मलेरियाविरुद्धच्या लढ्यात पुन्हा एकदा मूळ उपायावर
जगाचे लक्ष मुलकी युद्धे, गुन्हेगारी, बेकारी आणि इतर समस्यांवर केंद्रित असल्यामुळे मलेरियाने घडणारे मृत्यू यांसारख्या बातम्या मुख्य बातम्यांमध्ये क्वचितच येतात. तरीही, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, जवळजवळ जगातल्या निम्म्या लोकसंख्येला मलेरियाचा धोका आहे आणि सुमारे ३० कोटी ते ५० कोटी लोकांना दरवर्षी हा रोग होतो ज्यामुळे मलेरिया “उष्णकटिबंधीय रोगांपैकी सर्वाधिक पसरलेला आणि सर्वात घातक” रोग बनला आहे. हा रोग किती घातक आहे?
प्रती २० सेकंदाला कोणी न कोणी मलेरियाने दगावते. म्हणजेच, दर वर्षी १५ लाख पेक्षाही अधिक लोकांचा बळी पडतो—ही संख्या आफ्रिकेच्या बोट्स्वाना राष्ट्रातल्या संपूर्ण लोकसंख्येएवढी आहे. मलेरियाने घडणारे दहापैकी नऊ मृत्यू उष्णकटिबंधीय आफ्रिकेत होतात जेथे अधिककरून लहान मुलेच बळी पडतात. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत, डब्ल्यूएचओने ॲमेझॉन येथे मलेरियाचा सर्वात अधिक उद्भव नोंदला आहे. जगातल्या त्या भागात, जंगलतोड आणि इतर परिस्थितीकीच्या बदलांमुळे मलेरियाला अधिकाधिक लोक बळी पडताहेत. ब्राझीलमधील काही ॲमेझॉनियन समाजांमध्ये समस्या इतकी गंभीर बनली आहे की प्रत्येक १,००० व्यक्तींमध्ये ५०० पेक्षा अधिक लोकांना संसर्ग होतो.
आफ्रिकेत असो, उत्तर किंवा दक्षिण अमेरिकेत असो, आशियात असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी असो मलेरियाचा तडाखा प्रामुख्याने गरीब लोकांना बसतो. डब्ल्यूएचओ निरीक्षण करते की, या लोकांना “आरोग्य सेवा अत्यंत दुर्लभ आहेत, त्यांना स्वतःचे संरक्षण करणे परवडत नाही आणि संघटित मलेरिया नियंत्रण सेवा त्यांच्यापर्यंत पोहंचत नाही.” तरीपण, या गरिबांची दुरावस्था आशाहीन नाही. टीडीआर न्यूज हे उष्णकटिबंधीय रोगांवरील संशोधनाचे वृत्तपत्रक म्हणते की, अलीकडील वर्षांमध्ये मलेरियाने घडणारे मृत्यू टाळण्याची सर्वात आशादायक पद्धत अधिक प्रमाणावर उपलब्ध होऊ लागली आहे. त्या जीवनरक्षकाचे नाव? कीटकनाशकांमध्ये बुडवलेल्या मच्छरदाण्या.
मच्छरदाण्यांचे लाभ
मच्छरदाण्यांचा उपयोग हा पुन्हा एकदा मूळ उपाय अंमलात आणणे असले, तरी डब्ल्यूएचओच्या आफ्रिकन दप्तराचे अध्यक्ष, डॉ. इब्राहीम साम्बा यांनी पानॉस वैशिष्ट्ये (इंग्रजी) या पानोस संस्थेच्या बातमीपत्राला सांगितले, की मलेरियाविरुद्धच्या लढ्यात मच्छरदाण्या किती प्रभावी ठरतात ते पाहण्याच्या परीक्षांमध्ये “अत्यंत लक्षवेधक परिणाम” दिसून आले. उदाहरणार्थ, केनियामध्ये, बायोडिग्रेडेबल कीटकनाशकांमध्ये बुडवलेल्या मच्छरदाण्या वापरल्याने केवळ मलेरियामुळे घडणाऱ्या मृत्यूंचेच नव्हे, तर पाच वर्षांखालील मुलांच्या एकूण मृत्यूचे प्रमाण एक-तृतीयांशाने कमी झाले आहे. जीव वाचवण्याव्यतिरिक्त, “मच्छरदाण्यांमुळे आरोग्य सेवांवरील बोझा एकदम कमी होईल” कारण फार कमी रुग्णांना मलेरियासाठी इस्पितळात जावे लागेल.
परंतु, एका समस्येचे मात्र निरसन करायचे बाकी आहे: मच्छरदाण्यांचा खर्च कोण भरणार? एका आफ्रिकन देशातल्या लोकांना पैशांची देणगी द्यायला सांगितले तेव्हा पुष्कळांनी नकार दिला. ज्या देशांमध्ये, आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे वर्षाला ५ डॉलर (अमेरिकन) पेक्षा कमी खर्च केला जातो तेथे मच्छरदाणी म्हणजे—कीटकनाशकांसह असो किंवा साधीच असो—ती चैनीचीच वस्तू असणार यात काही नवल नाही. परंतु, सरकारांना ही प्रतिबंधक पद्धत मलेरियाच्या रुग्णांना उपचार देण्यापेक्षा कमीच खर्चात पडेल म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांचे असे निरीक्षण आहे की, “कीटकनाशकांमध्ये बुडवलेल्या मच्छरदाण्या वाटणे किंवा त्यांच्यासाठी निधी पुरवणे हा सरकारच्या तुटपुंज्या निधींचा सदुपयोगच ठरेल.” अर्थात, सरकारांना मच्छरदाण्या पुरवणे हा निधींची बचत करण्याचा मार्ग असेल. परंतु, त्यांच्या लाखो गरीब नागरिकांकरता मात्र तो फक्त निधींची बचत करण्याचा मार्ग नव्हे—तर जीव वाचवण्याचा मार्ग ठरेल.
[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]
CDC, Atlanta, Ga.