वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ४/८ पृ. १६-१८
  • फुलं दाखवतात की कोणीतरी तुमची पर्वा करतं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फुलं दाखवतात की कोणीतरी तुमची पर्वा करतं
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्लास्टिक आच्छादित ग्रीनहाऊसेस आणि कृत्रिम तलाव
  • उत्पादनाची पूर्वयोजना
  • सिझनमध्ये कष्टाचं काम
  • रंगीबेरंगी व सुगंधी संदेश
  • खरी पर्वा असलेली व्यक्‍ती
  • “चला आपण एक भेटकार्ड पाठवू या”
    सावध राहा! माहितीपत्रक १३-३ (gbr13-3)
सावध राहा!—१९९७
g97 ४/८ पृ. १६-१८

फुलं दाखवतात की कोणीतरी तुमची पर्वा करतं

कोलंबिया मधील सावधराहा! नियत कालिकाच्या बातमीदाराकडून

चकित झालेली एक लहानशी मुलगी आपल्या इवल्याशा गुबगुबीत मुठीत शेवंतीची फुलं गोळा करून आपल्याला काय मिळालंय ते दाखवायला आईकडं पळत जाते. रस्त्यावरील एका छोट्या फुलांच्या दुकानात, एक प्रेमळ पती आपल्या पत्नीवर आपलं किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा एक गुच्छ निवडून घेतो. आपल्या आईची कदर करणारा मुलगा, तिला आनंदी करण्यासाठी जवळपासच असलेल्या फुलवाल्याला फोन करून डेलियाची ताजी फुलं मागवतो. एक सद्‌गृहिणी, कार्नेशनच्या रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ घेऊन आपल्या बाजाराच्या पिशवीत अगदी वरती ठेवते. ही फुलं, सुंदरपणे सजवलेल्या घराची शोभा वाढवतील.

फुलं तरुणांची तसंच वृद्धांचीही मनं प्रसन्‍न करतात. “कोणीतरी तुमची पर्वा करतंय” ही भावना कळवण्याचं ती उत्तम माध्यम आहेत. एक स्पॅनिश म्हण अशी आहे, “ज्या कोणाला गुलाब दिल्याचं मूल्य वाटत नाही त्याला दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीबद्दल मूल्य वाटणार नाही.” (क्वीएन नो अग्रेदेसे उना रोझ, नो अग्रेदेसरा नीनगुना कोसा.)

फुलांची विक्री सध्या अपूर्व प्रमाणात होत आहे. विमान परिवहनाच्या या युगात, लोकांना मोहवून टाकणाऱ्‍या या फुलांची लागवड दुकानांपासून, सुपरमार्केटपासून आणि रस्त्यावरील छोट्या दुकानांपासून दूर असलेल्या ठिकाणी होऊ शकते.

टाइम नियतकालिकानुसार, पुष्प उद्योगाची “दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि त्याहूनही जास्त त्यात बदल होत आहेत: अधिकाधिक उत्पन्‍न दक्षिण गोलार्धातून मुख्यतः कोलंबियातून येत आहे; होलंडच्या मागोमाग कोलंबिया हा निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे.”

प्लास्टिक आच्छादित ग्रीनहाऊसेस आणि कृत्रिम तलाव

कोलंबियाला गेल्या २५ वर्षांचा अनुभव असून कार्नेशन्सची निर्यात करण्यात त्याचा पहिला क्रमांक आहे तर पुष्पांची एकूण विक्री लक्षात घेता जगात त्याचा दुसरा नंबर आहे. सन १९६४ मध्ये, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने संपूर्ण वर्षभर पुष्पांची लागवड करायला सर्वात अनुकूल ठिकाणे कोणती हे शोधून काढण्यासाठी एक कॉम्प्युटर अभ्यास केला. त्याला असं आढळून आलं की, विषुववृत्ताच्या अगदी उत्तरेला आणि अँडीज पर्वतमालिकेच्या सुमारे २,८०० मीटर उंचीवर ज्या पर्वतीय खोऱ्‍यात बोगोटा वसलेलं आहे तिथलं हवामान आणि उंची अगदी अनुकूल होती.

कोलंबियातून ९२ टक्के निर्यात पुष्पोत्पादन होत असलेल्या सांता फे द बोगोटाच्या आश्‍चर्यकारक हिरव्या सव्हानात ठिकठिकाणी कृत्रिम तलाव आणि प्लास्टिक आच्छादित ग्रीनहाऊसेस दिसून येतात. या लाकडी अथवा धातूच्या बनवलेल्या ग्रीनहाऊसेसमध्ये काळजीपूर्वक नियंत्रित वसंतऋतूच्या वातावरणात लाखोलाख कार्नेशन, डेलिया, गुलाब, शेवंती, अलस्ट्रोमिरायस आणि इतर अनेक प्रकारची फुलं आहेत; लवकरच ही फुलं वेचून उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियात पाठवण्यासाठी पॅक केली जाणार आहेत.

फुलांच्या संवर्धनासाठी अनुकूल असलेलं तापमान १८ ते २० डिग्री सेल्सिअस दरम्यान असतं; हे सव्हानावरील वर्षभर असलेल्या दिवसाचं साधारण तापमान असतं. इथं, विपुल पर्जन्यवृष्टी होते, सुपीक जमीन आहे आणि लघूवेतनाची मजुरीही आहे. रात्रीचं तापमान जवळजवळ गोठण्याइतकं असू शकतं आणि कधीकधी तर -२ डिग्री सेल्सिअस इतकं खाली जाऊ शकतं. स्मज मडकी, हाय-वॉटेज बल्ब किंवा फवारे थंडीपासून संरक्षण करतात. लाईट बल्बचा उपयोग तर दिवस लांबवण्यासाठी होतो ज्यामुळे काही विशिष्ट झाडे जागृत राहतात आणि त्यांची वाढ जास्त लवकर होते.

उत्पादनाची पूर्वयोजना

कोलंबियात १,२०,००० पेक्षा अधिक कामगार पुष्पोद्योगाच्या कोणत्या न कोणत्या कामात गोवलेले आहेत. यांपैकी पुष्कळजण यहोवाचे साक्षीदार आहेत जे सव्हानावर विखुरलेल्या वसतींमध्ये राहतात. फाकाटाटिवा येथील एका मंडळीत ख्रिस्ती वडील या नात्याने सेवा करत असलेले बनिटो किनटाना एका नर्सरीत प्रोडक्शन सुपरव्हाईझर म्हणून काम करतात. ते अशी स्पष्टता देतात: “बाजाराच्या हंगामी मागण्या पूर्ण करण्यासाठी बऱ्‍याच महिन्यांआधी आम्हाला उत्पादनाची योजना करावी लागते. कार्नेशन्सची रोपटी हॉलंड किंवा इटली येथून तर डेलियाची फ्लोरिडातून मागवली जातात. स्त्रिया हे अंकुर काळजीने कापून उबदार ग्रीनहाऊसमधील मातीच्या ढिगाऱ्‍यात रोवतात; तिथं मुळं धरेपर्यंत त्यांच्यावर ढगासारख्या धुक्याने पाणी फवारले जाते. डेलियाला वाढायला २० ते ३५ डिग्री सेल्सिअसच्या (६८° ते ९५° फॅ.) तापमानात रात्री दोन तासांचा जादा प्रकाश देऊन १२ दिवस लागतात. कार्नेशन्स, १५ ते २५ डिग्री सेल्सिअसमधील (५९° ते ७७° फॅ.) तापमानात रात्रीच्या वेळी प्रकाश न देता २३ दिवसांत वाढतात. मग आम्ही दुसऱ्‍या ग्रीनहाऊसेसमधल्या वाफ्यांमध्ये ही रोपटी लावतो; तिथं खतपाणी घातलं जातं, त्यांच्यावर कीटकनाशक औषधे फवारली जातात आणि त्यांना पाणी घातलं जातं. अशारितीने कार्नेशन्सची फुलं यायला सहा महिने लागतात तर डेलियाच्या फुलांना तीन महिने लागतात.”

सिझनमध्ये कष्टाचं काम

फुलं वेचण्याची वेळ येते तेव्हा, स्त्रिया सर्वात उत्तम काम करतात आणि बहुधा त्या हातमोजे न घालता स्वच्छ हातांनी फुलं वेचतात. कळ्या किती उमलल्या आहेत किंवा दांडी सरळ आहे का हे पाहणं यंत्रांना जमत नाही; हेच घटक फुलाचा दर्जा ठरवतात.

फाकाटाटिवा येथील ह्‍यूडीथ कॉरडोर म्हणते: “स्त्रिया सबुरीनं काम करतात आणि कोमल हातांनी फुलं वेचतात तसंच त्या भरभर आणि कौशल्यानंही काम करतात.” ह्‍यूडीथ पुढे सांगते, “पहाटे आम्ही ग्रीनहाऊसेसमध्ये प्रवेश करतो तेव्हा बहुतेकदा सव्हानावर धुकं असतं; वातावरण खूप थंड असू शकतं, गोठण्याइतकं थंडसुद्धा. पुष्कळ मुली डोक्याला रूमाल बांधतात. मग नंतर वातावरण उष्ण होतं, कधी कधी तर ३२ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होतं. हे कष्टाचं काम आहे, खासकरून सिझन असतो तेव्हा आम्हाला घाई करावी लागते आणि ओव्हरटाईमसुद्धा करावा लागतो.”

रंगीबेरंगी व सुगंधी संदेश

फुलं वेचल्यावर ती खेळती हवा आणि भरपूर प्रकाश असलेल्या खास खोलीत ठेवली जातात. इथं स्त्रिया, कळ्यांचा दर्जा आणि दांड्यांचा सरळपणा, जाडी आणि लांबी यानुसार फुलं निवडून वेगवेगळी करतात. मग २५ फुलांचा एक गुच्छ, अशातऱ्‍हेने स्वच्छ प्लास्टिकमध्ये गुंडाळून पॅकींगसाठी ही फुलं तयार केली जातात. निर्यात करण्यासाठी फक्‍त उत्तम दर्जाची फुलंच निवडली जातात.

पुरुष, नर्सरीचं नाव असलेल्या खास कोरुगेटेड पुठ्याच्या बॉक्सेसमध्ये फुलं पॅक करतात—कार्नेशन्सचे २४ गुच्छ एका बॉक्समध्ये असतात. बनिटो यांचा भाऊ, आलेहान्ड्रो किनटाना जे पॅकींगमध्ये काम करतात, असे म्हणतात: “आम्हाला भरभर काम करावं लागतं कारण फुलं अतिशय लवकर कोमजतात. आमच्या कंपनीत, बॉक्सेसमधली उष्ण हवा शोषून दोन तासांसाठी थंड हवा सोडणारे दोन पंप आहेत, एका वेळी ११२ बॉक्स उरकले जातात आणि अशातऱ्‍हेने फुलांचं तापमान गोठण्याआधीच्या केवळ काही डिग्रींपर्यंत कमी केलं जातं. मग बॉक्सेसवरची बिळं बंद केली जातात आणि विमानतळावर फुलं पाठवण्यासाठी अवकाश असल्यास ती थंड खोलीत ठेवली जातात.”

बोगोटाच्या एल डोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर फुलांची निर्यात तपासणी केल्यावर परदेशी ठिकठिकाणी वाहून नेण्यासाठी मोठ्या जेट विमानांमध्ये घालेपर्यंत काही तासांसाठी ती थंड खोलीत ठेवली जातात. केवळ काही दिवसांनंतर ही फुलं कुणाच्या घरात, कुणाच्या ऑफिसमध्ये, कोणा आजारी व्यक्‍तीच्या खोलीत तर इतर कुठल्या ठिकाणी उमलत असतील आणि कोणीतरी तुमची पर्वा करतं हा रंगीबेरंगी आणि सुगंधी संदेश पसरवत असतील.

खरी पर्वा असलेली व्यक्‍ती

आपण पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी गेलो तरी आपल्याला आनंदविणारी फुलं नजरेस पडतातच. उंच पर्वतांवर, हिमाच्छादित प्रदेशांच्या आणि हिमनदींच्या कडेनं, रानांत आणि कुरणांत, ओहोळांच्या व नदींच्या काठांवर, समुद्रकिनारी एवढंच काय तर उष्ण, शुष्क वाळवंटातही फुलं दिसून येतात. पृथ्वीवर मानवाची निर्मिती होण्याच्या पुष्कळ काळाआधी फुलं होती. वनस्पतिशास्त्रवेत्त्यांचा असा दावा आहे, की ‘फुलणाऱ्‍या वनस्पती सर्व प्राणी आणि मानवी जीवनाचा आधार आहेत. त्यांच्याविना प्राणी आणि मानवसुद्धा अस्तित्वात येऊ शकले नसते.’

राजा शलमोनाने अंतर्ज्ञानाने असे म्हटले: “आपआपल्या समयी होणारी हरएक वस्तु [देवाने] सुंदर बनविली आहे.” (उपदेशक ३:११) यात देवाने विविध प्रकारच्या आणि शोभिवंत फुलांचं जे दान दिलं आहे तेही सामील होतं. वर्षानुवर्षांपासून फुलांनी आबालवृद्धांचे मन प्रसन्‍न केलं आहे. निश्‍चित, देव खरंच पर्वा करतो!

[१७ पानांवरील चौकट]

फुलं टिकवण्यासाठी

● फुलं फुलदाणीत घालण्याआधी फुलांच्या दांड्या पाण्यात धरून आडव्या कापा. दांड्यांच्या टोकांवर असलेल्या पाण्याच्या थेंबांमुळं वारं आत शिरून पाणी आणि पोषक पदार्थ शोषण्यास जो अडथळा निर्माण होतो तो दूर होईल.

● जेओमुंडो ही पत्रिका कोलंबियाच्या उद्यानविज्ञानशास्त्रनांचं म्हणणं उद्धृत करते की, पाण्यात एखादी ॲस्प्रिनची गोळी, एक चमचा साखर किंवा थोडासा कोला घातला तरी फुलं जास्त वेळेपर्यंत टवटवीत राहतील. प्रत्येक दोन ते तीन दिवसांनी पाणी बदला, साधारण तापमान असलेलं नवीन पाणी वापरा पण कळ्या लवकर उमलावयाच्या असतील तर कोमट पाणी सुद्धा वापरलं जाऊ शकतं.

● हलकीशी कोमजलेली फुलं जर पुन्हा टवटवीत करायची असतील तर दहा मिनिटांकरता त्यांच्या दांड्या गरम पाण्यात बुडवून पाकळ्यांवर थंडगार पाणी शिंपडत राहा. फुलं, उष्णतेपासून आणि जिथून वारं येतं त्या ठिकाणांहून दूर ठेवा आणि थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा