वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ८/८ पृ. ३-४
  • इंटरनेट आहे तरी काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इंटरनेट आहे तरी काय?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हे आहे तरी काय?
  • इंटरनेट याचा सुज्ञपणे उपयोग करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • इंटरनेट सावध का असावे?
    सावध राहा!—१९९७
  • इंटरनेटची तुम्हाला खरोखरच गरज आहे का?
    सावध राहा!—१९९७
  • इंटरनेटचे विनियोग आणि साधने
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ८/८ पृ. ३-४

इंटरनेट आहे तरी काय?

अमेरिकेतील डेव्हिड नावाच्या एका शिक्षकाला इंटरनेटच्या साहाय्याने, आवश्‍यक असणारे अभ्यासक्रमाचे साहित्य मिळू शकले. रशियात राहणाऱ्‍या आपल्या मुलीच्या संपर्कात राहण्यासाठी कॅनडातील एका पित्याने याचीच मदत घेतली. लोमा नावाच्या एका गृहिणीला विश्‍वाच्या मुळारंभांविषयीच्या वैज्ञानिक संशोधनांचा अभ्यास करायचा होता, तिलाही याचा उपयोग झाला. यातून एका शेतकऱ्‍याला उपग्रहांच्या आधाराने केल्या जाणाऱ्‍या आधुनिक रोपण पद्धतींविषयी माहिती मिळवणे शक्य झाले. लक्षावधी संभाव्य ग्राहकांसाठी उत्पादनांच्या आणि व्यापारी सेवांच्या जाहिराती करण्याच्या याच्या प्रचंड क्षमतेमुळे ते कितीतरी औद्योगिक संस्थांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. यातील व्यापक वृत्तप्रसिद्धीच्या आणि माहिती सेवांच्या माध्यमाने सबंध जगातील लोकांना अगदी अलीकडील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या मिळतात.

इंटरनेट किंवा नेट नावाचे हे संगणक तंत्र आहे तरी काय? तुम्हाला स्वतःला याची गरज आहे का? इंटरनेट “वापरण्याचे” ठरवण्याआधी, तुम्हाला त्याविषयी थोडीफार माहिती करून घ्यायची इच्छा असेल. इंटरनेटविषयी बराच गाजावाजा झालेला असला तरीसुद्धा, थोडे सांभाळून राहण्याची गरज आहे, विशेषतः घरात मुले असल्यास.

हे आहे तरी काय?

एका खोलीच्या भिंतीवर बरेचसे कोळी आपापले जाळे कातत आहेत अशी कल्पना करा. त्यांची जाळी अशाप्रकारे एकमेकांत गुंतलेली आहेत की त्यामुळे तयार झालेल्या चक्रव्यूहातून ते कोळी कोठूनही कोठेही येजा करू शकतात. ही झाली सोप्या शब्दांत इंटरनेटची संकल्पना—एकमेकांशी जोडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संगणक आणि संगणक जाळ्यांचा एक जगव्याप्त संग्रह. दूरध्वनीच्या साहाय्याने जसे तुम्ही जगाच्या दुसऱ्‍या टोकावर ज्याच्याजवळ दूरध्वनी यंत्र आहे अशा कोणाशी बोलू शकता, तशाच प्रकारे इंटरनेटच्या साहाय्याने एक व्यक्‍ती आपल्या संगणकासमोर बसून जगातील कोणत्याही ठिकाणच्या दुसऱ्‍या संगणकासोबत आणि संगणक वापरणाऱ्‍यांसोबत माहितीची देवाणघेवाण करू शकते.

काहीजण इंटरनेटला माहितीचा सुपरहायवे म्हणतात. हायवेवरून आपण जसा देशाच्या विविध भागांतून प्रवास करू शकतो, तशाच प्रकारे इंटरनेटच्या माध्यमाने माहिती देखील एकमेकांशी जोडलेल्या अनेक वेगवेगळ्या संगणक जाळ्यांतून प्रवाहित होऊ शकते. वाटेत ज्या ज्या जाळ्यापर्यंत हे संदेश जातात त्या त्या जाळ्यात, पुढच्या जाळ्यापर्यंत पोहंचण्यात मदत करणारी माहिती असते. शेवटचे इच्छित स्थान कदाचित दुसऱ्‍या शहरात किंवा दुसऱ्‍या एखाद्या देशातही असू शकते.

इंटरनेटची रचना करणाऱ्‍यांनी घालून दिलेल्या काही सामान्य नियमांच्या आधारावर प्रत्येक जाळे आपल्या शेजारच्या जाळ्याशी “बोलू” शकते. सबंध जगात किती जाळी एकमेकांना जोडलेली आहेत? अंदाजे ३०,००० पेक्षा अधिक. अलीकडील सर्वेक्षणांनुसार, या जाळ्यांना सबंध जगातील १,००,००,००० पेक्षा अधिक संगणक आणि सुमारे ३,००,००,००० संगणक वापरणारे जोडलेले आहेत. जोडलेल्या संगणकांची संख्या दरवर्षी दुप्पट होत असल्याचा अंदाज आहे.

इंटरनेटवर लोकांना कोणकोणती माहिती सापडू शकते? वैद्यकीय शास्त्रापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानापर्यंतच्या निरनिराळ्या विविध विषयांवर यात निरंतर वाढत चाललेली माहिती उपलब्ध आहे. कलांविषयीचे व्यापक साहित्य, तसेच विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी साहित्य आणि मनोरंजन, करमणूक, खेळक्रिडा, खरेदी आणि रोजगार संधी यांच्याविषयीच्या माहितीचा देखील त्यात समावेश आहे. इंटरनेटच्या माध्यमाने तिथीपत्रक, शब्दकोश, विश्‍वकोश आणि नकाशे देखील पाहणे शक्य आहे.

तथापि, यासंबंधी काही चिंताजनक पैलूंचा देखील विचार केला पाहिजे. इंटरनेटवर असलेले सर्वच साहित्य हितकारक असते का? इंटरनेटवर कोणकोणते विनियोग व साधने उपलब्ध आहेत? कोणती पूर्वदक्षता घेणे सयुक्‍तिक ठरेल? पुढील लेखांत या प्रश्‍नांचा ऊहापोह करण्यात येईल.

[४ पानांवरील चौकट/चित्र]

इंटरनेटची सुरवात आणि रचना

दूरदूरच्या प्रदेशांतील सर्व शास्त्रज्ञ आणि संशोधक यांना दुर्मिळ व महागडे संगणक आणि त्यांचे माहितीसंच (फाईल्स्‌) वापरता यावेत म्हणून यु.एस. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सने १९६० च्या दशकात केलेल्या एका प्रयोगाच्या रूपात इंटरनेटची सुरवात झाली. त्यांचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सुसंबद्धपणे कार्य करू शकेल असा एकमेकांशी जोडलेल्या जाळ्यांचा एक समूह निर्माण करणे आवश्‍यक होते.

शीत युद्ध सुरू झाल्याने, “बाँबरोधक” जाळे निर्माण करता येईल का याविषयी जिज्ञासा निर्माण झाली. कारण हे शक्य झाल्यास, जाळ्याचा एक भाग जरी नष्ट झाला, तरीसुद्धा उरलेल्या भागांच्या साहाय्याने शेवटल्या इच्छित स्थानापर्यंत माहिती पोहंचू शकणार होती. या प्रयोगांच्या परिणामस्वरूपात निर्माण झालेल्या इंटरनेटमध्ये, संदेश वहनाची जबाबदारी कोणत्याही एका ठिकाणी केंद्रित असण्याऐवजी सबंध जाळ्यात वाटली गेली.

एव्हाना दोन दशकांपासून अस्तित्वात असलेले इंटरनेट, मुख्यतः ब्राउझर्सच्या उपयोगामुळे लोकप्रिय झाले आहे. ब्राउझर हे एक सॉफ्टवेअर साधन असून त्याच्या साहाय्याने संगणक वापरणाऱ्‍याला इंटरनेटवरील वेगवेगळ्या लोकेशन्सना “भेटी देणे” फारच सोपे जाते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा