आमच्या वाचकांचे मनोगत
एकत्र आणणारे प्रेम प्रिय बांधवांनो, “बायबलचा दृष्टिकोन: एकत्र आणणारे प्रेम” (ऑक्टोबर ८, १९९६, इंग्रजी) हा लेख छापल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते. मी गेल्या काही वर्षांमध्ये विश्वासाच्या अनेक परीक्षांना त्याचप्रमाणे माझ्या पालकांच्या आकस्मिक मृत्यूलाही तोंड दिलं आहे. पण, सर्वात कठीण परीक्षा मंडळीतल्याच एका व्यक्तीकडून होती. या लेखानं मला शक्ती आणि सांत्वन दिलंय आणि माझ्या प्रत्ययास आलंय की यहोवा माझे अश्रू आणि दुःख आणि वेदना जाणतो व समजतो. प्रेषित पौलानेही अशीच दुःखं भोगली हे मला समजलं. कालांतरानं, यहोवा माझ्या जखमा भरून काढील याची मला खात्री आहे.
एस. बी., कॅनडा
या दुष्ट व्यवस्थीकरणात आध्यात्मिक गोष्टींपासून परावृत्त होणं अतिशय सोपं आहे. हा लेख मला फारच प्रोत्साहनदायक आणि प्रेरणात्मक वाटला. अलीकडंच, जीवनातल्या दररोजच्या चिंतांमुळं मी पार खच्चून गेले होते. या लेखानं मला, स्वतःच्या अपरिपूर्ण भावनांवर अवलंबून न राहता येशूच्या प्रेमावर अवलंबून राहण्याचं महत्त्व समजण्यास मदत दिली आहे.
ए. एम., संयुक्त संस्थाने
रासायनिक असमतोलामुळे होत असलेल्या खिन्नतेचा मला त्रास होतो. या लेखानं मला माझ्या खिन्नतेला तोंड द्यायला आणखी मदत दिली आहे.
बी. यु., संयुक्त संस्थाने
रेडिओ “रेडिओ—जगात क्रांती घडवून आणलेला शोध” (ऑक्टोबर ८, १९९६, इंग्रजी) या उत्तम लेखाबद्दल आभारी आहे. मी १८ वर्षांचा आहे आणि मला रेडियो ऐकायला फार आवडतं. रेडिओचा विकास कसा झाला त्याची चर्चा मला फार रंजक वाटली. गतकाळात यहोवाच्या साक्षीदारांनी राज्याची सुवार्ता पसरवण्यासाठी रेडिओचा उपयोग केला ही गोष्ट मला विशेषतः लक्षवेधक वाटली.
एफ. बी., इटली
फुलपाखरे मी एकटाच शेतीवाडी चालत असलेल्या भागात प्रचार करत होतो आणि “नाजूक पण दणकट प्रवासी” (ऑक्टोबर ८, १९९६, इंग्रजी) हा लेख सादर करायचा मी विचार केला. एक धडधाकट शेतकरी मला भेटला—फुलपाखरांविषयी ज्याच्याशी मी एरवी बोललो नसतो असा तो गृहस्थ होता! पण, त्यातली सुंदर चित्रं पाहिल्यावर त्यानं नियतकालिकं हातात घेतली आणि तो म्हणाला की, त्याच्या शेतात फुलपाखरांच्या पुष्कळ दुर्मिळ जाती पाहायला मिळतात. मी तिथून निघालो तेव्हा त्याची पत्नी नियतकालिक वाचण्यात गढून गेली होती. म्हणून, फुलपाखरांसारखंच मी पुन्हा जाईन—आणि देवाच्या राज्याबद्दल आणखी माहिती देईन!
बी. बी., इंग्लंड
मला हा लेख सर्वात जास्त आवडला. नियतकालिक मिळाल्यावर काही दिवसांनी मी पाहिलं तर आमच्या बागेत मोनार्क फुलपाखरांची नुसती गर्दी जमली होती! मी देवाचे त्याच्या अद्भुत निर्मितीबद्दल आभार मानले.
एस. एम., संयुक्त संस्थाने
दुष्टतेला अनुमती “तरुण लोक विचारतात . . . देव वाईट गोष्टींना अनुमती का देतो?” (ऑक्टोबर ८, १९९६, इंग्रजी) या लेखाबद्दल आभारी आहे. ज्याला स्त्रियांबद्दल किचिंतही आदर वाटत नाही अशा अविश्वासू माणसाशी केलेल्या १८ वर्षांच्या संसारात मी एकलकोंडेपणा, मानहानी आणि अत्यंत दुःख सहन केले; पण यहोवा हा प्रेमळ देव असून आपल्याबद्दल त्याला काळजी वाटते हे वाचायला मिळालं तेव्हा मला माझ्या जखमांवर मलम लावल्यासारखं वाटलं. जणू काय यहोवाच मला सांत्वन देत होता.
एच. टी., संयुक्त संस्थाने
सिगारेट “सिगारेट—तुम्ही मना करता का?” (ऑक्टोबर ८, १९९६, इंग्रजी) या लेखाबद्दल मला काही म्हणायला आवडेल. कित्येक वर्षांआधी हा लेख मला मिळाला असता तर किती बरं झालं असतं! याच वर्षी माझे पती फुफ्फुसाच्या कर्करोगामुळं वारले. गेल्या ५० वर्षांपासून त्यांना धुम्रपान करण्याची खूप सवय होती. सिगारेटींचा इतका भयंकर परिणाम होऊ शकतो हे मलाच ठाऊक नव्हतं.
एच. जी., जर्मनी