इंटरनेटचे विनियोग आणि साधने
इंटरनेटच्या माध्यमाने उपलब्ध होणारे एक सर्वसामान्य साधन म्हणजे इलेक्ट्रॉनिक टपाल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी असलेली एक जागतिक यंत्रणा, जिला ई-मेल या नावाने ओळखले जाते. खरे पाहता, ई-मेलच संपूर्ण इंटरनेट दळणवळणातील बहुतांश भाग व्यापते आणि बरेचसे लोक केवळ याच इंटरनेट साधनाचा वापर करतात. पण ही यंत्रणा चालते कशी? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण आधी सर्वसाधारण टपाल व्यवस्थेचे परीक्षण करू.
तुम्ही कॅनडात राहता आणि तुम्हाला मॉस्को येथे राहणाऱ्या तुमच्या मुलीला पत्र पाठवायचे आहे असे गृहीत धरा. पाकिटावर अचूक पत्ता घातल्यावर तुम्ही ते पत्र टपालपेटीत टाकता आणि मग या पत्राच्या प्रवासाला सुरवात होते. एखाद्या डाक चौकीत हे पत्र पुढच्या ठिकाणाकडे, म्हणजे एखाद्या प्रादेशिक किंवा राष्ट्रीय वाटप केंद्राकडे आणि मग त्यानंतर तुमच्या मुलीच्या राहत्या ठिकाणाजवळील एखाद्या स्थानिक डाकघराकडे निर्देशित केले जाते.
ई-मेलमध्ये देखील अशाच प्रकारची प्रक्रिया घडते. तुमच्या संगणकावर तुमचे पत्र लिहून झाल्यावर तुम्हाला त्यावर तुमच्या मुलीची ओळख पटविणारा ई-मेल पत्ता घालावा लागतो. हे इलेक्ट्रॉनिक पत्र पाठवल्यावर, ते सहसा तुमच्या संगणकाला दूरध्वनी जाळ्याद्वारे इंटरनेटशी जोडणाऱ्या मोडम म्हटलेल्या एका यंत्राच्या माध्यमाने, पुढचा प्रवास करते. तुमच्याकडून निघाल्यावर ते कित्येक संगणकांतून जाते; या विविध संगणकांची तुलना, टपाल खात्याच्या स्थानिक आणि राष्ट्रीय मार्गनिश्चिती केंद्रांशी करता येईल. या संगणकांमध्ये काही आवश्यक माहिती असते जिच्या साहाय्याने तुमचे पत्र शेवटल्या इच्छित संगणकापर्यंत पोहंचते; आता येथून तुमची मुलगी तुमचे ते पत्र प्राप्त करू शकते.
साधी टपालव्यवस्था आणि ई-मेल यांमधील एक फरक मात्र असा की, ई-मेल शेवटल्या इच्छित ठिकाणी, मग ते दुसऱ्या खंडांतही असले तरीही, सहसा काही मिनिटांतच किंवा त्याहीपेक्षा कमी वेळात पोहंचते; अर्थात संगणक जाळ्याच्या एखाद्या भागात अतिशय दाटी झालेली असेल किंवा तात्पुरता बिघाड झाला असेल तर गोष्ट वेगळी आहे. तुमची मुलगी आपली इलेक्ट्रॉनिक टपालपेटी तपासेल तेव्हा तिला तुमचे ई-मेल त्यात सापडेल. अतिशय जलद संदेशवहनामुळे आणि सबंध जगात एकाच वेळी अनेक प्राप्तकर्त्यांनाही अगदी सहज पाठवता येत असल्यामुळे ई-मेल हा संपर्क साधण्याचा एक अतिशय लोकप्रिय प्रकार बनत चालला आहे.
वादविवादसमूह
यूसनेट हा आणखी एक लोकप्रिय विनियोग आहे. यूसनेटच्या माध्यमाने विशिष्ट विषयांवर सामूहिक वादविवाद करणाऱ्या न्यूजग्रुप्सशी (वादविवादसमूहांशी) संपर्क साधता येतो. काही न्यूजग्रुप्स प्रामुख्याने विविध उपभोग्य वस्तूंच्या खरेदी किंवा विक्रीशी संबंधित असतात. अशाप्रकारचे हजारो न्यूजग्रुप्स अस्तित्वात असून, संगणक वापरणाऱ्याने यूसनेटमध्ये प्रवेश मिळवला की मग त्याला वेगवेगळ्या न्यूजग्रुप्सचे सदस्यत्व मिळवण्यासाठी वेगळी वर्गणी द्यावी लागत नाही.
असे समजू या की कोणीतरी, डाक तिकिटांच्या संग्रहाशी संबंधित असलेल्या न्यूजग्रुपमध्ये सहभागी झाला आहे. या छंदाविषयीचे नवनवीन संदेश या न्यूजग्रुपच्या इतर सदस्यांद्वारे पाठविले जातात, तसतसे ते या नवीन सदस्याला देखील उपलब्ध होतात. या न्यूजग्रुपला कोणीतरी पाठवलेली माहिती तर तो पडताळू शकतोच, पण त्याचसोबत इतरांनी लिहिलेल्या प्रतिक्रिया देखील त्याला वाचता येतात. उदाहरणार्थ, जर कोणी विशिष्ट डाक तिकिटाच्या मालिकेविषयी माहिती देण्याची विनंती केली तर लगेचच सबंध जगातून याची अनेक उत्तरे येतील; आणि या न्यूजग्रुपच्या सर्व सदस्यांना ही माहिती लगोलग उपलब्ध होईल.
याच कल्पनेवर आधारित असलेला एक थोडा वेगळा प्रकार म्हणजे बुलेटिन बोर्ड सिस्टिम (बीबीएस). बीबीएस यूसनेट सारख्याच असतात, फरक इतकाच की यात सर्व फाईल्स एकाच संगणकात असून एकच व्यक्ती किंवा समूह या फाईल्स सांभाळतो. या न्यूजग्रुप्समधून त्यांना वापरणाऱ्यांच्या बहुविध अभिरुची, दृष्टिकोन आणि नैतिक मूल्यांचे दर्शन घडते, यामुळे त्यांचा विचारपूर्वक उपयोग करणे आवश्यक आहे.
फाईल्सची देवाणघेवाण आणि विषयांचा शोध
इंटरनेट यंत्रणेच्या मूळ उद्दिष्टांपैकी एक होता जागतिक स्तरावर माहितीची देवाणघेवाण. मागील लेखात उल्लेखलेल्या शिक्षकाने इंटरनेटवर, शिक्षण क्षेत्रातील दुसऱ्या एकाला गाठले जो आधीच तयार असलेले अभ्यासक्रमाचे साहित्य त्याला द्यायला तयार होता. या फाईल्स तब्बल ३,२०० किलोमीटरच्या अंतरावरून अवघ्या काही मिनिटांतच पोचत्या करण्यात आल्या.
इंटरनेटच्या आतल्याआत एखादा विषय कोठे सापडेल हे माहीत नसणाऱ्याने कसे शोधावे? टेलिफोन डायरेक्टरीच्या मदतीने आपण जसा एखादा दूरध्वनी क्रमांक शोधून काढतो तशाच प्रकारे संगणक वापरणारा देखील शोधस्थळांच्या (सर्च साईट्स) मदतीने इंटरनेटवर, त्याला हवे असलेले विषय कोठे आहेत हे शोधून काढू शकतो. त्याला कोणताही शब्द किंवा शब्दप्रयोग पुरवावा लागतो; यानंतर ही माहिती कोणकोणत्या इंटरनेट लोकेशन्सवर उपलब्ध आहे त्यांची सूची या सर्च साईट्समधून प्राप्त होते. सहसा हा शोध विनामूल्य असतो आणि अवघ्या काही सेकंदांतच पूर्ण होतो!
पूर्वी उल्लेखलेला शेतकरी, संगणकांचा आणि उपग्रहांतून प्राप्त झालेल्या नकाशांचा वापर करणाऱ्या प्रिसिशन फार्मिंग नामक आधुनिक कृषी तंत्राविषयी ऐकून होता. एका सर्च साईटमध्ये हा शब्दप्रयोग टाईप केल्यावर त्याला हे तंत्र वापरणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आणि या पद्धतीविषयी सविस्तर माहिती देखील सापडली.
जगव्याप्त जाळे
इंटरनेटमध्ये वर्ल्ड वाइड वेब (किंवा, वेब) (जगव्याप्त जाळे) नावाच्या एका विशिष्ट भागाच्या साहाय्याने लेखकांना तळटिपा वापरण्याच्या जुन्या पद्धतीचा एका नव्या प्रकारे उपयोग करणे शक्य होते. एखाद्या नियतकालिकाचा किंवा पुस्तकाचा लेखक जेव्हा तळटीपेचे चिन्ह देतो, तेव्हा त्याकरता आपण त्या पानाचा खालचा भाग न्याहाळतो आणि कदाचित आपल्याला दुसऱ्या एखाद्या पृष्ठाकडे किंवा पुस्तकाकडे निर्देशित करण्यात येते. इंटरनेटवरील संगणकीय डॉक्यूमेंट्सचे लेखकसुद्धा त्यांच्या डॉक्यूमेंटमधील एखादा शब्द, शब्दप्रयोग किंवा एखाद्या प्रतिमेला रेखांकित किंवा ठळक करणाऱ्या एका तंत्राच्या माध्यमाने मुळात असेच करू शकतात.
ठळक केलेला शब्द किंवा प्रतिमा म्हणजे वाचकासाठी एक संकेत असतो की संबंधित विषयावर आणखी एखादे इंटरनेट साधन, सहसा आणखी एखादे डॉक्यूमेंट अस्तित्वात आहे. हे इंटरनेट डॉक्यूमेंट वाचकासाठी, लगेच शोधून दाखवले जाऊ शकते. ते दुसऱ्या एखाद्या संगणकात आणि दुसऱ्या देशात देखील असू शकते. ॲक्सेस दि इंटरनेट! या पुस्तकाचे लेखक डेव्हिड पील सांगतात की हे तंत्र “तुम्हाला केवळ संदर्भांपर्यंत नव्हे तर प्रत्यक्ष त्या डॉक्यूमेंटपर्यंत पोहंचवते.”
वेबच्या साहाय्याने छायाचित्रे आणि आकृत्या, शिवाय ॲनिमेशन्स, व्हिडियोपट आणि आवाज साठवून त्यांना पुन्हा पाहता येणे किंवा प्ले करणे शक्य आहे. यापूर्वीच्या लेखात अगदी सुरवातीला उल्लेखलेली गृहिणी लोमा हिने विश्वासंबंधी प्रचलित सिद्धान्तांवरील एक लहानसा रंगीत माहितीपट मिळवून तो पाहिला. तिच्या संगणकातील ध्वनी यंत्रणेच्या साहाय्याने तिला त्यातील वृत्तान्तही ऐकता आला.
इंटरनेटवर शोधभ्रमण
वेब ब्राउझरच्या साहाय्याने एखादी व्यक्ती कित्येक वेगवेगळ्या देशांतल्या संगणकांत साठवलेली माहिती आणि रंगीबेरंगी आकृत्या सहजगत्या आणि चुटकीसरशी पाहू शकते. काही बाबतींत वेब ब्राउझरचा उपयोग करणे प्रत्यक्ष प्रवास करण्यासारखे असू शकते, उलट त्यापेक्षा सोपेच. त्याद्वारे आपण मृत समुद्र गुंडाळ्या किंवा हॉलोकॉस्ट मेमोरियल म्युझियम यांची वेबवरील चित्रे पाहायला जाऊ शकतो. एका वेब साईटवरून दुसऱ्या वेब साईटकडे अशाप्रकारे विनासायास येजा करण्याला सर्फिंग द नेट (नेटवर शोधभ्रमण करणे) असे म्हणतात.
वेगवेगळे उद्योग आणि इतर संस्था आपापल्या उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात करण्यासाठी आणि त्यासोबतच इतर प्रकारची माहिती देण्यासाठी वेबचा उपयोग करू लागल्या आहेत. यासाठी ते एक वेब पेज, म्हणजे दुकानांसमोरील तावदानांसारखेच एक इलेक्ट्रॉनिक तावदान तयार करतात. एखाद्या संघटनेचा वेब पेज ॲड्रेस (पत्ता) समजला की मग संभाव्य ग्राहक ब्राउझरच्या मदतीने “खरेदीला” जाऊ शकतात, दुसऱ्या शब्दात ते माहिती चाळू शकतात. तथापि, सर्व बाजारांसारखेच, इंटरनेटच्या बाजारातूनही उपलब्ध होणारी सर्व उत्पादने, सेवा किंवा माहिती हितकारक असतेच असे नाही.
गोपनीयरित्या किंवा सुरक्षितपणे व्यवहार करता यावेत म्हणून, इंटरनेटला पुरेशा प्रमाणात सुरक्षित करण्यासाठी संशोधकांचे प्रयत्न चालू आहेत. (सुरक्षेविषयी आणखी नंतर बोलू.) या व्यापारविषयक उलाढालींमुळे सध्याच्या इंटरनेटवरील दळणवळण अत्यंत वाढले असल्यामुळे आणखी एक जागतिक इंटरनेट विकसित करण्यात येत आहे; याला काहींनी इंटरनेट II असे टोपणनाव दिले आहे.
“हितगुज” म्हणजे काय?
इंटरनेटचा आणखी एक सामान्य विनियोग आहे, इंटरनेट रीले चॅट, उर्फ चॅट (हितगुज). चॅटच्या माध्यमाने एखाद्या गटातील लोक, टोपणनावांचा उपयोग करून एकमेकांना चुटकीसरशी संदेश पाठवू शकतात. विविध वयोगटांतील लोक या साधनाचा उपयोग करीत असले तरीसुद्धा तरुणांमध्ये हे विशेषतः लोकप्रिय आहे. इंटरनेट रीले चॅटला एकदा जोडला गेल्यानंतर, तो संगणक वापरणारा जगाच्या पाठीवर असलेल्या आणखी कितीतरी संगणक वापरणाऱ्यांच्या संपर्कात येतो.
तथाकथित चॅट रूम्स किंवा चॅट चॅनल्स अशा प्रकारे तयार करण्यात येतात की ते विज्ञानकथा, चित्रपट, खेळक्रीडा किंवा रोमांस यांसारख्या एखाद्या विशिष्ट विषयावरील माहिती प्रस्तुत करू शकतील. कोणत्याही चॅट रूमच्या अंतर्गत टाईप केलेले सर्व संदेश त्या त्या चॅट रूममध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांच्या संगणकाच्या स्क्रीनवर जवळजवळ एकाच वेळी प्रदर्शित होतात.
चॅट रूमची तुलना एखाद्या पार्टीशी करता येईल जेथे कित्येक लोक एकाच वेळी एकमेकांना भेटत असतात आणि एकमेकांशी बोलत असतात, फरक एवढाच की येथे ते बोलण्याऐवजी संक्षिप्त संदेश टाईप करून पाठवत असतात. या चॅट रूम्स सहसा चोवीस तास सक्रिय असतात. अर्थात, संगती करण्याविषयी असणारे बायबलचे सिद्धान्त, जीवनाच्या सर्व पैलूंप्रमाणेच, चॅट ग्रूप्समध्ये सहभागी होण्याच्या बाबतीतही लागू होतात याची ख्रिश्चनांना जाणीव आहे; यांपैकी एक सिद्धान्त १ करिंथकर १५:३३ येथे सापडतो.a
इंटरनेटचा खर्च कोण चालवतो?
तुम्ही कदाचित म्हणाल, ‘इंटरनेटच्या माध्यमाने इतक्या दूरच्या अंतरांपर्यंत पोहंचता येते, मग याचा खर्च कोण चालवतो?’ तर इंटरनेटचा उपयोग करणाऱ्या सर्वांना हा खर्च उचलावा लागतो, यांत संस्था आणि वैयक्तिकांचा समावेश आहे. तथापि, इंटरनेट वापरणाऱ्याला, अनेक आंतरराष्ट्रीय साइट्सशी संपर्क साधल्यावर, लांब अंतराचे टेलिफोन बिल भरावे लागतेच असे नाही. अधिकांश इंटरनेट वापरणाऱ्यांचे एखाद्या स्थानिक व्यावसायिक इंटरनेट सेवा वितरकाकडे खाते असते, दर महिन्यात हा वितरक त्यांच्याकडून एक ठरलेली रक्कम घेतो. फोनचा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी वितरक सहसा एक स्थानिक दूरध्वनी क्रमांक देतात. महिन्याला सर्वसाधारणपणे २० अमेरिकन डॉलर इतकी रक्कम भरावी लागते.
तुम्हाला कल्पना आलीच असेल की इंटरनेटचा अवाका अतिप्रचंड आहे. पण तुम्ही या माहितीच्या सुपरहायवेवर उतरावे का?
[७ पानांवरील चौकट]
इंटरनेट पत्ते कसे असतात?
इंटरनेटला जोडलेल्या लोकांची ओळख पटविण्यासाठी ई-मेल पत्त्यांचा उपयोग करतात. असे समजा की तुम्हाला तुमच्या मित्राला ई-मेल पाठवायचे आहे आणि त्याचा ई-मेल पत्ता drg@tekwriting.com असा आहे.b या उदाहरणात, या व्यक्तीची ओळख, किंवा त्याचा लॉग-इन “drg” आहे. सहसा लॉग-इनमध्ये लोक आपल्या नावाची पहिली अक्षरे किंवा पूर्ण नाव टाकतात. “@” या चिन्हापाठोपाठ येणारी संज्ञा एखाद्याच्या मालकाचे नाव, त्याचे कार्यस्थळ किंवा त्याला ई-मेल सेवेचा लाभ करून देणाऱ्या वितरकाकडे संकेत करते. या विशिष्ट पत्त्यात “tekwriting” अशाच एका वितरक कंपनीची ओळख आहे. पत्त्यातील शेवटला भाग, कशाप्रकारच्या संस्थेत तुमच्या मित्राचा लॉग-इन आहे त्याची ओळख पटवतो. याठिकाणी, “com” याचा अर्थ कमर्शियल (व्यापारी) संस्था असा होतो. शैक्षणिक संस्थांची नामकरण पद्धती अशाच प्रकारची असते पण त्यांच्या पत्त्याच्या शेवटी “edu” असे येते, तर ना नफा ना तोटा या आधारावर चालणाऱ्या संस्थांच्या बाबतीत शेवटी “org” असे येते. आणखी एका ई-मेल प्रमाणभुतानुसार ई-मेल पत्त्याच्या शेवटी त्या व्यक्तीच्या देशाच्या नावाचा संकेत असतो. उदाहरणार्थ, lvg@spicyfoods.ar यावरून कळते की “lvg” नावाचे लॉग-इन असलेली व्यक्ती आर्जेंटिना येथील “spicyfoods” नावाच्या एका कंपनीशी संबंधित आहे.
आणखी एका प्रकारचा पत्ता इंटरनेटवर वेब डॉक्यूमेंट्स शोधून काढण्यात सहायक ठरतो. असे समजा की पर्जन्यारण्यांविषयी संशोधन साहित्य एका वेब डॉक्यूमेंटमध्ये आहे जे http://www.ecosystems.com/research/forests/rf. या लोकेशनवर आहे. “http” (Hypertext Transfer Protocol) या अक्षरांवरून वेब डॉक्यूमेंट हाताळण्याच्या विशिष्ट पद्धतीची (प्रोटोकॉल) ओळख पटते, आणि “www.ecosystems.com” यावरून संबंधित वेब सर्व्हरची म्हणजे संगणकाची ओळख पटते—या विशिष्ट पत्त्यात “ecosystems” हे एका व्यावसायिक कंपनीचे नाव आहे. वेब डॉक्यूमेंटचे नेमके नाव या पत्त्याच्या शेवटी असते—“/research/forests/rf.” वेब पत्त्यांना सहसा युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर्स किंवा संक्षेपात युआरएल म्हणतात.
[तळटीपा]
a चॅट रूम्सच्या संबंधाने खबरदारी घेण्याच्या गरजेविषयी पुढे चर्चा करण्यात येईल.
b येथे उल्लेखलेले इंटरनेट पत्ते काल्पनिक आहेत.