वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ६/८ पृ. ८-१०
  • तुम्हाला मिळू शकते हितावह करमणूक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला मिळू शकते हितावह करमणूक
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • निवडक असा
  • पालकांची भूमिका
  • इतर गोष्टींचा आनंद घेणे
  • हितकारक मनोरंजन कसे निवडावे
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • यहोवाच्या दृष्टीने चांगलं मनोरंजन निवडा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • विचार करून मनोरंजन निवडा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • सामाजिक मनोरंजन—त्याचे लाभ मिळवा, पाश टाळा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ६/८ पृ. ८-१०

तुम्हाला मिळू शकते हितावह करमणूक

बायबल करमणुकीचा आनंद घेण्याचं खंडन करत नाही आणि करमणुकीचा आनंद लुटणं म्हणजे वेळ वाया घालवणं असंही समजत नाही. त्याउलट, उपदेशक ३:४ म्हणतं, “हसण्याचा समय” आणि “नृत्य करण्याचा समय असतो.”a प्राचीन इस्राएल येथील देवाचे लोक विविध प्रकारची करमणूक करत असत; संगीत, नृत्य आणि खेळाचे प्रकार देखील त्यांच्यामध्ये होते. स्वतः येशू एकदा एका भव्य विवाह मेजवानीसाठी आणि दुसऱ्‍या वेळी एका ‘मोठ्या मेजवानीसाठी’ उपस्थित होता. (लूक ५:२९; योहान २:१, २) म्हणून, बायबल मौज करण्याविरुद्ध नाही.

तथापि, हल्लीची बहुतांश करमणूक देवाला नापसंत असणाऱ्‍या वर्तणुकीला उत्तेजन देत असल्यामुळं प्रश्‍न उभा राहतो, तुमच्या करमणुकीचा दर्जा हितकारक असण्याची तुम्ही खात्री कशी करू शकता?

निवडक असा

कोणत्या प्रकारची करमणूक करावी ते ठरवताना, ख्रिस्ती बायबल तत्त्वांचं मार्गदर्शन घेतील. उदाहरणार्थ, स्तोत्रकर्त्या दावीदानं लिहिलं: “परमेश्‍वर नीतिमानाला कसास लावितो; त्याला दुर्जनाचा व आततायी माणसाचा वीट येतो.” (स्तोत्र ११:५) तसंच पौलानं कलस्सैकरांना लिहिलं: “तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ . . . हे जिवे मारा; क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणापासून दूर करा.”—कलस्सैकर ३:५, ८.

आज प्रस्तुत केली जाणारी बहुतेक करमणूक या प्रेरित सल्ल्याचा भंग करते. ‘पण पडद्यावर दाखवली जाणारी कृत्ये मी कधीच करणार नाही,’ असा आक्षेप काहीजण घेतील. ते खरंही असेल. पण तुम्ही निवडलेल्या करमणुकीवरून तुम्ही कसल्या प्रकारची व्यक्‍ती बनाल हे सूचित होत नसलं, तरी तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्‍ती आहात हे तरी प्रकट होतंच. उदाहरणार्थ, तुम्ही देखील “हिंसेचे प्रेमी” आहात की ‘जारकर्म, कामवासना, लोभ आणि शिवीगाळ’ यांच्यातच मग्न राहणारे आहात की, “वाइटाचा द्वेष” करणाऱ्‍यांपैकी आहात हे यावरून स्पष्ट होऊ शकतं.—स्तोत्र ९७:१०.

पौलानं फिलिप्पैकरांना लिहिलं: “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.”—फिलिप्पैकर ४:८.

पण कोणत्या न कोणत्या प्रकारची अधार्मिकता असली, समजा एखादा गुन्हा असला म्हणजे तो प्रत्येक चित्रपट, पुस्तक किंवा टीव्ही कार्यक्रम अनुचित आहे असा या शास्त्रवचनाचा अर्थ होतो का? किंवा विनोदी करमणुकीचे सर्व प्रकार ‘गंभीरतेचे’ नसल्यामुळं निषिद्ध आहेत का? नाही, कारण संदर्भावरून दिसून येतं की, पौल करमणुकीची नव्हे तर हृदयाच्या चिंतनाची चर्चा करत होता, की जे यहोवाला संतुष्ट करण्यावर केंद्रित असायला हवं. (स्तोत्र १९:१४) तथापि, पौलाचे शब्द आपल्याला करमणुकीची निवड करताना मदतदायी ठरू शकतात. फिलिप्पैकर ४:८ येथील तत्त्वानुरूप आपण स्वतःला प्रश्‍न विचारू शकतो, ‘माझी करमणूक, शुद्ध नसलेल्या गोष्टींवर मनन करण्यास कारणीभूत ठरते का?’ तसं असल्यास, आपल्याला बदल करण्याची आवश्‍यकता आहे.

परंतु, करमणूक निवडताना ख्रिश्‍चनांनी ‘आपली सहनशीलता सर्वांना कळून येईल’ अशाप्रकारे वागावं. (फिलिप्पैकर ४:५) अर्थात, करमणुकीत असाही अतिरिक्‍तपणा आहे जो ख्रिश्‍चनांकरता स्पष्टतः अनुचित आहे. त्याशिवाय, प्रत्येक व्यक्‍तीनं साधकबाधक विचारांती निर्णय घ्यावेत जेणेकरून देवासमोर आणि माणसासमोर त्याला शुद्ध विवेक राखता येईल. (१ करिंथकर १०:३१-३३; १ पेत्र ३:२१) क्षुल्लक बाबींवर इतरांना नावं ठेवणं किंवा इतरांनी काय करावं आणि काय करू नये असं दडपण आणणारे नियम बनवणं योग्य ठरणार नाही.b—रोमकर १४:४; १ करिंथकर ४:६.

पालकांची भूमिका

करमणुकीच्या बाबतीत पालकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पौलानं लिहिलं: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) अशा तऱ्‍हेनं, कौटुंबिक सदस्यांच्या केवळ भौतिक गरजाच नव्हे तर आध्यात्मिक आणि भावनिक गरजाही पूर्ण करणं हे कर्तव्य पालकांचं आहे. यामध्ये, हितावह करमणुकीची तरतूद करणं सामील होतं.—नीतिसूत्रे २४:२७.

कधी कधी कौटुंबिक जीवनाच्या या पैलूकडं कानाडोळा होतो. नायजेरियातील एका मिशनरीच्या मते, “करमणूक म्हणजे पालकांना वेळेचा अपव्यय वाटतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. याचा परिणाम काय तर, मुलांना एकट्यावर सोडलं जातं आणि मग ते चुकीचे मित्र बनवतात आणि चुकीची करमणूक निवडू लागतात.” पालकहो, असे होऊ देऊ नका! तुमच्या मुलांना ताजेतवाने करणारी हितावह करमणूक पुरवण्याची खात्री करा.

पण, सावधानतेचा एक शब्द. ‘देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणाऱ्‍या’ आजकालच्या बहुतांश लोकांप्रमाणे ख्रिश्‍चनांनी होऊ नये. (२ तीमथ्य ३:१-४) होय, करमणुकीला जिथल्या तिथं ठेवावं. त्याकरवी माणसानं आनंद मिळवावा—स्वतःच्या जीवनावर त्याचं वर्चस्व गाजवू देऊ नये. म्हणून मुलांनाच काय तर प्रौढांना देखील फक्‍त योग्य प्रकारची करमणूक नव्हे तर योग्य प्रमाणातली करमणूक हवी असते.—इफिसकर ५:१५, १६.

इतर गोष्टींचा आनंद घेणे

बहुतांश लोकप्रिय करमणूक, लोकांना सक्रिय बनवण्याऐवजी निष्क्रिय बनवते. टीव्हीचच उदाहरण घ्या. टीव्ही बंद केल्यावर काय करावे (इंग्रजी) हे पुस्तक म्हणतं: “[टीव्ही] मुळातच निष्क्रियतेस अंगवळणी पाडतो; करमणूक इतकेच काय तर शिकणे देखील सक्रिय सर्जनशीलतेने नव्हे तर बसल्या ठिकाणी प्राप्त होत असते.” अर्थात, निष्क्रिय करमणुकीलाही स्थान आहे. पण त्यात कुणा व्यक्‍तीचा जास्तच वेळ जात असेल, तर मग ती व्यक्‍ती आनंदविणाऱ्‍या संधींपासून वंचित राहते.

स्वतःला “टीव्हीपूर्व पिढीचे सदस्य” म्हणणारे लेखक जेरी मँडर आपल्या बालपणातील त्या कंटाळवाण्या क्षणांचे वर्णन करत म्हणतात: “त्या कंटाळ्यात एक प्रकारची अस्वस्थता वाटायची. इतकं नको-नकोसं व्हायचं की शेवटी मला काहीतरी करावं असं वाटायचं. मग मी माझ्या मित्राला फोन करून त्याच्यासोबत बाहेर जायचो. फुटबॉल वगैरे खेळायचो. किंवा वाचायचो. पण स्वस्थ बसत नव्हतो. मागचा विचार केला, तर त्या ‘काहीही उद्योग नसलेल्या’ काळाचा कंटाळा हाच खरं म्हणजे सर्जनशीलतेस कारणीभूत ठरलेला रिकामटेकडेपणा होता.” मँडर यांचं असं निरीक्षण आहे, की आज मात्र मुलांचा कंटाळ्यावरील झट-की-पट उपाय म्हणजे टीव्ही. “टीव्हीमुळं सगळी उत्सुकता आणि सर्जनशीलता नष्ट होते,” असं ते पुढं म्हणतात.

अशाप्रकारे, अनेकांना याची प्रचिती मिळाली आहे, की निष्क्रियतेपेक्षा ज्या कार्यहालचालींमध्ये सहभाग घ्यावा लागतो त्या कार्यहालचाली त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक प्रतिफळदायी असू शकतात. इतरांसोबत मोठ्यानं वाचन करण्यात अनेकांना मजा वाटते. तर इतरजण संगीत वाद्य वाजवायचा किंवा चित्र रंगवायचा छंद जोपासतात. त्या व्यतिरिक्‍त, हितकर एकत्रीकरणं आयोजित करण्याच्या संधी देखील आहेत.c (लूक १४:१२-१४) घराबाहेरच्या करमणुकीचेही फायदे आहेत. स्वीडनमधील सावध राहा! चा एक बातमीदार म्हणतो: “काही कुटुंबं कॅम्पिंग किंवा फिशिंग करायला जातात किंवा वन्य पर्यटन करतात, होडीत बसून फेरी घेतात, डोंगर चढायला जातात वगैरे. लहान मुलांना या सर्व गोष्टी अतिशय आवडतात.”

करमणुकीमधील सवंगता पाहून आश्‍चर्य करण्याची काहीही गरज नाही. प्रेषित पौलानं लिहिलं, की परराष्ट्रीय “भ्रष्ट मनाने चालत आहेत.” (इफिसकर ४:१७) म्हणून, त्यांची पुष्कळशी करमणूक, ‘देहाच्या कर्मांना’ तृप्त करणारीच असेल. (गलतीकर ५:१९-२१) तथापि, करमणुकीचा दर्जा आणि प्रमाण याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी ख्रिश्‍चन स्वतःला तशी तालीम देऊ शकतात. ते सबंध कुटुंबासाठी देखील असं मनोरंजन ठेवू शकतात आणि आल्हाददायक ठरणारे तसेच आयुष्यभराच्या सुंदर आठवणी बनून राहणारे नवनवीन प्रकारही करून पाहू शकतात. होय, तुम्हाला हितावह करमणूक मिळू शकते!

[तळटीपा]

a ‘हसणे’ असे भाषांतरित केलेल्या इब्री शब्दाच्या इतर रूपांचा अनुवाद, “खेळणे,” “करमणूक सादर करणे,” “साजरा करणे,” किंवा “मौज करणे” असा होऊ शकतो.

b अधिक माहितीसाठी, पाहा सावध राहा! (इंग्रजी) मार्च २२, १९७८, पृष्ठे १६-२१, आणि डिसेंबर ८, १९९५, पृष्ठे ६-८ हे अंक.

c सामाजिक एकत्रीकरणांवरील शास्त्रवचनीय मार्गदर्शनांसाठी पाहा टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, १९९२, पृष्ठे २४-२९ आणि ऑक्टोबर १, १९९६ (इंग्रजी), पृष्ठे १८-१९.

[९ पानांवरील चित्र]

हितावह करमणूक लाभदायक असू शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा