वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ७/८ पृ. ४-७
  • लठ्ठपणा अपायकारक ठरतो तेव्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लठ्ठपणा अपायकारक ठरतो तेव्हा
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • जितके वजन, तितका धोका
  • नवीन वजन सूचना
  • आपले वजन इतके कसे वाढले?
  • आपण यशस्वी ठरणार का?
सावध राहा!—१९९७
g97 ७/८ पृ. ४-७

लठ्ठपणा अपायकारक ठरतो तेव्हा

“माझे कोणतेच कपडे आता मला होत नाहीत,” ३५ वर्षांची रोझा खेदाने म्हणते. “आता मी ८६ किलो वजनाची झालेय आणि माझं वजन इतकं वाढेल अशी मी कधी कल्पनाच केली नव्हती!”

आपल्या स्थूलपणाची चिंता वाटणारी रोझा एकटीच नव्हे. ती राहते त्या संयुक्‍त संस्थानांत, त्या राष्ट्रातील एक तृतीयांश लोक स्थूल आहेत.a ब्रिटनमध्ये, स्थूल असलेल्या प्रौढांचे प्रमाण दहा वर्षांमध्ये दुप्पट झाले आहे. त्याचप्रमाणे, ज्या जपानमध्ये अधिक वजन असलेल्या लोकांचे प्रमाण अगदीच तुरळक असायचे तेथे स्थूलपणा आता सर्वसामान्य होत चाललाय.

आजकाल अधिकाधिक मुलांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे. ६ ते १७ वयोगटातील सुमारे ४७ लाख अमेरिकन युवकांचे वजन अतिशय जास्त आहे, तर तज्ज्ञांच्या अनुमानानुसार सुमारे २० टक्के कॅनेडियन मुले स्थूल आहेत. अलीकडील वर्षांत, सिंगापूरमध्ये मुलांचा स्थूलपणा तीन पटीने वाढला आहे.

काही देशांत, अधिक वजन असण्याला संपन्‍नता आणि ठणठणीत प्रकृतीचा पुरावा मानले जाते; गरिबी आणि अवपोषणापेक्षा तरी ही अवस्था चांगली असे मानले जाते. पण, अन्‍नाचा तुटवडा नसलेल्या पाश्‍चिमात्य देशांमध्ये मात्र वजन वाढणे हे सहसा इष्ट मानले जात नाही. त्याउलट, ती चिंताजनक बाब समजली जाते. का बरे?

अमेरिकेचे माजी सर्जन जनरल, डॉ. सी. एवरेट कूप म्हणतात, “अनेक लोकांना स्थूलपणा म्हणजे स्वरूपाची समस्या वाटत असली तरी खरे पाहता ती एक गंभीर समस्या आहे.” न्यूयॉर्क येथील अंतःस्रावविज्ञानतज्ज्ञ एफ. इगझेवियर पी-सन्यर स्पष्ट करतात: “[अमेरिकेतील लोक स्थूल होत असल्यामुळे] अधिकाधिक लोकांना मधुमेह, उच्च रक्‍तदाब, अर्धांगवायू, हृदयविकार त्याचप्रमाणे कर्करोगाच्या काही प्रकारांचाही धोका संभावत आहे.”

जितके वजन, तितका धोका

उदाहरणार्थ, १६ वर्षांपर्यंत निरीक्षण केलेल्या १,१५,००० अमेरिकन परिचारिकांचा एक अभ्यास विचारात घ्या. त्या अभ्यासातून असे निष्पन्‍न झाले की, प्रौढांचे वजन पाच ते आठ किलो जरी वाढले, तरीसुद्धा त्यासोबत हृदयविकाराचा धोकाही अधिक वाढतो. न्यू इंग्लंड औषध पत्रिका (इंग्रजी) याच्या सप्टेंबर १४, १९९५ च्या अंकात प्रकाशित झालेल्या त्या अभ्यासाचा वृत्तान्त दाखवून देतो की, कर्करोगाने संभवलेले एक तृतीयांश मृत्यू आणि हृदय व रक्‍त वाहिन्यांमुळे संभवलेले निम्मे मृत्यू अधिक वजनामुळे होते. द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन (जामा) च्या मे २२/२९, १९९६ अंकातील एका अहवालानुसार, “पुरुषांमधील ७८ टक्के उच्च रक्‍तदाब आणि स्त्रियांमधील ६५ टक्के उच्च रक्‍तदाब स्थूलपणामुळे आहे असा थेट संबंध लावता येतो.” अमेरिकन कर्करोग संस्थेप्रमाणे, “अत्यंत स्थूल” (सर्वसाधारण वजनापेक्षा ४० टक्के अथवा त्याहूनही अधिक वजन) असलेल्या लोकांना “कर्करोगाचा धोका जास्त आहे.”

पण केवळ वजन वाढणे हेच हानीकारक नाही; शरीरात कोणकोणत्या ठिकाणी वसा साठला आहे त्याचा देखील रोगाच्या धोक्यावर परिणाम पडतो. कंबर आणि मांड्यांपेक्षा उदरात जास्त वसा असलेल्या लोकांना खरं म्हणजे अधिक धोका असतो. उदरातील वसा असल्यास मधुमेह, हृदयविकार, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोग यांचा धोका वाढतो.

त्याचप्रमाणे, स्थूल युवकांमध्येही उच्च रक्‍तदाब, कोलेस्टेरॉलचे अधिक प्रमाण आणि मधुमेहाची पूर्वलक्षणे दिसून येतात. आणि सहसा हे युवक स्थूल प्रौढ बनतात. द लँसेट या ब्रिटिश वैद्यकीय पत्रिकेतील माहिती उपयोगात आणून द न्यूयॉर्क टाइम्सने अहवाल दिला की, “लहानपणापासूनच स्थूल असणारे, सर्वसाधारण लोकांपेक्षा लवकर मरण पावले आणि त्यांना इतरांपेक्षा अधिक रोग होते.”

नवीन वजन सूचना

वजनासंबधी गंभीर संकटप्रसंग असल्याची खात्री पटल्यावर अमेरिकन सरकारने १९९५ मध्ये शिफारस केलेल्या वजनसंबंधी सूचना आणखीन कडक बनवल्या. (पुढच्या पानावरील पेटी पाहा.) या अद्ययावत सूचनांच्या साहाय्याने “स्वास्थ्यकारी वजन,” “सर्वसाधारण स्थूलपणा,” आणि “अति स्थूलपणा” हे ओळखता येते. या सूचना कोणत्याही वयोगटातील प्रौढ पुरुष व स्त्रिया या दोघांनाही लागू होतात.

सन १९९० च्या सूचनांप्रमाणे, मध्यम वयात मध्य भागाचे पसरण म्हटल्या जाणाऱ्‍या अर्थात शरीरातील मध्य भागातल्या वाढीसाठी सूट होती. परंतु, नवीन सूचनांमध्ये ही सूट दिलेली नाही कारण कालांतराने प्रौढांचे वजन वाढू नये असे दिसून आले आहे.b म्हणून, आधी साधारण वजनाची व्यक्‍ती आता स्थूल वर्गात मोडते. उदाहरणार्थ, १९९० च्या सूचनांनुसार ७५ किलोग्रॅम वजन असलेल्या ३५ ते ६५ वयोगटातील १६८ सेंटीमीटर उंचीची व्यक्‍ती स्वास्थ्यकारी वजनाच्या वर्गात मोडत होती. परंतु, नवीन सूचनांप्रमाणे त्याचे अथवा तिचे पाच किलो जास्त वजन असेल!

आपले वजन इतके कसे वाढले?

आनुवंशिकतेमुळे एखादी व्यक्‍ती स्थूल बनू शकते, पण पाश्‍चिमात्य देशांमध्ये वजन वाढीचे हे कारण ठरत नाही. या समस्येला दुसरीच गोष्ट कारणीभूत आहे.

पेशेवाईक आरोग्य अधिकारी मान्य करतात, की चरबीयुक्‍त अन्‍नामुळे आपले वजन वाढते. भरपूर मांस, पुष्कळसे दुधाचे पदार्थ, बेक्ड पदार्थ, फास्ट फूड्‌स, स्नॅक फूड्‌स, तळलेले पदार्थ, सॉस, रस्सा आणि तेल यांमध्ये चरबीचे खूप जास्त प्रमाण असते आणि हे पदार्थ खाल्ल्याने स्थूलपणा वाढू शकतो. ते कसे?

त्याचे असे आहे, की शरीराच्या आवश्‍यकतेपेक्षा अधिक कॅलरींचे अन्‍न खाल्ल्याने आपले वजन वाढते. प्रथिनाच्या किंवा पिष्टमय पदार्थांच्या प्रत्येक ग्रॅममध्ये चार कॅलरी असतात तर चरबीच्या प्रत्येक ग्रॅममध्ये नऊ कॅलरी असतात. म्हणून आपण चरबीयुक्‍त पदार्थ खातो तेव्हा अधिक कॅलरी घेत असतो. पण आणखीन एक महत्त्वपूर्ण घटक आहे—तो म्हणजे, मानवी शरीर पिष्टमय पदार्थ, प्रथिन आणि मेद यांद्वारे पुरवलेल्या ऊर्जेचा उपयोग ज्याप्रमाणे करते ती पद्धत. शरीर, प्रथम पिष्टमय पदार्थ आणि प्रथिनांचे, आणि शेवटी मेदाचे ज्वलन करते. उपयोगात न आणलेल्या मेद कॅलरींचे शरीरातील चरबीत रूपांतर होते. म्हणून चरबीयुक्‍त पदार्थ कमी करणे हा वजन घटवण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग आहे.

पण, चरबीयुक्‍त पदार्थ कमी केल्यावरही आपले वजन वाढत आहे असे काहींना आढळले आहे. का बरे? एक कारण म्हणजे, ते जास्त जेवतात. अमेरिकेतील एक पोषण तज्ज्ञा म्हणतात: “जास्त जेवण वाढले जात असल्यामुळे आपण प्रमाणापेक्षा जास्त खातो. आता अन्‍न आहे म्हटल्यावर आपण खातोच.” लोक कमी चरबी किंवा चरबीरहित अन्‍नपदार्थ देखील प्रमाणापेक्षा जरा जास्तच खातात. पण अमेरिकन अन्‍न उद्योग सल्ला केंद्राच्या एक तज्ज्ञा म्हणतात: “कमी चरबी असलेल्या अन्‍नपदार्थांची चव वाढवण्यासाठी बहुधा [अधिक कॅलरी असलेल्या] साखरेचे प्रमाण वाढवले जाते.” यास्तव, द न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिले: “१९९० च्या दशकातील—दिलेल्या पैशांत होता होईल तितके मिळवणे आणि कम-चरबीचे अथवा चरबीरहित अन्‍नपदार्थ खाणे—हे दोन नवीनच प्रकार अधाशीपणाला उत्तेजन देत आहेत” आणि म्हणून वजन वाढत आहे.

ऐशआरामाच्या स्वस्थ जीवनामुळे देखील वजन वाढते. ब्रिटनमधील एका अभ्यासात असे आढळले, की तेथील एक तृतीयांशापेक्षा अधिक लोक प्रत्येक आठवडी २० मिनिटांपेक्षा कमी वेळ सर्वसाधारण व्यायाम करतात. निम्म्यापेक्षा कमी लोक सक्रिय क्रिडेत कधीच भाग घेत नाहीत. पुष्कळशा पाश्‍चिमात्य देशांमध्ये पायी चालण्याऐवजी कारनेच प्रवास केला जातो आणि बसून टीव्ही पाहण्यात अधिक वेळ घालवण्यामुळेही आळस आणि खादाडपणाला प्रोत्साहन मिळाले आहे. संयुक्‍त संस्थानांत, मुले प्रत्येक आठवडी अंदाजे २६ तास टीव्ही पाहण्यात घालवतात; शिवाय, व्हिडिओ गेम्समध्ये वेळ घालवतात तो वेगळाच. आज केवळ ३६ टक्के शाळांमध्ये शारीरिक शिक्षण दिले जात आहे.

वजन वाढण्यामागे मानसशास्त्रीय कारणे देखील आहेत. “आपण भावनिक गरजांमुळे खातो,” असे जॉन्स हॉपकिन्स वजन नियंत्रण केंद्रातील डॉ. लॉरेन्स चेस्किन यांचे म्हणणे आहे. “आपण आनंदी असतो तेव्हा खातो, दुःखी असतो तेव्हाही खातो. आपला असा समजच झाला आहे, की अन्‍न अनेक गोष्टींसाठी पर्याय आहे.”

आपण यशस्वी ठरणार का?

वजन वाढीच्या समस्या गुंतागुंतीच्या आहेत. प्रत्येक वर्षी, अदमासे आठ कोटी अमेरिकन लोक पथ्य पाळतात. पण, थोडेफार वजन कमी केल्यावर जवळजवळ सगळेच पुन्हा पूर्वीच्याच सवयीवर येतात. पाच वर्षांमध्ये, ९५ टक्के लोकांचे कमी केलेले वजन पुन्हा वाढते.

वजन कमी करण्यासाठी आणि ते नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवन-पद्धतींमध्ये बदल करणे आवश्‍यक आहे. अशा या बदलांकरता प्रयत्नाची आणि निर्धाराची, त्याचप्रमाणे कुटुंब व मित्रपरिवाराच्या साहाय्याची गरज आहे. काही बाबतीत, आरोग्य तज्ज्ञांकडील मदतही आवश्‍यक असेल.c तथापि, तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी सकारात्मक उत्तेजनाचे अगत्य आहे. स्वतःला पुढील प्रश्‍न करणे उचितच ठरेल, ‘मला वजन कमी का करायचंय?’ आरोग्याचे धोके टाळण्याच्या मनसेसोबत आपल्याला आरोग्यदायी वाटावे, आपण चांगले दिसावे आणि आपल्या जीवनाचा दर्जा सुधारावा अशी मनसा देखील असली तर वजन कमी करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्याची अधिक शक्यता आहे.

रुचकर त्याचप्रमाणे कमी कॅलरींचे स्वादिष्ट आणि समाधानकारक अन्‍न तुम्ही हवे तितके खाऊ शकता. परंतु, कोणत्या खाद्यपदार्थांमुळे तुमचे वजन घटू शकते हे पाहण्याआधी, आहारातील विशिष्ट घटक आरोग्य धोके कसे बनू शकतात त्याचे परीक्षण आपण करू या.

[तळटीपा]

a स्थूलपणाची व्याख्या, सर्वसाधारण वजनापेक्षा २० किंवा त्याहूनही अधिक टक्के वजन असणे अशी केली जाते.

b सन १९९५ च्या सूचना बहुतेक वयोगटांना लागू होतात पण सर्वांनाच नव्हे. “या नवीन वजन सूचना ६५ वर्षांपेक्षा अधिक वर्षांच्या लोकांना कदाचित लागू होत नाहीत असे सर्वसामान्य मत आहे,” असे डॉ. रॉबर्ट एम. रस्सल, जून १९, १९९६ अंकाच्या जामा या नियतकालिकेत म्हणतात. “वृद्ध व्यक्‍तीचे वजन जरा जास्त असल्यामुळे आजारपणात शक्‍तीचा साठा पुरवण्यासाठी आणि स्नायू व हाडे बळकट ठेवण्यासाठी फायदा देखील होऊ शकतो.”

c वजन कमी करण्याविषयी पाहा सावध राहा!, (इंग्रजी) मे ८, १९९४, पृष्ठे २०-२; जानेवारी २२, १९९३, पृष्ठे १२-१४; आणि डिसेंबर ८, १९८९, पृष्ठे ३-१२.

[६ पानांवरील तक्‍ता]

“स्वास्थ्यकारी वजन,” “सर्वसाधारण स्थूलपणा,” “अति स्थूलपणा” यांपैकी तुम्ही कोणत्या वर्गात मोडता? येथे दिलेला आलेख तुम्हाला या प्रश्‍नाचे उत्तर द्यायला मदत करील

स्त्रिया व पुरुष दोघांसाठी १९९५ वजन सूचना

(For fully formatted text, see publication)

उंची* सेंमी

१९८

१८०

१७० स्वास्थ्यकारी वजन सर्वसाधारण स्थूलपणा अति स्थूलपणा

१५०

किलो ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० ११०

वजन†

आकडेवारी सौजन्य: U.S. Department of Agriculture, U.S. Department of Health and Human Services

* चपला बूट न घालता

† कपडे न घालता. वजनाचे मोठे आकडे, बळकट स्नायू आणि अस्थी असलेल्या लोकांना, उदाहरणार्थ पुष्कळशा पुरुषांना लागू होतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा