वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ८/८ पृ. १७-१९
  • आफ्रिकन ढोल खरंच बोलतात?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आफ्रिकन ढोल खरंच बोलतात?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • ढोलांची भाषा
  • भेकलेल्या-ढोलांची भाषा
  • सर्वात छान बोलणारे ढोल
सावध राहा!—१९९७
g97 ८/८ पृ. १७-१९

आफ्रिकन ढोल खरंच बोलतात?

नायजेरियामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

हेन्री स्टॅन्ली या शोधकाने १८७६-७७ सालांदरम्यान साली काँगो नदीतून प्रवास केला तेव्हा त्याला तेथील ढोल वाजवण्याच्या प्रथेच्या वैशिष्ट्यांवर तितकासा विचार करायची वेळ आली नाही. त्याच्यासाठी आणि त्याच्या प्रवासी सोबत्यांसाठी, ढोल वाजण्याचा एकच अर्थ होत असे, एका शब्दात सांगायचे तर: लढाई. ढोल वाजण्याचा मंद स्वर ऐकू आला की, आता भाले घेतलेल्या भयानक योद्धांचा आपल्यावर हल्ला होणार असा त्यांना संकेत मिळत असे.

तथापि नंतर, शांतीच्या काळात स्टॅन्लीला दिसून आले की हे ढोल फक्‍त युद्ध पुकारण्यासाठीच नव्हे तर आणखी कितीतरी गोष्टी बोलून दाखवण्यासाठी उपयोगी होते. काँगोच्या काठी राहणाऱ्‍या एका विशिष्ट जमातीविषयी वर्णन करताना स्टॅन्लीने लिहिले: “[त्यांनी] अद्याप विद्युत संकेतांचा वापर केलेला नाही, तरीपण त्यांच्याजवळ संदेशवहनाची तितकीच प्रभावशाली यंत्रणा आहे. त्यांच्या मोठाल्या ढोलांवर वेगवेगळ्या ठिकाणी मारले जाते तेव्हा ज्यांना त्याचे ज्ञान आहे, त्यांना अगदी बोललेल्या भाषेप्रमाणे या ढोलांची भाषा स्पष्टपणे समजते.” स्टॅन्लीला कळून आले की हे ढोल वाजवणारे केवळ बिगुल किंवा सायरन यांच्याद्वारे पाठवतात तसा संकेतच नव्हे तर विशिष्ट मजकूर सांगणारे संदेश देखील पाठवत.

अशाप्रकारचे संदेश एका खेड्यातून दुसऱ्‍या खेड्यात पोहंचवण्याचीही व्यवस्था होती. विशेषकरून ढोल रात्रीच्या वेळी, पाण्यावर तरंगणाऱ्‍या तराफ्यावरून किंवा एखाद्या डोंगराच्या माथ्यावरून वाजवल्यास, कधीकधी त्यांचा स्वर आठ ते अकरा किलोमीटरच्या अंतरापर्यंत ऐकू येत असे. दूर कुठेतरी इतर ढोल वाजवणारे हा स्वर ऐकायचे, तो समजून घ्यायचे आणि इतरांना त्याचे संदेश सांगायचे. इंग्रज पर्यटक ए. बी. लॉइड यांनी १८९९ साली लिहिले: “मला अशी माहिती देण्यात आली, की एका खेड्यातून दुसऱ्‍या खेड्यात, असे करत १६० किलोमीटरच्या अंतरापर्यंत एक संदेश दोन तासांच्या आत पोचता करता येतो, आणि मला तर वाटतं की हे याहूनही कमी वेळात करणे शक्य आहे.”

माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी पोचती करण्यात, ढोलांचा २० व्या शतकातही बऱ्‍याच काळापर्यंत महत्त्वाचा वाटा होता. १९६५ साली प्रकाशित झालेल्या आफ्रिकेतील वाद्ये (इंग्रजी) या पुस्तकाप्रमाणे: “बोलणाऱ्‍या ढोलांचा टेलिफोन आणि टेलिग्राफ संदेशांप्रमाणे उपयोग केला जातो. यांच्या मदतीने, जन्म, मृत्यू आणि लग्नकार्ये; खेळक्रीडा महोत्सव, नृत्ये, आणि दीक्षादान समारंभ; सरकारी संदेश आणि युद्धे यांसारख्या बहुविध प्रकारच्या संदेशांची घोषणा केली जाते. कधीकधी ढोल वाजवून त्यांच्याद्वारे लोकवार्ता आणि गंमतीजमती देखील सांगितल्या जातात.”

पण हे ढोल नेमके कशाप्रकारे संदेश कळवायचे? युरोपात आणि इतर काही ठिकाणी, टेलिग्राफ तारांतून विद्युत लहरींच्या साहाय्याने संदेश कळविले जायचे. वर्णमालेतील प्रत्येक वर्णाची एक वेगळी सांकेतिक खूण असायची ज्यामुळे एकेक वर्ण याप्रमाणे, वेगवेगळे शब्द आणि वाक्ये तयार करता यायची. मध्य आफ्रिकेतील लोकांची भाषा लिपिबद्ध नसल्यामुळे हे ढोल शब्दातील वर्ण उच्चारत नव्हते. आफ्रिकेतील ढोल वाजवणारे एक वेगळीच यंत्रणा वापरायचे.

ढोलांची भाषा

ढोलांची भाषा समजण्यासाठी आफ्रिकन भाषांविषयी ज्ञान असणे आवश्‍यक आहे. मध्य आणि पश्‍चिम आफ्रिकेतील अनेक भाषा मुळातच द्विस्वरीय आहेत—प्रत्येक शब्दातील प्रत्येक अवयवाचे दोन मूलभूत स्वर असतात, एकतर वरचा किंवा खालचा स्वर. स्वरात बदल झाला की शब्दाचा अर्थही बदलतो. उदाहरणार्थ, झायर देशातील कली भाषेतला लीसाका या शब्दाबाबतच पाहा. यातील तिन्ही अवयवांचा खालच्या स्वरात उच्चार केल्यास, त्या शब्दाचा अर्थ “चिखलाचा खळगा किंवा दलदल” असा होतो; खालच्या-खालच्या-वरच्या स्वरात उच्चार केल्यास “वचन” असा अर्थ होतो; तर खालच्या-वरच्या-वरच्या स्वरात म्हटल्यास त्या शब्दाचा अर्थ “विष” असा होतो.

संदेशवहनासाठी वापरण्यात येणाऱ्‍या आफ्रिकेच्या भेकलेल्या-ढोलांत (स्लिट-ड्रम) देखील वरचा आणि खालचा असे दोन स्वर असतात. तसेच, कातडी लावलेले ढोल संदेश पाठवण्यासाठी वापरले जातात, तेव्हा एक वरच्या स्वराचा आणि एक खालच्या स्वराचा, अशा दोन ढोलांचा उपयोग केला जातो. यांच्या साहाय्यानेच कौशल्यवान ढोल वाजवणारा, बोली भाषेतील शब्दांच्या स्वरपद्धतीची हुबेहूब नक्कल करून संदेश कळवतो. आफ्रिकेचे बोलके ढोल (इंग्रजी) हे पुस्तक सांगते: “ढोलांची ही तथाकथित भाषा, थोड्याफार फरकाने लोकजमातींच्या बोली भाषेसारखीच असते.”

अर्थात, कोणत्याही द्विस्वरीय भाषेत, सहसा सारखेच स्वर आणि अवयव असलेले अनेक शब्द असतात. उदाहरणार्थ, कली भाषेत, जवळजवळ १३० संज्ञांच्या स्वरपद्धती सारख्याच (वरचा-वरचा) आहेत, जसे की शांगो (वडील) या शब्दांत. २०० पेक्षा अधिक शब्दांची सारखीच (खालचा-वरचा) अशी स्वरपद्धती आहे, उदाहरणार्थ न्यांगो (आई). गोंधळ होऊ नये म्हणून, ढोल वाजवणारे अशा शब्दांसोबत एखाद्या संक्षिप्त लोकोक्‍तीचा संदर्भही देतात, ज्यामुळे ऐकणाऱ्‍याला दोन शब्दांतला फरक लगेच कळून येतो आणि काय म्हणायचे आहे तेही समजते.

भेकलेल्या-ढोलांची भाषा

बोलणाऱ्‍या ढोलांपैकी एक प्रकार म्हणजे लाकडी भेकलेले-ढोल. (पृष्ठ १९ वरील चित्र पाहा.) हे ढोल तयार करण्यासाठी एखाद्या झाडाचे खोड पोकळ करतात. दोन्ही बाजूला कातडे लावलेले नसते. चित्रातल्या ढोलावर दोन भेका पाडलेल्या असल्या तरीसुद्धा, बऱ्‍याच ढोलांवर एकच लांब भेक असते. या भेकेच्या एका टोकावर आघात केल्यास वरचा स्वर, तर दुसऱ्‍या टोकावर आघात केल्यास खालचा स्वर ध्वनित होतो. भेकलेले-ढोल सहसा एक मीटर लांबीचे असतात, पण ते अर्ध्या मीटर इतके लहान किंवा दोन मीटर लांबीचे देखील असू शकतात. त्यांचे व्यास २० सेंटीमीटरपासून एक मीटरपर्यंतही असू शकते.

भेकलेल्या-ढोलांचा केवळ एका खेड्यातून दुसऱ्‍या खेड्यात संदेश पाठवण्यासाठीच वापर केला जात नसे. कॅमेरूनियन लेखक फ्रॅन्सस बेबे यांनी कुस्ती सामन्यांमध्ये या ढोलांचा कसा वापर केला जात होता त्याचे वर्णन केलेले आहे. गावाच्या चौकात दोन विरुद्ध संघांतील सामन्याची तयारी चालली असताना, एकीकडे भेकलेले-ढोल खेळाडूंच्या पराक्रमांचा महिमा वर्णित असतात आणि हे खेळाडू या ढोलांच्या तालावर नाचत असतात. एका संघाचा ढोल मोठ्या दिमाखाने म्हणतो, “तुझ्या जोडीचा कोण? तुला कोण टक्कर देणार, आहे तरी का कुणी? हे बिचारे . . . तुला मात देण्याचे स्वप्न पाहताहेत . . . कुणा बिचाऱ्‍याला त्यांनी धरून आणलंय खरं, पहिलवान म्हणे . . . , तुझ्यापुढे मात्र कधीच कुणी टिकणार नाही.” विरुद्ध संघातील ढोल वाजवणारे हे चेष्टेचे टोमणे मनाला लावून घेत नाहीत, उलट ते लगेच आपल्या ढोलांनी एका सुभाषिताच्या रूपात प्रत्युत्तर देतात: “छोटुकलं माकड . . . छोटुकलं माकड . . . झाडावर चढू पाहतंय, खाली पडणारंय हे सर्वांना दिसतंय. पण छोटुकलं माकड मात्र हट्टी आहे, ते पडणार नाही काही, थेट वरपर्यंत चढणारंय आमचं छोटुकलं माकड.” कुस्तीचा सामना संपेपर्यंत हे ढोल लोकांचे मनोरंजन करीत राहतात.

सर्वात छान बोलणारे ढोल

दाब देऊन वाजवण्याचे ढोल तर याहीपेक्षा एक पाऊल पुढे जातात. उजवीकडील चित्रातला ढोल आहे डुनडुन; हा नायजेरियातील प्रसिद्ध, योरुबांचा बोलका ढोल आहे. या ढोलाचा आकार वाळूच्या घड्याळासारखा असून त्याच्या दोन्ही बाजूला बकऱ्‍याच्या रापवलेल्या चामड्याचे पातळ आवरण असते. ढोलाची दोन्ही तोंडे चामडी पट्ट्यांनी जोडलेली असतात. या पट्ट्या आवळल्यास, ढोलाच्या तोंडावरील ताण वाढतो आणि यामुळे त्यातून आठ किंवा त्यापेक्षा अधिक सुरांचे स्वर ध्वनित होऊ शकतात. एका वाकलेल्या काठीचा उपयोग करून, आणि ताल आणि स्वर वरखाली करून, कौशल्यवान ढोल वाजवणारा माणसाच्या आवाजातील चढउतारांची देखील नक्कल करू शकतो. हे ढोल वाजवणारे, या आवाजांचा अर्थ लावून ढोलांच्या भाषेत बोलता येणाऱ्‍या दुसऱ्‍या ढोल वाजवणाऱ्‍यांशी अशाच रितीने “संभाषण” करू शकतात.

एका योरुबा प्रमुखाच्या दरबारातील वादकांनी ढोलांचा वापर करून १९७६ साली मे महिन्यात, संदेशवहन करण्याच्या आपल्या अपूर्व क्षमतेचे प्रदर्शन केले. प्रेक्षकांमधून कोणीतरी पुढे येऊन मुख्य ढोल वाजवणाऱ्‍याच्या कानात विशिष्ट सूचना द्यायचा, ज्यानंतर हा मुख्य वादक या सूचना पटांगणापासून दूर अंतरावर असलेल्या आणखी एका वादकाला ढोल वाजवून सांगायचा. ढोलांच्या भाषेत सांगितलेल्या या सूचनांना प्रतिसाद देऊन, हा वादक एका ठिकाणापासून दुसऱ्‍या ठिकाणी जाऊन त्याला जे काही सांगण्यात येईल त्यानुसार कृती करायचा.

ढोलांच्या भाषेत संदेश पाठवणे सोपे नाही. लेखक आय. लाओव्यी यांनी निरीक्षण केल्यानुसार: “योरुबांची ढोल वाजवण्याची कला गुंतागुंतीची आणि कठीण आहे, ती आत्मसात करण्यासाठी अनेक वर्षे अभ्यास करावा लागतो. ढोल वाजवणाऱ्‍याच्या हातात फक्‍त कौशल्य असून, आणि त्याला तालाचे ज्ञान असून चालत नाही; तर काव्य, गावाचा इतिहास आदि आठवणीत ठेवण्यासाठी त्याची स्मरणशक्‍ती देखील तल्लख असली पाहिजे.”

अलीकडील काही वर्षांत आफ्रिकेतील ढोल पूर्वीसारखे बोलके राहिलेले नाहीत, तरीसुद्धा आजही त्यांना संगीतात एक महत्त्वाचे स्थान आहे. आफ्रिकेतील वाद्ये हे पुस्तक म्हणते: “ढोलांवर संदेश पाठवण्याची कला शिकणे अत्यंत कठीण आहे आणि यामुळे ती आफ्रिकेतून दिवसेंदिवस नामशेष होत चालली आहे.” याच्या जोडीला प्रसारमाध्यम विशेषज्ञ रॉबर्ट निकल्स म्हणतात: “पूर्वीचे मोठाले ढोल, ज्यांचा आवाज मैलोमैल जात असे, आणि ज्यांचा संदेश पाठवणे हा एकच उद्देश होता, ते तर निश्‍चितच लोप पावणार आहेत.” आज, अधिकांश लोक टेलिफोन उचलून काम आटपतात.

[१९ पानांवरील चित्रं]

भेकलेला-ढोल

योरुबांचा बोलका ढोल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा