तरुण लोक विचारतात . . .
नेहमी मलाच का दोषी ठरवलं जातं?
“डॅडींना कशाकशाच्या ॲलर्जी आहेत, शिवाय त्यांना धूम्रपान करणाऱ्यांसोबत काम करावं लागतं. घरी आल्यावर ते कधीकधी खूपच रागात असतात. स्वतःच वस्तू इकडे तिकडे टाकतात आणि मग सापडल्या नाहीत की माझ्या डोक्यावर त्याचं खापर फोडतात. अमुक वस्तू त्यांच्याच हातून हरवली असं सांगितलं की त्यांचा पारा चढतो, मला शहाणपणा शिकवू नकोस असं म्हणतात.” —एक किशोरवयीन मुलगी.
तुमच्या घरचे लोक देखील नेहमी तुम्हालाच बळीचा बकरा बनवतात असं कधी तुम्हाला वाटतं का? कोणाचीही चूक असली तरी दोष मात्र तुम्हालाच दिला जातो असं वाटतं का? १४ वर्षांच्या जयाला असंच वाटतं. ती एक-पालक कुटुंबात राहते आणि पुष्कळदा तिला तिच्या धाकट्या भावाला आणि बहिणीला सांभाळावं लागतं. जया तक्रारीच्या सुरात म्हणते: “मी खाली असताना त्यांची माडीवर भांडणं सुरू होतात, दोघं अगदी मुर्खांसारखं, लहान मुलांसारखं वागतात, पण डॅडी घरी आल्यावर, मी जाऊन त्यांची भांडणं का मिटवली नाहीत म्हणून माझ्याच नावाने आकांडतांडव करतात.”
आईवडील तुम्हाला लाडाने वाया गेलेले, ऐतखाऊ, बेजबाबदार म्हणत असल्यास किंवा इतर नावं ठेवून तुम्ही अगदी कामातून गेलेले आहात असे भासवत असल्यास, तुमच्या हातून चुका घडाव्यात अशी त्यांची अपेक्षाच असते की काय असं कधी कधी वाटू लागतं. रमनच्या घरच्यांनी त्याच्यावर विसरभोळा हे जणू लेबलच लावले—मात्र या टोपणनावाचा त्याला मनापासून तिटकारा होता. तुमच्या चुकांवर प्रकाश टाकणाऱ्या अशाच एखाद्या लेबलचा किंवा टोपणनावाचा तुम्हाला देखील राग येत असेल, मग ते प्रेमाने ठेवलेले नाव असले तरीसुद्धा. या नकारार्थी लेबलमुळे, तुम्हाला सुधारण्याचे प्रोत्साहन मिळण्याऐवजी, नेहमी तुमचाच दोष असतो ही भावना तुमच्या मनात पुन्हा बळकट होते.
पक्षपाताने तुमच्यावर दोष लावण्यात येतो तेव्हा तर आणखीनच दुःख होते. फ्रॅन्की नावाची एक षोडशवयीन मुलगी म्हणते, “मी मधवी असल्यामुळे माझ्यावर नेहमीच अन्याय होतो.” असे भासू लागते की तुमच्या भावंडांच्या हातून चुका घडणे जणू अशक्यच आहे, पण थोडीशी जरी गडबड झाली की लगेच त्याचा दोष तुमच्या माथी मारला जातो.
आईवडील दोष का लावतात
अर्थात, आपल्या मुलांच्या हातून चूक घडते तेव्हा आईवडिलांनी ती दुरुस्त करणे स्वाभाविकच आहे. किंबहुना हितकारक, उभारणीकारक पद्धतीने चुकांची दुरुस्ती करणे हा तर मुलांना ‘यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवण्याचा’ एक मार्ग आहे. (इफिसकर ६:४) तथापि, समंजस पालक देखील काही वेळा अतिशयोक्त प्रतिक्रिया दाखवतात आणि कधीकधी तर लागलीच नको ते निष्कर्षही काढून बसतात. लहाणपणी एकदा येशू हरवला होता ती घटना आठवून पाहा. शोधाशोध केल्यावर शेवटी तो देवाच्या मंदिरात, बायबलविषयी चर्चा करताना आढळला. तरीसुद्धा, त्याच्या आईवडिलांना तो सापडल्यावर त्याच्या आईने त्याला विचारले: “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.”—लूक २:४८.
येशू परिपूर्ण असल्यामुळे, तो कोणते गैरवर्तन करील अशी भीती वाटण्याचा प्रश्नच नव्हता. पण सर्व प्रेमळ आईवडिलांप्रमाणे त्याच्या आईला देखील आपल्या मुलाच्या जबाबदारीची जाणीव होती, आणि त्याला कोणत्या प्रकारची इजा तर होणार नाही या भीतीमुळे तिची प्रतिक्रिया तीव्र स्वरूपाची होती. तशाच प्रकारे, तुमचे पालक देखील कधीकधी अवाजवी प्रतिक्रिया दाखवतील, पण तुम्हाला मुद्दामहून त्रास देण्यासाठी किंवा छळण्यासाठी नव्हे तर तुमच्याविषयी त्यांच्या मनात काळजी असल्यामुळे ते असं करतात.
शिवाय, आपण ‘शेवटल्या काळाच्या कठीण दिवसांत’ राहात आहोत याचीही जाणीव असू द्या. (२ तीमथ्य ३:१) घरादाराचे करता करता तुमच्या आईवडिलांवर बरेच दडपण येते आणि याचा परिणाम ते तुमच्याशी कसे वागतात यावरही होतो. (पडताळा उपदेशक ७:७.) मानसिक आरोग्यासंबंधी कार्य करणाऱ्या एका महिलेच्या निरीक्षणानुसार: “एरवी अगदी रास्तपणे विचार करणारे आईवडीलसुद्धा, कुटुंबासमोर एखादी बिकट समस्या आल्यास चिडचिडे बनतात आणि अविचारी निर्णय घेऊन बसतात.”
आपल्या मनात कोंडलेल्या वैफल्यामुळे मुलांवर राग काढण्याचा प्रकार विशेषतः एकट्या पालकांच्या बाबतीत घडण्याची जास्त शक्यता असते; साहजिकच, मनातलं बोलण्यासाठी कोणी जोडीदार नसल्यामुळे असे घडते. आईवडील त्यांच्या वैयक्तिक वैफल्यांमुळे दुसऱ्यांवर राग काढतात तेव्हा ते कुणालाही आवडणार नाही हे कबूल आहे. १७ वर्षांची लूसी म्हणते: “शिक्षा मिळण्यालायक एखादी चूक मी केली असेल, तर गोष्ट वेगळी आहे. पण फक्त आईचा मूड खराब असल्यामुळे मला शिक्षा मिळावी, हा कुठला न्याय?”
पक्षपात हे आणखी एक कारण आहे. सहसा आई किंवा वडील आपल्या सर्वच मुलांवर प्रेम करत असले तरीसुद्धा, त्यांना आपल्या मुलांपैकी एखाद्याविषयी विशेष जिव्हाळा असणे असामान्य बाब नाही.a (पडताळा उत्पत्ति ३७:३.) आपल्यावर आईवडिलांचे कमी प्रेम आहे या विचारानेच मुळात खूप दुःख होते. पण तुमच्या गरजांकडे दुर्लक्ष होत आहे किंवा तुमच्या भावंडांनी केलेल्या चुकांचे खापर तुमच्या डोक्यावर फोडले जात आहे असे भासू लागते तेव्हा क्रोध येणेही साहजिक आहे. रॉक्सॅन नावाची तरुणी म्हणते, “डॅरन माझा भाऊ. आमच्या ममींचं शहाणं बाळ आहे ते. . . . आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा दोष माझ्यावरच येतो, डॅरनवर कधीच नाही.”
समस्याग्रस्त कुटुंबे
सुस्थितीत असणाऱ्या कुटुंबांत अन्यायीपणे दोष लावण्याचा प्रकार क्वचितच घडतो. पण समस्याग्रस्त कुटुंबांत मात्र दोष लावण्याचे, खजील करण्याचे, आणि अपमानित करण्याचे प्रकार सततच सुरू असतात. कधीकधी दोषारोपणाच्या जोडीला “कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा” देखील असते.—इफिसकर ४:३१.
पण आईवडील अशारितीने संतापाचा स्फोट होऊ देतात त्यासाठी त्यांचे मूल दोषी असते का? आज्ञा न पाळणारे मूल पालकांना ‘दुःख देते’ हे खरे आहे. (नीतिसूत्रे १७:२५) तथापि, बायबल पालकांना सांगते: “तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू [अक्षरशः, “राग येण्याइतपत खिजवू”] नका.” (इफिसकर ६:४) सर्व ख्रिश्चनांसारखेच, पालकांनीही आत्मनियंत्रण ठेवले पाहिजे; त्यांनी ‘सहनशील असावे.’ (२ तीमथ्य २:२४) त्याअर्थी, पालक आत्मनियंत्रण गमावून बसतात तेव्हा ते मुलांच्या उणिवांना याच्यासाठी जबाबदार ठरवू शकत नाहीत.
आई किंवा वडिलांकडून शाब्दिक हल्ले होतात तेव्हा, तो याचा संकेत असतो की ते एकतर दुःख, खिन्नता किंवा कमस्वाभिमानाच्या भावनांनी त्रस्त झालेले आहेत. त्यावरून वैवाहिक समस्या किंवा मद्यासक्ती यांसारख्या समस्या देखील सूचित होऊ शकतात. एका माहितीसूत्रानुसार, व्यसनाधीन पालकांच्या मुलांना सहसा बळीचा बकरा बनविले जाते. “त्यांनी काहीही केले तरी ते चुकीचेच समजले जाते. त्यांना ‘मूर्ख,’ ‘वाह्यात,’ ‘आप्पलपोटे’ आणि बरेच काही म्हटले जाते. कुटुंबाचे सदस्य मग त्या मुलालाच (किंवा मुलांनाच) समस्या समजून बसतात आणि यामुळे त्यांच्या स्वतःच्या अस्वस्थ करणाऱ्या भावना आणि समस्या यांपासून त्यांचे लक्ष विचलित होते.”
अन्यायी आरोप लावला जातो तेव्हा
डॉ. कॅथलीन मकॉय यांच्या मते: “मुलांवर एखादे लेबल लावून टाकणे, त्यांना हिणवणे, किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी टीका करणे . . . किशोरवयात कमस्वाभिमान, अवसाद आणि संपूर्ण अंतर्मुखता यांना कारणीभूत ठरू शकते.” किंवा बायबलच्या शब्दांत, निष्ठुर वागणुकीमुळे मुले ‘चिरडीस येतील’ आणि परिणामी ती “खिन्न होतील.” (कलस्सैकर ३:२१) आपण अगदीच नालायक आहोत असा कदाचित तुम्ही स्वतःविषयी विचार करू लागाल. कदाचित तुम्ही तुमच्या पालकांविषयीही नकारात्मक विचार करू लागाल. आपण काहीही केले तरी त्यांना खूष करणे शक्य नाही आणि म्हणून प्रयत्न करण्यातही अर्थ नाही असाही निष्कर्ष कदाचित तुम्ही काढाल. राग आणि असंतोषाच्या भावना तुमच्या मनात घर करतील, ज्यामुळे तुम्ही सर्वच प्रकारच्या शिस्तीचा—तुम्हाला सुधारण्यासाठी केलेल्या टीकेचाही अस्वीकार करू लागाल.—पडताळा नीतिसूत्रे ५:१२.
या स्थितीला तुम्ही कसे तोंड द्याल? हे बऱ्याच अंशी तुमच्या स्वतःच्या विशिष्ट स्थितीवर अवलंबून आहे. थोडे थांबून तिला वास्तववादी दृष्टिकोनातून तोलून पाहण्यास काय हरकत आहे? उदाहरणार्थ, नेहमी तुमचाच दोष असतो हे खरे आहे का? की तुमचे आईवडील काहीवेळा उगाचच अनावश्यक टीका करून नको ते बोलून जातात? बायबल म्हणते, “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो,” आणि यात आईवडीलही आलेच. (याकोब ३:२) म्हणून कधी तुमच्या पालकांची प्रतिक्रिया अतिशयोक्तही असली तरी, तुम्ही पण अतिशयोक्त प्रतिक्रिया दाखवावी असा त्याचा अर्थ होतो का? कलस्सैकर ३:१३ येथे नोंदलेले बायबलचे मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकेल: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.”
तुमच्या आईवडिलांविषयी सहानुभूती राखणे तुम्हाला असे करण्यास सहायक ठरू शकेल. नीतिसूत्रे १९:११ म्हणते: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.” तुमचे डॅडी कामावरून घरी आल्यावर थोडे चिडलेले असतील आणि तुमची चूक नसताना त्यांनी तुमच्यावर दोष जरी लावला, तरीसुद्धा तुम्ही याचे एक मोठे प्रकरण बनवण्याची गरज आहे का? कदाचित, ते तणावात आणि थकलेले असावेत याची जाणीव राखल्यास तुम्हाला ‘त्यांच्या अपराधाची गय करणे’ तितकेसे जड जाणार नाही.
तथापि, अन्यायीपणे दोष लावल्या जाण्याचा त्रास तुम्हाला कधीकधीच नव्हे तर सतत, अखंडपणे सहन करावा लागत असल्यास काय? भविष्यातील एका लेखात या तुमच्या स्थितीत सुधारणा कशी करता येईल याविषयी चर्चा केली जाईल.
[तळटीप]
a आमच्या जुलै २२, १९८७ (इंग्रजी) अंकातील “माझ्या भावासोबत आणि बहिणीसोबत माझे का जमत नाही?” हा लेख पाहा.
[१५ पानांवरील चित्र]
आवश्यक असते तेव्हा पालकांनी सुधारणेसाठी उपदेश दिल्यास तो अन्याय नाही