वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ८/८ पृ. २०-२३
  • हिरे इतके महाग का असतात?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हिरे इतके महाग का असतात?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ॲन्टवर्पला भेट
  • कच्च्या स्वरूपातल्या हिऱ्‍याला पॉलिश करणे
  • हिऱ्‍याचे मोल
  • खड्याचे रूपांतर रत्नात
    सावध राहा!—१९९९
  • आपण आध्यात्मिक प्रगती करू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
सावध राहा!—१९९७
g97 ८/८ पृ. २०-२३

हिरे इतके महाग का असतात?

स्पेनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

काहीवेळा सौंदर्याचा शोध लागतो. इतर वेळा त्याची निर्मिती करावी लागते. परंतु, हिऱ्‍याच्या बाबतीत मात्र शोधही लावावा लागतो आणि निर्मितीही करावी लागते.

कच्च्या स्वरूपातील हिरे निःसंशये निसर्गाची सुंदर करणी आहेत. भूगर्भात अवाढव्य दाब आणि दाहक उष्णता यांमुळे कार्बन या मूलद्रव्याचे कठीण, पारदर्शक स्फटिकात हळूहळू रूपांतर होते. पण ही दुर्मिळ रत्ने इतक्या सहजासहजी सापडत नाहीत. या मूल्यवान रत्नांच्या शोधात पृथ्वीवर—ऑस्ट्रेलिया, सायबेरिया आणि दक्षिण आफ्रिका येथे—सर्वात मोठ्या खाणी खणण्यात आल्या आहेत. फार तर सहा ग्रॅम वजनाचे काही हिरे मिळवायचे असतील तर शंभर टन माती खणावी आणि चाळावी लागते!

हिरा सापडल्यावर, अंगठीची किंवा नेकलेसची शोभा वाढवण्याआधी कुशल कारागिरांना अत्यंत कलापूर्ण पद्धतीने त्याचे दडलेले सौंदर्य खुलवावे लागते.

निश्‍चितच, हा प्रयास आणि ही कुशलता स्वस्त पडत नाही. पण बहुतेक स्त्रियांना—आणि पुरुषांना—तो खर्च सार्थ वाटतो, विशेषतः हा हिरा आपल्या सोबत्याला किंवा भावी पत्नीला अनंत प्रेमाचे प्रतीक म्हणून भेट दिला जातो तेव्हा. सौंदर्य आणि प्रणयभावनांशी जोडलेल्या संबंधामुळे हिरा, पृथ्वीवरील सर्वात महागडे रत्न ठरला आहे.a

ॲन्टवर्पला भेट

बेल्जियम येथील ॲन्टवर्प शहराचे वैभव बहुतांश हिऱ्‍यांवर अवलंबून आहे; या शहराला भेट देताना या अनोख्या खड्यांबद्दल मला कुतूहल वाटू लागले. ‘हिरा इतका आकर्षक का वाटतो? हिरा निर्माण करण्यामागचे रहस्य तरी काय?’ असे अनेक प्रश्‍न माझ्या मनात आले.

त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्याकरता मी डर्क लोट्‌सशी बोललो ज्याच्या कुटुंबात तीन पिढ्यांपासून हिऱ्‍यांचा व्यापार चालत आला आहे. त्याने सांगितले, “ॲन्टवर्पला आम्ही हिऱ्‍याचा जवळचा मित्र मानतो कारण हिऱ्‍यांसाठी जगातील प्रख्यात केंद्रांपैकी हे एक शहर आहे. म्हणून हिरा तयार करणाऱ्‍याची रहस्ये जाणून घ्यायला तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.”

सुरवातीला, त्याने मला नुकतेच खरेदी केलेले काही कच्च्या स्वरूपातले हिरे दाखवले. त्यांची किंमत ३,५०,००० डॉलर असूनही ते इतके काही मोहक दिसत नव्हते—काचेच्या तुकड्यांसारखेच दिसत होते. पण बारकाईने पाहिल्यावर, मणिकार खलवू शकेल असे सौंदर्य त्यातील अंतर्भूत तेजावरून प्रकट झाले. तेव्हा मला त्याच्या आकर्षणाचे रहस्य उमगू लागले.

डर्क सांगतो, “अधूनमधून मला कच्च्या स्वरूपातला एखादा मोठा हिरा दिसला की जणू माझ्यावर मोहिनी केली जातेय असं वाटू लागतं, कसलं तरी भावनिक आकर्षण असल्यासारखं. आणि तो खडा खरेदी करायची प्रेरणा मला आतून होते. त्यावरून मला येशूच्या दृष्टान्तातल्या माणसाची आठवण होते, की ज्याला एक मूल्यवान मोती गवसला, तो मोती इतक्या उच्च प्रतीचा होता की, तो खरेदी करण्यासाठी आपलं सर्वकाही विकण्यास तो तयार झाला. अद्याप तसं काही मी केलं नाही,” असं तो हसत म्हणाला, “पण मला हे कबूल करावंच लागेल की, काही उत्तम प्रतीच्या खड्यांमध्ये एक विलक्षण आकर्षण असतं, अगदी आमच्यासारख्या याच व्यापारात आयुष्य घालवलेल्या लोकांनाही. परंतु, कच्च्या स्वरूपातल्या खड्यामधून रत्न निर्माण करायचे म्हणजे जोखिमा तर असणारच.”

कच्च्या स्वरूपातल्या हिऱ्‍याला पॉलिश करणे

मणिकार निष्काळजी असल्यास, मूल्यवान खड्याची किंमत मातीत मिळू शकते असे मी ऐकले होते. हे नेहमीच घडत असावे का असा प्रश्‍न मला पडला होता. “होय, असं अधूनमधून होतं,” असे डर्कने कबूल केले. “पण फक्‍त खड्याचे कोनेकोपरे कापतानाच हे होतं असं काही नाही. मणिकाराचा देखील ग्लेट्‌झ किंवा हिऱ्‍यातील सदोष भागाला धक्का लागून तो खडा खराब होऊ शकतो. आम्ही नेहमी पोलराईझ्ड प्रकाशातून कच्च्या स्वरूपातल्या हिऱ्‍याची बारकाईने पारख करतो ज्यामुळे सदोष जागा दिसून येतात; पण खरं सांगायचं तर कोणतीच पद्धत पूर्णतः विश्‍वासहार्य नाही.

“सदोष खडा मिळणे आम्हाला दुःस्वप्नासारखंच असलं, तरीही तेवढीच एक अडचण नसते. काहीवेळा काय होतं, की खड्याला पैलू पाडून पॉलिश केल्यावर खड्याला गडद रंगाची छटा येते आणि त्याचं मूल्य कमी होतं. आणि हेही लक्षात ठेवलं पाहिजे, की उत्तम प्रतीचं रत्न तयार करायला आम्हाला त्या खड्याचा ६० टक्के किंवा त्याहूनही अधिक भाग काढावा लागतो.”

किती हे पैशांचे नुकसान असे मला सुरवातीला वाटले; पण हिरा तयार करायला काय काय करावे लागते हे समजल्यावर मग मला कळाले. डर्कने मला एक बदामी आकाराचा हिरा दाखवला ज्याला नुकतेच पैलू पाडून पॉलिश केले होते. “हे बघ, कसा चमकतोय की नाही?” असे त्याने विचारले. “या खड्याच्या आत जे ‘तेज’ दिसतं ना ते खरं तर परावर्तित झालेला प्रकाश आहे, आणखी काही नाही.

“कारागिराला अशा तऱ्‍हेने पैलू पाडायचे असतात की ज्यामुळे प्रकाश आत कोंडला जाऊन पाहणाऱ्‍याकडे परत परावर्तित केला जाईल. काही पारंपरिक आकारांमध्ये, जसं की, गोलाकारात हे सर्वात उत्तम प्रकारे साध्य होतं. पण फॅन्सी आकारांमध्येही, जसं की या बदामी आकारातही होता होईल तितका जास्त प्रकाश परावर्तित होईल अशा तऱ्‍हेनं तो बनवला जातो. हिरा तयार करणाऱ्‍याकडे ही कला असावी लागते. एका सुप्रसिद्ध हिऱ्‍याच्या उत्पादकाने तर, ‘घडवण्याच्या कलेतच खरी जादू आहे,’ हेच घोषवाक्य निवडलं आहे.”

“पण हिऱ्‍याला कोणता आकार द्यावा हे तुम्ही कसं ठरवता?” असं मी डर्कला विचारले. तो म्हणाला, “खडा खरेदी करताना आम्ही अतिशय बारकाईने त्याची पारख करतो. अगदीच बारकाईनं बरं का! मला आठवतं, एक मोठा खडा होता आणि त्याला कोणता आकार द्यावा ते अखेरचं ठरवण्याआधी आम्ही चक्क महिनाभर तो खडा तपासून पाहत होतो. कधी कधी कच्च्या स्वरूपातल्या हिऱ्‍याचा मुळातच विशिष्ट आकार असल्यामुळे आकार देणं इतकं कठीण जात नाही. काहीही असलं, तरी एखाद्या खड्याला असा आकार द्यावा की ज्यामुळं कमीत कमी खडा कापला जाईल हाच हेतू असतो. पण प्रत्येक पैलूत वजन घटतं—आणि सर्वसाधारण हिऱ्‍याला ५० पेक्षा अधिक पैलू असतात.”

मग डर्कने मला एक खडा निरखायला दिला. “खड्याच्या उजवीकडं तुला दोष दिसतोय का ते पाहा” असं म्हणून त्याने मला लूप म्हणजेच जवाहिऱ्‍याकडचे सूक्ष्मदर्शक यंत्र दिले. मला त्या खड्याच्या एका कोपऱ्‍यात फुटलेल्या आरशातल्यासारख्या काही भेगा दिसल्या. “असल्या दोषामुळे हिऱ्‍याचे मूल्य खूपच कमी होते. आम्ही तो काढू शकतो म्हणा, पण मग खड्यातला बराच भाग वाया जाईल. हा दोष दिसून येण्याइतका स्पष्ट नसला, तर हा खडा कमी किंमतीतही विकता येतो.”

इतके बारीक हिरे एवढ्या महागामोलाचे का असतात हे मला जाणून घ्यायची इच्छा होती. स्पष्टतः, त्याची अनेक कारणे आहेत.

“‘हिरा अनंतकाळचा तेजःकण आहे’ ही म्हण—जाहिरातीचा नारा असला तरी—सामान्यतः खरीच आहे,” असे डर्क म्हणाला. “हिरे विटत नाहीत आणि त्यांचं तेज कमी होत नसतं. ते दुर्मिळ आहेत, अर्थात आधीप्रमाणे इतके दुर्मिळ राहिले नाहीत, आणि हो सुंदर तर आहेतच आहेत! पण त्यांचे मूल्य ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, हिऱ्‍यांसाठी जगभरात असणारी मागणी. हे मुख्यतः जाहिरात करण्यावर अवलंबून असते.”

विचार करता करता डर्क म्हणाला, “स्त्रीला हिरा इतका हवाहवासा का वाटतो? कदाचित ती हिऱ्‍याचा संबंध शृंगार आणि प्रणयभावनांशी लावत असावी. हिरा एक खास गोष्ट आहे, कायमसाठी जतन करण्याची वस्तू, आणि त्या हिऱ्‍याइतक्याच अनंतकाळापर्यंत टिकणाऱ्‍या प्रेमाची आठवण देणारी वस्तू आहे. अत्यंत कुशलतेने ही कल्पना किंवा काहींच्या मते ही गूढ भावना लोकांच्या मनात बिंबवण्यात आली आहे. जगभरातल्या लोकांना हिऱ्‍यांची खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्‍या या कल्पनेला प्रसिद्धी देण्याकरता १९९५ साली १८,००,००,००० डॉलर खर्च करण्यात आले.”

हिऱ्‍याचे मोल

“तयार रत्नाचे मूल्य त्याच्या आकारावर अवलंबून असतं ना,” असे मी म्हणालो. “नाही, फक्‍त तेवढंच नाही,” डर्क उत्तरला. “हिऱ्‍याचे मूल्य चार घटकांवर अवलंबून असतं असं हिऱ्‍याचे व्यापारी निश्‍चितच म्हणतील; ते चार घटक म्हणजे: पैलू, कॅरेट, रंग आणि निर्मळता. या प्रत्येकाचा हिऱ्‍याच्या सौंदर्यावर प्रभाव पडत असतो—आणि म्हणूनच हिऱ्‍याच्या मूल्यावर त्याचा परिणाम होतो.

“पहिल्यांदा पैलूंविषयी चर्चा करू या. उत्तम पैलू पाडणे ही एक कला आहे किंवा छोट्या प्रमाणातली शिल्पकलाच म्हणा ना. तू तारीफ करत होतास तो बदामी आकाराचा हिरा जरा निरखून पाहा बरं. हा असा आकार देणे इतकं सोपं नाही, आणि इतर आकारांपेक्षा या आकारासाठी मूळ खड्याचा जास्त भाग वाया जातो. या रत्नाचे सौंदर्य खुलवण्यासाठी हे सर्व पैलू कसे समप्रमाणात कोरलेले आहेत ते पाहा. आमच्या भाषेत या विशिष्ट हिऱ्‍याचे पैलूकाम अत्यंत सुरेख झाले आहे.

“सुरवातीला तू त्याचा मोठा आकार पाहून चकित झाला असावास आणि नाहीतरी हा मोठाच म्हणजे ८ कॅरेटचा खडा असल्यामुळे यात काही नवल नाही. एक कॅरेट म्हणजे ०.२ ग्रॅम होतात बरं का आणि म्हणून फक्‍त खड्याचं वजन पाहून त्याच्या कॅरेटचं मूल्य सांगता येतं. सामान्यपणे म्हणायचं झालं, तर जितके अधिक कॅरेट तितकाच मूल्यवान तो हिरा ठरतो पण रंग आणि निर्मळतेचाही त्याच्या मूल्यावर परिणाम होतो.

“हिरे निरनिराळ्या आकार आणि रंगांमध्ये मिळतात; आपण पाहिलेल्या कच्च्या स्वरूपातल्या खड्यांवरून तुला हे लक्षात आलंच असेल. सर्वात आधी, आम्ही रंगानुसार त्यांना वेगळे करतो; त्यातल्या त्यात पांढरे हिरे अधिक मोलाचे असतात. पण तरीही, फॅन्सी रंगांमध्ये म्हणजे गुलाबी, निळा किंवा लाल रंगांमध्येही काही खडे असतात आणि हे खडे अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे पांढऱ्‍या खड्यांपेक्षा त्यांची किंमत जास्त असते.

“शेवटी, खड्याची निर्मळता पाहून आम्हाला त्याचे मूल्य ठरवावं लागतं. एखादा खडा निष्कलंक असतो म्हणजे खडा पारखल्यावर—सूक्ष्मदर्शक यंत्राने पारखल्यावरही—तुम्हाला त्यात काही खोट दिसून येणार नाही. म्हणून, हिऱ्‍याचे पैलू, निर्मळता आणि रंग हे घटक देखील कॅरेटमधील त्याच्या वजनाइतकेच महत्त्वाचे असू शकतात. आता उदाहरणासाठी, १९९५ मध्ये, पॉलिश केलेला सर्वात मोठा हिरा (५४६.६७ कॅरेट) प्रदर्शनात ठेवण्यात आला होता. पण त्याचा आकार मोठा असतानाही—जवळजवळ गॉल्फ बॉल इतका असतानाही—तो जगातला सर्वात मूल्यवान हिरा नव्हता कारण तो निर्मळ नव्हता आणि त्याचा रंग पिवळसर तपकिरी होता.”

ॲन्टवर्पला निरोप देण्याआधी मी हान्स वीन्सशी बोललो जे गेल्या ५० वर्षांपासून हिऱ्‍याच्या उद्योगात आहेत. माझा शेवटचा प्रश्‍न म्हणजे, हिऱ्‍याला इतके खास महत्त्व का दिले जाते?

“मला लहान हिऱ्‍यांचं इतकं काही कुतूहल वाटत नाही—कारण मशिनवरही ते तयार केले जाऊ शकतात,” असे ते म्हणाले. “पण मोठ्या हिऱ्‍यांचं मात्र मला आकर्षण आहे. प्रत्येक खडा वेगळा असतो—कोट्यवधी वर्षांच्या ज्वालामुखी दाबामुळे कार्बनमधून निर्माण झालेली ती एक अनोखी निर्मिती असते. खडा निरखून पाहिल्याने तुम्हाला अक्षरशः वृद्धिवलयं दिसून येतील, अगदी झाडाच्या बुंध्यावर दिसून येतात तशीच. एखादा अनुभवी व्यापारी तर तो हिरा कोणत्या खाणीतला आहे ते देखील सांगू शकेल.

“शिल्पकार जसा संगमरवरी दगडाला न्याहाळत असतो तसंच हिऱ्‍याचा उत्पादक अशा खड्याला न्याहाळत असतो. त्याला त्यामधून काय बनवता येईल याचं चित्र तो मनात रेखाटू लागतो. मनातल्या मनात तो पैलूकाम, पॉलिशींग करत असतो आणि त्यातून एक शोभिवंत रत्न तयार होत असतं. शेवटी, जेव्हा हिरा एखाद्या अंगठीत किंवा नेकलेसमध्ये जडवण्यात येतो तेव्हा त्याच्या मालकाला अगदी तसाच आनंद वाटेल या विचाराने मन सुखावते.”

शेवटी काय, तर त्यांच्या आनंदातच आमच्या कामाची सार्थकता.

[तळटीप]

a हिऱ्‍यांच्या उच्च किंमतीचे एक मुख्य कारण म्हणजे, केंद्रिय विक्री संघटनेकडेच हिऱ्‍यांच्या खरेदीविक्रीचा पूर्ण ताबा आहे.

[२३ पानांवरील चित्रं]

बदामी आकाराचा ८ कॅरेटचा हिरा (प्रत्यक्षात याच आकारमानाचे नाहीत)

एका बाजूस टोक असलेले लंबवर्तुळ (पेअर घाटी)

सपाट तळभाग असलेली चौकट घाटी (“कार्डीनल्स हॅट” घाटी)

पैलू न पाडलेल्या खड्यांचे कॅरेट वजन ठरवताना

रंगानुसार कच्च्या स्वरूपातले हिरे वेगळे करताना

आणखी पॉलिशींगची गरज आहे का हे पाहण्यासाठी पैलू पारखताना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा