वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ३/८ पृ. २६-२८
  • लबाडीबद्दलची सत्यता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लबाडीबद्दलची सत्यता
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पहिली लबाडी
  • मरणप्राय परिणाम
  • खोलवर रुजलेली प्रथा
  • आजची धार्मिक लबाडी
  • दक्ष असण्याची गरज
  • सत्याच्या बाजूने उभे राहणे
  • खोटे बोलायला इतके सोपे का वाटते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • नेहमी खरं बोला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • मनुष्य नंदनवन गमावून बसतो
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • मृत कोठे आहेत?
    बायबल नेमके काय शिकवते?
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ३/८ पृ. २६-२८

लबाडीबद्दलची सत्यता

“लबाडखोर!” अशा खोचक शब्दांची तुमच्यावर कधी आतषबाजी झाली आहे का? असल्यास, त्यामुळे बसणारा भावनिक धक्का तुम्ही नक्कीच अनुभवला असेल.

ज्याप्रमाणे एखादी जतन केलेली फुलदाणी जमिनीवर पडल्यास तिचा चक्काचूर होऊन जाईल त्याचप्रमाणे एक बहुमूल्य नातेसंबंधही लबाडीमुळे बिघडू शकतो. काही कालावधीनंतर हे नुकसान तुम्ही दुरुस्त करू शकाल हे खरे असले तरी तो नातेसंबंध पूर्वी होता तसाच कदापि होणार नाही.

लबाडी—सार्वजनिक आणि खासगी जीवनातील एक नैतिक निवड (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “आपल्याशी लबाडी केली असल्याचे ज्यांना कळून चुकते ते तेथून पुढे अशा व्यक्‍तीसंबंधी आता दक्ष असतात. त्याचप्रमाणे अलीकडेच प्रकाशात आलेल्या लबाडीच्या आधारावर त्यांच्या गतकालीन विश्‍वासांचा व कृत्यांचा ते सखोल विचार करतील.” लबाडी प्रकट झाल्यानंतर, एकेकाळी निखालस परस्परसंवाद आणि भरवशामुळे जे नाते बहरत होते त्याला आता संदेहाची आणि शंकेची कीड लागू शकते.

लबाडीमुळे निर्माण होणाऱ्‍या कटू भावनांसहित आपण स्वतःस कदाचित असे विचारू की, ‘ही फसवी सवय कशी काय सुरू झाली?’

पहिली लबाडी

यहोवा देवाने, आदाम व हव्वा या पहिल्या मानवी दांपत्याला बनविले तेव्हा त्याने त्यांना एका सुंदर बागेसमान घरात ठेवले. त्यांच्या घरात कोणत्याही प्रकारची फसवणूक अथवा कपट अस्तित्वात नव्हते. ते खरोखरच एक परादीस होते!

तथापि, हव्वेची निर्मिती झाली त्याच्या काही काळानंतर दियाबल सैतानाने, मोहात पाडणारा एक प्रस्ताव तिच्यासमोर मांडला. हव्वेला सांगण्यात आले, की देवाने निषिद्ध केलेल्या “झाडाचे फळ” तिने खाल्ले तर देवाने सांगितले त्याप्रमाणे ती काही मरणार नव्हती. उलटपक्षी, ती ‘देवासारखी बरेवाईट जाणणारी’ होणार होती. (उत्पत्ति २:१७; ३:१-५) हव्वेचा सैतानावर विश्‍वास बसला. तिने ते फळ घेतले, स्वतः खाल्ले आणि त्यातले काही आपल्या पतीलाही दिले. परंतु, सैतानाने आश्‍वासन दिल्याप्रमाणे देवासारखे होण्याऐवजी आदाम आणि हव्वा दोघेही अवज्ञाकारी पापी अर्थात भ्रष्टतेचे दास बनले. (२ पेत्र २:१९) तसेच, ह्‍या पहिल्या लबाडीमुळे सैतान, “सर्व लबाडींचा बाप” बनला. (योहान ८:४४, टुडेज इंग्लिश व्हर्शन) कालांतराने, या तिघा पाप्यांना कळून चुकले की कोणीही, मग तो लबाडी करणारा असो अथवा लबाडीवर विश्‍वास ठेवणारा असो, केव्हाही विजेता ठरत नाही.

मरणप्राय परिणाम

हेतुपुरस्सर अवज्ञा करणारा शिक्षा भोगल्याशिवाय राहणार नाही हे स्वर्गातील आणि पृथ्वीवरील आपल्या सर्व निर्मितीने जाणावे, अशी यहोवाची इच्छा होती. त्या बंडखोर आत्मिक प्राण्याने त्याचे उरले आयुष्य देवाच्या पवित्र संघटनेबाहेर घालवण्याची शिक्षा त्याच्यावर फरमावून देवाने त्वरित कार्य केले. शिवाय, सरतेशेवटी सैतानाचा सर्वनाश केला जाईल याची देखील यहोवा देव खात्री करून घेईल. देवाने जिची तरतूद करण्याचे अभिवचन दिले होते ती “संतती” जेव्हा त्याच्या डोक्यावर एक प्राणघातक घाव करील तेव्हा हे घडून येईल.—उत्पत्ति ३:१४, १५; गलतीकर ३:१६.

आदाम व हव्वेने जे काही केले होते त्याकरता त्यांना एदेन बागेतून हाकलून देण्यात आले. देवाने आदामावर अशी शिक्षा ठोठावली की, “तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुनः मातीला जाऊन मिळशील; कारण तिच्यातून तुझी उत्पत्ति आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” कालांतराने, देवाने भाकीत केल्याप्रमाणे तो आणि हव्वा दोघेही मरण पावले.—उत्पत्ति ३:१९.

आदामाचे वंशज या नात्याने, सर्व मानवी कुटुंब ‘पापाला विकलेले आहे.’ सर्व मानवांनी, मृत्यूकडे नेणारी अपूर्णता वारशाने प्राप्त केली आहे. (रोमकर ५:१२; ६:२३; ७:१४) त्या पहिल्या लबाडीचे परिणाम किती भयंकर ठरले आहेत.—रोमकर ८:२२.

खोलवर रुजलेली प्रथा

सैतान व त्याच्यासह देवाविरुद्ध बंडाळी करणाऱ्‍या देवदूतांचा अद्याप नाश करण्यात आला नसल्यामुळे माणसांना ‘खोटे बोलण्यास’ ते प्रवृत्त करतात याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. (१ तीमथ्य ४:१-३) परिणामी, लबाडीची मुळे मानवी समाजात खोलवर रुजली गेली. लॉस ॲन्जेलेस टाइम्सने टिप्पणी केली: “लबाडी ही समाजाशी इतकी एकजीव झाली आहे, की तिच्यासंबंधी समाज आता पुष्कळशा प्रमाणात असंवेदनशील झाला आहे.” आज अनेक जण, राजकारण व राजकारण्यांचा संबंध निकटपणे लबाडीशी जोडतात, तरी धार्मिक नेते सर्वात कुप्रसिद्ध लबाडखोरांमध्ये गणले जात असल्याचे तुम्हाला ठाऊक होते का?

येशूच्या पृथ्वीवरील सेवेदरम्यान त्याच्या धार्मिक विरोधकांनी त्याच्याविषयी लबाडी पसरवली. (योहान ८:४८, ५४, ५५) “तुम्ही आपला बाप सैतान ह्‍यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. . . . तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे” असे म्हणून त्याने जाहीरपणे त्यांच्यावर आरोप ठेवला.—योहान ८:४४.

येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याची कबर रिकामी आढळली होती तेव्हा जी लबाडी पसरवण्यात आली ती तुम्हास आठवते का? बायबल म्हणते की मुख्य याजकांनी, “शिपायास पुष्कळ पैसे देऊन सांगितले की, ‘आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले,’ असे म्हणा.” ही लबाडी सर्वदूर पसरली आणि तिच्यामुळे पुष्कळांची फसगत झाली. खरेच, किती दुष्ट होते ते धार्मिक नेते!—मत्तय २८:११-१५.

आजची धार्मिक लबाडी

आज धार्मिक नेते करत असलेली सर्वात प्रमुख लबाडी कोणती आहे? ती, सैतानाने हव्वेला सांगितलेल्या लबाडीच्या साधर्म्यात आहे की: “तुम्ही खरोखर मरणार नाही.” (तिरपे वळण आमचे.) (उत्पत्ति ३:४) परंतु, हव्वा निश्‍चित मेली आणि ज्या मातीपासून तिला निर्मिले होते त्या मातीस ती पुन्हा जाऊन मिळाली.

तथापि, ती मेल्याचा केवळ भास झाला असून, खरे तर दुसऱ्‍या कोणत्यातरी रुपात ती जिवंत होती असा याचा अर्थ होता का? मृत्यू म्हणजे दुसऱ्‍या एका जीवनाकडे नेणारे प्रवेशद्वार आहे का? हव्वेचा एखादा सचेतन भाग जिवंत असल्याचे बायबल कोठेच दर्शवित नाही. तिचा जीव जिवंत राहिला नाही. देवाची अवज्ञा करून तिने पाप केले होते आणि बायबल म्हणते: “जो जीव पाप करीत आहे तो स्वतः मरेल.” (यहेज्केल १८:४, NW) आदामाप्रमाणे हव्वेची निर्मिती एक जिवंत जीव अशी केली होती आणि जिवंत जीव या नात्यानेच तिचे जीवन संपुष्टात आले. (उत्पत्ति २:७) मृतांच्या स्थितीबद्दल बायबल म्हणते: “मृतास तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) तथापि, सर्वसामान्यपणे चर्च कोणती शिकवण देतात?

अनेकदा चर्च अशी शिकवण देतात, की मानवांत एक अमर आत्मा असून दुसरे एक जीवन—परमसुखाचे अथवा यातनेचे जीवन अनुभवण्यासाठी मृत्यू त्यास मुक्‍त करतो. उदाहरणार्थ, कॅथोलिक एन्सायक्लोपिडिया म्हणतो: “नरकाग्नीतील वेदनांची अनंतता ही विश्‍वासाची एक वास्तविकता असल्याचे चर्च उघडउघड शिकवते; आणि पाखंडीमत प्रकाशात आल्याशिवाय कोणीही ही वास्तविकता नाकारू शकत नाही अथवा त्याविषयी शंकाही बाळगू शकत नाही.”—खंड ७, पृष्ठ २०९, १९१३ ची आवृत्ती.

ही शिकवण, बायबल सरळसोट शब्दांत जे शिकवते त्याच्या किती विषमतेत आहे! एखादा मनुष्य मरतो तेव्हा “तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो” असे बायबल शिकवते. (स्तोत्र १४६:४) तर मग बायबलनुसार, मृतांना कशाचीही शुद्ध नसल्यामुळे त्यांना कोणत्याही वेदना होऊ शकत नाहीत. म्हणूनच बायबल आर्जवते: “जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे [मानवजातीची सर्वसामान्य कबर] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्‍ति-प्रयुक्‍ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.”—उपदेशक ९:१०.

दक्ष असण्याची गरज

ज्याप्रमाणे येशूच्या काळातील याजकांच्या लबाडींमुळे पुष्कळांची दिशाभूल झाली त्याचप्रमाणे आजच्या धार्मिक नेत्यांच्या खोट्या शिकवणुकींमुळे फसवणूक होण्याचा धोका आहे. ह्‍या लोकांनी “देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली,” तसेच मानवी जीवाचे अमरत्व अशा खोट्या शिकवणुकी व नरकाग्नीत मानवांना यातना दिल्या जातील ही कल्पना ते पुरस्कारतात.—रोमकर १:२५.

या व्यतिरिक्‍त, आजकालचे धर्म मानवी संप्रदाय व तत्त्वज्ञान यांना बायबल सत्याच्या बरोबरीचे स्थान प्रदान करतात. (कलस्सैकर २:८) यास्तव, नैतिकता व त्याबरोबरच प्रामाणिकपणा आणि लैंगिक आचरण यांवरील देवाच्या नियमांकडे, ते सशर्त नाही तर परिपूर्ण असल्याचे पाहिले जाते. याच्या परिणामाबद्दल टाइम नियतकालिकात असे वर्णन केले आहे: “जेव्हा लोकांना इतरांप्रती असणाऱ्‍या आपल्या आचरणांचे नियमन करणारे नियम समजत नाहीत अथवा पटत नाहीत अशा सामाजिक अनिश्‍चिततेत लबाडी झपाट्याने वाढते.”—पडताळा यशया ५९:१४, १५; यिर्मया ९:५.

जेथे सत्याला अगदी गौण लेखले जाते अशा एका वातावरणात जगत असल्यामुळे खोटे न बोलण्यासंबंधीच्या देवाच्या सूचनेचे पालन करणे जड जाते. तरीदेखील नेहमी सत्यशील असण्यास कोणती गोष्ट आपली मदत करू शकते?

सत्याच्या बाजूने उभे राहणे

निर्माणकर्त्याला गौरविण्याची आपली मनीषा, सत्य बोलण्यास आपल्याला सर्वात उत्तम प्रेरणा प्रदान करते. सार्थपणे, बायबल देवाला “सत्यस्वरूप देव” असे संबोधते. (स्तोत्र ३१:५) तर मग, ‘लबाड बोलणाऱ्‍या जिव्हेचा’ वीट मानणाऱ्‍या निर्माणकर्त्याला प्रसन्‍न करण्याची आपली इच्छा असल्यास त्याचे अनुकरण करण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल. (नीतिसूत्रे ६:१७) आपण हे कसे करू शकतो?

देवाच्या वचनाचा मनःपूर्वक अभ्यास आपणास ‘आपापल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोलण्यास’ समर्थ करील. (इफिसकर ४:२५) तथापि, देव आपल्याकडून काय अपेक्षितो केवळ एवढेच माहीत असणे पुरेसे नाही. जगातील कित्येकांप्रमाणे सत्य बोलण्याकडे आपला नेहमी कल नसल्यास सत्य बोलण्याकरता आपल्याला कठोर प्रयत्न करावे लागतील. आपल्याला प्रेषित पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करून स्वतःशी कठोर व्हावे लागेल. पौलाने लिहिले: “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो.”—१ करिंथकर ९:२७.

प्रार्थना ही सत्य बोलण्याच्या आपल्या संघर्षात आपणास मदत करणारी आणखी एक गोष्ट आहे. साहाय्याकरता यहोवाकडे विनंती केल्याने “सामर्थ्याची पराकोटी” आपल्याला प्राप्त होईल. (२ करिंथकर ४:७) खरेच, “सत्यतेचा ओठ” राखण्यासाठी व “खोटी जीभ” त्यागण्यासाठी कदाचित आटोकाट प्रयास करावे लागतील. (नीतिसूत्रे १२:१९, पं.र.भा.) परंतु, यहोवाच्या मदतीने ते साध्य होऊ शकते.—फिलिप्पैकर ४:१३.

लबाडी करणे ही सर्वसामान्य बाब असल्याचे दियाबल सैतानच भासवत असतो हे नेहमी लक्षात असू द्या. त्याने पहिली स्त्री अर्थात हव्वा हिच्याशी आकसपणे लबाडी करून तिला फसविले. तथापि, सैतानाच्या फसव्या मार्गांचे संकटमय परिणाम आपणा सर्वांना चांगलेच माहीत आहेत. केवळ एका स्वार्थी लबाडीमुळे व तीन स्वार्थी व्यक्‍ती—आदाम, हव्वा आणि सैतान यांमुळे मानवी कुटुंबावर अतोनात दुःख ओढवले आहे.

होय, लबाडीबद्दलची सत्यता म्हणजे तिची तुलना मरणप्राय विषाबरोबर करण्याजोगी आहे. असे असले तरी, यातून आपण मार्ग काढू शकतो ही दिलासा देणारी गोष्ट आहे. आपण लबाडी करण्याची वहिवाट सोडून “दयेचा व सत्याचा सागर,” असलेला देव यहोवा याच्या कृपापसंतीचा आनंद सैदव लुटत राहू शकतो.—निर्गम ३४:६.

[२८ पानांवरील संक्षिप्त आशय]

लबाडीची तुलना मरणप्राय विषाबरोबर करण्याजोगी आहे

[२६ पानांवरील चित्र]

लबाडीचे परिणाम चक्काचूर होणाऱ्‍या फुलदाणीसारखे आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा