तुमचा आहार तो प्राणघातक ठरू शकतो का?
“तुमच्या हृद् रोहिणीत खूपच अडथळा आहे, ती ९५ टक्के खंडित झाली आहे . . . तुम्हाला हृदयाचा झटका येण्याचा फक्त अवकाश आहे.”
बत्तीस वर्षांच्या ज्योला या कार्डियोलॉजिस्टच्या म्हणण्यावर विश्वासच बसेना; छातीत कळा उठत असल्यामुळे त्याने त्याला तपासले होते. हृदय विकारामुळे मरण पावणाऱ्या जवळजवळ निम्म्या लोकांना आपल्याला तो रोग झाल्याचे माहीत देखील नसते.
परंतु, ज्योची अशी स्थिती का झाली? ‘३२ वर्षांपर्यंत मी आपला ठरलेला “मांस आणि दूधाचा” अमेरिकन आहार घेत होतो,’ असे ज्यो खेदाने म्हणतो. ‘हा अमेरिकन आहार माझ्या आरोग्याला धोकादायक आहे याकडे मी दुर्लक्षच केलं होतं.’
तुमचा आहार आणि हृदय विकार
ज्योच्या आहारात काय चुकीचे होते? मूलतः, त्यामध्ये कोलेस्टेरॉल आणि मेद, विशेषतः संतृप्त मेदाचे प्रमाण जरा जास्तच होते. तरुणपणापासूनच, ज्यो अन्नाच्या जवळजवळ प्रत्येक घासाद्वारे स्वतःवर कोरोनरी हृदयविकाराचा धोका ओढवून घेत होता. खरे म्हणजे, संयुक्त संस्थानांतील मृत्यूच्या दहापैकी पाच प्रमुख कारणांशी मेदाचे अधिक प्रमाण असलेल्या आहाराचा संबंध आहे. यादीत हृद् रोहिणी विकाराचे नाव सर्वप्रथम आहे.
सात देशांमध्ये, ४० ते ४९ वयोगटातील सुमारे १२,००० पुरुषांवर केलेल्या अभ्यासातून आहार आणि हृदय विकार यातील संबंध दिसून येतो. अगदीच टोकाच्या विभिन्नता विशेषतः स्पष्टीकरण देणाऱ्या आहेत. अभ्यासातून दिसून आले, की संतृप्त मेदाच्या रूपात २० टक्के कॅलरी घेणाऱ्या फिनिश पुरुषांमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक होते, तर संतृप्त मेदाच्या रूपात केवळ ५ टक्के कॅलरी घेणाऱ्या जपानी पुरुषांमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे, फिनिश पुरुषांना जपानी पुरुषांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका येण्याची सहा पटीने अधिक शक्यता होती!
तथापि, आता जपानमध्ये कोरोनरी हृदयविकार ही काही दुर्मिळ बाब उरलेली नाही. गेल्या पुष्कळ वर्षांमध्ये, पाश्चिमात्य पद्धतींचे फास्ट फूड्स तेथे लोकप्रिय झाल्यापासून प्राण्यांची चरबी खाण्याचे प्रमाण ८०० टक्क्यांनी वाढले आहे. हल्ली, जपानी मुलांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण त्याच वयाच्या अमेरिकन मुलांपेक्षा अधिक आहे! स्पष्टतः, आहारातील मेद आणि कोलेस्टेरॉल प्राणघातक परिस्थिती ओढवण्यास विशेषतः हृदयविकारास कारणीभूत ठरतात.
कोलेस्टेरॉलची भूमिका
कोलेस्टेरॉल हा पांढरा, मेणासारखा पदार्थ असून जीवनावश्यक आहे. सर्व मानवांच्या व प्राण्यांच्या पेशींमध्ये हा पदार्थ आढळतो. आपले यकृत कोलेस्टेरॉल निर्माण करते आणि आपण खातो त्या अन्नातही ते विविध प्रमाणात आढळते. रक्त हे कोलेस्टेरॉल, मेद आणि प्रथिने यांनी बनलेल्या लिपोप्रोटीन नामक कणांद्वारे पेशींमध्ये कोलेस्टेरॉल वाहून नेते. रक्तातील अधिकांश कोलेस्टेरॉल, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) या दोन प्रकारच्या लिपोप्रोटीनांमधून वाहून नेले जाते.
एलडीएलमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असते. रक्तप्रवाहात त्यांचे अभिसरण होत असताना, पेशींच्या अस्तरांवरील एलडीएल ग्राहकांद्वारे ते पेशींमध्ये प्रवेश करतात आणि पेशीच्या उपयोगासाठी त्यांचे विघटन केले जाते. शरीरातील बहुतांश पेशींमध्ये अशाप्रकारचे ग्राहक असतात आणि ते काही प्रमाणात एलडीएल शोषून घेतात. पण यकृताची रचना अशी करण्यात आली आहे, की एलडीएल ग्राहकांच्या साहाय्याने रक्तप्रवाहातील ७० टक्के एलडीएल येथेच काढून टाकले जाते.
दुसऱ्या बाजूला पाहता, एचडीएल हे कोलेस्टेरॉलसाठी तान्हेलेले कण असतात. रक्तप्रवाहातून प्रवास करताना ते अतिरिक्त कोलेस्टेरॉल शोषून यकृताकडे नेतात. यकृत कोलेस्टेरॉलचे विघटन करून शरीरातून त्यास बाहेर टाकते. तर अशाप्रकारे, आवश्यक ते कोलेस्टेरॉल उपयोगात आणून उर्वरित फेकून दिले जाईल अशा अद्भुत तऱ्हेने शरीराची ठेवण केलेली आहे.
रक्तात एलडीएलचे प्रमाण वाढल्यावर समस्या निर्माण होते. यामुळे रक्तवाहिन्यांच्या अस्तरात दाह निर्माण होण्याची शक्यता बळावते. दाह निर्माण झाल्यावर रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि त्यांच्यामधून ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी होते. या अवस्थेला रोहिणीविलेपीविकार म्हणतात. ही प्रक्रिया हळूहळू आणि कोणतीही लक्षणे न दाखवता वाढत जाते आणि कित्येक दशकांनंतर तिची स्पष्ट लक्षणे दिसून येऊ लागतात. त्यातील एक लक्षण म्हणजे, ज्योला झाले त्याप्रमाणे ॲनजायना पेक्टोरिस अथवा छातीत कळ येणे हे आहे.
हृद् रोहिणी बहुधा रक्ताच्या गुठळीमुळे पूर्णतः खंडित होते तेव्हा त्या रोहिणीतून हृदयाच्या ज्या भागाला रक्त पोचते तो भाग निष्क्रिय होतो. याचाच परिणाम म्हणजे, अचानक आणि बहुधा प्राणघातक ठरणारा मायोकार्डियल इन्फार्कशन होय—सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास हृदयविकाराचा झटका. हृद् रोहिणी निम्मी खंडित झाली तरीही, हृदयाचे ऊतक मृत होऊ शकते; हे लक्षण कदाचित दीर्घकालीन शारीरिक अस्वस्थपणाद्वारे दिसून येणार नाही. शरीराच्या इतर भागांमध्ये रक्तवाहिन्या खंडित झाल्याने मस्तिष्काघात, पायांमध्ये गँगरीन, आणि यकृत देखील निकामी होऊ शकते.
म्हणूनच एलडीएलला अपायकारक कोलेस्टेरॉल आणि एचडीएलला फायदेकारक कोलेस्टेरॉल असे संबोधले जाते. एलडीएलचे प्रमाण जास्त आणि एचडीएलचे प्रमाण कमी असल्यास, हृदयविकाराच्या झटक्याचा संभव बळावतो.a बहुधा, साध्यासोप्या रक्त तपासणीमुळे एखाद्या व्यक्तीला ॲनजायनासारखी स्पष्ट लक्षणे दिसण्याआधीच भावी धोक्याची चुणूक लागू शकते. म्हणून, आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण आटोक्यात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता तुमच्या आहाराचा कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर कसा प्रभाव पडू शकतो ते आपण पाहू या.
रक्तातील कोलेस्टेरॉल आणि आहार
कोलेस्टेरॉल हा प्राण्यांपासून मिळत असलेला अन्नातील एक नैसर्गिक पदार्थ आहे. मांस, अंडी, मासे, चिकन आणि दूधाचे पदार्थ या सर्वांमध्ये कोलेस्टेरॉल असते. परंतु, वनस्पतींपासून मिळालेल्या अन्नात कोलेस्टेरॉल नसते.
आवश्यक असलेले कोलेस्टेरॉल शरीरातच उत्पन्न होत असल्यामुळे अन्नामधून घेतलेले कोलेस्टेरॉल जादा असते. आपल्या आहारातील बहुतांश कोलेस्टेरॉल यकृतात जाते. साधारणतः, आहारातील कोलेस्टेरॉल यकृतात येते तेव्हा यकृत त्यावर प्रक्रिया करते आणि स्वतःचे कोलेस्टेरॉलचे उत्पन्न कमी करते. यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते.
परंतु, यकृताला आहारातल्या कोलेस्टेरॉलवर लवकर प्रक्रिया करता आली नाही इतके त्याचे प्रमाण अधिक असल्यास काय घडते? रक्तवाहिनीच्या अस्तरातील पेशींमध्ये थेट कोलेस्टेरॉल शिरण्याची संभावना वाढते. हे घडते तेव्हा, रोहिणीविलेपीविकार होतो. पण, आहारातील कोलेस्टेरॉल शोषल्यावरही शरीर तितक्याच प्रमाणात कोलेस्टेरॉल निर्माण करत राहते तेव्हा विशेषकरून ही स्थिती घातक बनते. संयुक्त संस्थानांत, ५ पैकी १ व्यक्तीला ही समस्या आहे.
म्हणून आहारातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करणे हे सुज्ञतेचे पाऊल आहे. परंतु, आपल्या आहारातील आणखी एका घटकाचा रक्तातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर खूपच मोठा प्रभाव पडतो—तो घटक म्हणजे संतृप्त मेद.
मेद आणि कोलेस्टेरॉल
मेदाचे दोन वर्ग आहेत: संतृप्त आणि असंतृप्त. असंतृप्त मेद एकतर मोनोअनसॅच्युरेटेड किंवा पॉलीअनसॅच्युरेटेड असू शकतात. संतृप्त मेदापेक्षा असंतृप्त मेद तुमच्याकरता अधिक चांगले असू शकतात कारण संतृप्त मेद खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. संतृप्त मेद हे कार्य दोन पद्धतींनी करतात: ते यकृतात जास्त कोलेस्टेरॉल निर्माण करण्यास हातभार लावून यकृताच्या पेशींवरील एलडीएल ग्राहकांवर दडपण आणतात आणि रक्तातून एलडीएल काढून टाकण्याची गती कमी करतात.
प्राण्यांपासून मिळालेल्या अन्नपदार्थांमध्ये संतृप्त मेद असते जसे की, बटर, अंड्याचे बलक, चरबी, दूध, आइस्क्रीम, मांस आणि चिकन. चॉकलेट, नारळ आणि त्याचे तेल, वनस्पती तूप आणि पाम तेलातही त्याचे प्रमाण अधिक असते. संतृप्त मेद सर्वसाधारण तापमानात घनरूपात असते.
दुसऱ्या बाजूला पाहता, असंतृप्त मेद खोली तापमानात द्रवरूपात असते. संतृप्त मेद असलेल्या अन्नपदार्थांऐवजी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असलेले अन्नपदार्थ खाल्ल्यास तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते.b मक्याच्या तेलात आणि सूर्यफुलाच्या तेलात असलेले पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट फायदेकारक व अपायकारक अशा दोन्ही प्रकारच्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते, तर ऑलिव्ह तेलात आणि कॅनोला तेलात भरपूर प्रमाणात असलेले मोनोसॅच्युरेटेड फॅट फायदेकारक कोलेस्टेरॉलवर काहीच परिणाम न करता केवळ अपायकारक कोलेस्टेरॉल कमी करते.
अर्थात, मेद आपल्या आहारातील अत्यावश्यक भाग आहे. त्यांच्याविना अ, ड, इ आणि क ही जीवनसत्त्वे आपल्याला मिळाली नसती. परंतु, आपल्या शरीराला लागणारे मेद अत्यंत कमी आहे. भाज्या, कडधान्ये, धान्ये आणि फळांमधून ही गरज सहजगत्या भागवली जाते. यास्तव, संतृप्त मेद कमी केल्याने शरीराला आवश्यक पोषकांपासून वंचित ठेवले जात नाही.
मेद आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याचे कारण
मेद आणि कोलेस्टेरॉलचे अधिक प्रमाण असलेल्या आहारामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढेलच असे आहे का? तसे काही नाही. सावध राहा! नियतकालिकाला मुलाखत दिल्यानंतर, पहिल्या लेखाच्या सुरवातीला उल्लेखिलेल्या थॉमसने रक्ताची तपासणी करायचे ठरवले. परिणामांवरून दिसून आले, की त्याचे कोलेस्टेरॉलचे प्रमाण हवे तितकेच होते. स्पष्टतः, त्याचे यकृत कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास समर्थ होते.
परंतु, याचा अर्थ थॉमसला कोणताही धोका नाही असे मुळीच नाही. अलीकडील अभ्यासांवरून स्पष्ट होते, की रक्तातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर काहीच प्रभाव न पाडता आहारातील कोलेस्टेरॉल कोरोनरी हृदयविकाराच्या धोक्यावर मात्र प्रभाव पाडू शकते. “कोलेस्टेरॉलचे अधिक प्रमाण असलेल्या अन्नामुळे, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असलेल्या लोकांनाही हृदयविकार होऊ शकतो,” असे नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाचे डॉ. जेरेमाया स्टॅमलर म्हणतात. “आणि म्हणूनच, रक्तातल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कितीही असले, तरी सर्व लोकांनी कोलेस्टेरॉल कमी खाण्याचा विचार केला पाहिजे.”
शिवाय, आहारात तर मेद असतेच. अन्नातील संतृप्त किंवा असंतृप्त अशा कोणत्याही मेदामुळे रक्तातल्या मेदाचे प्रमाण जास्त झाले म्हणजे लाल रक्त पेशींच्या गुठळ्या होतात. असे गोठलेले रक्त अरुंद रक्तकोशिकांमधून वाहत नाही आणि त्यामुळे ऊतकांना आवश्यक ते पोषक पदार्थ मिळत नाहीत. रक्तवाहिन्यांमधून गुठळ्या झालेल्या पेशी वाहत असल्यामुळे, रक्तवाहिन्यांच्या अस्तराला ऑक्सिजनचा नीट पुरवठाही मिळत नाही ज्यामुळे अस्तराला हानी पोहंचून सहजगत्या दाह निर्माण होऊ शकतो. परंतु जास्त प्रमाणात मेद खाण्याचा आणखी एक धोका आहे.
कर्करोग आणि आहार
“सर्व प्रकारचे मेद—संतृप्त असोत अथवा असंतृप्त—ते काही विशिष्ट प्रकारच्या कर्क पेशींच्या वाढीसाठी कारणीभूत असतात,” असे डॉ. जॉन ए. मॅकडुगल यांचे म्हणणे आहे. कोलोरेक्टल कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांचे आंतरराष्ट्रीय प्रमाण दाखवणाऱ्या एका सर्वेक्षणावरून, विकसनशील देशांमध्ये आणि जेथे आहारात मेदाचे प्रमाण अधिक असते त्या पाश्चात्त्य देशांमध्ये भीतीदायक विषमता दिसून आली. उदाहरणार्थ, संयुक्त संस्थानांत, कोलोरेक्टल कर्करोग हा पुरुषांना त्याचप्रमाणे स्त्रियांना सर्वसाधारणतः होणाऱ्या कर्करोगांपैकी दुसऱ्या स्थानावर आहे; तर स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा अगदीच सर्वसाधारण कर्करोग आहे.
अमेरिकन कर्करोग संस्थेनुसार, जे लोक कर्करोगाचा जास्त उद्भव असलेल्या देशात स्थलांतर करतात त्यांच्याबाबतीत नवीन जीवनशैली आणि आहाराशी जुळवून घ्यायला त्यांना जितका वेळ लागतो त्यावर आधारित त्यांच्यामधल्या कर्करोगाचे प्रमाण कालांतराने त्या देशाइतकेच होते. कर्करोग संस्थेचे पाककृतींचे पुस्तक म्हणते, “हवाईला स्थलांतर केलेल्या जपानी लोकांमध्ये पाश्चिमात्य कर्करोगाची वृत्ती निर्माण होऊ लागलीय: आंतड्यांच्या आणि स्तनाच्या कर्करोगाचा जास्त उद्भव तर पोटाच्या कर्करोगाचा कमी उद्भव होतो; जपानी कर्करोगाच्या वृत्तीच्या हे अगदीच उलट आहे.” कर्करोगाचा संबंध आहाराशी आहे हे स्पष्ट होते.
तुमच्या आहारात संपूर्ण मेद, संतृप्त मेद, कोलेस्टेरॉल आणि कॅलरी यांचे प्रमाण जास्त असल्यास तुम्हाला काही बदल करण्याची आवश्यकता आहे. योग्य आहारामुळे प्रकृती उत्तम राहू शकते आणि अयोग्य आहारामुळे झालेले दुष्परिणामही त्याद्वारे दुरुस्त करता येतात. जवळजवळ ४०,००० किंवा त्याहूनही अधिक डॉलर खर्चाची वेदनामय बायपास सर्जरी लक्षात घेता हे निश्चितच इष्ट ठरेल.
खाण्याबाबत निवडक राहून तुम्ही वजन कमी करू शकता, हलके वाटून घेऊ शकता आणि काही रोग टाळू शकता किंवा त्यांचे निवारण करू शकता. यासाठी दिलेल्या सूचना पुढील लेखात चर्चिल्या गेल्या आहेत.
[तळटीपा]
a प्रत्येक डेसीलीटरमधील मिलीग्रॅम या तऱ्हेने कोलेस्टेरॉलचे प्रमाण मोजले जाते. एकूण कोलेस्टेरॉलचे—एलडीएल, एचडीएल, आणि रक्तातील इतर मेद प्रथिनांमधील कोलेस्टेरॉल—यांचे प्रत्येक डेसिलिटरमध्ये २०० मिलीग्रॅम पेक्षा कमी असणे हे इष्ट प्रमाण आहे. प्रत्येक डेसिलीटरमध्ये ४५ मिलीग्रॅम किंवा त्यापेक्षाही अधिक एचडीएलचे प्रमाण असणे इष्ट मानले जाते.
b अमेरिकन लोकांकरता १९९५ आहारसंहितेमध्ये दररोज ३० टक्के कॅलरींपेक्षा अधिक मेद खाऊ नये आणि संतृप्त मेदाचे प्रमाण १० टक्के कॅलरींपेक्षाही कमी असावे अशी शिफारस केली आहे. संतृप्त मेदाची १ टक्का कॅलरी कमी केल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण प्रत्येक डेसिलीटरला ३ मिलीग्रॅम इतके कमी होते.
[८ पानांवरील चित्र]
हृद् रोहिणींचा आडवा छेद: (१) पूर्णतः मोकळी, (२) अर्धवट खंडित, (३) जवळजवळ पूर्णतः खंडित