जगावरील दृष्टिक्षेप
भवितव्याबद्दलची मते
एकवीसाव्या शतकाचा वेध लागल्यापासून लोकांच्या भवितव्याबद्दलच्या अभिप्रायांना ऊत आला आहे. संयुक्त संस्थानांत न्यूझवीकने घेतलेल्या मतनोंदणीत, पुढील शतकाबद्दल लोकांच्या काय अपेक्षा आहेत असे विचारले गेले. सर्वेक्षण घेतलेले सुमारे ६४ टक्के लोक म्हणतात की, खगोलशास्त्रज्ञ मंगळावर जातील. मानव कालांतराने विश्वात इतर ठिकाणी वास्तव्य करू लागतील अशी अपेक्षा सुमारे ५५ टक्के लोक करतात. सत्तर टक्के लोकांना वाटते की, शास्त्रज्ञांना एड्सवर उपचार मिळेल आणि ७२ टक्के लोकांच्या मते कर्करोगावर उपचार शोधून काढण्यात येईल. निराशावादी दृष्टिकोनातून पाहिलेल्या ७३ टक्के लोकांच्या मते भवितव्यात श्रीमंत आणि गरिबांमधला दरा आणखी रुंदावेल आणि ४८ टक्के लोक गेल्या १०० वर्षांमध्ये झालेल्या युद्धांपेक्षा जास्त युद्धे होतील अशी अपेक्षा करतात. सुमारे ७० टक्के लोकांच्या मते मानव, जागतिक उपासमारीचे निर्मूलन करू शकणार नाहीत.
“प्रामाणिक” ठकबाजी
आर्जेंटिनामधील विमा कंपन्यांना दर वर्षी आपल्या ग्राहकांच्या अप्रामाणिकतेमुळे २० कोटी डॉलर्सचा तोटा होतो. परिणामस्वरूप, अधिकांश देशांपेक्षा वाहन विमा जवळजवळ ३० टक्के वाढला आहे. अम्बीटो फीनॅनस्येरो या वृत्तपत्रानुसार “जवळजवळ निम्मी अप्रामाणिक कृत्ये ‘इमानदार नागरिक’ म्हटल्या जाणाऱ्या लोकांकडून केली जातात.” विमाधारकांपैकी सुमारे ४० टक्के लोकांनी कोणत्या न कोणत्या प्रकारे आपल्या विमा कंपनीचा गैरफायदा घेतल्याचे म्हटले जाते. वृत्तपत्र शेवटी असे म्हणते, की ही फसवेगिरी विमा कंपन्यांनी आपल्याला फसवले आहे असा विचार करणाऱ्या असमाधानी ग्राहकांचा बदला घेण्याचा प्रकार आहे असे दिसून येते.
जपानमध्ये मानवांचे पुनरागमन
“जपानी उद्योगात एक मोठा बदल होत आहे,” असे दूरच्या पौर्वात्य देशांची आर्थिक उजळणी (इंग्रजी) हे वृत्तपत्रक निरीक्षण करते. “गेल्या दोन दशकांमध्ये जपानी कंपन्यांनी अधिकाधिक उत्पन्न वाढण्यासाठी मानवांऐवजी यंत्रांचा उपयोग केला होता. परंतु आता मानवांचे पुनरागमन होत आहे. काही मोठे उत्पादक ॲसेंबली लाईन्सवरून रोबोट्सना अक्षरशः हटवून मानवांना त्यांची जागा देत आहेत.” का? कारण रोबोट्समध्ये नसणारा एक गुण मानवांमध्ये आहे—तो म्हणजे लवचीकता. मॉडेल बदलण्याची वेळ येते तेव्हा, मानव लगेचच जुळवून घेऊ शकतात पण रोबोट्समधला प्रोग्रॅम बदलायला कित्येक महिने लागू शकतात. “आम्ही लोकांनाच रोबोट म्हणून वापरू लागलो,” असे टोमीआकी मीझुकामी हे एनइसीचे फॅक्टरी अध्यक्ष म्हणतात. “पण आता मात्र त्यांची बुद्धी वापरायला हवी. रोबोट्सना वापरण्यात फायदा होतो, पण आता माणसांना वापरणं अधिक जलद असल्याचं आमच्या प्रत्ययास येऊ लागलंय.” उदाहरणार्थ, एनइसी येथील कामगार, रोबोट्सपेक्षा ४५ टक्के लवकर फोन बनवू शकतात असे आढळले. लोकांना या यंत्रांपेक्षा जागा देखील कमीच लागते, आणि साध्यासोप्या यंत्रणेमुळे कमीतकमी यंत्रे आणि मेंटेनन्सचा कमीतकमी खर्च होतो. “कमी स्वयंचलित यंत्रणा वापरून दोन किंवा तीन वर्षे प्रयोग केल्यावर भरपूर खर्च वाचतो आणि उत्पन्न वाढते असा दावा उत्पादक करत आहेत,” असे ती पत्रिका म्हणते.
मरणाच्या पथास असलेला समुद्र
मृत समुद्र आटत चालला आहे. “आधीच पृथ्वीवरील सर्वात कमी (जगातील सागरांच्या साधारण पातळीपेक्षा ४१० मीटर कमी) पाणी असणाऱ्या ह्या मृत समुद्राची पातळी हळूहळू कमी होत चालली आहे,” असे यु.एस.न्यूझ ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट म्हणते. का बरे? बाष्पीभवनाच्या परिणामांशिवाय, अनेक पाणी पुरवठ्याच्या यंत्रणांमुळे आणि धरणांमुळे जॉर्डन नदीचे पाणी वळवले जाते; ही नदी मृत समुद्राच्या पाण्याचा मुख्य उगम आहे. शिवाय, “मृत समुद्रातल्या पाण्यातून खनिज मिळवण्यासाठी त्यातले पाणी बाष्पीभवन तलावांमध्ये पंप करणाऱ्या रासायनिक कारखान्यांमुळेही भराभर आटू लागले आहे.” १९५० च्या दशकाच्या मध्यापासून मृत समुद्राची पातळी जवळजवळ २० मीटर कमी झाली आहे. सध्या विचारात असणारा एक सुधार घडवून आणण्याचा उपाय म्हणजे लाल समुद्रातून पाणी आणायला १९० किलोमीटरचा कालवा बांधणे. हे पाणी १२० मीटर सरळ वरती पंप करून मग मृत समुद्रात ५३० मीटर सरळ खाली सोडावे लागेल.
उपाय सापडला?
एका अभ्यासानुसार, “कमी वसा आणि जास्त फळे व भाज्यांचा समावेश असणारा आहार औषधांप्रमाणेच रक्तदाब लवकरात लवकर आणि परिणामकारकपणेही कमी करतो असे पहिल्यांदा आढळले आहे,” असा अहवाल द न्यूयॉर्क टाईम्स देते. नॅशनल हार्ट, लंग ॲण्ड ब्लड इन्स्टिट्यूट येथील प्रीव्हेंशन सायंटीफिक रिसर्च ग्रुपचे अग्रेसर डॉ. डेनीझ सायमन-मॉर्टन म्हणतात, की अभ्यासानुसार “एकच आहार पुरेसा आहे” म्हणजेच, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि पुष्कळ कर्करोगांवर प्रतिबंधक ठरेल. या अभ्यासाने, देशभरातल्या सहा वैद्यकीय केंद्रांमधल्या शेकडो प्रौढांमधील आहारात बदल केल्यामुळे झालेल्या परिणामांचे परीक्षण केले. सहभागितांना तीन गटांमध्ये विभाजले होते. एका गटाला “सर्वसामान्य” अमेरिकन आहारासारखाच आहार देण्यात आला होता. दुसऱ्या गटाला अधिक फळे आणि भाज्यांचा आहार दिला पण बाकीचे सर्व पदार्थ तेच होते. तिसऱ्या गटाला फळे, भाज्या आणि कमी चरबीच्या डेअरी पदार्थांचा आहार देण्यात आला ज्यांमध्ये संपूर्ण चरबीचे, कोलेस्टेरॉल आणि संतृप्त मेदाचे प्रमाणही कमी होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या गटातल्यांचे रक्तदाबाचे प्रमाण उतरले जे की वैद्यकीयरित्या महत्त्वाचे होते पण तिसऱ्या गटाच्या आहाराने सर्वात उत्तम परिणाम दाखवून दिले. उच्च रक्तदाब असलेल्यांना औषध दिल्या जाणाऱ्या लोकांसारखेच किंवा त्यापेक्षाही उत्तम परिणाम दिसून आले. या दोन्ही आहारांमध्ये प्रत्येक दिवशी फळे आणि भाज्यांच्या नऊ ते दहा ठराविक वाट्यांचा समावेश होता.
धुम्रपान करणारे युरोपियन
जर्मनीतल्या फ्रँकफर्ट येथील नॉसाउश नॉए प्रेसे असा अहवाल देते की, दरडोई तंबाखूचे जगातले सर्वात जास्त ग्राहक हे युरोपियन आणि चीनी नागरिक आहेत. युरोपियन युनियनमध्ये ४२ टक्के पुरुष आणि २८ टक्के स्त्रिया धुम्रपान करतात. परंतु, २५ ते ३९ वयोगटातली टक्केवारी अधिकच आहे. दरवर्षी, धुम्रपानामुळे जर्मनीत १,००,००० लोकांचा तर ब्रिटनमध्ये आणखी १,००,००० लोकांचा प्राण जातो. अलीकडेच, अनेक वर्षांपासून खूप धुम्रपान करण्याची सवय असलेल्या झेक प्रजासत्ताकचे राष्ट्रपती वॉटस्लाफ हेवल यांच्यावर फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी उपचार करण्यात आले. सुएटडॉयशे त्सायटुंग असा अहवाल देते की, राष्ट्रपतींनी, धुम्रपान की आरोग्य या युरोपियन संस्थेला लिहून म्हटले की, धुम्रपानाची सवय सोडून देणाऱ्या कोणाही व्यक्तीची ते प्रशंसा करतात.
कीटकनाशकांचे धोके
फिलिपाईन्समधील इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार, शेतकऱ्यांनी कीटकनाशके वापरलीच नाहीत तरीही भाताचे उत्पन्न तितकेच निघेल. सदर संस्थेत काम करणाऱ्या एका वैज्ञानिकांनी फिलिपाईन्समध्ये भरलेल्या जागतिक अन्न परिषदेला सांगितले की, पीकांवर कीटकनाशकांचा अत्याधिक फवारा मारणे हा एक अनावश्यक अपव्यय आहे. नव वैज्ञानिक पत्रिका अहवाल देते, की शेतकरी केवळ वर्षातल्या चुकीच्या वेळीच फवारा मारत नाहीत, तर प्रत्यक्षात चुकीच्या कीटकांचाही नाश करून टाकतात. शिवाय, पुष्कळसे शेतकरी रसायने फवारताना सुरक्षिततेच्या सल्ल्याकडे कानाडोळा करतात आणि श्वासातून सहज शरीरात प्रवेश करू शकतील अशा सूक्ष्म फवाऱ्यांचा वापर करतात किंवा मातीत हर्बीसाईड मिसळून हातानेच पसरवतात. जागतिक आरोग्य संघटना अहवाल देते की, जगभरात कीटकनाशकांमुळे सध्या दरवर्षी २,२०,००० मृत्यू आणि गंभीर विषबाधेची ३० लाख प्रकरणे घडतात.
आवाजाने त्रासलेले?
ब्रिटनच्या नव वैज्ञानिक (इंग्रजी) पत्रिकेतल्या अभ्यासांनुसार, अगदी कमी पण सतत आवाज ऐकत राहावे लागल्यास, एखादा माणूस आजारी पडू शकतो. हे शोध लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने रात्रीच्या सुरक्षित आवाजाच्या प्रमाणांवरील सूचनांमध्ये बदल केला आहे. मुलांना विशेषतः धोका संभवू शकतो हे प्रदर्शित करणारा पुरावा खास चिंतेचा आहे. एका अभ्यासात असे आढळून आले की, म्युनिकच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ राहणाऱ्या मुलांना उच्च रक्तदाब आणि ॲड्रिनलिनचे जास्त प्रमाण या दोन्ही समस्या होत्या. मुलांच्या वाचन क्षमतेला आणि दीर्घकालीन स्मरणशक्तीला हानी पोचल्याचेही संशोधकांना आढळले. जे लोक आवाजाची सवय करवून घेतात “त्यांच्या शरीराला निश्चित हानी पोहंचत असते,” असे ध्वनी तज्ज्ञा आर्लीन ब्रोनसॅफ्ट म्हणतात. “आवाज हा एक प्रकारचा ताण असतो आणि सरतेशेवटी शरीरावर त्याचा परिणाम होतोच.”
रक्तहीन औषध
“रक्तसंक्रमित रोग आणि रक्तदान केलेल्या रक्ताचा अत्याधिक तुटवडा यांमुळे होता होईल तिथे रक्त संक्रमणे बंद करण्याचा मोठा प्रयत्न सुरू झाला आहे,” असे वृत्त द ग्लोब ॲण्ड मेल वृत्तपत्र देते. रक्तहीन औषध आणि शस्त्रक्रिया, रक्तस्रावाच्या काळजीपूर्वक नियंत्रणावर अवलंबून असते आणि “सुरवातीला यहोवाच्या साक्षीदारांवर उपचार करण्यासाठी अनेक नवीन तंत्रे निर्माण करण्यात आली होती,” असे ग्लोब म्हणते. रक्तहीन शस्त्रक्रियेचे कार्यक्रम राबवणाऱ्या इस्पितळांपैकीचे एक अर्थात ओटावा हार्ट इन्स्टिट्यूट येथील अनेस्थेटीस्ट डॉ. जेम्स ए. रॉब्ली यांनी मान्य केले: “त्यांनी [यहोवाच्या साक्षीदारांनी] या विषयाबद्दल आम्हाला जागरूक केलंय असं मला खरोखर वाटतं.”
जगातले सर्वाधिक तुरुंगवासी
सन १९९५ मध्ये, संयुक्त संस्थानांतल्या प्रत्येक १,००,००० रहिवाश्यांमागे ६१५ लोक तुरुंगात होते असे अमेरिकेचा न्याय विभाग म्हणतो. ही संख्या १९८५ च्या संख्येच्या दुप्पट आहे ज्यामुळे ती जगातली सर्वात उच्च संख्या ठरते असे वृत्त द वॉल स्ट्रीट जर्नल देते. सर्वात अलीकडील माहितीनुसार (१९९४) रशियाचा दुसरा नंबर असून दर १,००,००० मागे ५९० लोक अशी तिची संख्या आहे.
पुनःसंस्कार उत्तम
व्हेनेझुएला येथील काराकासचे वृत्तपत्र एल युनिव्हर्सलनुसार, अल्युमिनियमच्या डब्यांवर पुनःसंस्कार केल्याने नवीन डबे तयार करण्यासाठी लागणारी ९० टक्के उर्जा वाचते. कागदावर पुनःसंस्कार करणे देखील परिस्थितीकीच्या दृष्टीने फायदेकारक ठरते. नवीन कागद निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या उर्जेपेक्षा कागदाच्या पुनःसंस्कारासाठी पन्नास टक्के कमी उर्जा लागते, पाण्याचे प्रदूषण ५८ टक्क्यांनी कमी होते आणि हवेचे प्रदूषण ७४ टक्क्यांनी कमी होते. काचेचा अधिक फायदा होतो कारण काचेवर वारंवार पूर्णतः पुनःसंस्कार करता येतो.