संघटित गुन्हेगारीचा तुमच्यावर होणारा परिणाम
जपान मधील सावधराहा! नियत कालिकाच्या बातमीदाराकडून
एका माफिया कंपूचा डॉन (म्होरक्या) आपल्या टोळीत नव्यानेच सामील झालेल्याच्या बोटावर एका टोकदार वस्तूने टोचतो. तिथे ठेवलेल्या ‘संताच्या’ चित्रावर टपटप रक्त सांडतं. मग, क्षणार्धात ते चित्र आगीत जळून भस्म होतं. मग, तो डॉन त्या तरुणाला बजावतो, ‘संघटनेच्या आतल्या गोष्टी फोडल्या तर तुझी पण या संतासारखीच गत होईल.’
इटॅलियन भाषेत ओमरटॉ म्हटल्या जाणाऱ्या गोपनीयतेच्या संहितेमुळे वर्षानुवर्षे संघटित गुन्हेगारी बऱ्याच प्रमाणात भूमिगत राहिली. परंतु, काही सदस्य टोळीला फितूर होत असल्यामुळे हल्ली सर्वदूर, या गुन्हेगारी टोळ्यांविषयी वर्तमान पत्रांच्या मुखपृष्ठांवर खळबळजनक बातम्या सहसा वाचायला मिळतात. या पेन्टीटी म्हणजेच पालट झालेल्या माफिया सदस्यांनी ज्यांचे पितळ उघडे पाडले त्यांपैकी सर्वात नामांकित व्यक्ती म्हणजे जूल्यो अँड्रेऑट्टी आहेत; त्यांनी तब्बल सात वेळा इटलीचे पंतप्रधानपद भूषवले असून सध्या त्यांची माफियाशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून न्यायालयीन चौकशी सुरू आहे.
इटली व संयुक्त संस्थानात कोसा नॉस्ट्रा या नावाने ओळखले जाणारे माफिया; दक्षिण अमेरिकेतील मादक पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्या संघटना; चीनमधील ट्रायड्स; जपानमधील याकूझा—अक्षरशः सबंध जगात या गुन्हेगारी संघटनांचा, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शिरकाव झाला आहे. त्यांच्या गैरधंद्यांचा आपल्या सर्वांवर परिणाम होतो आणि याचे पर्यवसान राहणी खर्च दिवसेंदिवस वाढत जाण्यात होते.
असे म्हटले जाते की संयुक्त संस्थानांतल्या माफियाने न्यूयॉर्क शहराचे, पाच गुन्हेगार कंपूंमध्ये विभाजन केले असून बेकायदेशीर पैसेवसूली, संरक्षणाच्या नावावर खंडणी घेणाऱ्या रॅकेट्स, भरमसाट व्याजावर कर्ज देणे, जुगार, मादक पदार्थांची अवैध खरेदी-विक्री आणि वेश्याव्यवसायातून त्यांना होणारी मिळकत अब्जावधी डॉलर्सच्या घरात जाते. कचरा-वहन व्यवसाय, ट्रान्सपोर्ट, बांधकाम, अन्न वाटप आणि कापड उद्योगांच्या मजूर संघांवर माफिया कंपूंचा जबरदस्त पगडा आहे असेही म्हटले जाते. मजूर संघावर असलेल्या त्यांच्या प्रभावामुळे एकीकडे ते मजूर-मालकांमधील मतभेदांचा सोक्षमोक्ष तर लावू शकतात पण, दुसरीकडे त्यांच्या मनात आल्यास ते जाणूनबुजून यंत्रसामुग्रीची नासधूस करवून एखाद्या प्रकल्पास ठप्प करू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी आज बुलडोजर चालेनासा होतो तर उद्या भराई यंत्राचे ब्रेक निकामी होतात, शिवाय कधी कधी कार्यकारी इंजिनियर हेतूपूर्वक काम न करता प्रकल्पाच्या कामाला “लांबण लावतात,”—टोळीच्या मागण्या, मग त्या लाचेच्या रूपात असोत किंवा बांधकाम कंत्राटांच्या रूपात असोत, त्या पूर्ण करायला बिल्डर जोवर तयार होत नाही तोवर असे आणि आणखीनही अनेक गैरप्रकार चालतच राहतात. खरे तर, टाईम नियतकालिकाच्या वृत्तानुसार, “टोळीला लाच दिल्यास उद्योजकांना वेळच्या वेळी सामानाची पोच होण्याची, मजूरांशी सलोखा कायम राहण्याची आणि स्वस्त दरांत मजूर उपलब्ध होण्याची हमी मिळते.”
कोलंबियामध्ये मादक पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्या दोन संघटनांमधील चढाओढ एवढ्या विकोपाला गेली की शेवटी त्यांपैकी मेडेलिन संघटनेचा प्रमुख, पॉब्लो एस्कोबॉर यास १९९३ साली गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यानंतर, सबंध जगातील कोकेनच्या अवैध व्यापारावर कॅली संघटनेचे वर्चस्व राहिले. एकट्या संयुक्त संस्थानांत १९९४ साली या संघटनेने सात सात अब्ज डॉलर मिळवले; त्यामुळे ती जगातल्या संघटित-गुन्हेगारीची कदाचित सर्वात मोठी सिंडिकेट बनली. परंतु, १९९५ साली तिचा प्रमुख सूत्रधार, होसे सान्टाक्रूस लॉन्डोन्यो याला गजाआड करण्यात आल्यामुळे या अवैध संघटनेला चांगलाच तडाखा बसला. तथापि, म्होरक्याची जागा घेण्यासाठी कोणी न कोणी टपून बसलेलाच असतो.
पोलादी पडद्याचा प्रभाव संपल्यावर, रशियन माफियाने आंतरराष्ट्रीय रंगमंचावर जणू प्रथम प्रवेश घेतला. परिणामस्वरूप, न्यूजवीक नियतकालिकात उद्धृत केलेल्या एका बँकरच्या शब्दांत, “आज रशियातील प्रत्येक लहानमोठ्या व्यापाराचा माफियाशी संपर्क येतो.” ब्रायटन बीच, न्यूयॉर्क येथेही रशियन माफिया, बेकायदेशीर पेट्रोल उद्योगांतल्या गुंतागुंतीच्या आणि धोकेबाज योजनांमधून भरमसाट नफा मिळवत असल्याचे वृत्त आहे. यामुळे मोटारगाड्यांच्या मालकांना तर भुर्दंड बसतोच, शिवाय सरकारलाही करांचे नुकसान भोगावे लागते. या रशियन टोळ्या पूर्व युरोपात वेश्याव्यवसायही चालवतात. त्यांच्या पुष्कळशा गुन्ह्यांविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही. नाहीतरी या शस्त्रधाऱ्यांपैकी पुष्कळसे, भूतपूर्व ॲथलीट्स आणि अफगाणिस्तानातील युद्धात भाग घेतलेले सैनिक असल्यामुळे त्यांना तोंड देण्याचे कोण धाडस करील?
पूर्वेकडील देशांतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. जपानमध्ये मनोरंजन व्यवसायातील लोकांनी आपापल्या परिसरातील याकूझा टोळीचा मान राखून त्यांना खंडणी न दिल्यास त्यांच्यावर नाना प्रकारची संकटे येण्याची भीती असते. येथेही दारू अड्डेवाल्यांकडून, तसेच वेश्यांकडूनही संरक्षणाच्या खंडणीची मागणी केली जाते. शिवाय, स्वतःच्या कंपन्या स्थापन करण्याद्वारे, बड्या उद्योगांतून पैसा उकळण्याद्वारे आणि परदेशातल्या गुन्हेगारी संघटनांशी संधान बांधण्याद्वारे याकूझाने जपानी अर्थव्यवस्थेत आपले पाय खोलवर रोवले आहेत.
हाँगकाँग आणि तायवानमधील गुन्हेगारी संघटना देखील संपूर्ण जगात आपले जाळे पसरवीत आहेत. ट्रायड्स या त्यांच्या नावाव्यतिरिक्त त्यांच्या संघटनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांचा इतिहास आपल्याला १७ व्या शतकापर्यंत मागे नेतो जेव्हा चीनवर ताबा मिळवलेल्या मंचुरियन लोकांविरुद्ध चीनी भिक्षू एकत्र आले होते. त्यांचे हजारो सदस्य असले तरीसुद्धा असे म्हटले जाते, की विशिष्ट गुन्ह्यासाठी किंवा एकापाठोपाठ अनेक गुन्हे करण्यासाठी हाँगकाँगमधील ट्रायड्स तात्पुरत्या सिंडिकेट्स निर्माण करतात, ज्यामुळे पोलिसांना सहजासहजी त्यांचा थांगपत्ता लागत नाही. हेरॉईनच्या अवैध खरेदी-विक्रीतून त्यांना अब्जावधी डॉलर मिळतात आणि हाँगकाँग तर बनावट क्रेडिट-कार्ड तयार करण्याचे जणू आगारच बनले आहे.
द न्यू एथनिक मॉब्स या आपल्या पुस्तकात विल्यम क्लाइंक्नेख्ट संयुक्त संस्थानांतील गुन्हेगारीविषयी सांगताना म्हणतात: “संघटित गुन्हेगारीच्या आधुनिक विश्वात वांशिक गँगस्टर्सपैकी चीनी गँगस्टर्सचे सर्वात उज्ज्वल भवितव्य आहे . . . चीनी गुन्हेगारांचे गट देशभरातील शहरांमध्ये प्रबल होत चालले आहेत. . . . न्यूयॉर्कमधील माफियाच्या पाठोपाठ त्यांचाच नंबर लागतो.”
हाँगकाँगमधून चालणाऱ्या आणखी एका प्रकारच्या तस्करीविषयी सं. सं. न्याय विभागाचे अधिकारी सांगतात: “परदेशी लोकांचे स्मग्लिंग करणे हा पण संघटित गुन्हेगारीचाच प्रकार आहे.” काही अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार दर वर्षी, १,००,००० चीनी लोक बेकायदेशीरपणे संयुक्त संस्थानांत येतात. अवैधपणे देशांतर करणाऱ्याला सहसा, कोणत्याही श्रीमंत देशात पोहंचवले जाण्यासाठी कमीतकमी १५,००० डॉलर मोजावे लागतात; या रकमेचा पुष्कळसा भाग तो मुक्कामी पोहंचल्यावरच भरतो. यामुळे, देशांतर केलेल्या अनेकांना, ढोरमेहनत करवून घेतल्या जाणाऱ्या कारखान्यांमध्ये सक्तीची मजूरी आणि वेश्यागृहांमध्ये शरीर विक्रय करावा लागतो आणि अशारितीने आपल्या स्वप्नातल्या देशात पोहंचल्यावर त्यांचे जीवन एक भयंकर दुःस्वप्न बनते.
तुम्ही स्वतः गुन्हेगारी हालचालींमध्ये गोवले जात नसल्यामुळे, संघटित गुन्हेगारीचा आपल्यावर परिणाम होत नाही असे कदाचित तुम्हाला वाटत असावे. पण हे खरे आहे का? दक्षिण अमेरिकेतील मादक पदार्थांची अवैध खरेदी-विक्री करणाऱ्या संघटनांकडून पुरवले जाणारे मादक पदार्थ विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे मिळवण्याकरता अनेक खंडांत राहणारे मादक पदार्थांचे व्यसनी, गुन्हेगारीकडे वळतात. गुन्हेगारी संघटना लोकोपयोगी उद्योगांचे कंत्राट कोणत्याही परिस्थितीत स्वतःशी संबंधित असलेल्या कंपन्यांनाच मिळवून देतात; यामुळे साहजिकच, नागरिकांना जास्त किंमती मोजाव्या लागतात. संघटित गुन्हेगारीच्या चौकशीसाठी राष्ट्रपतींनी नेमलेल्या आयोगाने एकदा असे विधान केले होते की संयुक्त संस्थानांत, “चोरी, पैसे उकळणे, लाचखोरी, किंमत नियंत्रण आणि व्यापार प्रतिरोध यांसारख्या संघटित गुन्हेगारीच्या विविध प्रकारांमुळे किंमतीत वाढ होते” तसेच, उपभोक्त्यांना माफियाला “एकप्रकारे अधिभारच” द्यावा लागतो. अशाप्रकारे, गुन्हेगारीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या तावडीतून कोणीही सुटत नाही. आपल्या सर्वांनाच किंमत मोजावी लागते.
पण, आज संघटित गुन्हेगारीची एवढी भरभराट का होत आहे?
“टोळीला लाच दिल्यास उद्योजकांना वेळच्या वेळी मालाची पोच होण्याची हमी मिळते”
[५ पानांवरील चौकट]
माफिया—त्यांचा मुळारंभ
“माफिया हे मध्य युगांच्या उत्तरार्धात सिसिली येथे उदयास आले. त्यांची सुरवात एका गुप्त संघटनेच्या रूपात झाली आणि या संघटनेचे सदस्य, त्यांच्या बेटावर विजय मिळवणाऱ्या—सॅरॅसेन, नॉर्मन आणि स्पॅनियर्ड यांच्यासारख्या अनेक परदेशी लोकांचे राज्य पालथे पाडण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समर्पित होते. सिसिलीच्या पुष्कळशा भागांत शतकानुशतके अराजकतेचे साम्राज्य असल्यामुळे स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर नव्हे तर दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास असणारे मालगुजार दरोडेखोरांपासून आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी माफी अर्थात लहानलहान खासगी सैन्यांना या कामावर लावत असत; माफियाचे आरंभीचे सदस्य याच सैन्यांतील होते. १८ व्या आणि १९ व्या शतकात, या खासगी सैन्यांतील बळकट दांडगेश्वर संघटित झाले आणि पाहता पाहता इतके शक्तिशाली बनले की ते उलट मालगुजारांचाच विरोध करू लागले आणि अनेक मालमत्तांचे स्वतःच सर्वेसर्वा बनले; ते मालगुजारांच्या पिकांचे संरक्षण करण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडून भरपूर पैसा उकळायचे.” (द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका) खंडणीची वसूली ही त्यांची मुख्य कार्यपद्धत बनली. याच पद्धती ते संयुक्त संस्थानातही घेऊन आले आणि येथे त्यांनी जुगार, मजुरांची पिळवणूक, सावकारी, मादक पदार्थांची अवैध खरेदी-विक्री आणि वेश्याव्यवसायही सुरू केला.