इंटरनेट सावध का असावे?
शैक्षणिक उद्देशांसाठी आणि दैनंदिन दळणवळणासाठी इंटरनेट निश्चितच अतिशय कार्यक्षम आहे. तरीसुद्धा, त्याच्या आकर्षक उच्चतंत्रीय आवरणाच्या खाली डोकावून पाहिल्यास असे दिसते की टीव्ही, दूरध्वनी, वृत्तपत्रे आणि ग्रंथालयांना ज्या समस्यांनी वेढले आहे त्यांसारख्याच काही समस्यांनी, इंटरनेटलाही ग्रासले आहे. यामुळे एक सयुक्तिक प्रश्न असा विचारता येईल, की इंटरनेटमध्ये सामावलेले साहित्य माझ्या कुटुंबातील सदस्यांसाठी आणि माझ्यासाठी यथोचित आहे का?
इंटरनेटवर अश्लील साहित्य उपलब्ध असण्याबद्दल कितीतरी वृत्तांत भाष्य करण्यात आले आहे. पण म्हणून इंटरनेट हा घाणेरड्या लैंगिक विकृतमानसांचा अड्डा आहे असे सुचविले जात आहे का? काही जण यावर वाद घालून म्हणतात की ही अनावश्यक अतिशयोक्ती आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की जाणूनबुजून प्रयत्न केल्याशिवाय असले आक्षेपार्ह साहित्य काही आपोआप दिसत नाही.
अवांच्छनीय साहित्य शोधून काढण्यासाठी एखाद्याला हेतूपूर्वक प्रयत्न करावा लागतो हे अगदी खरे असले तरीसुद्धा, काहींचा असा प्रतिवाद आहे की दुसऱ्या कोणत्याही ठिकाणापेक्षा इंटरनेटवर असल्या प्रकारचे साहित्य शोधून काढणे फारच सोपे आहे. फक्त दोनचार कळा दाबल्या की ती व्यक्ती लैंगिकरित्या प्रक्षोभक साहित्य शोधून काढू शकते, जसे की बीभत्स लैंगिक छायाचित्रे, तसेच ऑडिओ आणि व्हिडिओचे अंश.
इंटरनेटवर नेमक्या किती प्रमाणात अश्लील साहित्य उपलब्ध आहे हा प्रश्न सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ही एक व्यापक समस्या आहे, असे सुचविणारे वृत्त अतिशयोक्त असू शकतात, असे काहींना वाटते. पण, तुमच्या अंगणात १०० नव्हेत पण दोनचारच विषारी साप आहेत असे तुम्हाला कुणी सांगितले तर यामुळे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेविषयीची तुमची काळजी काही कमी होईल का? इंटरनेटची सोय उपलब्ध असणाऱ्यांनी सावध राहणेच शहाणपणाचे ठरेल.
लहान मुलांचा गैरफायदा घेणाऱ्यांपासून सांभाळून राहा!
काही बालसंभोगी लहान मुलांसोबत इंटरनेटवरील आंतरक्रियाशील चॅट चर्चांमध्ये सहभागी होतात, असे अलीकडील बातमीवृत्तांतून उघडकीस आले आहे. आपणही लहान मुलेच आहोत असा आभास निर्माण करून अशा काही प्रौढांनी अजाण मुलांकडून मोठ्या कावेबाजपणे त्यांची नावे आणि पत्ते काढून घेतले आहेत.
द नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ॲण्ड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन (एनसीएमईसी) या संस्थेने या गैरप्रकाराविषयी काही माहिती अभिलिखित केली आहे. उदाहरणार्थ १९९६ साली, पोलिसांना अमेरिकेतील साउथ कॅरोलिना येथील १३ आणि १५ वर्षांच्या दोन मुली सापडल्या; या मुली एका आठवड्यापासून बेपत्ता होत्या. इंटरनेटवर भेटलेल्या एका १८ वर्षांच्या मुलासोबत त्या अमेरिकेतील एका दुसऱ्या राज्यात गेल्या होत्या. एका ३५ वर्षांच्या माणसाविरुद्ध, १४ वर्षांच्या एका मुलाला त्याचे आईवडील घरी नसताना लैंगिक गैरप्रकार करायला भाग पाडल्याचा आरोप लावण्यात आला. या दोन्ही प्रकरणांची सुरवात इंटरनेट चॅट रूममधील संभाषणातूनच झाली. आणखी एका प्रौढ पुरुषाची, १९९५ साली एका १५ वर्षांच्या मुलाशी इंटरनेटवर ओळख झाली आणि तो बेधडक त्याच्या शाळेत त्याला भेटायला गेला. दुसऱ्या एका प्रौढाने एका १४ वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक संभोग केल्याचे कबूल केले. इंटरनेटवरील बुलेटिन बोड्र्सच्या माध्यमाने इतर किशोरवयीन मुलामुलींशी संपर्क साधण्यासाठी तिने तिच्या वडिलांचा कॉम्प्युटर वापरला होता. या माणसाशी तिची देखील इंटरनेटवरच गाठ पडली. या सर्व लहान मुलांना पुढेमागे कधीतरी त्यांचे खरे नाव सांगण्यासाठी भाग पाडण्यात आले होते.
आईवडिलांच्या मार्गदर्शनाची गरज
वर उल्लेख केलेल्या घटना जरी तुलनात्मकपणे तुरळक असल्या तरीसुद्धा, आईवडिलांनी या बाबतीत विचारपूर्वक परीक्षण करणे अगत्याचे आहे. आपल्या मुलांचे गुन्हेगारी आणि शोषण यांपासून संरक्षण करण्यासाठी पालकांना मदत करणारी काही साधने आहेत का?
अनेक कंपन्या आता, चित्रपटांसाठी असतात तशा रेटिंग व्यवस्था, अवांच्छनीय विषय अडविता येतील अशाप्रकारच्या (वर्ड-डिटेक्शन) शब्दशोधक सॉफ्टवेअर पद्धती आणि (प्रूफ-ऑफ-एज) वय-परीक्षक व्यवस्था इत्यादींसारखी निरनिराळी साधने प्रस्तुत करू लागल्या आहेत. काही पद्धतींच्या मदतीने तर विशिष्ट साहित्य घरातील संगणकापर्यंत पोहंचण्याआधीच ते अडविण्याचीही सोय आहे. तथापि, यांपैकी पुष्कळशा पद्धती काही परिपूर्ण नसतात आणि त्यांना वेगवेगळ्या आडमार्गांनी उलट फसविता येते. तुम्हाला आठवत असेल, इंटरनेटचे मूळ उद्दिष्टच असे होते की बिघाड झाले तरीही त्यावर परिणाम व्हायला नको आणि म्हणून त्यातील माहिती सेन्सॉर करणे कठीण आहे.
सावध राहाच्या! मुलाखतीत, लहान मुलांच्या शोषणावर अन्वेषण करणाऱ्या कॅलिफोर्निया येथील एका गटाचे नेतृत्त्व करणारे पोलिस सार्जन्ट म्हणाले: “आईवडिलांच्या मार्गदर्शनाशिवाय दुसरा पर्याय नाही. मला स्वतःला १२ वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या आईने आणि मी त्याला इंटरनेट वापरण्याची परवानगी दिलेली आहे, पण आम्ही सर्वजण मिळूनच ते वापरतो आणि किती वेळ त्यासाठी द्यायचा यावरही आम्ही काळजीपूर्वक मर्यादा घातल्या आहेत.” वडील या नात्याने हे गृहस्थ चॅट रूम्सच्या बाबतीत विशेष सावधगिरी बाळगतात आणि यांच्या उपयोग करण्यावर त्यांनी कडक निर्बंध लावले आहेत. ते पुढे सांगतात: “आमचा हा पर्सनल कॉम्प्युटर माझ्या मुलाच्या खोलीत नव्हे तर घरात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ठेवलेला आहे.”
आईवडिलांनी समजा इंटरनेट वापरण्याची परवानगी देण्याचे ठरवलेच तर त्यांनी आपल्या मुलांना त्यातील कोणकोणते भाग वापरू द्यावेत हे स्वतःहून आस्थेवाईकपणे ठरवले पाहिजे. असे करताना कोणत्या व्यवहार्य आणि वाजवी गोष्टींविषयी पूर्वदक्षता बाळगावी?
सॅन जोस मर्क्युरी न्यूज या वर्तमानपत्रात लिहिणारे डेव्हिड प्लॉटनिकॉफ, घरात इंटरनेटची सोय करवून घेण्याचे ज्यांनी ठरवले आहे अशा पालकांसाठी काही उपयोगी सल्ले देतात.
• इंटरनेट वापरताना तुम्ही तुमच्या मुलांसोबत असता तेव्हा त्यांना तुमच्या निर्णयशक्तीचे आणि मार्गदर्शनाचे महत्त्व कळू लागते आणि यामुळे त्यांचा इंटरनेटचा अनुभव अत्यंत सुखावह ठरू शकतो. ते ताकीद देतात की तुमचे मार्गदर्शन न मिळाल्यास, “नेटवर असलेल्या सर्व माहितीची, पाणी आहे पण पेला नाही अशी गत होईल.” तुम्ही ज्यांवर जोर देत असता ते नियम म्हणजे “विस्तृत स्वरूपात त्याच सर्वसामान्य ज्ञानाच्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही तुमच्या मुलांना सुरवातीपासूनच सांगत आला आहात.” अनोळखी लोकांशी बोलण्याविषयीच्या तुमच्या नियमांचे उदाहरण घेता येईल.
• इंटरनेट एक सार्वजनिक ठिकाण असून त्याचा पाळणाघरासारखा उपयोग होऊ नये. “नाहीतरी, तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात तुमच्या १० वर्षांच्या मुलाला एकटे सोडून, जा दोनचार तास मजा करून ये असे सांगणार नाही, सांगाल का?”
• खेळ खेळण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी असलेले इंटरनेट लोकेशन्स आणि होमवर्क करायला मदत करणारे लोकेशन्स यांमधला फरक ओळखायला शिका.
चाइल्ड सेफ्टी ऑन द इन्फर्मेशन हायवे या एनसीएमईसीच्या हस्तपत्रिकेत लहान मुलांना बऱ्याच मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत:
• स्वतःविषयीची माहिती, उदाहरणार्थ, घरचा पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक, किंवा तुमच्या शाळेचे नाव किंवा पत्ता सांगू नका. तुमच्या आईवडिलांच्या परवानगीशिवाय कोणाला फोटो पाठवू नका.
• एखादा संदेश थोडा जरी विचित्र वाटला की लगेच तुमच्या आईवडिलांना त्याविषयी सांगा. असभ्य किंवा कठोर शब्दांत लिहिलेल्या संदेशाला कधीच प्रत्युत्तर देऊ नका. ताबडतोब तुमच्या आईवडिलांना सांगा, यामुळे ते इंटरनेट सेवेशी संपर्क साधू शकतील.
• इंटरनेटचा वापर करण्यासंबंधी, म्हणजे दिवसातल्या कोणत्या वेळेस, आणि किती वेळ इंटरनेट वापरावे शिवाय त्याच्या कोणत्या भागांत जावे यासंबंधी नियम ठरवून घेण्यात तुमच्या आईवडिलांना सहकार्य द्या; त्यांच्या निर्णयांना मान द्या.
पूर्वदक्षता बाळगणे हे प्रौढांसाठी देखील फायदेकारक आहे हे लक्षात असू द्या. काही प्रौढ स्त्रीपुरुष त्यांच्या निष्काळजीपणामुळे केव्हाच नको असलेल्या नातेसंबंधांत आणि भयंकर समस्यांमध्ये गुंतले आहेत. चॅट रूम्सभोवती असणारे गूढपणाचे वलय, अमोरसमोर नसल्याने प्रत्यक्ष संपर्काचा अभाव, आणि टोपण नावांमुळे असणारा अनोळखीपणा या सर्व कारणांमुळे काहींना तितकीशी बंधने राहिलेली नाहीत आणि सुरक्षिततेची एक फसवी भावना निर्माण झाली आहे. प्रौढांनो, जरा जपून!
समतोल दृष्टिकोन बाळगणे
काही प्रमाणात इंटरनेटवरील साहित्य आणि त्यावर उपलब्ध असणारे बरेचसे विनियोग शैक्षणिकदृष्ट्या मोलाचे आहेत आणि ते उपयोगी देखील ठरू शकतात. अधिकाधिक संस्था आता त्यांच्या अंतर्गत नेटवर्क्सवर, अर्थात इन्ट्रानेट्सवर संस्थेचे आतील दस्तऐवज साठवू लागल्या आहेत. इंटरनेटवर आधारित असणाऱ्या ऑडिओ आणि व्हिडिओ माध्यमांतून विचारविनिमय करण्याची सोय आता प्रचारात येत असल्यामुळे प्रवास आणि बिझनेस-मिटींग्स यांसंबंधीच्या रूढ पद्धतींत कायमस्वरूपी परिवर्तन घडून येण्याची चिन्हे दिसताहेत. कंपन्या इंटरनेटच्या साहाय्याने आपले कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वितरीत करतात, ज्यामुळे बराच खर्च वाचतो. पुष्कळशा कंपन्या प्रवास आणि स्टॉक-दलाली यांसंबंधात औद्योगिक व्यवहार करण्यासाठी अद्यापही अशाप्रकारच्या कंपन्यांच्या कर्मचारी वर्गावर अवलंबून असतात; पण जसजसे इंटरनेट वापरणाऱ्यांना त्यांच्या काही किंवा सर्व व्यवस्था हाताळणे शक्य होईल तसतसा याबाबतीतही बदल घडून येण्याची शक्यता आहे. खरोखरच इंटरनेटचा पगडा जबरदस्त आहे आणि यापुढेही माहितीची देवाणघेवाण, उद्योगधंद्यांतील व्यवहार, आणि दळणवळण करण्याचे ते एक महत्त्वपूर्ण माध्यम राहील.
बहुतेक साधनांप्रमाणेच, इंटरनेटचेही फायदे आहेत. तथापि, त्याचा दुरुपयोग होण्यालाही बराच वाव आहे. काहीजण इंटरनेटच्या सकारात्मक पैलूंचे आणखीन मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्याचे पसंत करतील, इतरजण कदाचित करणारही नाहीत. ख्रिश्चन व्यक्तीला दुसऱ्याच्या निर्णयांवर किंवा इतरांच्या वैयक्तिक बाबींविषयी बरावाईट निर्णय देण्याचा अधिकार नाही.—रोमकर १४:४.
इंटरनेटचा वापर करणे एखाद्या नवीन देशात प्रवास करण्यासारखे आहे ज्यात ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी कितीतरी नवनवीन गोष्टी असतील. प्रवास करताना शिष्टाचाराचे नियम पाळणे आणि विचारपूर्वक पूर्वदक्षता बाळगणे अत्यावश्यक आहे. तुम्ही इंटरनेट नावाच्या या माहितीच्या सुपरहायवेवर जाण्याचे ठरवल्यास तुम्हालाही असेच करणे अगत्याचे आहे.
[११ पानांवरील चौकट/चित्र]
सभ्यता आणि सावधगिरीची गरज
सभ्यता
सभ्यता आणि आचारसंहितेचे नियम शिकून घ्या. बऱ्याचशा इंटरनेट सर्विस कंपन्या व्यवहार करण्यासाठी विचारशील आणि स्वीकार्य सूचना प्रकाशित करतात. तुम्ही या सुचनांना मान देऊन शिष्टाचाराचे नियम पाळल्यास इंटरनेट वापरणारे इतरजण याची प्रशंसा करतील.
सावधगिरी
काही वादविवादसमूह धार्मिक किंवा वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करतात. अशाप्रकारच्या चर्चांमध्ये आपली मते प्रकट करणारे संदेश पाठवण्यापासून सावध राहा; तुमचा ई-मेल पत्ता आणि नाव त्या समूहातील सर्वांना प्रसारित करण्यात येऊ शकतो. यामुळे अनेकदा वेळखाऊ आणि अनावश्यक पत्रव्यवहार करावा लागतो. अर्थात, काही न्यूजग्रुप्सच्या संपर्कात राहणे तर सोडाच पण त्यांचे साहित्य वाचण्यालायकही नसते.
सहख्रिस्ती बांधवांसाठी अशाप्रकारचे वादविवादसमूह किंवा न्यूजग्रुप्स निर्माण करण्याविषयी काय? सुरवातीला कदाचित जाणवणारही नाहीत इतक्या समस्या आणि धोके यामुळे संभवू शकतील. उदाहरणार्थ, कपटी हेतू बाळगणाऱ्या काहींनी इंटरनेटवर स्वतःची बनावट ओळख दिल्याची उदाहरणे आहेत. सध्यातरी, इंटरनेटवर एखाद्याची खरी ओळख पटवण्याची सोय उपलब्ध नाही. शिवाय, अशाप्रकारच्या समूहांची काही बाबतीत मोठ्या, सामाजिक कार्यक्रमाशी तुलना करता येईल जेथे जबाबदारीने आवश्यक देखरेख करण्यासाठी यजमानाचा वेळ आणि शक्ती अनावश्यकपणे खर्च होऊ शकते.—पडताळा नीतिसूत्रे २७:१२.
[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]
“आमचा हा पर्सनल कॉम्प्युटर माझ्या मुलाच्या खोलीत नव्हे तर घरात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ठेवलेला आहे”
[१३ पानांवरील संक्षिप्त आशय]
इंटरनेट एक सार्वजनिक ठिकाण असून त्याचा पाळणाघरासारखा उपयोग होऊ नये