकधी असं वाटू लागतं की काही गडबड झाली—मग ती काहीही असो, तिचं खापर तुमच्याच डोक्यावर फोडलं जातं. यापूर्वीच्या एका लेखात, आम्ही कबूल केलं होतं की कधीकधी आईवडील आपल्या मुलांवर अगदी लगेच दोष लावतात.a आणि यामागे, आईवडिलांना वाटणाऱ्या सर्वसामान्य काळजीपासून ते भोगत असलेल्या तीव्र भावनात्मक दुःखापर्यंत पुष्कळशी कारणं असू शकतात. कारण काहीही असो, पण चूक नसताना एखाद्या गोष्टीबद्दल जबाबदार ठरवलं जाणं दुःखदायक आणि अपमानास्पद वाटू शकतं.
अर्थात, अपरिपूर्ण मानव असल्याकारणानं, तुमच्या हातून वेळोवेळी चुका या होतीलच. (रोमकर ३:२३) शिवाय, वयाने लहान असल्यामुळे, तुमच्या गाठी फारसा अनुभवही नाही. (नीतिसूत्रे १:४) कधीकधी तुमचे अंदाज चुकतील, हे साहजिक आहे. म्हणून तुमच्या हातून चूक झाल्यास, तिच्याबद्दल तुम्हाला जबाबदार ठरवले जाणे नक्कीच योग्य आणि न्यायसंगत आहे.—उपदेशक ११:९.
तर मग, खरंच तुमच्या हातून घडलेल्या चुकीबद्दल तुम्हाला जबाबदार ठरवले जाते, तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असावी? काही तरुण असे भासवतात जणू त्यांच्यावर फारच मोठा अन्याय झाला आहे. आईवडील नेहमी प्रत्येकच गोष्टीसाठी आमच्यावर दोष लावतात असे म्हणून ते अकांडतांडव करतात. परिणाम? त्यांना समज देण्यासाठी मग नाईलाजाने त्यांचे आईवडील आणखीन कडक उपाय शोधून काढतात. बायबलचा सल्ला असा आहे: “मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको;” (नीतिसूत्रे १:७, ८) तुम्ही स्वतःची चूक पदरी घेऊन आवश्यक बदल करता तेव्हा तुम्हाला या चुकांमधून काहीतरी शिकायला मिळतं.—इब्री लोकांस १२:११.
आईवडिलांसोबत “मसलत”
पण तुमची चूक नसताना ऊठसूठ तुम्हालाच दोषी ठरवलं जातं, तेव्हा मात्र गोष्ट वेगळी असते. तुमचे रागावणे आणि संतापणे समजण्याजोगे आहे. येऊन जाऊन दोष तर असाही आपल्याच माथी मारला जाणार आहे असा निष्कर्ष काढल्यामुळे, कदाचित तुम्हाला मुद्दामहून गैरशिस्त वागण्याचाही मोह होऊ शकतो. (उपदेशक ७:७) तथापि, आकसखोर कृतींमुळे सर्वांचीच मनं दुखावली जातात. (पडताळा ईयोब ३६:१८.) नीतिसूत्रे १५:२२ त्यापेक्षा चांगला मार्ग सुचवून म्हणते: “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात.” होय, तुमच्या आईवडिलांकडून तुम्हाला मिळणाऱ्या वागणुकीत बदल घडवून आणायचा असल्यास एक उपाय म्हणजे, तुमच्या भावना त्यांना कळू द्या.
सर्वप्रथम, बायबलमध्ये उल्लेखलेला ‘योग्य समय’ येईपर्यंत थांबा. (नीतिसूत्रे १५:२३, पं.र.भा.) लेखक क्लेटन बारबो सुचवतात, “सर्वांची डोकी थंड आणि मूड चांगले असतील अशी वेळ आणि ठिकाण निवडा.” पुढे बायबल ताकीद देऊन म्हणते: “कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” (नीतिसूत्रे १५:१) म्हणून आक्रमक नव्हे, तर विनयशील आणि आदरपूर्वक पावित्रा घ्या. संतापू नका. (नीतिसूत्रे २९:११) आईवडिलांवर (‘तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी मलाच दोषी ठरवता!,’ यांसारख्या) टीकास्त्रांचा भडिमार करण्याऐवजी त्यांच्या सतत दोष लावण्यामुळे तुमच्या मनात कशा भावना येतात हे समजावण्याचा प्रयत्न करा (उदाहरणार्थ, ‘माझी चूक नसताना मला दोषी ठरवलं जातं तेव्हा मला स्वतःवरच राग येऊ लागतो.’)—पडताळा उत्पत्ति ३०:१, २.
तुमचे आईवडील गैरसमज झाल्यामुळे चिडलेले असतात तेव्हा देखील असेच म्हणता येईल. येशू लहान असताना एकदा हरवला होता तेव्हा त्याचे आईवडील अस्वस्थ झाले. पण येशूने रडारड किंवा कुरकूर केली नाही. शांतपणे, त्याने त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. (लूक २:४९) एखाद्या कठीण परिस्थितीत सापडल्यास तुम्ही पण आपल्या आईवडिलांशी प्रौढांसारखे वागून पाहा. त्यांना तुमची काळजी असल्यामुळेच ते अस्वस्थ होतात याची जाणीव असू द्या! आदरभावाने त्यांचे ऐकून घ्या. (नीतिसूत्रे ४:१) परिस्थिती थोडी थंडावल्यावर मगच तुमची बाजू मांडा.
‘स्वतःच्या कामाची परीक्षा करावी’
पण मुलांबद्दल चुकीचे निष्कर्ष काढण्याची आईवडिलांची प्रवृत्तीच बनते, यामागचे मूळ कारण काय? खरं सांगायचे तर, काहीवेळा मुलं स्वतःच आईवडिलांना शंका येईल असं वागतात. नीतिसूत्रे २०:११ (सुबोध भाषांतर) म्हणते: “एखाद्या लहान मुलाचा स्वभावसुद्धा त्याच्या वागणुकीवरून समजतो. त्याच्या वागणुकीमुळेच तो प्रामाणिक आहे की कपटी आहे हे समजते.” तुमच्या पालकांच्या नजरेत तुम्ही स्वतःविषयी कसे मत बनवले आहे? तुमच्या “वागणुकीवरून” तुम्ही “प्रामाणिक” आणि विचारी असल्याचे दिसले आहे की तुमचा निष्काळजी आणि बेजबाबदार स्वभाव उघड झाला आहे? कारण तुम्ही निष्काळजी आणि बेजबाबदार असल्याचे सिद्ध झालेले असल्यास, आईवडील तुमच्याविषयी अयोग्य निष्कर्ष काढून बसतात यात नवल ते काय. याआधी उल्लेखलेल्या रमनने आईवडिलांच्या टीकेविषयी असा कबुलीजवाब दिला: “मी स्वतःशीच खोटे बोलू शकत नव्हतो. त्यांच्या संशयांना कधीकधी निश्चितच काही ना काही आधार असायचा.”
तुमच्या बाबतीतही हे खरे असल्यास, तुमच्याजवळ एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे गतकाळात बनलेली ही प्रतिमा मिटवण्याचा प्रयत्न करणे. सातत्याने भरवशालायक आणि जबाबदार वागणुकीचा पुरावा दिल्यास हळूहळू तुम्ही बदलला आहात आणि आता तुमच्यावर भरवसा करता येण्यासारखा आहे याची तुमच्या आईवडिलांना खात्री पटेल.
रमनच्या अनुभवातून हे प्रत्ययास येते. त्याच्या मित्रांनी आणि घरच्यांनी त्याच्या विसराळू स्वभावामुळे त्याला मजेत विसरभोळा हे टोपणनाव दिले. तुमच्या आईवडिलांनीही तुमच्यावर “पोरकट” किंवा “बेजबाबदार” यांसारखे नकारार्थी लेबल लावले आहे का? कॅथलीन मकॉय यांच्या मते, काही आईवडिलांची अशी समजूत असते की असले लेबल लावल्यामुळे “मुलांच्या नेमक्या चुकीवर बोट ठेवता येतं, ज्यामुळे त्यांना ती चूक दिसू शकेल आणि बदलता येईल.” पण वास्तविक पाहता, असल्या लेबल्समुळे सहसा मुलांना तीव्र मनःस्ताप होऊ शकतो. पण तरीसुद्धा, रमनला कळून आले की या टोपणनावात तथ्य होते. तो मान्य करतो, “माझे मन सतत एकाच गोष्टीवर केंद्रित असे, यामुळे माझ्या हातून चाव्या किंवा वह्यापुस्तकं वगैरे हरवायची, मी माझी कामं विसरायचो.”
मग रमन बदलण्याचा प्रयत्न करू लागला. तो सांगतो, “मला जबाबदाऱ्यांविषयी आणि कोणते काम जास्त महत्त्वाचे कोणते कमी महत्त्वाचे याविषयी जाणीव होऊ लागली. मी एक आराखडा तयार केला आणि वैयक्तिक बायबल अभ्यासाला पूर्वीपेक्षा अधिक गांभिर्याने घेऊ लागलो. मोठ्या गोष्टींसोबत यहोवा लहानसहान गोष्टींनाही महत्त्व देतो हे मला समजून आले.” (लूक १६:१०) बायबलची तत्त्वे आचरणात आणल्यामुळे रमनने विसरभोळेपणाची आपली जुनी प्रतिमा नाहीशी केली. तुम्हीही त्याच्यासारखेच का करून पाहात नाही? आणि तुमच्यावर लावलेल्या अशा एखाद्या लेबलमुळे किंवा टोपणनावामुळे तुम्हाला खरोखरच मनस्ताप होत असेल तर याविषयी तुमच्या आईवडिलांशी चर्चा करा. कदाचित ते तुमचा दृष्टिकोन समजून घेतील.
पक्षपाताचे चिन्ह दिसतात तेव्हा
काहीवेळा तुमच्यावर थोपलेल्या दोषामागे पक्षपातीपणा आहे असे भासते. रमन आपली आठवण सांगतो, “माझी मोठी भावंडं खुशाल घरी उशिरा यायचीत, त्यांना कुणी काही म्हणत नसे. पण मी मात्र उशिरा आलो की मला बोलणी खावी लागत.” ॲल्बर्ट नावाच्या एका गुयानीज माणसाला देखील आठवतं की तरुणपणी त्याच्या अशाच भावना होत्या. आई, भावापेक्षा आपल्यालाच जास्त कडक शिक्षा करते असं त्याला वाटायचं.
पण, नेहमीच दिसतं तसं नसतं. आईवडील सहसा मोठ्या मुलांना जास्त स्वातंत्र्य देतात ते पक्षपातामुळे नव्हे, तर फक्त एवढ्यासाठी की ते जबाबदारीने काम पार पाडतील असं त्यांना वाटत असतं. किंवा काही असामान्य परिस्थितीमुळे ते असं करत असतील. ॲल्बर्ट कबूल करतो की त्याच्या भावाला शारीरिक स्वरूपाची शिक्षा मिळत नसे कारण तो ‘अशक्त होता आणि सतत आजारी पडायचा.’ मुलांपैकी एखाद्याच्या विशेष गरजा किंवा असमर्थता ओळखून त्याच्यासोबत वागल्यास याला आईबापांचा पक्षपात म्हणता येईल का?
अर्थात, कधीकधी एखादं मूल आईवडिलांचं अधिक लाडकं असतं हे खरं आहे. (पडताळा उत्पत्ति ३७:३.) सतत आजारी असणाऱ्या आपल्या भावाविषयी ॲल्बर्ट सांगतो: “आईला त्याच्याबद्दल जास्त जिव्हाळा होता.” सुदैवाने, ख्रिस्ती प्रेम हे संकुचित नसतं. (२ करिंथकर ६:११-१३) म्हणून, तुमच्या आईवडिलांना तुमच्या भावंडांपैकी एखाद्याविषयी “जास्त जिव्हाळा” आहे, याचा अर्थ तुमच्यासाठी त्यांच्या मनात प्रेमच उरले नाही असा नाही. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ते तुमच्याशी अन्यायीपणे वागतात का, भावंडांपैकी एखाद्याविषयी असणाऱ्या अंधळ्या प्रेमामुळे ते तुमच्यावर दोष लावतात का? हे खरं असल्यास, तुमच्या भावना अवश्य त्यांच्याजवळ व्यक्त करा. शांतपणे, समंजसपणे, स्पष्ट उदाहरणं देऊन त्यांना सांगा की त्यांनी पक्षपात केलाय असं तुम्हाला का वाटतं. कदाचित ते ऐकून घेतील.
समस्याग्रस्त कुटुंबं
परिस्थिती नेहमीच सहजासहजी बदलणार नाही हे कबूल आहे. काही आईवडिलांना आपल्या मुलांना खजील करण्याची, आणि त्यांना दोषी ठरवण्याची सवयच जडलेली असते. विशेषतः भावनात्मक समस्यांनी त्रासलेल्या किंवा एखाद्या व्यसनाशी झुंजणाऱ्या आईवडिलांच्या बाबतीत असं घडू शकतं. अशा परिस्थितीत, एकमेकांच्या भावना व्यक्त करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तरीही फारसा फायदा होत नाही. तुम्ही अशाच परिस्थितीत असल्यास, तुमच्या आईवडिलांच्या समस्या तुमच्या हाताबाहेर आहेत, आणि बाहेरून मदत घेतली तरच त्या सुटू शकतील याची जाणीव ठेवा. सर्वात उत्तम म्हणजे त्यांना आदर आणि सन्मान द्या आणि अनावश्यक भांडणं टाळा. (इफिसकर ६:१, २) नीतिसूत्रे २२:३ म्हणते: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो.”b
त्याच वेळेस कुटुंबाबाहेर कुणाचातरी आधार घ्या. एखाद्या अनुभवी व्यक्तीजवळ, उदाहरणार्थ एखाद्या ख्रिस्ती वडीलाजवळ मन मोकळं करा. अशा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमळ काळजीमुळे नेहमी आपलाच दोष असतो अशी जी तुमची भावना बनली आहे, तिच्यावर मात करण्यास तुम्हाला बरेच साहाय्य होऊ शकते. त्यासोबतच “देवाजवळ या.” (याकोब ४:८) इतरजण तुम्हाला अन्यायीपणे दोषी ठरवत असले तरीसुद्धा, “[देव] सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही. . . . कारण तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” (स्तोत्र १०३:९, १४) देवाच्या नजरेत आपण मोलवान आहोत याची जाणीव ठेवल्यामुळे तुमच्यावर अन्यायाने दोष लावला जातो तेव्हा ते सहन करण्यासाठी तुम्हाला मदत मिळते.
[तळटीपा]
a आमच्या ऑगस्ट ८, १९९७ अंकातील “तरुण लोक विचारतात . . . नेहमी मलाच का दोषी ठरवलं जातं?” हा लेख पाहा.
b आमच्या जून ८, १९८९ (इंग्रजी) अंकातील “तरुण लोक विचारतात . . . मी शाब्दिक गैरवर्तणुकीला कसे तोंड द्यावे?” हा लेख पाहा. शिवाय, सावध राहा! ऑक्टोबर २२, १९९६ (इंग्रजी) अंकातील “झोंबणाऱ्या शब्दांपासून सांत्वनदायक शब्दांपर्यंत,” ही लेखमालिका देखील पाहा.
[१७ पानांवरील चित्र]
स्वतःच्या चुका पदरी घेतल्यास त्यांतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं